शरीरात थंडावा राखणारे खाद्यपदार्थ (Summer Speci...

शरीरात थंडावा राखणारे खाद्यपदार्थ (Summer Special: Fruits And Juices To Keep Body Cool)

निरुत्साह, थकवा येणं, शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणं… असं होऊ लागलं की समजायचं आला उन्हाचा महिना… यावर उत्तम उपाय म्हणजे थंडावा देणारं खा नि प्या…
उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत. अंगाचा दाह होत आहे. यामुळे दोन गोष्टी प्रामुख्याने होतात. एक म्हणजे निरुत्साही वाटते. कारण अंगातील एनर्जी लेव्हल कमी होते. अन् दुसरी म्हणजे अंगात कोरड पडणे (डिहायड्रेशन). या दोन्ही गोष्टींनी हैराण होऊन तब्येत बिघडवून घेण्यापेक्षा काही नैसर्गिक उपायांनी आरोग्य राखता येईल. आपल्या खाद्यपेयांच्या मदतीने या दिवसात तंदुरुस्त राहता येईल.

लिंबू सरबत


उन्हाचा हल्ला रोखणारा इतका साधा आणि परिणामकारक उपाय कोणताही नसेल. उन्हाळ्याच्या तलखीने शरीर आतून-बाहेरून कोरडं पडतं. (डिहायड्रेशन होतं.) त्याच्याने माणूस मलूल होतो. त्याला काही करावंसं वाटत नाही. ही निष्क्रियता घालविण्याचा व अंगात ओलावा निर्माण करण्याचा लिंबू सरबत हा अक्सीर इलाज आहे. थंड (म्हणजे फ्रिजमधील थंडगार नव्हे) किंवा गरम पाण्यातही ते घ्यावं. बर्फ अजिबात टाकू नका. एक संपूर्ण पेला घोट घोट करत प्यावा. दिवसाची सुरुवात गरम पाण्यातील लिंबू सरबतानं करा आणि दिवसभरात तीनदा तरी ते प्या. बघा, कसा फरक पडतो ते! थकवा जाईल, उत्साह येईल.

काकडी


काकडी कापताच तिचा थंडावा जाणवतो. तिच्यातून पाणी ओघळू लागते. या नैसर्गिक पाणीयुक्त गराचा औषधी उपयोग होतो. अंगातील उष्णतेला काकडी बाहेर काढते. अन् शरीरास थंडावा देते. शिवाय तिच्यात पोषणमूल्ये आहेत. त्यामुळे ती शरीरात एनर्जी निर्माण करते. या गुणांमुळेच डिहायड्रेशनला ती थारा देत नाही. काकडीच्या फोडी आपण आवडीने खातो. त्याचप्रमाणे काकडीची कोशिंबीर. या आवडी या दिवसात कटाक्षानं जपा. जेवताना काकडीच्या चकत्या वा कोशिंबीर ताटात अवश्य असू द्या. शिवाय काकडीच्या फोडीत अ‍ॅपल सायडर व्हिनेगर घालून हे सॅलड देखील टेस्ट करा.

उसाचा रस
येथे ‘थंडगार, ताजा, उसाचा रस मिळेल’ अशा पाट्या उसाच्या रसवंतीवर या दिवसात झळकतात. या रसवंतीमध्ये मिळणारा उसाचा रस म्हणजे नैसर्गिक गुणधर्माचा मेरूमणी म्हटला पाहिजे. साखरेचे मूळ असलेला हा मूळ रस किती गोड असतो, ते महाराष्ट्रातील खवय्यांना सांगायलाच नको. शरीरातील उष्णतेस हद्दपार करणारा व व्हिटॅमिन, कॅल्शिअम, लोह यांनी संपन्न असलेला आणि चवीपुरते लिंबू व आल्याचा रस मिसळलेला हा रस आपली तहान भागवतो, अंगात एनर्जी निर्माण करतो अन् थकवा घालवतो.

नारळ पाणी
मुंबई शहरात व केरळ राज्यात बाराही महिने उपलब्ध असणारं नारळ पाणी उन्हाळ्यात आपल्याला त्याच्या दुकानाकडे खेचून घेतं. अन् ते पोटात जाताच अंगातील आग खेचून घेतं. अन् शरीर व मन शांत करतं. हे ऊर्जेचा मोठा स्रोत आहे, अशक्ताला सशक्त करणारे घटक यात आहेत. अगदी झटपट गुण देणारे हे घटक आहेत. म्हणूनच आपण पेशंटसाठी नारळ पाणी घेऊन जातो ना! शरीरातील विषद्रव्यं फेकून देण्याचं सामर्थ्य त्यात आहे. अन् थंडावा निर्माण करण्याचे गुण. वरील सर्व पदार्थांपेक्षा याचा ‘भाव’ जरा अधिक असला तरी गुणाचे मोल आहेत, असे समजून त्यास पोटात ढकला. अन् गारेगार राहा.

कलिंगड


या दिवसात फळ विक्रेत्यांनी रस्तोरस्ती लावलेले हिरव्या कलिंगडांचे ढीग आपल्याला खुणावत असतात. त्याचा आतील लालजर्द गर मोठ्या प्रमाणात तहान भागवतो. त्याची फोड कापताच लाल गरातून पांढरे पाणी झिरपू लागते. अन् आपण अधाश्यासारखी ती फोड तोंडाला लावतो. शरीरातील उष्णता शोषून घेण्याचा मोठा गुण या कलिंगडात आहे. शिवाय ते पचायला अतिशय हलकं असतं. चवीला गोड असलेल्या या फळाचे औषधी गुणधर्म तितकेच गोड आहेत. त्यात असलेला लायकोपेन हा घटक कॅन्सरला प्रतिबंध करतो, असं काही शासत्रज्ञाचं मत आहे. तेव्हा दिवसातून 3 वेळा तरी त्याचा गर किंवा ज्यूस पोटात गेला तर उष्णतेचा विकार गपगार पडेल.

अननस


कलिंगडाप्रमाणेच बाहेरून टणक व आतमध्ये रसदार असणारे आणखी एक फळ म्हणजे अननस. अननस पोटास थंडाई देतं की नाही, यावर कोणी भाष्य केलेलं नसलं तरी ते पोटास तंदुरुस्त करतं हे मात्र निश्‍चित. त्याच्या रसदार, आंबटगोड फोडी पचनसंस्था उत्तमरीत्या कार्यरत ठेवतात. शिवाय या फळात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने अंगात ओलावा राहतो. आत कोरडेपणा राहत नाही. डिहायड्रेशन होत नाही. शिवाय अंगातील विषद्रव्यं बाहेर टाकतं.


स्ट्रॉबेरी
असंच रसदार आणि आंबटगोड चवीचं राजेशाही फळ म्हणजे स्ट्रॉबेरी. राजेशाही अशासाठी की, ते सर्वत्र मिळत नाही अन् महाग असतं. महाबळेश्वर हे त्याचे जन्मगाव असल्याने तेथून ते मुंबई-पुण्यास मुबलक प्रमाणात येते. वेगळ्याच मधुर चवीच्या या फळात अ‍ॅण्टी ऑक्सिडंट्सची पातळी जास्त असते. माफक प्रमाणात फायबर्स अन् फार मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्याने शक्तिवर्धक. फॉलिक अ‍ॅसिड आणि बायोटिन हे घटक देखील जास्त प्रमाणात असतात. बायोटिन त्वचा, नखे आणि केसांना पोषक ठरतं. रसदार असल्याने अंगातील पाण्याचं प्रमाण वाढवते. कोरडेपणास संधीच नसते.