आकाशाला गवसणी घालणार्या महिला (Success Stories ...

आकाशाला गवसणी घालणार्या महिला (Success Stories Of Mediocre Woman)

विविध संकटांना धाडसाने सामोरं जाणार्‍या, प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करत नेटाने काम करणार्‍या, परिस्थितीशी झुंज देणार्‍या महिलांच्या सत्यकथा रश्मी बन्सल यांच्या ‘टच द स्काय’ पुस्तकामध्ये आहेत. आपलं नशीब सटवाई लिहिते, असं आपण मानतो. परंतु, आपल्या देशातील कणखर मनाच्या, खंबीर वृत्तीच्या महिला स्वतःचं नशीब स्वतःच लिहितात, असा ठाम विश्‍वास सुप्रसिद्ध इंग्रजी लेखिका रश्मी बन्सल यांनी व्यक्त केला आहे. ‘टच द स्काय’ या नव्या पुस्तकात त्या व्यक्त झाल्या आहेत.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण नारी शक्ती, नारी स्वातंत्र्य याविषयी बोलतो. पण “सत्य, सौंदर्य आणि स्वतःवरील दृढ विश्‍वास यांच्या पायावर आपलं आयुष्य उभं करण्याची आपल्यामध्ये शक्ती आहे. या पुस्तकात अशा महिलांच्या कथा आहेत, ज्यांनी आपला हा आतला आवाज ओळखला आहे, ज्यांनी आपल्या अंगातील शक्ती जाणली आहे नि स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे,” असं मत रश्मी यांनी या पुस्तकात व्यक्त केलं आहे.
विविध संकटांना धाडसाने सामोरं जाणार्‍या, प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करत नेटाने काम करणार्‍या, परिस्थितीशी झुंज देणार्‍या काही महिलांच्या सत्यकथा त्यांनी ‘टच द स्काय’ यामधून प्रकाशित केल्या आहेत. ‘सातवी पास सरपंच’, ‘सुनिये सिस्टरजी’, ‘चक दे पिरियड्स’, ‘फ्री टू बी मी’, ‘यू कॅन डू मॅजिक’, ‘बिईंग ह्युमन’ या कथा चटका लावणार्‍या आहेत.

अविश्‍वसनीय सत्यकथा
हरियाणा राज्यातील छोट्या खेडेगावात, जिथे स्त्रीच्या डोक्यावरील घुंगट खाली येत नाही, तेथील एक महिला सातवीपर्यंत शिकते आणि जिद्दीने सरपंच होते. अहमदाबादची अदिती गुप्ता मासिक पाळीबद्दल अवडंबर माजवणार्‍या समाजाविरुद्ध धिटाईने उभी राहते. काश्मीरमधील हफीजा खान ही महिला ‘हम लडकियों को स्कूल नहीं भेजते,’ अशी मानसिकता असलेल्या समाजातील मुलींना शिकवण्यासाठी अथक परिश्रम घेते. आपल्या मोहल्ल्यातील स्वच्छतेसाठी मुलींना प्रेरित करते. मुस्लीम मुलींनी शिकावं, रोजगार कमवावा, स्वतःच्या पायावर उभं राहावं, या हेतूने झटते. भावना इस्सार ही महिला मोटारसायकल शिकते. त्यावरून मुंबई ते दमण आणि मुंबई ते भारत-चीन सरहद्दीवर जाते. 1200 किलोमीटर्सचा प्रवास करते. मुंबईची ज्योती ढवळे हिला इन्फेक्शनमुळे एचआयव्ही पॉझिटिव्हची बाधा होते; पण खचून न जाता, ती त्यावर मात करते अन् ‘निगेटिव्ह’ (सुदृढ) मुलाला जन्म देते. अशा एकाहून एक सरस, अविश्‍वसनीय वाटाव्या, अशा सत्यकथा या पुस्तकात बन्सल यांनी दिल्या आहेत. विशेष म्हणजे, आकाशाला गवसणी घालणार्‍या यांपैकी कणखर बाण्याच्या काही महिलांचा या पुस्तक प्रकाशनाच्या दिवशी गौरव करण्यात आला. सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी या पुस्तकाचं अनावरण केलं. “अपने अंदर की शक्ती को जानिये, पहचानिये. आज से लिखिये अपना एक सुनहरा कल,” असा संदेश रश्मी बन्सल यांनी पुस्तकामधून दिला आहे. त्याची प्रचिती या पुस्तकातून होते.