लपंडाव (Story – Lapandav)

लपंडाव (Story – Lapandav)

By Atul Raut in

“पुरुषाला मोहाचा शाप आणि स्त्रीला त्यागाची देणगी देवाने दिलेली आहे, असं म्हणतात ते खोटं नाही…”

‘मकरंद, मला वाटतं आपण आपले वेगळे मार्ग सुधारावे. किती तरी वर्षांनी ती दोघं एकत्र आलीयेत. नियतीने त्यांना वेगळं केलं होतं. जीवनाचा सारिपाट मांडता मांडताच उधळला गेला होता. पुनश्‍च तो डाव मांडण्याची संधी त्यांना मिळाली आहे. त्याचं सोनं झालं पाहिजे.”

“ते मान्य आहे मला. परंतु, त्यामुळे आपला मांडलेला डाव आपणच का उधळायचा? दोनहीे डाव यशस्वी होऊ देत ना, माधवी.”

“मला ते शक्य वाटत नाही. आपलं प्रेम सफल व्हावं, म्हणून अनी माघार घेईल. अशा रितीने आपलं नातं सुखकर होईल का? मनात सतत बोच राहील.

ना ती दोघं सुखी होतील ना आपण. त्यापेक्षा आपलं  प्रेम व्यक्त न केलेलंच बरं.”

“प्रेमाचे बंध इतके जुळलेले असताना ते तोडणं सोपं आहे?”

“कठीण जरूर आहे; पण अशक्य नक्कीच नाही.”

“पुरुषाला मोहाचा शाप आणि स्त्रीला त्यागाची देणगी देवाने दिलेली आहे, असं म्हणतात ते खोटं नाही.”

“आपल्या माणसांसाठीच करतोय ना हे? पूर्ण जीवन विरहाच्या होरपळीत व्यतीत केल्यावर, संध्याकाळ तरी सुखद जावी, ही इच्छा.”

“ठीक आहे, जशी तुझी मर्जी.  पण पुढे आपण काय करायचं?” मकरंदने उसासा सोडला.

“मकरंद, असा हताश होऊ नकोस. आपण मित्र आहोतच की. मी आधी होते तशी हुजूरपागेत राहीन. माझी नोकरी आहेच तिथे. तू इथेच नाशिकला राहा. दोघांचीही काळजी घेऊ शकशील?”

असं सुचवताना माधवीला कढ अनावर होत होते. भावनांवर ताबा ठेवणं दुरापास्त झालं होतं. पण ते आवश्यक होतं. तिच्या आईचं, अनीचं वैवाहिक जीवन अतिशय दुःखप्रद होतं. व्यसनाधीन वडिलांनी तिची शारीरिक आणि मानसिक अवहेलना केली होती. शेवटी ते अंथरुणाला खिळले आणि त्यांचा देहान्त झाला. अनींनी चार घरी जेवणाची कामं करून माधवीला नावारूपाला आणलं होतं. त्या वाळवंटात आता ओयासीस गवसत होते. ते हरवू नये, अशी माधवीची इच्छा होती.

“काळजी तर मी तिघांचीही घेऊ शकतो; पण

तिसरी परकी होऊ पाहतेय, तर मी तरी काय करणार?” माधवी दुखावली गेली.

“मी मुद्दाम करतेय का रे? मला अनीला सुखात पाहायचंय. दोनही पालकांचं कर्तव्य पार पाडून तिने मला फुलासारखं जपलंय.”

“माझ्या दादांचंही आयुष्य तसंच गेलंय. मी पाच वर्षांचा असताना आईला कॅन्सरनं ग्रासलं. शेवटच्या स्टेजला लक्षात आलं. वैद्यकीय इलाजाला आणि आजीच्या सेवेला न जुमानता तिचं प्राणोत्क्रमण झालं. माझी आजी खंबीर होती, म्हणून माझं लालनपालन व्यवस्थित झालं. यथावकाश दादासुद्धा सावरले. पण एकाकीपणा असणारच ना!”

“हो ना! आजी तर आताही खंबीर आहेत. गावाला एकट्याच राहून सर्व व्यवहार सांभाळतायत. इकडे काय चाललंय याची त्यांना कल्पनासुद्धा नसेल. मला तो फोटो सापडला म्हणून कळलं. अनी मधूनच सुचवायची; पण नक्की व्यक्ती कोण, ते कळत नव्हतं. मध्यंतरी मामा आला होता, तेव्हा तुमच्या कुटुंबाबद्दल बोलणं चाललं होतं.”

“माधु, दादा तुझ्या मामाचे मित्र. त्यामुळे तुमच्या घरी सतत येणं-जाणं होतंच. तुझी आजी म्हणजे अनीची आई साक्षात अन्नपूर्णा. त्यांनी खाऊ घातलेल्या पदार्थांची दादा अजूनही तारीफ करतात. तर अशी ही दोन कुटुंबं सान्निध्यात आली. काही ना काही कारणाने दुरावली; पण फक्त अंतराने. अंतरीचे रज्जू अभंग होते. म्हणूनच नियतीने त्यांना पुन्हा जवळ आणलं.”

“नाही, नाही. शक्यच नाही. मकरंद, आपल्याबद्दल कळलं तर ती दोघं पुन्हा एकमेकांपासून बाजूला होतील आणि अंतर्यामी कुढत राहतील. पुनरुज्जीवित होत असलेलं त्यांचं प्रेम करपून जाईल. हा कटू अनुभव त्यांनी एकदा घेतलेला आहे. पुनश्च नको. आपल्याला पूर्ण आयुष्य आहे पुढे.”

“रडतखडत ढकलायला.”

“त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी बदलावी लागेल. न जाणो आपलंही मीलन होईल कालांतराने…”

“कालाय तस्मै नमः”

“नियती काय अजब खेळ खेळतेय रे सुरेश आपल्या चौघांशी. जसा पत्त्यातला लॅडीसचा खेळ, दोन भिडू जवळ तरीही लांब.”

“सुधा, आपली परत भेट होईल अशी सुतराम शंका आली नव्हती मला. माझ्या बाबांची बदली झाली आणि आपली कुटुंबं दूर गेली. सुरुवातीला थोडा फार संपर्क होता. कालपरत्वे कमी होऊन तोसुद्धा संपुष्टात आला.”

“कसा असणार संपर्क? माझा भाऊ शिक्षणासाठी बाहेर गेला. तिथेच स्थायिक झाला. आलेल्या पहिल्याच स्थळाशी बाबांनी माझं लग्न लावून दिलं. मलासुद्धा दुसर्‍या गावी जावं लागलं. माझ्या संसाराचे आणि आयुष्याचे तीन तेरा वाजले. जिद्दीने माधवीला नावारूपाला आणली. ती मार्गाला लागल्यावर स्थिरावले. तुझ्या येण्याने आवर्त उठलं.”

“माझ्यामुळे जीवनात अस्थिरता येत असेल, तर मी जातो परत गावी. आई वाट पाहत असेल.”

“तसं नाही रे. पण आपल्याबद्दल मुलांना कळलं, तर काय होईल?”

“कधी तरी कळणारच आणि कळायलाच पाहिजे. आपल्या हातीतोंडी आलेला घास का झिडकारायचा?”

“मुलांना कळलं, तर ती दोघं एकमेकांपासून लांब जातील. त्यांच्या भावना करपून जातील रे. माझ्या माधुला पितृप्रेम मिळालंच नाही. आता पतीप्रेमाला पारखी न होवो.”

“माझा मकरंद मातृप्रेमाला पारखा झाला; पण माझ्या आईने त्याच्यावर प्रेमाची पाखर घातली. ती तर त्याचं सर्वस्व आहे. मकरंद इकडे स्थायिक झाला, म्हणून मी इकडे आलो आणि आपली अवचित भेट झाली.”

“मकरंद तुला आमच्या घरी घेऊन आला, तेव्हा मला पाहून तू केवढा चक्रावून गेला होतास.”

“चक्रावणार नाही तर काय? संमिश्र भावनांचा कल्लोळ होता तो. फोनवर मकरंदने तुम्हा दोघांविषयी सांगितलं होतं. माधवीला पाहिलीसुद्धा होती. पण कौटुंबिक पार्श्‍वभूमीचा कधी उल्लेखच झाला नव्हता. आता पुढे काय करायचं सुधा?”

“मला असं वाटतं, आपल्या जवळिकीविषयी वाच्यताच नको करूया. नाहीतरी आता आयुष्य उतरणीलाच लागलंय. एकत्रित जगण्याला काही अर्थ आहे का सुरेश?”

“दोघांनाही भावनिक आधाराची गरज आहेच ना!

लग्न झाल्यावर त्या दोघांचा सुरळीत संसार चालू होईल.

मी काय म्हणतो सुधा, त्या दोघांचं आणि आपलंसुद्धा लग्न झालं, तर बिघडलं कुठे? ती दोघं काय आपली मुलं नाहीत. म्हणजे मकरंद माझा, माधवी तुझी.”

“त्या दोघांना मंजूर नाही झाला हा नात्यांचा

तिढा तर?”

“तू तिकडे आणि मी इकडे. त्यांच्या संसारात सुख मानायचं.” सुरेशने सुस्कारा सोडला.

“मीसुद्धा आतून हेलावले आहे रे. पण काही मार्गच दिसत नाहीये.”

“सुधा, मी काय म्हणतो, आधी त्यांचं लग्न होऊ दे. सगळं स्थिरस्थावर झाल्यावर आपण आपल्याबद्दल सांगू. उरलेलं आयुष्य एकत्र व्यतीत करू. हे फक्त सहजीवन असेल. आपल्याबद्दल त्यांना कळलं तर नसेल ना?”

“मला तरी वाटत नाही, सुरेश. आपण दोघं भेटतो,

तेव्हा कर्मधर्मसंयोगाने ती दोघंही आसपास नसतात.”

“आणि ती दोघं असतात, तेव्हा आपण नुकतीच

ओळख झाल्यासारखं वागतो.”

“तेव्हा आता आपण त्यांना लग्न करण्यासाठी प्रवृत्त करायचं. माईंना, म्हणजे तुझ्या आईंना माहिती आहे का?”

“मकरंद-माधवीविषयी माहिती असेल, कारण माधवी कॅम्पला गेली होती, तेव्हा आमच्या घरी गेली होती. मकरंदने फोन करून आईला कळवलं होतं. तेव्हा कामानिमित्त मी शहरात गेलो होतो. त्यामुळे आमची चुकामूक झाली.”

“सुरेश, हे एकार्थी बरंच झालं. म्हणजे माईसुद्धा लग्न करण्यासाठी त्यांच्या मागे लागतील. आपलं काम काहीसं सोपं होईल.”

“सुधा, सध्या तरी सगळं अंधारातच आहे. येणारा काळच ठरवेल घटनाक्रम.”

“कालाय तस्मै नमः”

माईंनी दोघांनाही एकदम का बोलावलं असेल, या तर्कवितर्काच्या भोवर्‍यांत गरगरतच दादा आणि मकरंद प्रवास करत होते. एकमेकांशी बोलणंसुद्धा टाळत होते. मकरंदला त्याच्या आणि माधवीच्या प्रेमसंबंधाविषयी माईला कल्पना असल्याचं तिच्या फोनवरील बोलण्यावरून जाणवलं होतं. पण दादा आणि मावशी? मकरंदच्या बोलण्यावरून माईला, माधवी-मकरंद यांच्या संबंधाविषयी माहिती असेल आणि तिची संमतीसुद्धा असेल असा दादांचा अंदाज होता. पण सुधाविषयी कळल्यावर काय असेल तिची प्रतिक्रिया? आपणहून इतक्यात वाच्यताच नको करायला.

“या या, मकू बेटा. सुरेश प्रवासात त्रास नाही

ना झाला?”

“प्रवासात काहीच नाही; पण एकदम दोघांना का बोलावून घेतलंस, या विचाराच्या भुंग्याने मात्र सतावलंय. त्याला लवकर उडवून लाव. ”

“सुरेश, जरा सबुरीने घे. मी काय तुमची उलट तपासणी घेणार नाहीये. आधी सांगा, तुमचं कसं काय चाललंय?

सुरेश तू तिकडे वेळ कसा घालवतोस? मकू दिवसभर कामावर असतो ना? नवीन ओळखी वगैरे झाल्या की नाही?

मकू, तुझी ती मैत्रीण, माधवी ना रे? कशी आहे ती?

अगदी चटपटीत आहे पोरगी.”

“माईजी, प्रश्‍नांची सरबत्ती थांबव. आमचं छान चाललंय. तिकडे दादा कधीकधी आपलं पाककौशल्य पणाला लावतात. शेजारच्या वाळिंबे काकूंकडून जेवण मागवतो. काही वेळा माधवीची आईसुद्धा काही पदार्थ करून पाठवते.”

दादांनी चमकून माईकडे पाहिलं. सुधाचा उल्लेख केल्यानंतर तिच्या चेहर्‍यावर काही भाव दिसले नाहीत. म्हणजे, हिच्या लक्षात आलेलं नाही. विश्रांतीनंतर शांतपणे जेवणं झाली. माईंच्या गौप्यस्फोटाची दोघं अधीरपणे वाट पाहत होते. त्या मुद्दामच वेळ काढत असल्याचं त्यांना जाणवत होतं. अखेर तो क्षण आलाच.

“काय रे बापलेकांनो, तुमचा काय अंदाज?

का बोलावलंय तुम्हाला?”

“जमिनीचा किंवा शेतीचा मामला आहे काय?”

“त्यासाठी एकट्या सुरेशला बोलावलं असतं. मक्याचं काय काम?”

“वेड पांघरून पेडगावला जाऊ नका. असेच पांढरे

झालेत का हे केस?”

“माई, असं कोड्यांत बोलून चक्रावून टाकू नकोस गं.”

“तुम्हाला पडलेलं कोडंच सोडवायला बोलावलंय.”

“कोडं… कोडं… कसलं?” दोघंही गरजले.

“आता स्पष्टच बोलते. मक्या, तुझं आणि माधवीचं

काय चाललंय?”

“माधवी… मी… नाही… म्हणजे तसंच आहे.”

“दोघंही भांबावून एकमेकांकडे पाहू लागले.”

“असे चक्रावून एकमेकांकडे का पाहताय? तुमचे सूर जुळतायत, हे माझ्या केव्हाच लक्षात आलंय. सुरेश, तुझ्या नाही लक्षात आलं?”

“तसं आलं होतं गं माई; पण खात्री नव्हती.”

“एकत्र राहता आणि खात्री नव्हती कशी? म्हणजे

नक्की पाणी मुरतंय. आवडताय ना एकमेकांना? विचार पटतायत ना?”

“हो माईजी, आमचं प्रेम आहे एकमेकांवर.” घाबरून दादांकडे पाहू लागला.

“अरे खुळ्या, त्याच्याकडे काय पाहतोस? त्याचीसुुद्धा खात्री झालीय. आता पुढे काय?”

“तुम्हीच ठरवा काय ते?”

“सुरेश, तुला पसंत आहे का सून? म्हणजे, नापसंत करण्यासारखं काहीच नाही, आता उशीर कशाला? चट् मंगनी पट् शादी करूया.”

“हो… पण… तिच्या आईला कळवलं पाहिजे ना?”

“म्हणजे अजून तिच्या लक्षात आलेलं नाही? मुलीच्या आईची नजर चाणाक्ष असते. ती नकार देणारच नाही. मक्यासुद्धा सर्वगुणसंपन्न आहे. पुढचं ठरवायला तिला

बोलावू इकडे.”

दादा घाईघाईने म्हणाले, “नको नको. ती इकडे नको.”

दादा असे का करताहेत ते मकरंदला कळलं होतं.

“असं काय करतोस रे सुरेश? दोन कुटुंबाचे संबंध जुळणार, तर भेटीगाठी व्हायला नकोत?”

“होऊ दे. पण लगेच नको. नंतर बघू.”

“कधी? त्यांनी लग्न केल्यानंतर?”

“माई, आधी लग्नाचं सर्व ठरवू या ना.”

“त्यासाठी तिची आई हवीच ना!”

“नको गं. आपणच ठरवू. ती करील मान्य.”

“सुरेश, असा धायकुतीला का येतोयस? मला तिच्या तोंडून होकार ऐकायचा आहे.”

“मग आली का पंचाईत?” सुरेश गर्भगळीत झाला.

“कसली पंचाईत? माधवीची आई सुधा आहे म्हणून?”

“आं… आं… म्हणजे… तुला… कसं… कळलं?”

“कळलंय मला. ती तुझ्या मित्राची बहीण. लहानपणी यायची ना आपल्या घरी.”

सुरेशने त्यांना घाईघाईने थांबवलं, “हो माई इतकंच. आणखी काही नाही.”

“मी कुठे काय म्हणतेय? तिच्या कानावर सर्व गोष्टी घातल्या पाहिजेत. फोनवर नाही. प्रत्यक्षात.”

“हे सगळं तुला कसं कळलं?”

“कॅम्पच्या वेळी माधवी आली होती, तेव्हा तिच्या कुटुंबाची माहिती तिने सांगितली. त्यावरून ओळखलं.”

“हो… प… ण… आ.. ण… खी एक प्रॉब्लेम…”

“काय? तुम्हा दोघांचा ना?” सुरेशला थांबवून

माईंनी गौप्यस्फोट केला. तो ओशाळा होऊन मकरंदकडे

पाहू लागला.

“मकू म्हणजे माझं तसं काही म्हणणं नाही.”

“सुरेश, म्हणणं नाही कसं? जुनं प्रेमप्रकरण आहे

ना तुमचं?”

“माई, त्याच्यासमोर काय?”

“सगळी परिस्थिती स्पष्ट व्हायला पाहिजे.”

“माईजी, दादा, आम्हा दोघांना सर्व माहीत आहे.”

“काय? माधवीला सुद्धा!” माई आणि सुरेश किंचाळले.

“दादा, तुम्ही तिला वाचायला दिलेल्या पुस्तकात सुधा मावशीचा फोटो सापडला. इतर कौटुंबिक माहिती कळली. त्यावरून आम्ही कयास बांधला.”

“चला. आता सर्वांनाच माहिती आहे. मग पुढचा बेत करायला काय हरकत आहे. मला तर हत्तीचं बळ आलंय. एकाच वेळी मी सासू आणि आजेसासू होणार.”

“माईजी, पण त्या दोघी या नातेसंबंधाचा घोळ

कसा स्वीकारतील?”

“मकू, नातेसंबंधांच काय? प्रेमाचे रज्जू घट्ट

आहेत ना?”

“माई, पण माझी एक विनंती आहे. आधी तू आजेसासू हो. नंतर सासू.”

“आपण इतके बेत करतोय, ते त्या दोघींना कळवले पाहिजेत ना?”

“कळवायचं कशाला? फोन करून ताबडतोब बोलावून घे ना रे सुरेश त्या दोघींना.”

“दादा, शेवटी हा तिढा सोडवण्यात आजीनेच खरी

बाजी मारली.”

“हो रे. या लपंडावाच्या खेळात कोणीच आउट झालं नाही, हे विशेष.”