तुझ्याचसाठी (Short Story: Tuzyachsathi)

तुझ्याचसाठी (Short Story: Tuzyachsathi)

तुझ्याचसाठी

– राजश्री बर्वे
अरुताई एरवी एवढी समजूतदार; पण आलोकचं काही असलं की, किती एक्साइट होते. त्याची कविता कधी वाचते, त्यावर कमेंट कधी देते, असं तिला होऊन जातं. अरुताईचं असं तंद्री लागणं, वाट पाहणं, हुरहुर लागणं, गुणगुणणं ही सर्व प्रेमात पडल्याची लक्षणं तो समजू शकत होता.
धापा टाकत आलेल्या पिंट्याला बघून अरुने लगेच लॅपटॉप त्याच्या ताब्यात देत म्हटलं,
“पिंट्या, हे घे पाणी आणि हा लॅपटॉप. आणि बाकीचं इथलं तिथलं नको बघत बसूस फेसबुकवर. पहिला काव्यमैफल ग्रुपवर जा आणि आलोकने एखादी नवीन कविता पोस्ट केलीय का, ते बघ आधी.”
“हो गं ताई बघतो. आधी दम तर खाऊ दे मला.” पाणी पिऊन झाल्यावर पिंट्या म्हणाला.
आता लॅपटॉप ऑन करून गुगल क्रोमवर जाऊन लॉगिन करून फेसबुक उघडायला, काही मिनिटं तर लागणारच ना. पण अरुला तेवढाही दम धरवत नव्हता.
“अरे सांग ना. किती वेळ बघतोयस?”
“हो टाकलीय त्याने कविता. पण मी आता वाचत बसणार नाहीय हं. आजीच्या हातात ओझं होतं म्हणून
वर आलो मी ते घेऊन. माझे मित्र खाली वाट पाहताहेत. बॅटिंग तशीच सोडून आलोय. माझा खेळ संपला की येतो आणि वाचतो.” पिंट्या सटकायच्या बेतात होता. पण अरुने त्याला हाताला धरून खेचलं आणि परत बसवलं.
“काय रे भाव खातोस, पिंट्या? जवळ जवळ एक आठवड्यानंतर येतोयस. मला फेसबुक वगैरे शक्य नाहीय, म्हणून तुझ्या मागे लागलेय ना? प्लीज वाच ना रे.”
शेवटी पिंट्या बसला आणि वाचू लागला, “बरं ऐक, आलोकच्या कवितेचं नाव आहे, ‘तुझ्यासाठी…’
सर्वस्वाचे देणे
मनातले गाणे
पुनव चांदणे… तुझ्यासाठी
इवलीशी खूण
सुरेखशी धून
पाऊस वरून… तुझ्यासाठी
चांदण्याचे श्‍वास
आभाळाचा भास
पुन्हा पदन्यास… तुझ्यासाठी
प्रीतीचे किरण
स्वत्वाचे हरण
जीवन मरण… तुझ्यासाठी”
पिंट्याने कविता वाचली, मात्र अरु वेगळ्याच दुनियेत गेली. इतके सुंदर शब्द, जणू काही झाडावरून प्राजक्ताची फुलं टपकताहेत. इतकी सुंदर लय, जणू काही झोपाळ्यावर बसून आपलं मनच झुलतंय. इतका सुंदर अर्थ, जणू काही हृदयातील
खोल असा हळवा कोपरा कोणी उकरून काढतंय…
“ओह! माय गॉड. काय कविता आहे! चल लाईक कर पटकन आणि मी सांगते तसं लिही कमेंटमध्ये.”
“ए तायडे, खाली सगळे जमलेत. जातो ना गं मी. खेळ झाला की, घरी नाही जात माझ्या. तडक इथेच येतो. मग लाईक करूया, कमेंट करूया, चॅट पण करू हवं तर आलोकशी.”
“अरे जाशील रे, बस आणि आधी लिही मी काय सांगते ते.”
अरुताई एरवी एवढी समजूतदार; पण आलोकचं काही असलं की, किती एक्साइट होते. त्याची कविता कधी वाचते, त्यावर कमेंट कधी देते, असं तिला होऊन जातं. पिंट्याला सर्व समजत होतं. कारण त्याचाही आता तारुण्याच्या वाटेवर प्रवास चालू होणार होता. अरुताईचं असं तंद्री लागणं, वाट पाहणं, हुरहुर लागणं, गुणगुणणं ही सर्व प्रेमात पडल्याची लक्षणं तो समजू शकत होता. शेवटी त्यानं खेळाचा नाद सोडला आणि तो लॅपटॉपवर बसला.
अरुने सांगितलेली कमेंट टाकायला त्याने सुरुवात केली. कमेंट कसली आलोकच्या कवितेचं रसग्रहणच होतं ते. शिवाय तिने अजून दोन कडवी वाढवली.
पापण्यांचा भार
मनातला स्वर
हृदयाचा थरार… तुझ्यासाठी
भावनांचे ऋण
अस्तित्वाची जाण
माझे पंचप्राण… तुझ्यासाठी
हे सर्व टाइप करून झालं. ते पोस्ट करणार तेवढ्यात पिंट्याला काही सुचलं. तो म्हणाला,
“तायडे, एक आयडिया सांगू का तुला? इथे असं ग्रुपवर लिहिलं, तर ते सर्व जण वाचतात. शिवाय तू त्याची कॉमन वाचक असल्यासारखं वाटतं. तुला जर त्याला आपण कोणी स्पेशल आहोत, असं वाटायला हवं असेल आणि त्याने नीटपणे तुझं मत किंवा तुझी कमेंट वाचावी, असं वाटत असेल तर त्याला पर्सनल मॅसेज करायला हवा. काय वाटतं तुला? टाकू त्याला पर्सनल मेसेंजर वर?”
“चालेल का रे? तूच सांग. तुलाच जास्त माहिती हे सर्व फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपचे फंडे. पण असं केलं तर आगाऊपणा नाही ना वाटणार?”
“त्यात काय आगाऊपणा आहे? तुला तो… आय मीन.. त्याच्या कविता आवडतात. होय ना? मग सांगायचं त्याला. सिम्पल फंडा आहे, बघ हा मैत्रीचा.” खांदे उडवत पिंट्या म्हणाला.
“तुम्ही शहरातली मुलं मुळातच बिनधास्त असता. आमच्या गावाकडे नाही असं चालत. त्यातून मी तर खेडेगावात राहिलेले. तालुक्याला कॉलेजमध्ये जायला मिळायचं त्यातच भाग्य मानायचो आम्ही. आम्हाला कुठले मित्रबित्र असायला.”
“बरं चल तायडे. सध्या तरी साधी कमेंट टाकतो. तू विचार कर फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवायची का ते?” असं म्हणून पिंट्या सटकलाच.
अरुच्या मनात मात्र आलोकच्या कवितेच्या ओळी रुंजी घालत होत्या. आलोक… कसा असेल तो? दिसायला… स्वभावाने… मनाने? हळवा असणार. प्रेमळ असणार. नक्कीच! ज्याच्या कविता इतक्या छान तो स्वतः छानच असणार. त्याच्या कवितांचे शब्द म्हणजे, नुसते शब्द नसतातच. तो असतो भावनांनी ओथंबलेला नजराणा. त्याच्या प्रेयसीकरिता. किती उत्कट असतात त्यातील भावना. त्याचे प्रेयसीला लिहिलेले शब्द आपल्याकरताच लिहिलेले का वाटतात? त्याच्या कविता वाचताना अंगावरून मोरपीस फिरवल्याचा भास का होतो? त्याला फेसबुकच्या माध्यमातून भेटताना, आपल्या कमेंटवर आलेली त्याची कमेंट वाचताना मोहरल्यासारखं का वाटतं?
खरंच पिंट्या म्हणतो, तसा मैत्रीचा हात करावा का आपण पुढे? काय हरकत आहे? पण आपण त्याच्या प्रेमात आहोत, असा त्याचा गैरसमज झाला तर? गैरसमज? पण तो गैरसमज कुठे आहे? खरंच आपण त्याच्यात गुंतलो आहोत. खूप खोलवर. अरे बापरे! हे कधी घडलं? आपल्याही नकळत? आजीला कळलं तर? तिला काय वाटेल? जाऊ दे. पुढचं पुढे. सध्या फ्रेंडशिप करायला काहीच हरकत नाही.
***


“तायडे, मी एक मार्क केलंय. आलोक हल्ली ग्रुपवर कविता टाकायच्या आधी, तुला पाठवतो मेसेंजर वर.”
“चल, उगाच काय पिंट्या? काहीही बोलतोस.” नाही म्हटलं तरी अरुच्या गालावर गुलाब फुललेच.
“अगं, मी कशाला काहीही बोलू? आणि तुझं अकाउंट कोण बघतं? मीच ना? मग असं मला काही बोलशील, तर मी नाही मदत करणार तुला.”
“’ए बरं बरं, सॉरी रे. पण कशावरून तुला असं वाटलं?”
“अगं त्याने तुला पाठवलेल्या
आणि ग्रुपवर टाकलेल्या कवितांच्या तारखा आणि वेळा पहिल्या, तर सिद्ध होईल बघ. थांब दाखवतोच तुला,”
असं म्हणून पिंट्याने मेसेंजर उघडला आणि त्यावरचा अलोकचा मॅसेज पाहून तो उडालाच.
आलोकने अरुला चक्क भेटण्याची गळ घातली होती. पिंट्या आता मात्र घाबरला, कारण आलोकशी बोलताना तो अरुताईचे शब्द थोडे तिखटमीठ लावून पाठवत होता. शेवटी पिंट्या आत्ताच्या पिढीतला होता. आलं मनात की, टाकलं बोलून. त्यातून अरुताईच्या आलोकच्या प्रति भावना त्याला समजत होत्या. तिच्या उधाण आलेल्या भावनांना ती बांध घालत होती. त्याच्याशी चॅट करताना तोलून मापून शब्द वापरत होती. पण पिंट्या तिच्या नकळत तिच्या खर्‍या भावना आलोकपर्यंत पोहोचवत होता. आणि आता आलोकही अरुताईच्या प्रेमात पडला होता बहुतेक. बहुतेक का? नक्कीच!
आलोकशी मैत्री करायच्या अगोदर पिंट्याने मुद्दामच अरुचा एक छानसा साडी नेसून खुर्चीवर बसून वाकून साडीच्या निर्‍या नीट करतानाचा फोटो, तिच्या नकळत काढून टाकला होता; तिचं प्रोफाईल पिक्चर म्हणून. त्यावर आलोकने ‘मार्व्हलस’ अशी कमेंट टाकली होती आणि लगेच तिच्या सौंदर्याचं वर्णन करणार्‍या चार ओळींची कविताही! ती कविता वाचताना अरुताई अशी काही लाजली होती की, पिंट्याने तेव्हाच ठरवलं होतं की, आपण या दोघांना एकत्र आणायचा प्रयत्न करायचा. आणि मग त्याने अरुताईच्या नकळत तिचे शब्द बढाचढाके लिहायला सुरुवातही केली होती.
पण आलोकची दांडी एवढ्यातच गुल होईल, असं मात्र त्याला वाटलं नव्हतं. मैत्री करून महिनाही झाला नाही, तर आलोकला अरुला भेटावसं वाटू लागलं होतं. आता याला जे उत्तर द्यायचं, ते अरुताईला विचारूनच द्यावं लागणार. फेकंफाक नाही करता येणार. मग त्याने बिचकतच तिला सांगितलं,
“तो येतोय. तुला भेटायला.”
“काय?” अरु जवळजवळ किंचाळलीच, “कधी?”
“उद्याच.”
“उद्या? इतक्या लगेच? का?”
“अगं तायडे, उद्या 14 फेब्रुवारी. व्हॅलेंटाइन डे. प्रेमाचा दिवस.”
“अरे बापरे! पिंट्या हे सर्व काय चाललंय? असं काही अपेक्षित नव्हतंच रे मला. हे काय होऊन बसलंय? उद्या आलोक येईल. मला पाहील. आणि मग? मग आमची मैत्रीही तुटेल. मला तो फेसबुकवर ब्लॉक का काय म्हणता ना, तसं करेल. मी त्याच्याशी बोलूही शकणार नाही. मला त्याचं प्रेम नाही मिळालं तरी चालेल… पण मैत्री तरी तुटायला नकोय. मी काय करू आता? त्यापेक्षा आपण त्याला नको सांगूया का रे?” अरुच्या डोळ्यातील पाणी बघून पिंट्याही हेलावला. पण त्याने तिला धीर दिला.
“ऐक तायडे, आजी संध्याकाळी कीर्तनाला जाईल दोन तास. तेव्हा तो येणार आहे. तू भेटून तर घे.”
“म्हणजे, पिंट्या तो येणार तेव्हा तू पण नसणार?”
“अर्थात ताई, तुम्ही दोघांनी एकांतात भेटायचं, बोलायचं. अगदी सगळं काही. काही म्हणून शिल्लक ठेवायचं नाही. आणि घाबरू नकोस तायडे. ही वेळ कधी ना कधी येणारच होती. ती थोडी लवकर आली एवढंच. जे होईल ते होईल. आपण बघू मग काय करायचं ते.”
***
सूर्य अस्ताला गेला होता. पाखरं आपापल्या घरात शांतपणे विसावली होती. संधिप्रकाशही धूसर झाला होता. जवळजवळ काळोखच पडला होता. अरुला त्याचं काहीच पडलं नव्हतं. तसंही तिला काय फरक पडत होता? ती तर अलोकच्या विचारात गढून गेली होती. इतकी की, आजीने घराबाहेर पडताना ‘दरवाजा लावून घे गं’ म्हटलेलंही तिच्या मेंदूपर्यंत
पोहोचलंही नाही.
आलोकच्या वाटेकडे ती डोळे लावून बसली होती. त्याची चाहूल कधी लागते, तो कधी येतो, याची ती आतुरतेने वाट पाहत होती. तिला त्याला समजून घ्यायचं होतं. तिला त्याला सर्व सांगायचं होतं. सगळं कळल्यावर तो काय घेईल तो निर्णय त्याला घेऊ दे. फक्त त्याला एक गळ घालायचीच, त्याने तिच्याशी मैत्री तरी ठेवायची. असं सगळं ठरवल्यावर ती निश्‍चिंत झाली.
तो आला. दरवाजा उघडाच असल्याने त्याने बेल वाजवली नाही. ती पाठमोरी होती. म्हणून तो दबक्या पावलांनी आत शिरला. मागून जाऊन त्याने तिच्या डोळ्यांवर हात ठेवला. बसलेली ती उभी राहिली. त्याने डोळे झाकले त्या हातावरून तिने हात फिरवला. तो स्पर्श तिला हवाहवासा वाटला. तिने त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. तशीच मिटल्या डोळ्यांनी ती वळली आणि सरळ त्याने ओढून घातलेल्या मिठीत शिरली. बराच वेळ ते काहीही न बोलता मिठीत होते. मग त्याला जाणवलं. आपण अजून एकमेकांना नीट पाहिलंही नाही. पाहिलं नसलं, तरी आपण खूप वर्षं एकमेकांना ओळखतोय असं त्याला वाटत होतं. आणि ती? तिने तर त्याला मनोमन वरलं होतं. कधीच.
खूप वेळ मिठीत राहिल्यानंतर ती स्पर्शाने त्याला समजून घेऊ लागली. चाचपडल्यासारखी त्याच्या पाठीवरून हात फिरवू लागली. हळूहळू तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्यापर्यंत पोहोचले. त्याचे दोन्ही
हात हातात घेण्याकरता, तिचे हात हळूहळू त्याच्या खांद्यावरून, दंडांवरून पुढे येऊ लागले. पण तिला आश्‍चर्याचा धक्का बसला. त्याचा उजवा हात दंडाच्या पुढे नव्हताच. त्याला फक्त एकच हात होता. त्याला फक्त एकच हात होता?
आणि त्याला? त्यालाही काहीतरी जाणवलं. तिचं ते त्याच्या पाठीवरून चाचपडणं, डोळे न उघडता तसेच मिटून ठेवणं, त्याला काहीतरी सांगून गेलं. तिचे डोळे…? तिला डोळे नाहीत? या गोष्टीचा त्याला थोडा शॉक बसला, जसा त्याच्या हात नसण्याचा तिला बसला होता. पण त्या दोघांची ही अवस्था अगदी थोड्या वेळाकरता होती.
थोड्याच वेळात दोघांच्याही चेहर्‍यावर छान हसू विलसू लागलं. तिने त्याचा डावा हात आपल्या दोन्ही हातात घेतला आणि त्याने तिच्या
अर्धोन्मीलित नेत्रांवर आपले ओठ टेकवले. आणि दोघंही एकदमच म्हणाले, ‘हॅपी व्हॅलेंटाइन्स डे!’