उन्हाळ्यात गर्भवती स्त्रियांनी काय काळजी घ्यावी...

उन्हाळ्यात गर्भवती स्त्रियांनी काय काळजी घ्यावी? (Summer Care Tips For Pregnant Woman)


सध्या फारच कडाक्याचे ऊन पडू लागले आहे. या उन्हाळ्याच्या दिवसात गर्भवती स्त्रियांनी काय काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन कराल का?

 • स्वप्नाली, भांडूप
  खरंच तुम्ही म्हणताय तसे ऊन्हाचे चटके बसू लागले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात गर्भवती स्त्रियांना इतर सर्वसाधारण लोकांपेक्षा जास्त उकडतं. उन्हाळ्याच्या दिवसांत त्यांना डिहायड्रेशन व लघवीमध्ये जंतुसंसर्ग होण्याचा जास्त धोका असतो. हे टाळण्यासाठी गर्भवती स्त्रियांनी दिवसभरात कमीत कमी 8 ग्लास पाणी प्यावे. सैलसर सुती कपडे घालावेत. आहारामध्ये इतर द्रवपदार्थ उदाहरणार्थ नारळपाणी, सरबते, फळे व भाज्यांचे रस, सूप, खिरी इत्यादीचा समावेश करावा. ताज्या भाज्या व फळे यांचा समावेश करावा. या दिवसात 5-6 वेळा थोडे थोडे खावे. रात्रीचे जेवण लवकर करावे. चालणे व पोहणे हे व्यायाम करावेत. गरम पाण्यापेक्षा साध्या पाण्याने सकाळ व संध्याकाळ आंघोळ करावी. दुपारच्या वेळी शक्यतो बाहेर जाऊ नये. बाहेर जाताना छत्री, गॉगल्स, सनस्क्रीन वापरावे. त्वचेला मॉइश्चरायझर लावून त्वचा मुलायम राखावी.
 • माझी भाची 23 वर्षांची असून तिला पीसीओडीचा त्रास आहे. तिला चेहर्‍यावर मुरुमे व जास्त लव आहे. यावर काय उपाय आहे?
 • सुप्रिया, महाड
  पीसीओडी म्हणजे ‘पॉलिसिस्टिक ओव्हॅरिअन डिसिज’. ह्यामध्ये स्त्रीच्या शरीरात अँड्रोजेन्सचे (‘मेल हार्मोन्स’)प्रमाण जास्त असते. त्यामुळे मुरुमे व चेहर्‍यावर जास्त प्रमाणात केस येऊ शकतात. ह्यामध्ये मासिक पाळी अनियमित असते. ह्या दोन्ही गोष्टींवर उपाय म्हणून स्त्री रोगतज्ज्ञ हार्मोन्सच्या गोळ्यांचा वापर करतात. त्याने ही समस्या आटोक्यात राहते. शिवाय मुरुमे व केसांसाठी सौंदर्य तज्ज्ञांचीही मदत घ्यावी लागते.
 • माझ्या जावेची दोन सिझेरियन झाली आहेत. आता तिला योनीमार्गातून मूत्रस्त्राव होत आहे. यावर काय उपाय आहे?
 • प्राजक्ता, नवी मुंबई
  मूत्राशय, मूत्रमार्ग, गर्भाशय व मलाशय हे सर्व अवयव अत्यंत जवळजवळ असतात. सिझेरिअन शस्त्रक्रियेमध्ये मूत्राशयाला इजा होऊ शकते. यामुळे कालांतराने युरिनरी फिस्टुला निर्माण होऊ शकतो. त्यावर शस्त्रक्रिया करून ही समस्या दूर होऊ शकते.