यमुनाकाकू आणि तीन लेकी (Short Story: Yamuna kak...

यमुनाकाकू आणि तीन लेकी (Short Story: Yamuna kaku Aani Teen Leki)

यमुनाकाकू आणि तीन लेकी

– प्रमोद कांदळगावकर

कित्येकदा वाट्याला आयुष्यभर कष्ट आणि कष्टच उपसावे लागतात. अशीच काहीशी अवस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील तांबळडेग गावाच्या यमुना सुदाम सारंग यांची होती. पण त्यांनी त्याचा कधीच बाऊ केला नाही. तसेच कुणाकडे बोलून दाखविले नाही. प्राप्त परिस्थितीला सातत्याने सामोरे गेल्या. याच माय लेकीच्या नात्यामधील गुंफण!

सकाळी एकदा घरातून बाहेर पडल्यानंतर परत कधी घरी येणे होईल हे समस्त मुंबईकरांना सांगताच येत नाही. त्यामुळे मी तरी त्याला अपवाद कसा असेन. नित्यनेमाने संध्याकाळची आंघोळ आटोपून रोजची वतमानपत्रे आणि रोजचं टपाल यावर दृष्टिक्षेप टाकत असताना भ्रमणध्वनी वाजला. स्क्रीनवरील नाव परिचित वाटलं म्हणून हॅलो म्हणालो.
‘बोला!’
समोरून ‘बाळा, तुला काय समजलं का? नाही ना?’
खरं तर धक्कादायक बातम्या एवढ्या आमच्या जीवनात पाचवीला पुजल्यासारख्या असल्याने काय सांगायचं ते सांगून टाका असं म्हटलं. पलीकडून यमुनाकाकू गेल्याचे सांगितलं आणि स्वाभाविक शब्द उमटले सुटल्या बिचार्‍या!
असं म्हणण्याचं कारण तितकंच सत्य होतं. यमुनाकाकूच्या तीन कर्तबगार मुलींनी मुलगा असून सुद्धा करणार नाही, इतकी आईची सेवा केल्याविषयी सर्वत्र बोललं जाऊ लागलं होतं. माणूस जन्माला आला तो एक ना एक दिवस या जगाचा निरोप घेणार हे प्रत्येकाला माहीत असतं. पण का कुणास ठाऊक मला मात्र राहून राहून यमुनाकाकूच्या जगण्यातील आवश्यक काळ चित्रपटाप्रमाणे सरकू लागला. जणू काही यमुनाकाकूची जीवनशैली ते संघर्षमय जीवन याबाबत मनात विचारांनी थैमान घातलं. मन स्वस्थ बसू देईना म्हणून दुसर्‍या एका आप्त सख्याला भ्रमणध्वनी केला. लांबच लांब बेल होत होती. थोड्या वेळानंतर भ्रमणध्वनी उचलला गेला.
पलीकडून बोल बाळामामा, त्यामुळे आश्चर्याचा सुखद धक्का बसला, तोही क्रमांक सेवेत असल्याबद्दलचा…
पण समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारण्याची संधी न देताच म्हटलं, “अजितराव, मला समजलेल्या बातमीत कितपत तथ्य!”
“होय पूर्णपणे खरी आहे.”
“पण केव्हा घडली घटना.”
“आज दुपारी चार वाजता गेली. अडीच वर्षे आजी आमच्याकडे होत्या. प्रकृतीत सुधार होत होता. आकस्मिकपणे काय बदल झाले त्यांचा अंदाज आला नाही. एवढे बोलून संभाषण आटोपत घेतलं. तशा आठवणी जागृत होऊ लागल्या. खरं तर फारशा सोयीसुविधा नसलेले गाव. त्याकाळी चार किलोमीटर शाळेत जायचं तेवढंच अंतर कापत परत फिरायचं असा दैनंदिन कार्यक्रमाचा भाग होऊन राहिला. तालुक्याच्या ठिकाणाहून एस. टी. ही आमच्याकरिता राणी होती. एस. टी. च्या गाडीवर आमचं अतोनात प्रेम होतं, किंबहुना आहे. त्याक्षणी सर्वांच्या नजरा खिळून असत. विशेषतः मुंबईवरून येणारे गावकरी एस. टी . मधून उतरल्यावर जणू काही परदेशातून आल्यासारखे आकर्षक वाटत असे. पण याच एस. टी. वाहतुकीने यमुनाकाकूंच्या जगण्याला आधार दिला. त्या काळी मुंबईहून आलेल्या स्वच्छ कपड्यातील प्रवाशांनी आपल्या सोबतचे सामान (बोजा) डोकीवर दिलं की, काकू वाट काढत त्या सद्गृहस्थाच्या घरी बोजा निमूटपणे ठेवून निघत. त्याची जी काही मोलमजुरी ते देतील त्यावर कोणतंही भाष्य न करता त्या निघून जात असत. आपल्या घरी परतत असताना वाटेमध्ये त्यांना कित्येकजण विचारणा करीत,‘गे यमुने आज कोण मुंबैसून इलो?’


चालता चालता त्या व्यक्तीचे नाव सांगून घर केव्हा गाठते असे होई. मुळात बाकीच्या विषयात त्यांना रस नसे. त्यांच्यावर पाच मुलींची मोठी जबाबदारी होती. यमुनाकाकूच्या माहेरची श्रीमंती होती. त्याचा त्यांनी बाज मिरविला नाही. दिल्या घरीच प्राप्त परिस्थितीला सामोरे जात परिस्थितीशी दोन हात केले. नवर्‍याने दोन ठिकाणी नोकरी करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याचे मन रमले नाही. त्यांनी नोकरी सोडून इकडे तिकडे फिरताना मुलींच्या शिक्षणाची, लग्नाची जबाबदारी यमुनाकाकुंवर येऊन पडली. एवढं होऊन तिनं नवर्‍याला कधीच दोष दिला नाही. प्रसंगी उपासमारीस तोंड द्यावे लागले. पण आपण व माझी मुलं उपाशी आहेत हे कधीच शेजारच्याला कळू दिले नाही. या सवयीचा संस्कार मुलींनी आपल्या जीवनात जोपासला. यमुनाकाकू प्रामाणिक होत्या. पण लाचार नव्हत्या. म्हणूनच आपल्या आईचे कष्ट अतिशय जवळून पाहिलेल्या मुलींनी यमुनाकाकूंना कधीच निराधार होऊ दिले नाही. त्यांच्यामागे खंबीरपणे नियमित मुली उभ्या राहिल्या. तरीसुद्धा विवाहित मुलींच्या घरी मुक्काम करणे यमुनाकाकूना पचनी पडत नव्हते. मुलींच्या आग्रहाखातर त्या तिथं स्थिरावत पण लगेच दोन दिवसांनी काहीतरी कारण सांगून आपल्या घरी जाण्याचा त्यांचा प्रयत्न असे. आपल्या संसारात सुखी असलेल्या मुलींना सतत आईची काळजी सतावत असे. मग मात्र तीनही मुलींनी एकत्रित निर्णय घेतला की बस्स झालं! आईवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी शालेय मैत्रीण बेबीकडे द्यावी.
एके दिवशी शेजारी असलेल्या कुटुंबाकडे पुरुष माणूस कुणी नसल्याने यमुनाकाकू मुलांच्या सोबतीला गेल्या आणि एका माथेफिरूने आकस्मिक हल्ला केला. त्यात यमुनाकाकू गंभीररीत्या जखमी झाल्या. हे वृत्त सर्वच स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आणि सर्वजण गलबलून गेले.
ताबडतोब तीनही मुलींनी तालुक्याच्या ठिकाणच्या शासकीय दवाखान्याकडे धाव घेतली पण आपल्या तिन्ही मुलींना पाहताच इथं कशा? अशी उलटपक्षी विचारणा करण्यास सुरुवात केली.
मुलींनी आईला धीर देत शांत होण्यास सांगितले. दवाखान्यातून सुटका करून घेत आईला उपचार कसे मिळतील या दिशेने प्रयत्न केले. या अपघाताने काकूंच्या स्मृतीपटावर परिणाम झाला. त्यातून त्या बाहेर आल्या पण यमुनाकाकू शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या लेकींची काळजी करत राहिल्या.
असा हा आई लेकींचा संवाद थांबला. लेकी आज खर्‍या अर्थाने पोरक्या झाल्या. हे मात्र सत्य आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटतं आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर या शब्दाची संभावना करण्यात आली असून आई गेल्याचे दुःख काय असतं, याची क्षणोक्षणी जाणीव होत राहील.