तिची स्पेस (Short Story : Tichi Space )

तिची स्पेस (Short Story : Tichi Space )

तिची स्पेस

– सुधीर सेवेकर

“आई, आम्ही उद्याच्याच फ्लाईटने युएसला परत जातोय गं!“
सुबोध म्हणाला, तशा योगिताबाई भानावर आल्या. बर्‍याच वेळापासून त्या वकीलसाहेबांच्या तस्वीरीकडे पाहात भूतकाळात रमून गेल्या होत्या. हृदयविकाराच्या झटक्याने अचानक वकीलसाहेबांनी वयाच्या जेमतेम साठीतच या जगाचा निरोप घेतला होता. त्यांच्या ‘उदकशांती’चा विधीही रीतसर कालच पार पडला होता. त्यासाठी वकीलसाहेबांचे झाडून सगळे आप्तेष्ट काल जमले होते. काल दुपारी रीतीप्रमाणे गोड जेवण पार पडले, तसा आलेल्या आप्तेष्टांनी काढता पाय घ्यायला सुरुवात केली आणि काही तासातच गजबजलेला वकीलसाहेबांचा बंगला ओस पडला. बंगल्यात उरली होती फक्त तीन माणसं. वकीलसाहेबांच्या पत्नी योगिताबाई, मुलगा सुबोध आणि सू्न रिया.
निघताना प्रत्येक नातेवाईक योगिताला सांगत होता, “योगिता स्वतःची काळजी घे बाई. काही गरज पडली तर आम्हाला फोन करायला संकोच करू नकोस!”
तेच ते ऐकून योगिता खरे तर वैतागली होती. म्हणे गरज पडली तर फोन कर! वकीलसाहेबांनी माझ्यासाठी भरपूर आर्थिक तरतूद करून ठेवलीय. मला कुणाच्याही दारात जायची गरज पडणार नाही.
गरज होती पस्तीस वर्षांपूर्वी, जेव्हा वकीलसाहेबांना त्यांच्या वडिलांनी – थोरल्या देशमुखांनी घरातून काढलं होतं, तेव्हा. थोरल्या देशमुखांनी वकीलसाहेबांना घराबाहेर काढायचं कारण काय घडलं होतं?
कारण वकीलसाहेबांनी योगिताशी, एका भिक्षुकाच्या मुलीशी लग्न केलं होतं. वकीलसाहेबांचं घराणं देशमुखांचं. तालेवार. गावाकडे मोठा वाडा. जमीनजुमला. पंचक्रोशीत मानमरातब. त्या घरातल्या तरुण, बुद्धिमान, उमद्या मुलानं एका दरिद्री भिक्षुकाच्या मुलीशी लग्न करावं? थोरल्या देशमुखांना ते अजिबात मानवलं नाही. अनेक थोरामोठ्यांच्या, मंत्र्यांच्या मुली वकीलसाहेबांना सांगून आल्या होत्या. आपलं देशमुखी घराणं, नावलौकिक, श्रीमंती या कशाचाही विचार न करता त्याकाळी वक्तृत्व स्पर्धा व युवक चळवळीत सक्रिय असलेल्या योगिता नामक एका सर्वसामान्य रंगरूपाच्या आणि गरीब घरातल्या मुलीशी लग्न केलं होतं, हे थोरल्या देशमुखांच्या फार जिव्हारी लागलं होतं. त्यावेळी एकही आप्तेष्ट, नातेवाईक वकीलसाहेब आणि योगिताच्या पाठराखणीस उभा राहिला नव्हता. कारण सगळ्यांमध्येच तो वतनदारीचा, देशमुखपणाचा, सरंजामीपणाचा कैफ, खरे तर माज ओतप्रोत भरलेला होता. योगिताला या सरंजामीपणाची, खोट्या अहंकाराचीच विलक्षण चीड होती.
वतनदारी, देशमुखी, जहागीरदारी हे केव्हाच संपलेलं होतं. पण अनेक घराण्यांप्रमाणे या थोरल्या देशमुखांमध्ये आणि त्यांच्या तसल्याच नातलग आणि गणगोतमध्ये तो माज अजुनही कायम होता. अपवाद फक्त वकीलसाहेबांचा. अत्यंत पुरोगामी, सहिष्णू आणि लोकशाही संस्कारात ते हॉस्टेलमध्ये वाढले होते. राजेरजवाडे, नवाब, जहागीरदार, वतनदार हा जमाना आता संपलाय. आता माणसाची ओळख आणि त्याचे महत्त्व त्याच्या स्वतःच्या कर्तबगारीवर ठरणार, हे त्यांनी बरोबर ओळखले होते. त्यामुळे त्यांनी कधीच आपल्या देशमुखीचा अहंकार दाखवला नाही. थोरले देशमुख मात्र ‘सुंभ जळला तरी पीळ जात नाही’ अशा मानसिकतेचे होते.

 


वकीलसाहेबांनी गाव-वाडा सोडला तो कायमचाच. हायकोर्टाच्या औरंगाबाद बेंचमध्ये त्यांनी आपल्या वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली. बुद्धिमत्ता, वक्तृत्व कौशल्य, यांच्या जोरावर एक निष्णात आणि अभ्यासू वकील म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला. आरंभी भाड्याच्या छोट्याशा दोन खोल्यात योगितासह सुरू झालेला त्यांचा संसार यशावकाश मोठ्या जागेत – बंगल्यात रूपांतरित झाला. प्रादेशिक विकास, प्रादेशिक प्रश्‍न यांबाबतही अनेक केसेस वकीलसाहेबांनी लढविल्या, जिंकल्या. त्यामध्ये मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी, नोकर्‍या आणि विकासनिधीतील प्रादेशिक असमतोल, सरकारी नोकर्‍यांबाबत होणारा अन्याय, मेडिकल व तंत्रशिक्षणाच्या जागा रेल्वे, रस्ते, सिंचन याबाबतचा अनुशेष असे अनेक सामाजिक, राजकीय खटले त्यांनी स्वार्थनिरपेक्षपणे आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर लढविले आणि जिंकलेही. त्यामुळे एक जागरूक व अभ्यासू वकील म्हणून ते जनतेच्या आदरास पात्र ठरले. त्यांच्या या वाटचालीत योगितानेही त्यांना पुरेपूर साथ दिली. आरंभी त्यांच्यावर बहिष्कार घालणारे सगळे आप्तेष्ट योगिता व वकीलसाहेबांच्या यशामुळे सुतासारखे सरळ झाले.
गेल्या पस्तीस वर्षांच्या सहजीवनाचा हा पट योगिताच्या मनःपटलावर ती पाहात होती. एवढ्यात सुबोधचे उद्गार तिच्या कानी पडले. त्या पाठोपाठ रिया – सुबोधची बायको हिने तिच्या विमानाचे वेळापत्रक, वगैरे तपशील सांगायला सुरुवात केली आणि नंतर म्हणाली, “ममा, यू मस्ट नाऊ स्टे विथ अस इन युएस! इथे भारतात तुम्ही एकट्या काय करणार?”
बोटाच्या इशार्‍याने योगिताने रियास थांबविले आणि ती बोलू लागली, “रिया – सुबोध मी तुमच्याकडे युएसमध्ये अवश्य येईन. राहीन. पण आत्ता नाही. आत्ता मला माझी व वकीलसाहेबांची काही स्वप्नं, काही योजना इथे भारतात राहूनच पूर्ण करायच्या आहेत. पहिले म्हणजे मला आपल्या या बंगल्याचे रूपांतर एका हॉस्टेलमध्ये करायचे आहे. गुणी पण गरीब मुलींसाठीचे हॉस्टेल. गरिबीमुळे मुलींच्या गुणांची, कर्तबगारीचीही कशी उपेक्षा होते, हे मी स्वतः अनुभवलेय. अशा मुलींच्या पाठीशी मी उभी राहीन. त्यांना यथाशक्ति सक्षम करेन.”


“दुसरे म्हणजे आपल्या या पावन प्रदेशाचे अनेक आर्थिक आणि विकासविषयक प्रश्‍न राज्याच्या राजकारणामुळे प्रलंबित आहेत. त्यांच्या सोडवणुकीसाठी मी वकीलसाहेबांप्रमाणेच माझे वकिली कौशल्य पणास लावून, प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करीन. अरे, आपल्या सात पिढ्यांची राख या मातीत मिसळलेली आहे. त्या भूमीची विद्यमान पक्षपाती राजकारण्यांनी जी अवहेलना चालविलेली आहे, तिला मी माझ्या परीने चाप बसविण्याचा प्रयत्न करणार आहे. या कामी मला वकीलसाहेबांचे अनेक स्नेही, युवा कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवा संस्था यांचीही साथ मिळेल. याची मला खात्री आहे. याला किती काळ लागेल मला माहीत नाही. पण मी प्रामाणिकपणे झटेन. आणि नंतर मी जमेल तेव्हा तुमच्याकडे येईन!”
योगिताच्या या बोलण्याकडे सुबोध आणि रिया अवाक् होऊन पाहात राहिले. त्यांनी योगिताच्या पायावर डोके ठेवले. योगिताने वकीलसाहेबांच्या तस्वीरीकडे पाहिले. त्यांची मुद्रा तिला त्या क्षणी अधिकच प्रसन्न वाटली. जणू ते योगिताच्या या निर्णयाला ‘ऑल द बेस्ट’ अशा शुभेच्छा देत होते.