प्रतिभावंत लेखणीची पंचविशी (Superstar Writer Ce...

प्रतिभावंत लेखणीची पंचविशी (Superstar Writer Celebrates 25 Years In Serial Writing)

मराठी मालिकांची सुपरस्टार लेखिका रोहिणी निनावे तिच्या लिखाणाचा रौप्य महोत्सव या तीन ऑक्टोबर रोजी साजरा करत आहे. तिच्या लिखाणाचा 25 वर्षांचा प्रवास जाणून घेऊया थेट रोहिणी निनावे यांच्याकडून!
मराठीतील दामिनी, अवंतिका, अवघाचि संसार, माझ्या नवर्‍याची बायको, अग्गं बाई सासूबाई, मुलगी झाली हो, अजून ही बरसात आहे तर हिंदीमधील कुसुम, संजीवनी, इस प्यार को मै क्या नाम दू, यहाँ मै घर घर खेली या सगळ्याच मालिका प्रचंड गाजल्या. या सगळ्याच मालिका नायिकाप्रधान आहेत आणि या मालिकांचं वैशिष्ट्य म्हणजे या मालिकांतील सगळ्या स्त्री व्यक्तिरेखा एका लेखिकेने लिहिल्या आहेत. मराठी डेली सोपची सुरुवात तिच्या लेखणीने झाली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ही लेखिका तिच्या लिखाणाचा रौप्य महोत्सव या तीन ऑक्टोबर रोजी साजरा करत आहे. लिखाणाचा रौप्य महोत्सव साजरा करणारी कदाचित ती पहिलीच लेखिका असावी. प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारी ही लेखिका आहे रोहिणी निनावे. लिखाणाचा 25 वर्षांचा हा प्रवास जाणून घेऊया थेट रोहिणी निनावे यांच्याकडून!

तुम्ही लेखन क्षेत्राकडे कशा काय वळलात?
वडील लेखक असल्याने त्यांचे लेखन गुण माझ्याकडे वारसाने आले. मराठी आणि हिंदी साहित्य विषय घेऊन एम.ए. केल्याने खूप वाचनही झाले आणि त्यातून कुठेतरी लिखाणाची उर्मी मनात जागृत झाली. वडिलांचं प्रोत्साहन होतंच. मी मंत्रालयात नोकरी करत होते. तिथे आधी अनुवादक, नंतर उपसंपादिका, मग संपादिका, त्यानंतर गॅझेटेड ऑफिसर या प्रवासात बरेच अनुभव गाठीशी आले.
हिंदी कविता, उर्दू शायरीची आवड पूर्वीपासून होतीच. मुशायर्‍यांमध्ये कविता वाचायचे. ङ्गइंतझारफ नावाच्या माझ्या हिंदी उर्दू पुस्तकाच्या प्रकाशनाला निदा फाजली हे मोठे शायर आले होते. प्रथम शीर्षक गीत आणि अभिनयाद्वारे मी मालिका क्षेत्रात प्रवेश केला. याच दरम्यान अधिकारी बंधूनी त्यांच्या मालिका मराठीमधून हिंदीमध्ये रूपांतरित करण्याची संधी दिली. त्यातच गौतम अधिकारी यांनी पत्रकारितेवर आधारित एखादी कथा आहे का, असं विचारलं. मंत्रालयातील कामाचा आणि प्रत्यक्ष आयुष्याचा जो काही अनुभव होता त्याच्या आधारे मी दामिनीचं लेखन सुरु केलं. हा प्रवास कुठल्याच अर्थाने सोपा नव्हता. दुसर्‍याला श्रेय न देण्याची, दुसर्‍याचा उत्कर्ष न पाहू शकण्याची वृत्ती, आईचं आजारपण, अपमान, कारस्थानं यांना तोंड देत दामिनी मालिकेचे 1050 भाग मी लिहिले. आता मला काही वेगळं लिहायचं होतं. विशेषतः स्मिता तळवलकरां सारख्या सुविद्य सुजाण निर्मातीसाठी आणि तशी संधीही आली अवंतिकाच्या निमित्ताने. माझ्या आयुष्यातला अत्यंत सुखद काळ होता तो!

आतापर्यत किती लिखाण केलंय?
जवळ जवळ 72 मालिका आणि 12000 हुन अधिक मालिकेचे भाग लिहिले आहेत.

या क्षेत्रातील तुमचे आदर्श कोण?
सर्वात प्रथम माझे वडील वसंत निनावे. ते एक उत्तम लेखक होते. आपल्याकडे मराठी साहित्यिकांची मांदियाळी आहे. भरभरून ओंजळीत घ्यावे तितके कमी. पण माझे विशेष आवडते लेखक म्हणजे व.पु.काळे, शं. ना. नवरे, रत्नाकर मतकरी. मालिका लेखनासाठी आवश्यक असलेले मध्यमवर्गीय माणसाचं भावविश्व त्यांच्या लेखनातून फार प्रभावीरित्या प्रतिबिंबित झालं आहे!

पात्रं कशी सुचतात, तुमच आवडतं पात्रं कोणतं ?
खरंतर अनेक पात्रं आपल्या आजूबाजूला असणार्‍या माणसांमध्येच दडलेली असतात. लेखकाने आसपासच्या माणसांचं सतत निरीक्षण करत राहिलं पाहिजे. त्यांचा अभ्यास करत राहिलं की या व्यक्तिरेखा सापडायला मदत होते. दामिनी मध्ये तर सुरुवातीलाच जवळजवळ 60 पात्रे होती. जी मी कधी ना कधी पाहिली होती, त्यांना भेटले होते. ही पात्रे रंगवतानाही खूपदा आपण केलेल्या वाचनाचा फायदा होतो. व्यक्तिरेखेची पांढरी, काळी आणि ग्रे शेड दाखविण्यस मदत होते. माझं सर्वात आवडतं पात्र म्हणजे अवंतिका. हे पात्र लिहिताना दिग्दर्शिका स्मिता तळवळकर यांनी मुक्त वावर करु दिला होता. त्यामुळे माझ्या मनातली व्यक्तिरेखा मला लिहिता आली. दामिनी ही माझी लेखिका म्हणून नावलौकिक मिळवून देणारी पहिली व्यक्तिरेखा. ती मला खूप जवळची वाटते. एक बंड्खोर विचारांची, अन्याय दिसला की पेटून उठणारी अशी ती व्यक्तिरेखा होती. माझ्या जवळपास सर्वच नायिकांमध्ये दामिनी ही कधी न कधी डोकावते. कारण प्रत्येक स्त्री मध्ये दामिनी दडलेली आहे असे मला वाटते. माझ्या नवर्‍याची बायको मधील नायिका राधिका हे देखील माझं आवडतं पात्र. मुलगी झाली हो यातील ममाऊफ ही नायिका मुकी दाखवली आहे. नायिका मुकी दाखवण्यचा धोका आहे. प्रेक्षक मुक्या नायिकेला स्वीकारणार नाही, असं अनेकांचं म्हणणं होतं. मात्र ही व्यक्तिरेखा लोकांना भावली अन् त्यांनी ती स्वीकारली याचा खूप आनंद वाटतो.

मालिका लेखनाचं काम हे शापित गंधर्वासारखं आहे, असे का म्हटले जाते?
मालिका लेखनाचं काम म्हणजे सोप्प असतं असं अनेकांना वाटतं. पण ते तसं मुळीच नाही. मालिका लेखन करताना दिलेल्या वेळेत लिखाण देणं आवश्यक असतं. तुमच्या काहीही समस्या असतील त्याच्याशी काही देणं घेणं नसतं. आई इस्पितळात असताना मी कित्येकवेळा जमिनीवर बसून, रात्रभर जागून लिखाण पूर्ण करून दिलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत लेखकाला वेळ मर्यादा पाळावीच लागते. कोणत्याही व्यक्तिरेखेला जन्म देण्याचं काम लेखक करत असतो. पण ती व्यक्तिरेखा हिट झाली की लेखकाकडे कोणाचंच लक्ष नसतं. मालिकेचा लेखक कोण आहे हे सर्वसामान्य प्रेक्षकाला ठाऊक पण नसतं. हे फारच दुर्दैवी आहे.
मालिकेच्या भागांची संख्या मर्यादित असेल तर मालिकांचा दर्जा टिकून राहील असं वाटतं का?
हो. नक्कीच. पूर्वीच्या मालिका मर्यादित भागांच्याच होत्या. त्यामुळे लेखकाला विचार करायला वेळ मिळत होता. पण आता रोज रतीब घालावा लागतो. परिणामी त्या मालिकेचा दर्जा घसरतो आणि त्याचं खापर मात्र लेखकावर फोडलं जातं. लेखकाला वेळ द्या. त्याला वेठबिगार्‍यासारखं वागवू नका. माझ्या मते मालिका 104 भागांमध्ये किंवा वर्षभरात आटोपली तर मालिकेचा दर्जा टिकून राहील.

रौप्यमहोत्सवातून सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करताना काही योजना?
आतापर्यंत अनेक मालिकांसाठी लेखन केलं. शीर्षक गीते लिहिली. चित्रपटासाठी लेखन केलं. आता वेबसिरिज हा आधुनिक प्रकार हाताळायचा आहे. मी काही कविता लिहिल्या आहेत. त्यांचा कवितासंग्रह देखील प्रकाशित करण्यचा मानस आहे. नाटक देखील लिहायचा विचार आहे.
या क्षेत्राकडे वळणार्‍या तरुणाईस काय संदेश द्याल?
नक्की या क्षेत्रात या. पण थोडी तरी तयारी करून या. निदान नीट मराठी तरी येऊ द्या. साधा मी आणि तूचा,  तू हृस्व की दीर्घ हेही किती जणांना ठाऊक नसतं. भाषेचा पाया मजबूत असला पाहिजे. लिहिण्यासाठी वाचन, निरीक्षण खूप महत्वाचं आहे. माणसं वाचायला शिका, त्यांचं निरीक्षण करा. परकाया प्रवेश करुन लिहिण्यएवढी प्रतिभा संपन्नता असली पाहिजे. संत वाङ्मयाचा अभ्यास करा. ते जीवनाचं सार सांगतात. संवेदनशीलता जपा. लेखनाचं तंत्र शिकून घ्या. मालिका लेखन ही एक कला आहे. ती शिकावी लागते. प्रतिभा मात्र जन्मजात असावी लागते. ती असणं फार गरजेचं आहे. मराठीमध्ये कलेची आणि कलाकारांची उणीव नाही. ती अधिकाधिक दर्जेदार व्हावी यासाठीच आमचा प्रयत्न चालू असतो आणि पुढच्या पिढीने हा लेखनाचा वारसा पुढे चालवावा!
रोहिणी निनावे यांची ही वाटचाल सुवर्ण महोत्सवाकडे दमदारपणे होवो यासाठी त्यांना शुभेच्छा.