लिंबूपाणी पिण्याचे फायदे (Summer Special: Benef...

लिंबूपाणी पिण्याचे फायदे (Summer Special: Benefits Of Lemon Sarbat)

उन्हाळ्याच्या दिवसात लिंबूपाणी पिणं सगळ्यांसाठीच अत्यंत आवश्यक असतं. परंतु, पहाटे रिकाम्या पोटी लिंबूपाणी पिणं अधिक लाभदायक ठरतं. या छोट्याशा लिंबामध्ये आपल्याला फिट ठेवण्याचे मोठमोठे गुण आहेत.
उन्हाळ्याच्या दिवसांत खरं तर विविध प्रकारची सरबतं, शीतपेयं, आइस्क्रिम्स, कुल्फी इत्यादी उपलब्ध असतात. परंतु लिंबूपाण्याचं महत्त्व जराही कमी झालेलं नाही. रोज लिंबूपाणी प्या म्हणजे तुम्हालाही त्याचं महत्त्व पटेल.

वजन आटोक्यात राहतं
नियमितपणे रिकाम्या पोटी सकाळी एक ग्लास लिंबूपाणी प्यायल्यास वजन नियंत्रणात राहतं. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोटाशी संबंधित सर्व तक्रारींपासून सुटका होते.

शरीरातील पाण्याचं संतुलन राखतं
उन्हाळ्याच्या दिवसात कितीही पाणी प्याले तरीही शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होते. परंतु लिंबू पाणी प्याल्याने शरीरात पाण्याचे संतुलन राखले जाते. कोमट पाण्यामध्ये लिंबू आणि मध घालून प्याल्यास पाण्याची कमतरता राहत नाही.

त्वचेसाठी लाभदायक
दिसायला अगदी छोटसं असलं तरी लिंबामध्ये क जीवनसत्त्व अधिक प्रमाणात असतं. त्यामुळे तुम्ही जर सकाळी नियमितपणे लिंबूपाणी पीत असाल तर तुमच्या चेहर्‍यावर सुरकुत्या येत नाहीत, तसंच चेहर्‍यावरील तजेलाही
कायम राहतो.

तोंडाची दुर्गंधी दूर होते
तोंड सुकणे आणि तोंडातील जिवाणू यांच्यामुळे सकाळी झोपेतून उठल्यानंतर बर्‍याच लोकांच्या तोंडातून दुर्गंधी येते. परंतु सकाळी लिंबूपाणी प्याल्यास तोंडात लाळ येते आणि श्‍वासाची दुर्गंधीही निघून जाते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते
लिंबामध्ये क जीवनसत्त्व आणि पोटॅशियम असतं. त्यामुळे दररोज नियमितपणे लिंबू पाणी प्याल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.