कौशल्य पणाला लावणारी नेमबाज...

कौशल्य पणाला लावणारी नेमबाजी (Success Story Of A Shooting Star)

ऑलंपिकमधील प्रसिद्ध अशा रायफल शूटिंग या खेळावर प्रकाशझोत टाकणारी संयुक्ता गुप्ते यांची मुलाखत…
एअर रायफल शूटिंग हा खेळ आपल्या देशात सध्या लोकप्रिय आहे; पण काही वर्षांपूर्वी ही परिस्थिती नव्हती. अनेक वर्षांपासून खेळाडू हा खेळ खेळत होते; पण आजच्यासारखी साधनसामग्री किंवा शूटिंग रेंज उपलब्ध होत नव्हती. फार कष्टातून जात त्यांनी आज या खेळाला लोकप्रिय बनवलं. अंजली भागवत, दिपाली देशपांडे, गगन नारंग, अभिनव बिंद्रा  अशा अनेक दिग्गज खेळाडूंनी पेरलेल्या कष्टाच्या बीमुळे लोकप्रिय होण्याची गोड फळं आजच्या पिढीला चाखायला मिळत आहेत. त्यांच्या दुसर्‍या फळीतील संयुक्ता गुप्ते या एक उत्तम खेळाडू असून, उत्तम प्रशिक्षकदेखील आहेत. आज वयाच्या 31व्या वर्षीच त्यांनी यशस्वी प्रशिक्षक म्हणून नावलौकिक मिळवला आहे.
संयुक्ता गुप्ते या पेंढरकर कॉलेज, डोंबिवली येथील गगन नारंग यांच्या ‘गन फॉर ग्लोरी’ अ‍ॅकॅडमीतील एअर रायफल शूटिंग या खेळाच्या प्रशिक्षिका आहेत. तसं या खेळात महिला खेळाडूंची संख्या भरपूर प्रमाणात असली, तरी महिला प्रशिक्षकांचं प्रमाण कमीच आहे. संयुक्ता गुप्ते या केवळ यशस्वी प्रशिक्षकच नाहीत, तर स्वतः एक यशस्वी खेळाडूही आहेत. दोन्ही भूमिका त्या उत्तमरीत्या पार पाडत आहेत.

संयुक्ता गुप्ते यांनी एअर रायफल शूटिंगची सुरुवात 2004 सालामध्ये केली. त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्यांना अनेक पदकंही मिळाली. ऑल इंडिया जी.व्ही. मावलणकर स्पर्धेत त्यांना सुवर्ण पदक मिळालं. याशिवाय अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा त्यांना अनुभव आहे. वयाच्या 29-30व्या वर्षीच त्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत शिरल्या. आत्तापर्यंत त्यांनी जवळपास 60-70 मुलांना प्रशिक्षण दिलं आहे आणि सध्या विविध वयोगटातील 30 जणांना प्रशिक्षण देत आहेत. खेळाडू ते प्रशिक्षक होण्याचा प्रवास, तसंच प्रशिक्षक म्हणून असलेली आव्हानं, शासनाकडून असलेल्या अपेक्षा हे सगळं उलगडण्याचा प्रयत्न केलाय या मुलाखतीच्या माध्यमातून.

एअर रायफल शूटिंग या खेळाची सुरुवात तुम्ही केव्हा आणि कशी केली?
एनसीसीमध्ये असताना आम्हाला रायफल शूटिंग होतं. तेव्हाच मला शूटिंगची आवड निर्माण झाली. शिवाय रुईया महाविद्यालयात 10 मीटर एअर रायफल शूटिंग रेंज आहेच. तिथे मला प्रशिक्षणही मिळालं आणि मी माझी प्रॅक्टिसही करायचे. त्यानंतर मी स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागले. कॉलेजमध्ये होणार्‍या स्पर्धा, त्यानंतर आंतरविद्यालय स्पर्धा यात काही मेडल्सही मिळाली. असं करत हळूहळू पुढे जाऊ लागले. माझी खेळाविषयी आवडही वाढत गेली आणि आत्मविश्‍वासही वाढला. पुढे स्टेट चॅम्पियनशीप, प्री नॅशनल, असं करत सुरुवात झाली आणि आत्मविश्‍वासही वाढला. आणि यातूनच मग पुढे शूूटिंगमध्येच करिअर करायचा निर्णय घेतला.

रायफल शूटिंगविषयी लोकांना आता आकर्षण निर्माण झालंय. या खेळाकडे वळण्याचा गंभीरपणे विचार केला जातोय. यासाठी रायफल आणि खेळाच्या तांत्रिक बाबींविषयी माहिती द्याल का?रायफल शूटिंगच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचं आहेत सेफ्टी रूल्स. रायफल व्यवस्थित हाताळली गेली पाहिजे. रायफलचं टोक नेहमी भिंतीच्या दिशेने पाहिजे. कारण चुकून जरी तुम्ही ट्रिगर दाबलं आणि त्यात गोळी असेल, तर त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात. इतर खेळांमध्येही नियम असतात, ते पाळले नाही तर कदाचित फाइन भरावा लागेल किंवा तुम्हाला तात्पुरतं खेळापासून लांब ठेवण्यात येईल; पण या खेळात तसं होत नाही. जर तुम्ही नियम पाळले नाहीत, तर तुम्हाला अपात्र ठरवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे रायफल व्यवस्थित हाताळणं फारच महत्त्वाचं आहे. तांत्रिक बाबी महत्त्वाच्या आहेत- जसं रायफल कशी पकडायची, कशी वापरायची, ट्रिगर कधी दाबायचं, श्‍वासावर नियंत्रण कसं ठेवायचं, उभं कसं रहायचं, नेम कसा धरायचा इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात.

प्रशिक्षक हे थोडेसे वयस्कर असतात; पण तुम्ही तरुण आहात. प्रशिक्षक होण्याचा निर्णय कधी घेतलात आणि त्यासाठी काही विशेष प्रशिक्षण घ्यावं लागलं का?
खरं तर ठरवून असं काही झालं नाही. आपसूकच सगळ्या गोष्टी जुळून आल्या. मुलुंंड जिमखान्यात शूटिंग रेंज आहे. दीपाली देशपांडे ज्या उत्तम शूटर आहेत, त्यांची ही रेंज आहे. तिथे त्यांनी प्रशिक्षणात साहाय्यक होण्यासाठी मला विचारलं आणि अर्थातच मी हो म्हटलं.
2010मध्ये एका वर्षासाठी मी त्यांना असिस्ट केलं. त्यानंतर दोन वर्षं मी काही घरगुती कारणांमुळे शूटिंगपासून दूर होते. मधल्या काळात मी बँकेत नोकरीही केली. या सगळ्यामुळे मी शूटिंगपासून दूर होत गेले. पण योगायोगाने पुन्हा शूटिंग मला खुणावू लागलं. मी डोबिंवलीला राहते आणि तिथे शूटिंग रेंज सुरू होणार असल्याचं कळलं. तेव्हा माझी प्रॅक्टिस इथे सुरू करायचं मी ठरवलं. माझे जे आधीचे प्रशिक्षक होते, पवन सर त्यांची वरळीला रेंज आहे. त्यांचीच ही रेंज असणार होती. त्यांनी मला प्रशिक्षक होण्याविषयी विचारलं आणि त्यांना नाही म्हणण्याचा प्रश्‍नच नव्हता. अशा प्रकारे माझा प्रशिक्षकाचा प्रवास सुरू झाला.
आता प्रश्‍न होता ट्रेनिंगचा, तर ‘गन फॉर ग्लोरी’ ही गगन नारंग यांची अ‍ॅकॅडमी आहे. देशभरात त्यांच्या बर्‍याच ठिकाणी शाखा आहेत. तिथे जाऊन प्रशिक्षक होण्याचं प्रशिक्षण घेतलं. ‘गन फॉर ग्लोरी’चा दर्जा वेगळा आहे. आणि पॅटर्नही वेगळा आहे. माझा अनुभव खूप छान होता. आपण जेव्हा स्वतः खेळतो तेव्हा आपली जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागते. पण प्रशिक्षक झाल्यावर ती जबाबदारी कितीतरी पटींनी वाढते.

एनसीसीमध्ये असणार्‍या मुलांनादेखील बीएलसी या कॅम्प अंतर्गत रायफल शूटिंगचं प्रशिक्षण देण्यात येतं आणि स्पर्धाही घेण्यात येते, त्याचा इथे काही फायदा होतो का?
एनसीसीमध्ये जी मुलं शूटिंग कॅम्प करतात त्यांना प्राथमिक स्वरूपाचं शूटिंग शिकवलं जातं. ती रायफलही बेसिक लेव्हलची असते. यात शूटिंगची प्राथमिक माहिती होते. पण इथे मात्र स्वरूप थोडं बदललेलं असतं. आपण इथे 10 मीटर इनडोअर एअर रायफल शूटिंग करत असतो आणि तेही उभं राहून शूटिंग करायचं असतं. एनसीसीमध्ये मात्र आउट डोअर शूटिंग असतं, तेही झोपण्याच्या पोझिशनमध्ये.
मी स्वतः एनसीसीची विद्यार्थी राहिली असल्यामुळे माझा अनुभव असा की, एखादा विद्यार्थी जेव्हा एनसीसीमध्ये दाखल होतो, तेव्हा त्याच्यात प्रचंड बदल आपसूकच बघायला मिळतो. एक वेगळाच आत्मविश्‍वास, एक वेगळीच पर्सनॅलिटी घेऊन तो बाहेर पडतो. मुलांमध्ये शारीरिक स्टॅमिना वाढलेला असतो. जो या खेळात आवश्यक आहे. अशा मुलांना पॉलिश करणं सोपं जातं. पण जेव्हा इथे अ‍ॅकॅडमीत तुम्ही शिकायला येता, तेव्हा मला शूटिंग येतं असं अजिबात डोक्यात आणता कामा नये. शिकण्यासाठी मात्र आपली पाटी कोरी घेऊनच यायला हवं.
एनसीसीमध्ये शूटिंगंच स्वरूप वेगळं असतं. ती स्पर्धा वेगळी असते, टारगेट वेगळं असतं. या मुलांना 22ची रायफल दिली जाते, जी प्राथमिक तयारीसाठी म्हणून गणली जाते. पण इथे मात्र रायफलही वेगळी, स्पर्धेचं स्वरूपही वेगळं. अगदी पॉइंट डेसिमलच्या फरकानेही मेडल जाऊ शकतं. प्री-नॅशनल लेव्हलच्या ज्या स्पर्धा होतात त्यात एनसीसीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. माझीही एनसीसीमध्ये असताना प्री-नॅशनलसाठी निवड झाली होती. त्यामुळे जर एनसीसीच्या मुलांना 10 मीटर एअर रायफल शूटिंगमध्ये करिअर करायचं असेल तर नक्कीच फायदा होतो.

वयाच्या 10व्या वर्षी सुरू होणारा आणि अंतासाठी वयाचं बंधन नसलेला, असा हा एकमेव खेळ आहे. एक प्रशिक्षक म्हणून प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना शिकवताना कोणती विशेष काळजी घ्यावी लागते?
हा मात्र खूपच वेगळा अनुभव मी घेतेय. आमच्या अ‍ॅकॅडमीमध्ये 10 वर्षांपासून वेगवेगळ्या वयोगटातील मुलं आहेत. पण मी जेव्हा मुलुंडला शिकवत होते, तेव्हा मात्र इयत्ता सहावी, सातवी, आठवीचे विद्यार्थी होते. त्यामुळे त्यांचं काही प्रेशर नव्हतं. इथे 10-12 वर्षांची शाळेत जाणारी लहान मुलं ते 20-30 वर्षं वयोगटातील आपल्या करिअरमध्ये स्ट्रगल करणारी तरुण पिढी आणि 40 वर्षांच्या पुढची आपापल्या क्षेत्रात सेटल झालेली मध्यम वयोगटातील व्यक्तीही आहेत. प्रत्येकाची मानसिकता वेगळी आहे, गरजा वेगळ्या आहेत, जबाबदार्‍या वेगळ्या आहेत. या सगळ्याचा विचार मला एक प्रशिक्षक म्हणून करावा लागतो.
रायफल शूटिंग हा मानसिक खेळ आहे. यात नितांत एकाग्रता लागते. खेळत असताना डोक्यात कुठलेही विचार नकोत. कारण एकाग्र होऊनच तुम्हाला नेम धरायचा असतो. लहान मुलांना सांगताना त्यांचा मूडही बघावा लागतो, कधी त्यांना रागवावंही लागतं. तेच मोठ्यांच्या बाबतीत एकदा सांगितलं की कळतं आणि जे मध्यम वयोगटातले आहेत त्यांच्या क्षेत्रातील त्यांच्या पदाचा मान ठेवूनच त्यांना शिकवावं लागतं. ते सेटल झालेली असतात. त्यामुळे त्यांना इतर गोष्टींचं टेंशन नसतं; पण इथे मात्र ते विद्यार्थी असतात. त्यांना इथे शून्यापासूनच सुरुवात करावी लागते. अशा वेळी मात्र माझं प्रशिक्षण पणाला लागतं.

हा खेळ इतर खेळांपेक्षा वेगळा आणि थोडा महागडा आहे, तेव्हा सामान्य लोक या खेळापर्यंत कसे पोहचू शकतील?
हा खेळ महाग आहेच, कारण याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे, ते आपल्याला बाहेरच्या देशातून मागवावं लागतं. शूटिंगचं सर्व साहित्य जर भारतात तयार होऊ लागलं, तर हा खेळ सामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आपण जे पॅलेट्स मागवतो, ते जर्मनीहून येतात आणि त्याची किंमत खूप जास्त असते. भारतीय रायफलमध्ये इथल्या बनावटीच्या पॅलेट्स टाकू शकतो; पण परदेशी बनावटीच्या रायफलमध्ये इथल्या पॅलेट्स टाकल्या तर त्या रायफल्स खराब होतात. बाहेरूनच शूटिंगच सामान मागवावं लागत असल्यामुळे त्याची किंमत वाढते.

तुम्ही स्वतः हा खेळ खेळता, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेता, तेव्हा एका प्रशिक्षकाच्या भूमिकेतून बाहेर येऊन एक स्पर्धक म्हणून जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुमची तयारी कशी करता?खरं तर खूप कठीण आहे. मी प्रशिक्षक तर आहेच, पण त्याआधी माझ्या घरासाठी काही जबाबदार्‍या आहेत, त्या पूर्ण कराव्या लागतात. मी एकत्र कुटुंबात राहते. त्यामुळे घरी लक्ष देणंही महत्त्वाचं आहे. पण माझ्या घरचे मला खूपच प्रोत्साहन देतात. त्यामुळे मला माझं काम निश्‍चिंतपणे करता येतं. पण कुठेही स्पर्धक म्हणून जाण्यासाठी एका स्पर्धकाला जी तयारी, जी एकाग्रता आवश्यक असते ती मी देऊ शकत नाही; कारण माझ्याकडून माझ्यातील प्रशिक्षकाला प्राथमिकता दिली जाते. मी माझ्यापुरती जबाबदारी घेणं आणि माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांची जबाबदारी माझ्यावर असणं यात खूप फरक आहे. मी प्रशिक्षक म्हणून आधी विद्यार्थ्यांना प्राथमिकता देणं गरजेचं आहे आणि म्हणूनच माझी प्रॅक्टिस मागे राहते. आणि त्याचा नकारात्मक परिणाम माझ्या शूटिंगवर होतो. मला रोज या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. प्रत्येक जण त्यांचे प्रॉब्लेम माझ्यासोबत शेअर करतात. मग ते वैयक्तिक असो किंवा खेळाशी संबंधित. सगळ्याचं सतत ऐकावं लागत असल्यामुळे चित्त एकाग्र रहात नाही. हा खेळ मानसिक असल्यामुळे पूर्ण एकाग्रता आवश्यक आहे. माझ्या डोक्यात माझ्या प्रॅक्टिसच्या वेळी इतरांच्या खेळाचे विचार येतात. खरं तर मी समन्वय साधण्याचा प्रयत्न करते; पण माझ्यातला प्रशिक्षक माझ्यातल्या स्पर्धकावर हावी होतो.

एक स्पर्धक म्हणून स्पर्धेला जाणं आणि एक प्रशिक्षक म्हणून जाणं, यापैकी कोणती भूमिका जास्त आव्हानात्मक वाटते?
अर्थातच, प्रशिक्षकाची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. कारण स्पर्धक म्हणून मी जेव्हा जाते, तेव्हा माझ्या खेळाची जबाबदारी माझी असते, माझ्यातील डावी-उजवी बाजू मला माहीत असते; पण प्रशिक्षक म्हणून जाते, तेव्हा या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर असते. नाही म्हटलं तरी, थोडं दडपण येतच. कधी कधी एकाच वेळी चार-चार जणं खेळत असतात. प्रत्येकांच्या मागे पळावं लागतं.

ज्यांना या खेळाकडे यायचे आहे, त्यांना तुम्ही काय सांगाल?
या खेळाचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की, वयाच्या दहाव्या वर्षापासूनच सुरू करता येतो आणि वरच्या वयाची काही मर्यादा नाही. हा खेळ पूर्णपणे वैयक्तिक आहे. तुमच्या परफॉर्मन्सवर तुमचा निकाल अवलंबून असतो. या खेळात काही वय बघितलं जात नाही, या खेळात सगळ्यांना स्कोप आहे. अशा काही जमेच्या बाजू आहेत. तुम्ही जितक्या लवकर या खेळात याल, तितका हा खेळ आत्मसात करायला सोपा जाईल.
लहान मुलं जेव्हा येतात तेव्हा त्यांना शिकवणं, मोल्ड करणं खूप सोपं जातं. लहान मुलांसाठी तर खूप स्कोप आहे. लहान मुलांना घरच्यांचा पूर्ण पाठिंबा असतो. त्यांना स्वतःच्या तयारीला खूप वेळ मिळतो, इतर कुठल्या जबाबदार्‍या, टेंशन असं काही नसतं. त्याच्या उलट जी ज्युनिअर कॅटेगरीमधली आहेत. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये किंवा नोकरीमध्ये सेटल होण्याचं टेंशन, अशी बरीच कारणं असतात. म्हणूनच ज्यांना शूटिंगमध्ये करिअर करायचं आहे, त्यांनी लहान वयातच सुरुवात करणं जास्त योग्य.

अधिकाधिक लोकांनी या खेळाकडे वळलं पाहिजे यासाठी कोणते प्रयत्न करता येतील? खेळाच्या प्रचारासाठी शिबिरं वगैरे घेतली जातात का?
काही दिवसांपूर्वी आम्ही ‘गन फॉर ग्लोरी’तर्फे आंतरशालेय शूटिंग स्पर्धा आयोजित केली होती. उद्देश हाच होता की, अधिकाधिक मुलं या खेळाकडे वळावी. कल्याण-डोंबिवलीतल्या खूप मुलांनी सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी आम्ही मुलांकडून एकही रुपया घेतला नव्हता, उलट रायफलपासून सर्व साहित्य आम्हीच पुरवलं होतं. बरीच मुलं अशी होती की, ज्यांनी कधीच शूटिंग पाहिलं नव्हतं, पहिल्यांदाच हातात रायफल घेतली होती. या सगळ्यांना शूटिंगची माहिती देऊन, सेफ्टी रूल्स शिकवून शूटिंगची संधी आम्ही उपलब्ध करून दिली. त्यामुळे मुलांना आवड निर्माण झाली. त्यातील काही मुलं झोनलपर्यंत खेळली.
प्रशिक्षकाची मेहनत, मुलांची जिद्द, शासनाची मदत यामुळे हा खेळ सर्वांपर्यंत पोहचतोय, याचा फारच आनंद होतो. या खेळातून आपल्या देशासाठी खेळाडू निर्माण करण्याचा जो आनंद असतो, तो संयुक्ता यांच्या चेहर्‍यावर अगदी भरभरून दिसतो. त्यांना यांच्या या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.- मंजिरी पाठक