विधीलिखीत (Short Story: Vidhilikhit)

विधीलिखीत (Short Story: Vidhilikhit)

विधीलिखीत


– विनायक शिंदे
ऐकीव गोष्टी व दंतकथांवर विश्वासरावांचा मुळीच विश्वास नव्हता; कारण ते पहिल्यापासून नास्तिक व अश्रद्ध होते. अंधश्रद्धेला त्यांच्या विश्वात किंचीतही स्थान नव्हते. त्यामुळे गावातल्या प्रतिष्ठीत व्यक्तींनी या गोष्टीला विरोध करूनही त्यांनी हट्टाने त्याच जागेवर हा ‘स्वागत’ बंगला बांधला.
समोर पसरलेले काजळी नदीचे विशाल पात्र, तिच्या दोन्ही किनार्‍यावर पसरलेली घनगर्द वृक्षांची दाटीवाटी, आजूबाजूला अंतरा अंतराने पहारा करीत असलेले काळेकभीन्न कातळ दूरवर दिसणारे चित्ररुप, जांभळ्या रंगाचे धूसर पर्वत पश्चिमेला खाली खाली जाणारा रविराज नदीच्या स्फटीकासारख्या स्वच्छ पाण्यावर चमचमणारी सोनेरी किरणे मधूनच येणार्‍या खट्याळ वार्‍याच्या सुखद झुळूका हे सर्व विलोभनीय दृश्य आपल्या ‘स्वागत’ बंगल्याच्या पश्चिमेकडल्या लांब रुंद खिडकीच्या झरोक्यातून प्राजक्ता नेहमीच पाहत राहते. कॉलेजात बी.ए.एम.ए.च्या वर्गात ती मराठी विषय शिकवायची. तेव्हा तिच्या त्या तजेलदार चेहर्‍यावरले अलौकीक तेज व देहभान हरपून सर्वस्व पणाला लावल्यासारखे तिचे ते अजब कौशल्य पाहून तिचे विद्यार्थी, विद्यार्थीनी स्तिमित व्हायचे. थक्क व्हायचे. जगरहाटीप्रमाणे ठराविक वेळेत प्रत्येक गोष्ट थांबतेच थांबते. ती वेळ म्हणजे तुमची रिटायरमेंट!
प्राजक्ता चार वर्षापूर्वीच निवृत्त झाली होती. तिचे पती विश्वासराव राणे दहा वर्षापूर्वी विदर्भातल्या खिरोदा या गावातल्या जिल्हा कोर्टातून न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले होते. या माणगावात त्यांचे वडिलोपार्जीत घर होते. ते लहानाचे मोठे इथेच झाले होते. त्यांची जरी दर पाच वर्षांनी बदली होत असली तरी त्यांचे कुटुंब जुन्या घरातच राहात होते. त्यांचे लग्नही या गावातच झाले. दोन मुलेही इथेच झाली. प्राजक्ता लहानाची मोठी इथेच झाली होती. महाडमधल्या नवी पेठ जुने पोस्ट भागात त्यांचा मोठा वाडा होता. तिच्या आजोबांनी त्यांच्या मारवाडी मित्राच्या मदतीने मुंबईला त्या काळी बांधकाम व्यवसाय व कापसाच्या व्यवसायात चांगला जम बसवला. अगदी ऐन ब्रिटीश आमदानीत त्यांची गर्भश्रीमंत म्हणून गणना झाली होती. गावातले जुने जाणते वृद्ध सांगायचे, मुंबईचा त्या काळचा ब्रिटीश मेयर त्यांच्या घरी एकदा पाहुणचाराला थांबला होता. त्याला खडकीला ब्रिटीश छावणीत जायचे होते. सैन्याची एक तुकडीही त्याच्यासोबत होती. ब्रिटीशांच्या दहशतीमुळे गावातली लोकं रानात पळाली होती. तर काहीजण घरांच्या खिडक्या, दरवाजे घट्ट लावून माळ्यावर दडून बसली होती. आसपासच्या गावातल्या एका क्रांतीकारकाने ब्रिटीश सत्तेला कडवा विरोध केला होता. तो राग मनात धरून त्यांनी कपटनीती वापरून त्याला पकडून अत्यंत क्रूरपणे फासावर लटकावले होते.


प्राजक्ताचे वडील रामचंद्र देशमुख यांना कला, साहित्य, संगीत याबद्दल कमालीचे प्रेम होते. पदवीधर झाल्यावर त्या काळात नुकतेच सुरू झालेल्या महाडच्या सिटी कॉलेजात स्वखुषीने त्यांनी प्राध्यापकी सुरू केली. त्यांचे दोन भाऊ नागराज व शेषराज यांना खेडेगावात राहणे अजिबात पसंत नव्हते. तेव्हा त्यांनी मुंबईला असलेल्या वडिलोपार्जीत व्यवसायात लक्ष घालून जम बसवला.
प्राजक्ता ही रामरावांची एकुलती एक लाडकी कन्या असल्यामुळे तिला त्यांनी सर्व मुभा दिल्या असल्या तरी तिने थेट वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालून आलेली प्राध्यापकी स्विकारली. नंतर वडिलांनी पसंत केलेल्या विश्वासरावांच्या स्थळाला होकार देऊन ती लग्न बंधनात अडकलेली होती. सगळे कसे सुरळीत चालले असताना विश्वासरावांच्या, मुंबईतले नामांकित आर्किटेक्ट असलेल्या बालमित्राने त्यांना शानदार आणि टुमदार बंगला बांधण्याची विनंती केली. त्यानंतर आपले कौशल्य आणि बुद्धी पणाला लावून दीड वर्षात त्यांनी काळी नदीच्या काठच्या विस्तीर्ण जागेवर हा बंगला बांधून दिला. त्यांच्या आईने कधी काळी व्यक्त केलेली इच्छा, विश्वास तू या आपल्या गावात सुसज्ज बंगला बांध व उर्वरीत आयुष्य इथेच घालव. ती सफल झाली होती.
वयपरत्वे आईने जरी या जगाचा निरोप घेतला असला तरी तिची शेवटची इच्छा आपण पूर्ण केली याचेच विश्वासरावांना अत्यंत समाधान वाटत होते. ही जागा नियुक्त करण्यापूर्वी विश्वासरावांना त्यांच्या मित्रांनी धारप गुरुजींचा सल्ला घेण्याची आज्ञा दिली होती. ते म्हणाले होते, विश्वास तू ही जागा घेऊ नकोस. ही जागा शापीत आहे. ज्यांनी ज्यांनी या जागेबद्दल विचार केला. त्यांच्या मार्गात अडथळे आले, संकटे आली. या जागेला स्मशान म्हणतात. पण तिथे कधी कोणाला कोणाची चिता जळताना दिसली नव्हती. 200 वर्षांपूर्वी इंग्रजी सत्तेला इथल्या पेंढारी लोकांनी त्राही भगवान करून सोडले होते. गावातल्या गरीबांना ते लुटायचे व फास टाकून मारायचे नंतर त्यांची हिंमत एवढी वाढली की ब्रिटीश नागरिकांची संपत्ती लुटून त्यांचा त्यांच्या बंदुकीने अत्यंत निघृण पद्धतीने बळी घ्यायचे. शेवटी लॉर्ड बेंटीकने अत्यंत चलाखीने त्यांचा बिमोड केला होता. जवळ जवळ पन्नास पेंढार्‍यांना जमीनीत दहा फूट खोल खड्डा खणून जिवंतपणे मातीत गाढले होते. तीच ही जागा. शहाणे असाल तर पर्यायी जागा पाहा. पण ही जागा घेऊ नका.
असल्या ऐकीव गोष्टी व दंतकथांवर विश्वासरावांचा मुळीच विश्वास नव्हता; कारण ते पहिल्यापासून नास्तिक व अश्रद्ध होते. अंधश्रद्धेला त्यांच्या विश्वात किंचीतही स्थान नव्हते. त्यामुळे गावातल्या प्रतिष्ठीत व्यक्तींनी या गोष्टीला विरोध करूनही त्यांनी हट्टाने त्याच जागेवर हा ‘स्वागत’ बंगला बांधला. गृहशांती व गृहप्रवेश, सत्यनारायण, मुहूर्त या धार्मिक संस्कारांना अजिबात थारा न देता ते त्या बंगल्यात राहायला आले होते. बंगल्याभोवती त्यांनी तर्‍हेतर्‍हेची फुलझाडे, फळ झाडे व औषधी झाडे, तसेच वनस्पतीची मोठ्या हौसेने लागवड केली होती. त्यांची देखभाल करण्यासाठी दोन तरुण माळी कामाला ठेवले होते.


एकदा एक माळी तुकाराम, बागकाम करण्यात एवढा गुंग झाला होता की संध्याकाळ कधी झाली तेच त्याला कळले नाही. आकाशात घरट्याकडे थव्याने जाणार्‍या रानपाखरांचा आवाज त्याच्या कानी पडला तेव्हा त्याचे लक्ष अचानक बागेच्या कोपर्‍यावर गेले तर दोन उंच पांढर्‍या शुभ्र आकृती त्याचे काम निरखून पाहात आहेत असे वाटले. सुरुवातीला त्याला वाटले आपल्याला भास झाला, म्हणून तर त्याने डोळे चोळले व पाहिले तर खरोखरच तिथे दोन आकृती उभ्या होत्या. त्यांना डोळेच नव्हते, नुसतीच खोबणी होती. अचानक त्याच्या अंगावर गार वार्‍याचा झोत आला तेव्हा त्याच्या अंगावर भीतीने शहारे आले. चेहरा घामाने निथळत होता. त्याचा जन्मच खेडेगावात गेल्यामुळे भुते-खेते अमानवी शक्ती यावर त्याचा प्रचंड विश्वास होता. हातातले काम तिथेच टाकून घाबरून तो बंगल्याच्या दिशेने पळत सुटला. त्याने ती भीतीदायक घटना भीत भीत विश्वासरावांच्या कानावर घातली. तेव्हा त्याला प्रसंगी सहानुभूती दाखवायची सोडून त्यांनी त्याला रागाने तडकाफडकी कामावरून काढून टाकले. त्याचेच त्याला राहून राहून आश्चर्य वाटले. प्राजक्ता व त्यांचा मुलगा जो नुकताच एका केमिकल सेंटरमध्ये रिसर्च करीत होता. होळी निमित्त तो गावी आला होता. प्रणव यांना विश्वासरावांचा निर्णय अजिबात आवडला नाही. खरं तर विश्वासरावांचा स्वभाव अत्यंत लाघवी व प्रेमळ होता. त्या घटनेनंतर त्या माळ्याने परत त्यांच्या बंगल्याचे तोंड पाहिले नाही व राह्यलेला पगार घ्यायलाही कोणाला त्याने पाठवले नाही. तर दुसरा माळी दत्तूही कसले कारण नसताना एकाएकी कामावर यायचा बंद झाला. प्राजक्ताने त्याची खबर काढण्यासाठी त्यांच्याकडे गेली दहा वर्षे प्रामाणिकपणे हरकाम्याचे काम करणारा घरगडी बाळूला दत्तुच्या घरी पाठवले. दत्तुच्या घराला मोठे कुलूप होते. आजूबाजूला चौकशी केली तर कळले की तो हे घर सोडून त्याच्या भाच्याकडे कायमचा राहायला गेला होता.
सकाळ-संध्याकाळ विश्वासराव तासभर तरी गावात नाहीतर नदीच्या किनार्‍यावर नियमितपणे चक्कर टाकायचे. मग देवपुजा, पेपर वाचन किंवा फोनवर गप्पानंतर जेवण असा आखीव रेखीव कार्यक्रम असायचा. त्यात कोणी जवळचे परगावचे पाहुणे आले तर व्यत्यय यायचा. अचानक विश्वासरावांना मुंबईला तातडीने जावे लागले. त्यांची जवळजवळ नव्वदी गाठलेली आत्या परळच्या के.इ.एम. हॉस्पिटलमध्ये शेवटच्या घटका मोजीत होती. तिच्यावर त्यांचे खूप प्रेम होते. ती थेट त्यांच्या वडिलांसारखी दिसायची. विश्वासरावांबरोबर बाळूही होता. रात्रीपासून त्यांना कसली तरी विचित्र जाणीव होत होती. त्यांना धड झोपही येत नव्हती. सकाळी त्यांच्या आत्येभावाचा फोन आला. आई शेवटच्या अवस्थेत आहे. ती सारखी तुझी आठवण काढते आहे, म्हणजे आपल्याला जाणवलेला अस्वस्थपणा हा दैवी संकेत असावा. ते धडधडत्या अंतःकरणाने हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा एका सेकंदात हॉस्पिटलची वीज गेली. विश्वासराव एकदम चमकले. प्रत्येक शहरात एखाद्या दिवशी असा प्रकार घडतोच, त्याचे एवढे कोण अप्रूप वाटून घेत नाही; पण त्यावेळी ती घटना विश्वासरावांना भयंकर अपशकून झाल्यासारखी वाटली. मुंबईच्या लोकांना काहीही घडले तरी एका जागी थांबणे माहीत नाही. ती सतत चालत राहतात. त्या वेळी काळोख व हवेत उष्मा असूनही दादराने चालत जाऊन आपल्या रुग्णाला भेटण्याचा पर्याय त्यांनी स्विकारला. कारण लिफ्ट तर तेव्हाच बंद पडली होती. बाळूचा हात धरून विश्वासराव दादराने चालले होते. आत्या चौथ्या मजल्यावर कॉट नंबर 431 वर होती.
अशी अचानक लाईट गेल्यावर एक इमर्जन्सी जनरेटर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये सुरक्षेसाठी ठेवलेला होता. कित्येक दिवस तो बंद असल्यामुळे त्याच्यावर धुळ साचली होती. कर्मचार्‍यांनी तो चालू करण्याचा प्रयत्न केला पण तो बिघडला असल्यामुळे प्रयत्न करूनही चालू झाला नाही. विश्वासराव व बाळू तिसर्‍या मजल्यापर्यंत कसेबसे आले असतील एवढ्यात कोणीतरी वरून धावत दादराने खाली आला. पकडा पकडा असे म्हणत पोलीसही त्याच्या पाठोपाठ धावत येत होते. नेमका त्या पळणार्‍या व्यक्तीचा दंड विश्वासरावांच्या हाती आला. ते समजले हा मोठा गुन्हेगार असला पाहिजे. त्याने जोराचा हिसडा मारला तरी त्याला त्यांची पकड सोडवता आली नाही. त्याने मग सरळ डोक्याने विश्वासरावांच्या पोटात जोराची डुक्कर मुसंडी मारली. ती इतकी भयंकर होती की वेदना सहन न होऊन ते खाली कोसळले. तो दुष्ट त्यांच्या पोटावर पाय देऊन पळाला. तेवढ्यात गेलेला लाईट परत आला.
पुढील दृश्य पाहिल्यावर हॉस्पिटलमध्ये उपस्थित लोक हादरले. क्षणात विश्वासरावांना रक्ताची उलटी झाली होती. अचानक त्यांचा श्वास बंद झाला. तिथल्या वार्डातल्या तत्पर डॉक्टरनी त्यांना आयसीयू मध्ये दाखल केले. हा सर्व प्रसंग डोळ्यांसमोर घडल्यामुळे बाळू एकदम गलीतगात्र झाला. क्षणभर काय करावे तेच त्याला कळेना. तेवढ्यात त्याला कॉट नंबर 431 वरच्या आत्याची आठवण झाली. तो धावत तिथे गेला तर आत्याचे नुकतेच निधन झाले होते. तिचा मुलगा व सून बाहेरच्या बाकावर बसून रडत होते. त्याने त्यांना विश्वासरावांवर काही वेळा पूर्वी घडलेला दुर्धर प्रसंग सांगितल्यावर ते हादरले. अचानक तब्येत बिघडली म्हणून तो जन्मठेपेचा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या कडक बंदोबस्तात हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी आला होता. पोलीसांची नजर चुकवून तो पळाला होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला पण त्यांना गुंगारा देऊन तो पलायनात यशस्वी झाला होता.
विश्वासरावांच्या बाबतीत घडलेली दुर्दैवी घटना पोलिसांनी त्यांची पत्नी प्राजक्ता व मुलगा प्रणवला माणगावला कळवली. ती ऐकून गावातले लोक हळहळले. ती दोघं मुंबईला हॉस्पिटलमध्ये पोचण्या अगोदरच विश्वासराव पंचत्त्वात विलीन झाले होते. त्यांना त्यांचे निश्चेष्ट शव पाहायला मिळाले. ही दुर्घटना इतकी अकस्मात घडली होती की, प्राजक्ता व प्रणव यांना विचार करायला अजिबात सवड मिळाली नव्हती. जे आपले नव्हते ते आपल्याला सोडून गेले. जीवन-मृत्यु हा निसर्ग नियम माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यासाठी हळहळ किंवा दुःख हे होणारच! विशेष म्हणजे पतीपत्नीमधील कोणीही अर्ध्या वाटेवर जोडीदाराला सोडून गेले, तर त्यांच्या नात्यातील स्मृती सुगंध, जिवंत असणार्‍या व्यक्तीच्या हृदयात अखेरपर्यंत तेवत ठेवणे हेच एक लक्ष उरते. जसे विश्वासराव अंधश्रद्धेला कधीच थारा देत नव्हते. प्राजक्ता पण नेमकी तशीच होती. भूत-प्रेत-करणी तोडगे – भानामती असल्या गोष्टींवर तिचा कधीच विश्वास बसला नाही, ते सारे मनाचे खेळ असतात. जीवनात महत्त्वाची असते ती माणसाची आत्मशक्ती. ती सदैव जागृत ठेवायला हवी. तिने तेच केले.
पैशांची तिला अडचण आली नाही. समान आवड-निवड असलेल्या व्यक्तीची संतती मात्र कधी कधी आई – वडिलांच्या विरुद्ध आवडीची होती. प्रणव त्या दोघांचा मुलगा सर्वस्वी वेगळा होता. गौरवर्ण, धारदार नाक, जांभळासारखे निळे डोळे, अतिशय करारी चेहरा, त्याला साजेल अशी भरभक्कम शरीरयष्टी! अनेकांनी चक्क त्याला एन. एस. डी.ची वाट धर म्हणून सांगितलं. तो होता विज्ञान शाखेचा पदवीधर. वडिलांच्या ओळखीने तो एका केमिकल सेंटरमध्ये रिसर्च करीत होता. त्याला एम. एस. करून मोठ्या कंपनीत भारी पगाराची नोकरी व तेथून थेट परदेशात जायचे होते, पण त्याच्या बाबतीत काहीतरी वेगळेच घडायचे होते. ते म्हणजे त्याच्या वडिलांचे अचानक जाणे. त्याचे सर्व गोष्टीवरून एकाएकी लक्ष उडाले. तो विमनस्क अवस्थेत राहायला लागला. त्याला हे जग मिथ्या वाटायला लागले. एकदा अचानक रात्री त्याला अस्वस्थ वाटायला लागले. काही केल्या झोप लागेना. प्राजक्ताला सुद्धा झोप येत नव्हती. निळ्याभोर आभाळात टिपूर चांदणे पडले होते. वातावरणाला तजेलदार करण्यासाठी वाराही इकडून तिकडे बागडत होता. दिवसा हारीने उभी असलेली झाडे रात्रीच्या अंधारात गडद दिसत होती. जणू काय त्यांनी रात्री महाकाय आसुरी दैत्याचे रुप घेतले की काय अशीच वाटत होती. प्राजक्ता प्रणवच्या खोलीत डोकावली. तर नुकताच शांत झोपल्यासारखा वाटत होता. रात्री त्याला कधीतरी मोठे विचित्र स्वप्न पडले. त्याचा तो बराच वेळ विचार करीत होता.


आई, मला काल रात्री वेगळेच स्वप्न पडले. स्वप्नात बाबा आले होते. ते म्हणाले, प्रणव, तू तुझ्या आईला सोडून कुठे जाऊ नकोस. माझ्यानंतर आता आईच्या जीवाला धोका आहे. ते दुष्ट आत्मे आता तिचा बळी घेतील. त्यांच्या जागेवर आपण अतिक्रमण केले ना! एवढे सांगून ते नदीच्या दिशेने पळत सुटले. मला वाटते त्यांच्या पाठी कुठली तरी दुष्ट शक्ती लागली असावी.
प्रणव, तू काय बोलतो आहेस, तेच मला समजत नाही. प्रत्येकाचे जन्ममृत्यूचे एक विधीलिखीत असते. त्याच्या प्रारब्धात जे असते तसेच घडते. बाबा गेले तसे मलाही एक दिवशी जावे लागेल. एवढे बोलून ती अचानक गप्प झाली. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. संध्याकाळी नदीच्या तीरावर फिरताना पिंपळ वृक्षाच्या छायेत त्याला एक अवलिया जोगी दिसला. तो आभाळाकडे एकटक पाहत होता. त्याच्या वाढलेल्या जटा कपाळावर लावलेले चंदन, दाढी, मिशा यामुळे तो अधिकच उग्र दिसत होता. खरेतर त्याचे ते उग्र रुप पाहून कोणीही सर्वसामान्य व्यक्ती त्याच्या जवळ यायला धजावली नसती. त्याने त्याच्या पायाला हात लावून नमस्कार केला. तेव्हा त्याची समाधी भंग पावली. आपली काळीभोर बुब्बुळे गरागरा फिरवीत तो म्हणाला, बेटा, फार मोठ्या चिंतेत दिसतोस. तुझे पिताजी तुला काही दिवसांपूर्वी सोडून गेले. आता मागे उरलेल्या आईच्या जीवाची तुला काळजी लागली आहे. आत्ताच मला जाणवले या परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून एक दुष्ट शक्ती वावरते आहे. हकनाक बळी गेलेल्या माणसांचे दुष्टात्मे जगावर सूड घ्यायचा म्हणून रात्रंदिवस तिथे वावरताहेत. असल्या अपार्थवीय गोष्टीवर तुझ्या बाबांचा काडीमात्र विश्वास नव्हता. आईलाही असल्या गोष्टीवर विश्वास ठेवणे जड जाईल. कदाचित तिचाही अंत
बाबा, काहीही करा पण माझ्या आईला त्यांच्या तावडीतून सोडवा तुम्ही महान आहात.
बेटा या जगात काही जण ताकदीच्या, श्रीमंतीच्या जोरावर स्वतःला सर्वश्रेष्ठ मानीत असले तरी जन्म-मृत्युच्या मोहजालात ते लहानच असतात. त्या दुष्ट शक्तीची ताकद मोठी आहे. तिचा पाडाव करण्याचा जरी मी प्रयत्न केला तरी मी त्यात कदाचित अपुरा पडेन.
बाबा, आता इथे बोलत बसण्याची ही वेळ नाही. चला माझ्याबरोबर रात्र व्हायला आता काही वेळ उरला आहे. तुम्ही कदाचित त्या दुष्ट शक्तीला हरवाल.
तसे पाहिले तर माझ्या हातात तसे काही नाही. जगन्नियंत्याने ठरवलेल्या विधीलिखीताला तोडण्याची शक्ती केवळ त्याच्याच हातात आहे.
प्रणव नदीच्या काठाने रुळलेल्या पाय वाटेने भराभर चालत होता. त्या पाठोपाठ तो साधू लांब लांब ढेंगा टाकीत येत होता. नदीच्या उताराच्या वरल्या अंगाला तो साधू थांबला. त्याला कसली तरी विचित्र जाणीव झाली. तेवढ्यात नदी पलीकडल्या शेतात अचानक टिटवी ओरडली. त्याला वाटले, हा कसला संकेत ?
आई आई असे मोठ्याने ओरडत प्रणव आईच्या खोलीत धावला. सर्वत्र लाईट तिनेच लावला असावा. कारण बाहेर मिट्ट काळोख पडला होता. प्राजक्ता खिडकीजवळ तिच्या नेहमीच्या खुर्चीवर बसलेली दिसत होती. तिचे डोळे सताड उघडे होते. कसल्या तरी भीतीने तिचा चेहरा आक्रसला होता. तिच्या शरीरातले प्राण पखेरू उडून गेले होते. निष्प्राण देह तसाच गोठलेल्या अवस्थेत खुर्चीत होता. प्रणवने हात लावल्यावर तिचा देह कलला व खाली कोसळला.
त्या दुष्टांनी डाव साधला. तुझ्या आईचे विधीलिखीत मी बदलू शकलो नाही, असे म्हणून तिथे क्षणभर न थांबता तो वेगाने बाहेर निघून गेला.