सनी लियोनीचा ‘शांताबाई’ या अतीव लोकप्रिय गाण्या...

सनी लियोनीचा ‘शांताबाई’ या अतीव लोकप्रिय गाण्यावर मराठी चित्रपटात डान्स (Sunny Leoni’s ‘Shantabai’ Dance In Marathi Film)

सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री सनी लिओनीने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केल्यानंतर तिने प्रादेशिक चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला आहे. तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर आता सनी मराठीमध्ये आणखी एका गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. यापूर्वी सनीने ‘बॉईज’ या मराठी चित्रपटाच्या ‘कुठं कुठं जायच हनिमूनला’ या गाण्यावर थिरकून मराठी प्रेक्षकांची मने जिंकली होती. लवकरच सनी लिओनी संजीव कुमार राठोड निर्मित व दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘आमदार निवास’मध्ये ‘शांताबाई’ या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.

आगामी ‘आमदार निवास’ या चित्रपटाच्या निमित्ताने सनी आपल्याला आधुनिक शांताबाई रूपाने भेटणार आहे. या मराठी आयटम सॉन्गची बॉलीवुडने सुद्धा दखल घेतली असून या गाण्याची बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा रंगू लागली आहे. आधुनिक ‘शांताबाई’चा अवतार पाहायला सगळेच उत्सुक आहेत.

२०१५ मध्ये ‘शांताबाई’ या गाण्याने महाराष्ट्रात नाही संपूर्ण जगात अक्षरश: धुमाकुळ घातला होता. आतापर्यंत युट्यूबवर या गाण्याला ८५ करोडपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. सुमीत म्युझिकच्या मालकीचे हे गाणे आता जय जगदंब प्रोडक्शनने घेतले असून महाराष्ट्राची आधुनिक शांताबाई म्हणून सनी लियोनी या गाण्यात दिसणार आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर विष्णू देवाने या आयटम सॉन्गचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. तर संजय लोंढे यांचं मूळ गीत असलेलं हे गाणं नितीन सावंत यांनी पुनर्निर्मित करून या गाण्याला आधुनिकतेची झालर घातली आहे.

‘शांताबाई’ या गाण्याची भव्यता आणि गावरान बाज असलेल्या सनी लिओनीच्या दिलखेच अदांनी प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. तर या शांताबाई या गाण्याच्या निमित्ताने संजीवकुमार राठोड यांनी गायक संजय लोंढे यांना एक मोठी संधी दिली आहे.