‘करोडपती’मध्ये अमिताभ बच्चनची फॅशन ...
‘करोडपती’मध्ये अमिताभ बच्चनची फॅशन आणि रूप खुलविणारी स्टायलिस्ट कोण आहे? (Stylist Behind The Tie-Bow Dashing Look For Big B In The New Season Of KBC)


सोनी टी. व्ही. वरून प्रसारित होणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचा रूबाबदार सूत्रधार अमिताभ बच्चन प्रत्येक सीजनमध्ये अधिकाधिक स्टायलिश आणि फॅशनेबल दिसतो. आपली स्टाईल आणि लूक याच्याने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अमिताभचे स्टायलिंग करणारी, पडद्यामागे एक टीम आहे.

‘केबीसी’च्या प्रत्येक कार्यक्रमात अमिताभचे कपडे, त्याची फॅशन, स्टाईल आणि लूक हा प्रेक्षकांच्या कुतुहलाचा विषय असतो. त्यामुळेच प्रत्येक सीझनमध्ये त्याच्या कपड्यांबरोबरच त्याचा टाय-बो याची देखील चर्चा रंगते. त्याची ही रूबाबदार स्टायलिंग करणारी स्टायलिश आहे प्रिया पाटील. ती अमिताभ बच्चन बरोबर गेल्या १० वर्षांपासून काम करते आहे.

अमिताभला या सीझनमध्ये नवीन प्रकारचा बो-टाय या प्रिया पाटीलने डिझाईन केलेला आहे. टी. व्ही. ९ या वाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत प्रिया पाटीलने सांगितले की, अमितजींवर नवा प्रयोग करायचा हे ठरवून, मी हा नवा बो-टाय निर्माण केलेला आहे.

आपल्या या नव्या प्रयोगाबद्दल प्रिया पाटीलने सांगितले की, सूटची शोभा वाढविणारा, शर्टावर घातला जाणारा हा बो-टाय आहे. तो टाय इतका लांब नाही, अन् बो गळ्याला अगदी लागून असतो. सूट आणि पॉकेट स्क्वायर प्रमाणेच टाय-बो मध्ये कलर कॉम्बिनेशन असते. गेल्या वर्षी तिने बिग बींच्या सूटवर ब्रोच लावला होता. वेगवेगळ्या रंगातील हे ब्रोच लोकांना आवडले होते.

‘केबीसी’ कार्यक्रम सुरू होण्याच्या महिनाभर आधी प्रिया पाटील आपले स्टायलिंगचे काम सुरू करते. अमिताभच्या सूटचे कापड ती युरोपमधून मागवते. त्यावर शिवलेले बटन्स टर्की व अन्य देशातून मागवले जातात.

तसं पाहायला गेलं तर अमिताभ बच्चनची स्टाईल आणि फॅशन हा प्रत्येक सीझनमध्ये लोकांच्या चर्चेचा विषय असतो.

अमिताभ बच्चन यांच्या सोबत एक दशकापासून काम केल्याने प्रिया पाटीलच्या लक्षात आलं आहे की, त्यांना क्लासिक लूक फार आवडते. गडद रंगाचे व चौकडीचे डिझाईनवाले कापड ती निवडते. आपल्यावर केले जाणारे प्रयोग अमिताभ बच्चन आनंदाने स्वीकारतात. मात्र स्टाईल अथवा लूक या संदर्भात त्यांची परवानगी घेणे प्रियासाठी आवश्यक असते.