पालकत्त्व शिकविणाऱ्या नेटकऱ्यांना सनी लियोनीने ...

पालकत्त्व शिकविणाऱ्या नेटकऱ्यांना सनी लियोनीने चांगलाच धडा दिला, म्हटलं – ‘एका फोटोवरुन पालकत्त्व सिद्ध होत नाही’ (Sunny Leone slams trolls attacking her parenting, says- One photo doesn’t dictate who we are as parents)

सनी लियोनी पालकत्त्वावरून नेहमीच ट्रोलर्सच्या तावडीत सापडते. दत्तक घेतलेली मुलगी निशावरुन तर तिला बरेचदा ट्रोलर्सकडून खडे बोल ऐकावे लागले आहेत. काही दिवसांपूर्वी असंच घडलं, पण यावेळी मात्र सनीची सहनशक्ती संपली आणि तिने टोलर्सना सडेतोड उत्तर दिले.

सनीने २०१७ मध्ये महाराष्ट्रातील लातूर येथील एका अनाथालयातून एका मुलीला दत्तक घेतलं होतं. त्यानंतर सरोगसी पद्धतीने ती दोन मुलांची आई बनली. त्यानंतर ट्रोलर्सनी ती आपल्या दत्तक मुलीकडे लक्ष देत नाही, असा आरोप करत तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्या दरम्यान सनीचा एक फॅमिली फोटो समोर आला, ज्यात सनी आणि पती डेनियल वेबरने आपल्या मुलीचा निशाचा हात पकडला नव्हता. एवढ्या कारणावरून लोकांनी तिला सतत टोकायला सुरुवात केली. निशा दत्तक मुलगी आहे, म्हणून तिचा हात पकडला नाही का? असे प्रश्न सुरू झाले. सनीने यांना असं उत्तर दिलं आहे की, सगळ्यांची बोलती आता बंद होईल.

ती म्हणाली, ‘सोशल मीडियावरील अशा प्रकारच्या कमेंट्‌सकडे मी लक्ष देत नाही आणि त्या वाचतही नाही. परंतु, डेनियल हे सर्व वाचतो आणि त्याला त्याबद्दल वाईट वाटतं. मलाही वाईट वाटतं. पण एकाच गोष्टीमुळे दोघांनी दुःखी होऊन कसं चालेल.’

सनी पुढे म्हणाली, ‘मी डॅनियलला नेहमी समजावून सांगते, की मुर्खासारख्या कमेंट्‌स करणारे हे लोक ना तुला ओळखतात ना मला. तसेच आपण आपल्या मुलांची काळजी कशी घेतो हे त्यांना माहीत नाही. आपण पालकत्वासाठी एक स्टँडर्ड ठरवले आहे, जे इतर पालक करत नाहीत. हे लोक ना आमच्या मुलांशी खेळतात ना त्यांच्यासाठी स्वयंपाक करतात, त्यामुळे असे लोक फक्त फोटो पाहून आपल्या पालकत्वाबद्दल बोलू शकत नाहीत.’

सनी लिओनीने सांगितले की, तिचा पती डॅनियल निशासाठी खूप प्रोटेक्टीव्ह आहे आणि जर कोणी तिला वाईट बोलले तर त्याला खूप त्रास होतो.

याआधीही सनी लिओनी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. आपल्या तिन्ही मुलांसोबत रस्त्यावरून जाताना सनीने दोन्ही मुलांचा हात धरला होता तर मुलगी एकटीच पायऱ्या उतरत होती. त्यावेळेसही युजर्सनी तिला जोरदार फटकारले होते, त्यावेळेस तिचा पती डॅनियल तिच्या बचावासाठी पुढे आला होता.