मराठी तरुणी झाली आशियाची सुंदरी (Success Story ...

मराठी तरुणी झाली आशियाची सुंदरी (Success Story Of A Marathi Girl, Who Was Crowned With Miss Asia Tourism Universe 2021 Award)

श्रिया परब या मराठी तरुणीने आशियाची सुंदरी बनण्याचा मान पटकावून भारताचे नाव मोठे केले आहे. श्रिया मिस एशिया टुरिझम युनिव्हर्स 2021 ची विजेती ठरली आहे. आधी मिस इंडिया अन् आता मिस एशिया टुरिझम युनिव्हर्स बनलेल्या श्रियाचा यशस्वी प्रवास कसा झाला ते जाणून घेऊया तिच्याच शब्दात…


माझ्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण झाले
मिस एशिया टुरिझम युनिव्हर्स 2021च्या तुझ्या यशाबद्दल चाहत्यांना काय सांगशील?
श्रिया – या संपूर्ण यशाबद्दल सांगायचे झाले तर ही संपूर्ण परिस्थिती मला अविश्वसनीय वाटत आहे. माझे स्वप्न पूर्ण झाले आहे किंबहुना माझेच नाही तर माझ्या संपूर्ण कुटुंबाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी मिस इंडियाचे नाव मोठे केले. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
तुझ्या या सर्व प्रवासाची सुरुवात कशी झाली ?
श्रिया – मी लहानपणापासूनच स्टेज लवर आहे. अनेक गोष्टींची मला आवड आहे. 2018 मध्ये मे सोप सारा महाराष्ट्र या स्पर्धेमार्फत मी पहिल्यांदा या क्षेत्रामध्ये प्रवेश घेतला. या स्पर्धेमुळे मला एक आत्मविश्वास मिळाला. मग तिथून पुढे मी मिस इंडिया पॅसिफिक केलं तसेच 2017-2018 मध्ये इंटरनॅशनल फोक डान्स स्पर्धेत मी भारताचं प्रतिनिधीत्त्व केलं. या वर्षी टियारा मिस इंडिया मध्ये भाग घेतला. या स्पर्धेत मला मिस एशिया टुरिझम युनिव्हर्स असे नाव मिळालं आणि मी भारताचं प्रतिनिधीत्त्व करण्यासाठी लेर्बान मध्ये गेले.

देशाला प्रेझेंट करण्यासाठी मानसिक तयारी
या संपूर्ण प्रवासाची तयारी कशी केली ?
श्रिया – मला मिस इंडियाचे नाव मिळाले त्याच्या दुसर्‍या दिवशी पासूनच माझी तयारी सुरू झाली. त्यामधे रॅम्प वॉक,  मी कपडे कोणते, कधी घालायचे ते ठरवणे, त्या सोबत मुलाखत प्रश्न, सत्य परिस्थिती तसेच टुरिझम संबंधी माहिती या सर्व गोष्टी कशा पद्धतीनी मांडता येतील याची सर्व तयारी सुरू झाली. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्या देशाबाहेर जाऊन आपल्या देशाला प्रेझेंट करण्यासाठी मानसिक तयारी देखील करावी लागली. हे सर्व करत असताना माझे पालक आणि माझे गुरु हे माझ्यासोबत असल्यामुळे मला त्यांचा पाठिंबा मिळाला.
तुझ्या या यशामध्ये तुला कोणा कोणाची साथ लाभली ?
श्रिया – माझ्या या संपूर्ण यशामध्ये खूप लोकांचा सहभाग आहे. त्यामध्ये माझे पालक, भाऊ , गुरू ऋषिकेश मिराजकर आहेत. शिवाय माझे अनेक गुरु आहेत, माझे मित्र, मैत्रिणी या सर्वांचीच मला महत्त्वपूर्ण साथ लाभली. हे सर्वजण मला एकच गोष्ट सांगायचे ती म्हणजे आम्हाला तुझा अभिमान आहे. त्यांचा माझ्यावरील विश्वास माझ्यासाठी आशिर्वाद होता.
तू या क्षेत्राशी निगडीत घेतलेल्या शिक्षणाबद्दल थोडक्यात सांग ?
श्रिया – मी के सी कॉलेज मधून फिल्म मेकिंग – फिल्म टेलिव्हिजन अँड न्यू मीडिया प्रॉडक्शन असा एक कोर्स केला आहे. त्यामध्ये फिल्म डायरेक्शन, फिल्म सिनेमॅटोग्राफी, स्टोरी रायटिंग, स्क्रिप्ट रायटिंग शिकले आहे. या क्षेत्रामध्ये पुढे जाण्याची माझी इच्छा होती, म्हणून मी हा कोर्स निवडला.

मिस एशियाची विजेती मिस इंडिया
स्पर्धेत फायनलिस्ट म्हणून नाव जाहीर झाले, त्यावेळेस तुला कसे वाटले?
श्रिया – खरं सांगायचं झालं, त्यावेळची माझी स्थिती मी शब्दांत नाही सांगू शकत. तिथे मला कोणीही श्रिया म्हणून ओळखत नव्हतं किंवा श्रिया म्हणून बोलवत देखील नव्हतं. सर्वजण मला मिस इंडिया या नावानेच बोलवत होते. जेव्हा त्यांनी मिस एशियाची विजेती मिस इंडिया आहे, असं जाहीर केलं, त्यावेळेस मला खूप भरून आलं. मी माझ्या कुटुंब आणि गुरूंकडे बघून एक स्माइल केली. मी सर्वांच्या इच्छा पूर्ण केल्या, याचं समाधान होतं.
विजेते पद घेऊन आल्यानंतर तुझं कशाप्रकारे स्वागत झालं? सर्वांच्या भावना कशा होत्या?
श्रिया – मी आल्यानंतर विमानतळावर सर्वजण माझ्या स्वागतासाठी उभे होते. तेथे सगळ्यांना पाहून मला खूप आनंद झाला. माझ्या आईने आपल्या महाराष्ट्रीयन प्रथेनुसार औक्षण करून माझे स्वागत केले. सर्वांचा आनंद, प्रेम बघून मला खूप छान वाटले. सर्वांचा माझ्याबद्दलचा अभिमान मी सार्थ केला असल्याची जाणीव मला त्यावेळेस झाली.

स्वतःहून हार मानत नाही, तोपर्यंत तुम्ही हरत नाही
आजच्या युवा पिढीसाठी तू प्रेरणा स्त्रोत आहेस, तर त्यांना तू काय संदेश देशील?
श्रिया –  मला माझ्या आयुष्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, जेव्हा तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न करता, तेव्हा तुमच्या विजयाचा मार्ग हा स्वतःहून बनत जातो. अर्थात त्यात तुमची मेहनत देखील तितकीच महत्वाची असते. अजून एक सांगायचं म्हणजे तुम्ही कोणतंही क्षेत्र निवडा; त्यात प्रवेश केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की, जोपर्यंत तुम्ही स्वतःहून हार मानत नाही, तोपर्यंत तुम्ही हरत नाही. मग त्यात तुम्ही एक तर जिंकता किंवा तुम्हाला एक चांगला अनुभव मिळतो, ज्यातून नक्कीच तुम्ही काहीतरी शिकू शकता.

एक स्त्री म्हणून तू इतर महिलांना काय संदेश देशील ?
श्रिया – मी इतकंच सांगेन की, मी एक गोष्ट फॉलो केली ती म्हणजे वुमन एन पॉवर अदर वुमन आणि त्यांनाच क्वीन्स म्हणतात. तर सर्व महिलांना एकमेकांची ताकद बनायचं आहे. हाच एक संदेश द्यायचा आहे.
– गायत्री सरला दिनेश घुगे