उन्हाळ्यात अशी घ्या ओठांची काळजी (Summer Lip Ca...

उन्हाळ्यात अशी घ्या ओठांची काळजी (Summer Lip Care: How To Maintain The Perfect Lips All Summer)

थंडीमध्येच नाही तर उन्हाळ्यातही ओठांची काळजी घेणं गरजेचं आहे. ओठांची काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं ते पाहूया.

ओठांना मॉइश्चराइज करा

ओठांना दररोज मॉइश्चराइज करणे आवश्यक आहे. ओठ कोरडे झाले की लगेच कोल्ड क्रिमचा वापर करा. बोटावर थोडी कोल्ड क्रिम घेऊन, ती ओठांवर लावून मालिश करा.

ओठांना असे करा स्क्रबिंग

अर्धा टीस्पून पिठी साखरेमध्ये ऑलिव्ह ऑइल मिक्स करा. नंतर कापसाच्या बोळ्याने वा बोटाने हे मिश्रण हलकेसे ओठांवर लावा. ओठांवरील मृत त्वचा निघून जाईपर्यंत ओठांना हळूहळू मसाज करत राहा. आता कोमट पाण्याने ओठ धुऊन घ्या. मग ओठांना लिप बाम लावून ठेवा. असं तुम्ही दररोज करा.

असा घालवा ओठांचा मेकअप

ओठांचा मेकअप अर्थात ओठांवरील लिपस्टिक वा लिप लायनर काढण्यासाठी कोल्ड क्रिमचा वापर करा. कापसाच्या बोळ्यावर थोडी कोल्ड क्रिम लावून हलक्या हाताने ओठांना मसाज करत लिपस्टिक काढा. ओठ जोरजोरात रगडू नका. लिपस्टिक काढल्यानंतर ओठ मॉइश्चराइज्ड करा. यामुळे ओठ नरम राहतील.

घरीच बनवा लिप ग्लॉस

साहित्य : अर्धा टीस्पून मेण, २ टेबलस्पून कोको बटर.

कृती : एका छोट्या बाऊलमध्ये मेण आणि कोको बटर घ्या. नंतर त्यापेक्षा मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन ते गरम करा. पाणी उकळलं की त्यात मेण आणि कोको बटर असलेलं बाऊल ठेवा. मेण आणि कोको बटर व्यवस्थित विरघळल्यानंतर आचेवरून खाली घ्या. थंड करून ओठांसाठी वापरा.

ओठांसाठी घरीच बनवा क्रीम

साहित्य : २ टीस्पून मेण (बीजवॅक्स), ४ टीस्पून बदामाचं तेल, २ टीस्पून गुलाबपाणी.

कृती : एका छोट्या बाऊलमध्ये मेण वितळवा. त्यात बदामाचं तेल घालून फेटा. आचेवरून खाली घेऊन त्यात गुलाबपाणी घाला. आता हे मिश्रण दाट होईपर्यंत ढवळत राहा. तयार क्रिम साधारण गरम असतानाच बाटलीत भरून ठेवा आणि वापरा.