जिममध्ये जीव जाण्याची सुनील शेट्टीने केलेली कार...

जिममध्ये जीव जाण्याची सुनील शेट्टीने केलेली कारणमीमांसा: काळजी घेण्याची दिली सूचना (Sunil Shetty Told Why People’s Lives Are Going In The Gym, Take Special Care Of These Things)

जिममध्ये वर्कआउट करताना मृत्यू होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. जिममध्ये वर्कआउट करताना अनेक चित्रपट आणि टीव्ही कलाकारांनी आपले जीव गमावले. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत सूर्यवंशीचा जिममध्ये वर्कआउट करताना मृत्यू झाला होता. त्यांच्या आधी प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव हे देखील जिममध्ये वर्कआउट करताना बेशुद्ध पडले आणि रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या आधी सलमान खानचा बॉडी डबल म्हणून प्रसिद्ध असलेल्या 50 वर्षीय सागर पांडेलाही जिममध्ये वर्कआऊट करताना जीव गमवावा लागला होता. तसेच गेल्या वर्षी साऊथचा सुप्रसिद्ध स्टार पुनीत राजकुमार यालाही वर्कआउटदरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता, रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.

त्यामुळे जिममध्ये वर्कआऊट करताना अचानक लोक का मरत आहेत हा प्रश्न सर्वांना पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीने दिले आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात फिट कलाकारांच्या यादीत सुनील शेट्टीचे नाव घेतले जाते. तो आजही तितकाच फिट आणि देखणा दिसतो. सध्या तो आपल्या आगामी ‘धारावी बँक’ या वेब सिरीजमुळे चर्चेत आहे. या वेब सिरीजबाबत घेण्यात आलेल्या एका मुलाखतीत त्याला विचारण्यात आले की, व्यायामादरम्यान मृत्यूचे प्रमाण का वाढत आहे ?

या प्रश्नाचे उत्तर देताना सुनील म्हणाला, “त्यांनी घेतलेल्या सप्लिमेंट्समुळे, स्टिरॉइड्समुळे ही समस्या निर्माण होते. वर्कआउट ही समस्या नाही किंवा ते मर्यादेपलीकडे शरीर ताणत आहेत असेही नाही. हा हृदयविकाराचा झटका नसून हृदय निकामी होणे आहे,  सप्लिमेंट्स आणि स्टिरॉइड्समुळे ह्रदय निकामी होते.

दुसरीकडे, सुनील शेट्टी व्यतिरिक्त अभिनेता सैफ अली खानने देखील जिममध्ये वर्कआउट करताना वाढलेल्या मृत्यूच्या प्रमाणाबद्दल सांगितले. तो म्हणाला, “खाण्याच्या योग्य सवयी नसणे आणि झोप न लागणे यामुळे असे होते. या सर्व समस्या त्यामागे कारणीभूत आहेत. आणि लक्षात ठेवा की योग्य आहार घेणे म्हणजे पोषण घेणे. हे पोषण योग्य आणि पुरेसे असावे.

याशिवाय जिम करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत सुनील शेट्टीने सांगितले की, “कोविडनंतर शरीरात रक्ताच्या गुठळ्या तर बनल्या नाहीत ना याची तपासणी करणे आवश्यक आहे. कोविडमुळे रक्त गोठण्याची समस्या वाढत आहे आणि ती धोकादायक ठरू शकते. त्यामुळेया सर्व गोष्टी नीट तपासा आणि मग जिममध्ये व्यायाम करा. “

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम