सुबोध भावे अभिनीत ‘फुलराणी’ या चित्रपटाचे मोशन...

सुबोध भावे अभिनीत ‘फुलराणी’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित (Subodh Bhave Starrer Romantic Film ‘Phulrani’s Motion Poster Release)

एक उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून सुबोध भावेचे मराठी चित्रपटक्षेत्रात मोठे नाव आहे. लोकमान्य, बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली यांसारख्या यशस्वी चित्रपटांनंतर आता सुबोध भावे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अगदी कालचेच त्याच्या वाढदिवसाचे निमित्त साधत त्याने आपल्या चाहत्यांना एक खास भेट देखील दिली आहे.

सुबोध सोशल मीडियावर देखील बऱ्यापैकी सक्रिय असून आपल्या चाहत्यांच्या कायम संपर्कात असतो. कालच त्याने त्याचा आगामी चित्रपट ‘फुलराणी’मधील लूक त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रदर्शित केला आला आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करून लवकरच ‘फुलराणी’ प्रदर्शित होईल अशी माहिती त्याने दिली आहे.

 ‘फुलराणी’ या चित्रपटात सुबोध भावे विक्रम राजाध्यक्ष ही मुख्य भूमिका साकारणार आहे. सुबोध भावेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत त्याने, ‘फुलराणी या माझ्या नवीन चित्रपटामध्ये आत्तापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका साकारण्याचा एक प्रयत्न करतोय. तुमचे सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद असू द्या’ या आशयाची कॅप्शन दिली आहे. या पोस्टरमधील सुबोधचा हटके लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तसेच या पोस्टरमध्ये सुबोधसोबत पाठमोरी फुलराणी असल्याचे दिसत आहे.

‘फुलराणी’ चित्रपटाचे चित्रीकरण करोना काळात पूर्ण करण्यात आले आहे. प्रसिद्ध लेखक जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या ‘पिग्मॅलिअन’ या गाजलेल्या नाट्यकृतीवर, १९६४ साली आलेली ‘माय फेअर लेडी’ ही म्युझिकल फिल्म चांगलीच गाजली होती. याच ‘पिग्मॅलिअन’ कलाकृतीने प्रेरित होऊन ‘फुलराणी…अविस्मरणीय प्रेमकहाणी’ हा चित्रपट मराठी रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

विश्वास जोशी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हर्षवर्धन साबळे, जाई जोशी, अमृता राव हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाला प्रियंका बर्वे, आनंदी जोशी, शरयू दाते, निलेश मोहरीर, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, हृषीकेश रानडे अशी गायक आणि संगीतकरांची तगडी फौज लाभली आहे. तर, गीतकार गुरु ठाकूर यांनी चित्रपटातील गीतांचे बोल लिहिले आहेत.

ही ‘फुलराणी’ २०२२ ला चित्रपटगृहात दरवळणार असून, ही प्रेक्षकांनाही मोहित करेल असा विश्वास दिग्दर्शक विश्वास जोशी व्यक्त केला आहे.