‘सुख म्हणजे नक्की काय असतं ‘ मालिके...

‘सुख म्हणजे नक्की काय असतं ‘ मालिकेतील खलनायिकेला प्रेक्षकांनी दिला मार (Sukh Mhanje Nakki Kaay Asat’ Fame Vamp Beaten Up By Ladies)

काही प्रेक्षक हे मालिकांमध्ये इतके समरस होऊन जातात की त्या मालिकेतील पात्र हे त्यांच्या कुटुंबातीलच सदस्य आहे असे त्यांना वाटू लागते. त्यामुळे मालिकेत काही चांगल्या घटना दाखवल्या की प्रेक्षकांना खूप बरे वाटते किंवा मालिकेत काही वाईट घडले तर त्यांना दु:ख होते किंवा राग येतो. मालिकेतील खलनायकाचा तर त्यांना अशा प्रकारे राग येतो की ते समोर आलेच तर ते त्यांच्यावर हल्ला सुद्धा करतात.

असेच काहीसे स्टार प्रवाह वाहिनी वरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेबाबतीत झालं. या मालिकेत सध्या उत्कंठावर्धक ट्रॅक सुरु आहे. इतके दिवस गौरी ज्यांना सासू सासरे म्हणून ओळखायची ते तिचे खरे आई वडील असतात हे समोर आल्यावर मालिकेचे कथानकच बदलून गेले आहे. त्यामुळे मालिकेत पुढे काय घडणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

पण या सर्वात मालिकेतील खलनायिका शालिनीच्या कुरापती या अजूनही सुरु आहेत. शालिनी आणि देवकी या दोघी गौरीला त्रास देण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे गौरीच्या डोळ्यात बहुतेक वेळा अश्रू दिसत असतात. पण गौरीला सतत रडताना पाहून तिच्या चाहत्यांना मात्र त्याचे खूप वाईट वाटत असते. त्यामुळे ते मनातल्या मनात शालिनी आणि देवकीला शिव्या घालत असतात. खरेतर खलनायकाचा राग येणे ही ते पात्र साकारणाऱ्या कलाकाराची पोचपावती असते पण काहीवेळेस त्यांना अनेक अडचणींना सुद्धा सामोरे जावे लागते.

याबाबत शालिनी म्हणजेच अभिनेत्री माधवी निमकरने तिच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला. ती म्हणाली की, मी एका कार्यक्रमात गेली होती. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या दोन बायकांनी माझ्या पाठीत बुक्की मारली. आणि जेव्हा त्यांनी मी तुम्ही मला का मारलं असं विचारलं त्यावर त्या म्हणाल्या की, तू नेहमीच शिर्के पाटलांना त्रास देत असते. खरेतर त्या महिलांचा राग म्हणजे तिला तिच्या कामाची एकप्रकारे दादच मिळाली होती.

अभिनेत्री माधवी निमकरने आपल्या करीअरची सुरुवात २००७ मध्ये केली होती. त्यानंतर तिने अवघाचि हा संसार या चित्रपटात काम केले. पुढे वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपटांमध्ये तिने काम केले.