वॉर्ड नं.6 (Short Story: Ward No 6)

वॉर्ड नं.6 (Short Story: Ward No 6)

वॉर्ड नं.6


– विनायक शिंदे

आठ दिवसांपूर्वी तिच्या दूरच्या वहिनी सरकारी दवाखान्यात दाखल झाल्यावर तिने आठ दिवसातच या जगाचा निरोप घेतला होता. तिचे अंतिम दर्शनही कोणाला घेता आले नाही. कारण त्यांना करोना पेशंट म्हणून घोषित केले होते. तेव्हापासून सुशीलाने सरकारी दवाखान्याचा भयंकर धसका घेतला होता.
कालपासून सुशीला अस्वस्थ होती. तिला नेमके काय होते आहे तेच सांगता येत नव्हते. आठ दिवसांपूर्वी तिने डॉक्टरांच्या सांगण्यावरून व्हॅक्सीन घेतले होते. तिला तेव्हा काहीच झाले नव्हते; पण नंतर एकाएकी ताप भरायला लागला. सगळे उपाय करून तो हट्टी ताप उतरायचे नाव घेईना, अचानक तिची अन्नावरची वासना उडाली. तिच्या पोटात अन्नाचा कणही जाईना. तिचा नवरा सतीश घाबरला. हे काही चांगले लक्षण नव्हे! जेवण घेतले नाही तर पेशंट जगणार कसा? सर्वत्र करोनाचा हैदोस चाललेला. डॉक्टर मग दवाखान्यात येईनासे झाले, पेशंटच्या सावलीलाही ते घाबरायला लागले. नवरा जमेल तसे उपचार करीत होता. त्यातल्या त्यात त्याच्या ओळखीच्या अशा डॉ. योगिता यादवना त्याने हातापाया पडून बायकोची हालत पाहायला माझ्या घरी या म्हणून विनंती केली. परंतु त्यांनी जराही दयामाया न दाखवीत त्याला स्पष्टपणे नकार दिला.
पहिल्या मजल्यावरील दत्तसाधक सद्गुरू सकपाळ दादा यांनी घरगुती उपचार – देवधर्म- गंडेदोरे असले उपचार न करता तिला एखाद्या सरकारी दवाखान्यात दाखल करण्याचा सल्ला दिला. तो ऐकून सुशीला अगदी कावरीबावरी झाली. कारण आठ दिवसांपूर्वी तिच्या दूरच्या वहिनी सरकारी दवाखान्यात दाखल झाल्यावर आठ दिवसातच या जगाचा निरोप घेतला होता. तिचे अंतिम दर्शनही कोणाला घेता आले नाही. कारण त्यांना करोना पेशंट म्हणून घोषित केले होते. तेव्हापासून सुशीलाने सरकारी दवाखान्याचा भयंकर धसका घेतला होता.
ती म्हणाली – ‘हे पाहा, मला त्या सरकारी दवाखान्यात अ‍ॅडमीट करू नका; त्यापेक्षा मी माझ्या स्वतःच्या घरात सुखाने मरेन.’
रोज पेपरला करोना रुग्णांच्या अतिरंजित बातम्या येत होत्या. त्या वाचून सतीशचे काळीज धडधडत होते. सुशीला मनातल्या मनात खचत चालली होती. प्रायव्हेट हॉस्पिटलचा दहा-बारा लाख रुपयांचा खर्च ऐकून भल्याभल्यांच्या पोटात गोळा आणीत होता. निवृत्त होऊन त्याला चार-पाच वर्षे झाली होती. त्याची पेन्शन ती काय उणेपुरे पाच हजार! त्यात त्याच्या मालाडच्या आतेबहिणीची मुलगी सरिता दरमहा दहा हजार रुपये पाठवीत होती. त्यामुळे दोघांचा घरखर्च व औषधपाणी चालत होते. त्याच्याकडे स्वतःचे असे दागदागिने होते ते हळूहळू विकून झाले. सारखेसारखे तरी नातेवाईकांकडे पैसे कुठे मागणार? पोटी संतान नसल्याचे शल्य त्यांना तरुणपणी जाणवले नाही; पण आता म्हातारपणी हातपाय गळायला लागले तेव्हा ते दुःख पदोपदी त्याला जाणवायला लागले. तशात लॉकडाऊनमध्ये त्या उपकारकर्त्या भाचीची नोकरीही गेली होती. आणि महिन्याच्या खर्चाचे करायचे काय? हा यक्षप्रश्न सतीशच्या पुढे मधमाशांसारखा घोंगावयाला लागला.
त्या दिवशी सुशीलेच्या अंगात अजिबात त्राण नव्हते. पोटात काहीच नसल्यामुळे तिला ग्लानी आली होती. ती अर्धवट झोपेत होती. अचानक तिच्या डोळ्यांसमोर एक मोठी सावली दिसली. तिला नाक, डोळे नसले तरी तिचा आकार एखाद्या राक्षसासारखा दिसत होता. ती सारखी तिला कसल्यातरी खुणा करीत होती. सुशीला तिला पाहून एवढी घाबरली की क्षणात तिची वाचाच बंद झाली. नेमका सतीश त्याचवेळी जागेवर नव्हता. तिला त्या जागी राहणेही भीतीदायक वाटायला लागले. कशीबशी जीव खाऊन ती उठली तेव्ही ती काळसावली तिच्या इतकी जवळ आली होती की ती आता आपल्याला गिळणार असे तिला वाटले. ‘सतीश… ’ तिच्या तोंडातून अचानक किंकाळी फुटली आणि ती धाडदिशी जमिनीवर कोसळली आणि बेशुद्ध झाली. तिच्या डोळ्यापुढे काळोख पसरला.
सतीश घरी आला तेव्हा त्याच्या घरात चाळकर्‍यांची गर्दी पाहून त्याच्या काळजात चर्र.. झाले. त्यावेळी चाळकरी त्याला काही बोलले नसले तरी त्यांच्या बोलण्याचा एकंदरीत सूर असा होता की सुशीला वहिनीला आता घरात ठेवणे अत्यंत धोक्याचे आहे. यापुढे काहीही वाईट घडू शकते. ते घडण्यापूर्वी त्यांना आत्ताच्या आता सरकारी दवाखान्यात अ‍ॅडमिट करा. मग शेजार्‍यानी वेगाने हालचाली करून समोरच्या चाळीत राहणार्‍या व गंजवाडी दवाखान्यात वॉर्डबॉयच्या नोकरीवर असलेल्या बाबी शिगवणच्या वशिल्याने त्या सरकारी इस्पितळात सुशीला वहिनीना दाखल केले. पहिल्या माळ्यावरल्या त्या वॉर्डचा नंबर होता सहा आणि सुशीलेचा कॉट नंबर होता तेरा! सर्व सोपस्कार होता होता पहाट झाली होती. सर्व पेशंट निद्रित अवस्थेत होते. आया, मेहतराणी आपल्या रूममध्ये खुशाल घोरत पडल्या होत्या, तर निर्ढावलेले वॉर्डबॉय कसलीच तमा न बाळगता बाहेर पडलेल्या लोखंडी स्ट्रेचरवर निर्धास्तपणे झोपले होते. रात्रपाळीच्या सिस्टर्स डोळे मिटून खुर्चीतल्या खुर्चीत पेंगत होत्या. तो महिला वॉर्ड असल्यामुळे तिथे पुरुषांना मज्जाव होता. सुशीला निचेष्टपणे पडली होती. सतीश तिच्या कॉटशेजारी लोखंडी स्टुलावर बसला होता. त्याला तिची वाईट अवस्था पाहवत नव्हती. त्यांच्या लग्नाला उणीपुरी चाळीस वर्षे झाली होती. तेव्हापासूनचे सुख-दुःखाचे क्षण एखाद्या चलत् चित्रासारखे झरझर त्याच्या डोळ्यापुढून सरकले. त्याला एकदम गहिवरून आले. शेजारी नातेवाईकांनी जरी त्याला पुनपुनः सांगितलं असले की – ‘सुशिला काकी इस्पितळातून खडखडीत बर्‍या होऊन येतील. तुम्ही तिचे अजिबात टेंशन घेऊन नका.’ पण आता तिच्या सुखरूप घरी परतण्याची आशा त्याच्या मनाला वाटेनाशी झाली. नकळत त्याचे डोळे भरून आले. पुढल्या खाटेवर एक जीर्ण देह झालेली म्हातारी जणू काय इस्पितळात देह ठेवायला आली होती. तिच्या पोटात दुखत असावं, म्हणून ती सतत कण्हत होती. एवढेच काय ते तिच्या जिवंतपणाचे लक्षण होते. नाहीतर नातेवाईकांच्या मनातून ती केव्हाच या जगातून हद्दपार झाली होती. ‘दिवसभर आम्हाला भरपूर काम असते. त्या श्रमाने आमचाच एके दिवशी जीव जायचा तर अशा सटर-फटर पेशंटकडे लक्ष पुरवायला लागलो तर मग जगायलाच नको, असा चेहरा कायम ठेवून पांढर्‍या शुभ्र कपड्यातल्या सिस्टर्स वावरत होत्या. कुणाचा ब्रदर असो अथवा सिस्टर, आम्हाला सर्वजण सारखेच हाच त्यांचा एकंदरीत दृष्टीकोन असावा.
टीप टीप पडणार्‍या सलाईनच्या बाटलीतल्या थेंबांकडे मग सतीश पाहायला लागला. त्याला क्षणभर वाटले आपले आयुष्य असेच कणाकणाने मृत्युकडे जाते आहे. तेवढ्यात सुशिलेच्या देहाची सुक्ष्म हालचाल त्याला जाणवली. अचानक तिचा चेहरा भीतीने आक्रसला. तिच्या तोंडातून अस्पष्ट किंकाळी आली असावी; पण वॉर्डातल्या विचित्र कोलाहलात तितकीशी कोणालाही ती जाणवली नाही. तेवढ्यात सुशिलाच्या देहाची विचित्र हालचाल त्याला जाणवली. तेवढ्याने ती घाबरलेल्या अवस्थेत म्हणाली, ‘दूर उभी राहा. जवळ येऊ नको ती मला बोलावते आहे. मला अखेर बोलावणे आले. मला जायला लागेल.’
सतीशला वाटले तिला कसलेतरी अभद्र स्वप्न पडले असावे. तो पुढे झाला व त्याने तिचे दोन्ही हात घट्ट पकडले. तिच्या कपाळावर दरदरून घाम फूटला होता. त्याला वाटले तिला गरम झाले असावे. त्याने वरती छताकडे पाहिले, रंग उडालेला जुना झालेला पंखा शेवटची घरघर लागलेल्या मरणासन्न माणसासारखा फिरत होता. गेली कित्येक वर्षे त्याच्याकडे लक्ष द्यावे असे कोणालाही वाटले नसावे. म्हणून त्याने बरेच दिवस बंद असलेली खिडकी उघडली. तशी इतका वेळ कोंडलेली दमट हवा बाहेर गेली. समोरच एक शंभर वर्षे जुना पिंपळवृक्ष घनदाट फांद्यानी डंवरलेला दिसत होता. नेहमीच काहीतरी मिळेल त्याच्या शोधात असलेले डोमकावळे इकडून तिकडे उडत होते.
अचानक त्या झाडाच्या फांद्यातून चमत्कारिक आवाज ऐकायला आला. हळूहळू प्रज्वलित होणार्‍या सूर्यकिरणातून तो आवाज गडद व्हायला लागला. तसे डोळे बारीक करून त्याने पानांचा वेध घेतला तर तिथे त्याला कसली तरी विचित्र हालचाल जाणवली. तिथे शहरात त्वचितच कोणाच्या दृष्टीस न पडणारी वटवाघुळे उलटी लटकून दाटी वाटीने कलकलाट करीत होती. नकळत त्याच्या अंगावर भीतीने काटा उभारला. त्यांचे ते ओंगळवाणे स्वरूप त्याला कधीच आवडले नव्हते. त्याने धरलेले सुशिलेचे हात त्याच्या हातात तसेच होते. तेवढ्यात ती ओरडली, ‘सोड..सोड मला. मला नाही एवढ्यात मरायचे जा तू ’ तिला जे काही जे कोणी दिसत होते ते त्याला मुळीच दिसत नव्हते. अचानक ती रडायला लागली. आणि तिने सोडवलेले त्याचे हात घट्ट पकडले. तेवढ्यात सकाळच्या पाळीची सिस्टर सलाईनची बॉटल चेक करायला जवळ आली, तसे ओशाळून सतीशने आपले हात सोडवून घेतले. सावळ्या वर्णाची, लांब नाकाची व पाणीदार डोळ्यांची ती नर्स गोबर्‍या गालात हसली आणि गोळ्यांचा डोस त्याच्या हातात देत म्हणाली, ‘काका, हा सकाळचा गोळ्यांचा डोस काकीना घ्यायला सांगा; नाहीतर तुम्हीच प्रेमानं द्या, म्हणजे त्या कटकट न करता घेतील.’
‘अहो, काय सांगू तुला नाही तुम्हाला. गोळ्या घेण्याचा हिला मनस्वी कंटाळा. तिच्या नाकदुर्‍या कशा काढू? तुम्हीच – .’ पुढचे शब्द ऐकायला नर्स थांबली नाही. नऊच्या आत सगळे काम तिला संपवायचे होते. नाहीतर सायन हॉस्पिटलमधून बदली होऊन आलेला पोरसवदा डॉक्टर मनीष वयाचा मान न ठेवता सरळ सरळ कडक शब्दात ढोस द्यायचा. दोन दिवस झाले सतीश घरी गेला नव्हता. पोटात अन्नाचा कणही जात नव्हता, त्याला धड झोपही येत नव्हती. सहा नंबरच्या वॉर्डच्या बाहेर ठेवलेल्या बाकड्यावर तो बसून असायचा. त्याची दया येऊन एखादी आया त्याला पुरीभाजी आणून द्यायची. डॉक्टर दिसले की तो दीनवाणा चेहरा करून म्हणायचा, ‘साहेब माझी बायको बरी होईल ना?’
‘ते आम्ही कसे सांगणार? आमचे प्रयत्न चालू आहेत आणि हे बघा या करोना लाटेत आम्हाला दिवसाला हजारो पेशंटना तपासावे लागते, तेव्हा तुम्ही आमच्याकडून वाट्टेल त्या अपेक्षा ठेवू नका. कृपया आम्हाला समजून घ्या.’
निराश झालेला सतीश पुन्हा काळवंडलेला चेहरा घेऊन कुठेतरी पाहात बसायचा. त्याचा चेहरा परिचित झालेल्या नर्स मनातल्या मनात हळहळत म्हणायच्या, ‘पत्नीच्या प्रेमामुळे तिचे काही बरेवाईट झाले तर याला कायमचे वेड लागेल.’
सुशिला बरी होण्याऐवजी बिघडत चालली होती. चाळीतले शेजारी-हितचिंतक दर दिवसाआड येऊन त्याला धीर देऊन जात होते. त्या दिवशी रविवार होता. सतीशचा करी रोडचा भाचा प्रमोदने असाच उडत उडत कोणाकडे तरी निरोप पाठवला होता, ‘मामीच्या समाचाराला येतो.’ रविवारचा आता शनिवार आला तरी त्याचा पत्ता नव्हता.
दिवसभर सहा नंबर वॉर्ड सिस्टर्स, डॉक्टर्सच्या वावराने चैतन्यमय वाटत असला तरी काळोख पडायला लागला की हळूहळू उदासी सर्वत्र वावरायला लागायची. दिवसभर मुकाटपणे पडून असलेले पेशंट अंगातली दुखणी बाहेर काढून असहाय्य झाल्यासारखे विव्हळायला लागायचे, सुशिला मात्र सर्व वेदना सहन करून कुठेतरी अंतराळात नजर लावून पडलेली असायची. तिच्या डोळ्यात पैलतीराचे पक्षी दिसत होते. सतीशची ओळख ती जणू काय विसरली होती. वैतागून तो म्हणायचा, ‘अगं, बोल काहीतरी नाहीतर तुझ्या या अबोल्याने माझी जीव जाईल.’
त्या दिवशी दुसर्‍या पाळीचे डॉक्टर अजय त्याला बाजूला घेऊन म्हणाले, ‘काका, मी काय सांगतो ते नीट ऐका. काकींची तब्येत खालावत चालली आहे. तुम्ही त्यांना एकतर घरी न्या, नाहीतर दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमीट करा.’


‘साहेब, या अशा आजारी गोळ्याला घरी नेऊन मी काय करू? माझे हात पाय थकले आता -’
‘तो तुमचा प्रश्न आहे. सांगायचे काम मी केले.’ असे म्हणून डॉक्टर झटकन पुढे गेले.
‘देव माझी अग्नीपरीक्षा घेतो आहे.’ असे म्हणून पत्नीकडे अजिबात न पाहता तो स्वतःशी त्रागा करीत बाहेरच्या बाकड्यावर जाऊन बसला. सुरुवातीला उत्साहाने समाचाराला येणारे चाळकरी मग आटले आणि मग नुसता शुकशुकाट उरला. पहिल्या दिवसापासून त्याची भूक मेली होती. त्याच्या अंगात त्राण राहिले नव्हते. पोटाच्या विकाराने आजारी असलेल्या म्हातारीचा लेक दुबईवरून आला होता, तोही समोरच्या बाकड्यावर बसून आईसाठी अल्लाकडे दुआ मागीत बसला होता. सतीशची एकंदर अवस्था पाहिल्यावर त्याला त्याची दया येत होती. अचानक त्याला कुठूनतरी फोन आला. त्यामुळे तो जिना उतरून खाली गेला. त्या वेळी रात्रीचे बारा वाजले होते. त्याच्यासमोर अचानक सुशिला येऊन उभी राहिली तेव्हा त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसेना, त्याला मनातून आनंद झाला होता व आश्चर्याचा धक्का बसला होता. आपण समोर पाहतो आहोत ते सत्य आहे की स्वप्न? तेच त्याला क्षणभर कळेना.
‘सुशिला, इतक्या रात्री कशी काय बाहेर आलीस?’
‘तुम्हाला भेटायला. जीव आतल्या आत कोंडत होता.’ असे म्हणून ती खाली जाणार्‍या जिन्याकडे गेली आणि तिथेच अदृश्य झाली. तेवढ्यात नर्स, वॉर्डबॉय डॉक्टर सतीश बसला होता तिथे लगबगीने आले.
‘डॉक्टर पेशंट बरा झाला तुमचे आभार.’
‘काका, आम्हाला माफ करा. तु्मच्या पेशंटला काकीना आम्ही वाचवू शकलो नाही. आमचे प्रयत्न कमी पडले.’ असे म्हणून डॉक्टरांनी प्रेमाने त्याचे खांदे थोपटले. तो धावत कॉट नंबर 13 जवळ धावत गेला. तिथे सुशिलाचे कलेवर निचेष्ट पडले होते. त्याला मोठ्याने ओरडायचे होते, पण अचानक त्याची वाचाच गेली.