स्वप्नपूर्ती.. (Short Story : Swapnapurti)

स्वप्नपूर्ती.. (Short Story : Swapnapurti)

स्वप्नपूर्ती..

– शिल्पा केतकर

अखेर तो भेटीचा दिवस उजाडला. अमर जरा वेळेच्या आधीच तेथे पोहोचला होता… खरं तर सकाळचे सात वाजले होते, त्यांची भेटण्याची वेळ आठची ठरली होती… हे सगळं माहीत असूनही कधी एकदा अरुणाला भेटतोय असं त्याला झालं होतं…गेल्या पाच वर्षांत एकदाही त्यांनी एकमेकांना भेटण्याचा, फोन करण्याचा, मेसेज करायचा प्रयत्न देखील केला नव्हता.

नदी किनारी प्राजक्ताचं सुंदर झाड आणि सकाळी सकाळी प्राजक्ताच्या पांढर्‍या केशरी रंगाचा तो पडलेला सुंदर सडा. त्या दोघांची ती नेहमीची भेटायची जागा. शिक्षण पूर्ण झाल्यावर परत याच ठिकाणी भेटायचे, तोपर्यंत भेटायचे नाही, तसे ठरलेच होते दोघांचे आणि अखेर तो भेटीचा दिवस उजाडला. अमर जरा वेळेच्या आधीच तेथे पोहोचला होता… खरं तर सकाळचे सात वाजले होते, त्यांची भेटण्याची वेळ आठची ठरली होती… हे सगळं माहीत असूनही कधी एकदा अरुणाला भेटतोय असं त्याला झालं होतं…गेल्या पाच वर्षांत एकदाही त्यांनी एकमेकांना भेटण्याचा, फोन करण्याचा, मेसेज करायचा प्रयत्न देखील केला नव्हता. तिची वाट बघत येरझारा घालत असताना नकळत तो मागच्या भूतकाळात पोहोचला.. घडून गेलेल्या सगळ्या गोष्टी त्याच्या डोळ्यासमोरून सरकू लागल्या…
अरुणा आणि अमर यांची दहावीपासूनची मैत्री.. अमर सरपंचाचा मुलगा तर अरुणा अगदी साधी मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात वाढलेली मुलगी अभ्यासात हुशार.. दहावीला बोर्डात आलेली. पुढे जाऊन शिक्षिका व्हायचं आणि गावातल्या मुलांकरता आपल्या शिक्षणाचा उपयोग करायचा. त्याकरता शहरात शिकून परत गावाकडे परतायचं हे तिनं आधीच ठरवलं होतं. अमरसुद्धा अभ्यासात हुशार पण पुढचं शिक्षण तो तालुक्याला जाऊन घेणार होता. त्याला गावातच राहायचं होतं.
शेतीकडे लक्ष आणि गावाचा विकास करणार हे त्याने मनाशी पक्क केलं होतं.
दोघांची उद्दिष्टं तसं पाहता सारखीच होती, गावाचा विकास.. दोघांचा एकमेकांवर खुप विश्वास आणि प्रेम, पण त्यांच्या या प्रेमाला दोन्ही घरचा कडाडून विरोध होता. नाही म्हणायला अरुणाच्या मामाचा मात्र त्यांच्या या प्रेमाला पाठिंबा होता.
अमरचे वडील गावचे सरपंच… अत्यंत चलाख माणूस… समोरच्याकडून काम कसं करून घ्यायचं त्यांना बरोबर माहीत…गावांत कुणीही त्यांच्याबद्दल चांगलं बोलत नसे.. त्यांना अमर आणि अमिता अशी दोन मुले, मुलीचं मागच्यावर्षीच लग्न लावून दिले होते. ती तिच्या सासरी सुखात होती. अमर एकुलता एक असल्याने त्याने पण त्यांना साथ द्यावी असं त्यांना वाटायचं.. पण अमरला त्यामधे अजिबातच इंट्रेस्ट नव्हता.. त्यामुळे त्यांचे बरेचदा खटके उडत.. त्यांच्या बायकोने म्हणजे अमरच्या आईने खूप वेळा दादासाहेबांना समजावून सांगितले पण त्याचा काही उपयोग होत नसे.. गावातले सगळे लोक अमरच्या वडिलांना दादासाहेब म्हणत.
दादासाहेबांनी अमर करता त्यांच्या माहितीतले स्थळ पक्के केले होते. अमरचं शिक्षण झालं की लग्नाचा बार उडवून द्यायचा त्यांचा विचार होता. अर्थात त्यामागे त्यांचा स्वतःचा फायदा जास्त होता, अमर फक्त निमित्त मात्र.. पण अमरने लग्नाला स्पष्ट नकार दिला आणि अरूणा शिवाय तो कोणाशीही लग्न करणार नाही असे त्याने घरातल्यांना स्पष्ट सांगून टाकले
अरूणाच्या घरी काही वेगळी परिस्थिती नव्हती, त्यांच्या प्रेमाबद्दल कळल्यावर अरुणाच्या वडिलांनी तर बोलणेच टाकले होते, एक तर अमर सरपंचांचा मुलगा त्यामुळे त्यांच्यामते तो पण पुढे मागे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला लागला तर आपल्या पोरीचं कठीण होऊन बसेल आणि तसंही अमरच्या वडिलांबद्दल त्यांचं काही फारसं चांगल मत नव्हतं. मामानी त्यांना किती वेळा सांगितले की अमर तसा मुलगा नाही पण व्यर्थ..
अमर आणि अरुणा मात्र त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे दोन्ही घरातल्यांनी समोरासमोर एकदा भेटावं असा मधला मार्ग मामाने सुचवला, मग पुढचा निर्णय घेऊ पोर अजून लहान आहेत, आधी त्यांची शिक्षणं महत्त्वाची. .. खरं तर दोघांच्या घरचे जरा नाखूषीनेच तयार झाले भेटायला..
ठरल्याप्रमाणे अमरच्या घरी सगळे घरातले भेटले.. चहा पाणी झाले. इकडचे तिकडचे बोलणे चालले होते, पण विषयाला कोणी हात घालायला तयार नाही, ही गोष्ट मामाच्या लक्षात आली, शेवटी त्यानेच विषय काढला, थोडासा घसा खाकरत त्याने बोलायला सुरुवात केली.. “मंडळी आपण आज इथे सगळे ज्या करता जमलेले आहोत त्याबद्दल मी बोलायला सुरुवात करतो. अमरचं आणि अरुणाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण अजून ती लहान आहेत तर मला असं वाटतं त्यांनी आधी त्यांची शिक्षणं पूर्ण करावीत तोपर्यंत त्यांच्यातले प्रेम आहे तसेच राहिले तर दोन्ही घरातल्यांनी कुठलीही आडकाठी घालायची नाही आणि लग्न लावून द्यायचे.”
“मान्य आहे आम्हाला. पण आमची एक अट आहे, त्यांची शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांनी एकमेकांना भेटायचे नाही, फोन नाही की कुठलाही पत्र व्यवहार नाही यापैकी काही जरी करायचा प्रयत्न केला, तरी त्या क्षणी हे लग्न मोडले असे समजा. मग आम्ही सांगू त्या मुलीशी अमरला लग्न करावे लागेल, आहे मंजूर?”
अमर पोरीच्या घरातल्यांसमोर काय असेल ते सांग नंतर भानगड नको.


अमर आणि अरुणा एकदमच बोलले, “हो आहे मंजूर.”
“आम्ही दोघेही तुम्हाला वचन देतो तुम्ही घातलेली अट आम्ही नक्की पाळू. आणि दादासाहेब मुळात दुसर्‍या मुलीशी लग्न करायची वेळच येणार नाही कारण आमचं एकमेकांवर खूप प्रेम आणि विश्वास आहे, फक्त दोन्ही घरातल्यांच्या संमतीने सर्व व्हावं इतकंच, कोणालाही दुखवून किंवा पळून जाऊन आम्हाला लग्न करायचं नाही. आम्ही दोघांनी मिळून जी स्वप्नं पाहिली आहेत त्याकरता ही एक प्रकारे आमची परीक्षाच आहे असं आम्ही समजतो.”
“तुमचे आशिर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू देत.”
खरं तर अत्ता अमरचं बोलणं ऐकून अरुणाचे बाबा खूश झाले होते. आपल्याला जसा वाटत होता तसा पोरगा अजिबात नाही इतक्या लहान वयातील त्याची समज त्यांना आवडली. त्यांना मनापासून अमर आवडला. थोडक्यात अमरबद्दलचा त्यांचा गैरसमज दूर झाला, सरपंचाचा मुलगा म्हणून कुठे ही बडेजाव त्याच्या वागणुकीतून दिसत नव्हता, म्हणजे मामा सांगत होता अमर बद्दल ते काही खोटे नाही.
दैवी प्रेम हे कायम टिकतं यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता, मनातल्या मनात त्यांनी त्या दोघांना त्यांच्या स्वप्नपूर्ती करता खूप आशीर्वाद दिले
एक मात्र नक्की शिक्षण पूर्ण झाल्यावरही हा पोरगा असाच राहिला तर माझ्या अरुणाचं लग्न नक्कीच याच्याशी लावून देणार.. असं अरुणाच्या बाबांनी मनाशी ठरवून टाकलं.
दादासाहेबांना खरं तर त्यांच्या पोराच्या निर्णयाचं धाडसच वाटलं होतं, पण तसं त्यांनी अजिबात दर्शवलं नाही. बघू किती टिकतं यांच प्रेम, लांब गेले की कळेलच, आता मारे मारतायत उड्या..
मामानी दोन्ही घरातल्यांचे आभार मानले, दोन्ही पोरांनी घरातील मोठ्यांना नमस्कार केला आणि मुलीकडची मंडळी दादासाहेबांचा निरोप घेऊन निघाली… हे सर्व आठवत असताना त्याचं लक्ष घड्याळाकडे गेलं, “अरे आठ वाजून गेले, अजून कशी आली नाही, आठचीच वेळ ठरली होती ना!”
बघता बघता आठचे साडे आठ, हळू हळू घड्याळाचा काटा नवावर जायला लागला तसं त्याचा चेहरा बदलू लागला.. डोक्यात नको नको ते विचार येऊ लागले त्याची घालमेल वाढू लागली, काय झालं असेल उशीर का झाला की घरातल्यांनी सोडल नसेल, का कोणी पै पाहुणे आले असतील. काहीच कळत नव्हतं, घरीच जावं का तिच्या काय झालं आहे ते तरी कळेल.. तो निघणार इतक्यात त्याला लांबून अरुणा येताना दिसली… हो हो अरुणाच होती ती, अरुणा सुद्धा झपाझप पावले उचलत चालली होती… तिला पण लांबून अमर दिसला… जवळ जवळ धावतच ती तिथे पोहचली.. एकमेकांच्या समोर आल्यावर कितीतरी वेळ ते एकमेकांना बघत होते, दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले… आणि ती पटकन म्हणाली, “सॉरी तुला वाट बघावी लागली…”
तो हसून म्हणाला, “अगं असू दे वाट बघण्यात पण मजा आहे. इतक्या वर्षांनी भेटतोय आपण कुठून सुरवात करावी खरं तर सुचत नाहिये.. खूप खूप बोलायचं आहे तुझ्याशी.. पण आज मात्र शब्द सापडत नाहियेत, ते पण बहुतेक तुला पाहून घायाळ झाले बहुतेक..” असं म्हणत त्याने डोळे मिचकावले, चल काहीतरीच तुझं, अजिबात बदलला नाहियेस. तू अगदी आहे तसाच आहेस, हो ना पण तू मात्रं बदलली आहेस बरं का म्हणजे अरुणाने लहान मुलासारखे मोठे डोळे करून विचारलं… अगं म्हणजे पूर्वी पेक्षा अधिकच सुंदर दिसायला लागली आहेस बुद्धीचं तेज अगदी झळकत आहे तुझ्या चेहर्‍यावर. त्याने असं म्हणताच ती एकदम लाजली. बघ त्यावेळीही घायाळ झालो होतो आणि आजही तीच अवस्था आहे बघ माझी, किती रे चेष्टा करतोस..ती त्याला लटके रागावते, अशीच चेष्टा मस्करी करत दोघांच्या गप्पा सुरू होतात, बोलता बोलता विषय गावातील सुधारणा याकडे वळतो.
अमरने गावातील मुलांना हाताशी घेऊन बरेच चांगले बदल करायला सुरवात केली होती, शेतीच शिक्षण घेतल्यामुळे आता गावातील शेतीमधे त्याने बर्‍याच सुधारणा केल्या होत्या, एक गांव एक गणपती ते महिलांसाठी बचतगट एक ना अनेक गोष्टींची सुरवात झाली होती. शिक्षणाची जबाबदारी मात्रं त्याने अरूणावर टाकली होती.. गावांत दहावीपर्यंत शाळा होती पण पुढील शिक्षण एक तर शहरात किंवा तालुक्याला जाऊन घ्यावे लागे त्यामुळे अरुणाचं स्वप्नं होत की आता गावात कॉलेज झालं पाहिजे, तसंच गावातील प्रत्येकजण शिकला पाहिजे..
बराच वेळ दोघे एकमेकांशी बोलत होते किती वेळ गेला त्यांना कळलं देखील नाही. ऊन्हं वर आली, शेवटी गावातील पोरं अमरला शोधत तिथे पोहोचली.. खरं तर त्या दोघांचे लक्षच नव्हते, त्या पोरांपैकी एक जण बोलला, “आर दादा ईकडे हायेस होय, आर किती हुडकलं तुला. बबन बोलला त्यानी तुला इथं पाहिलंं तडक आलो बघ इकडे..”
त्या पोरांना पाहून एकदम दोघे भानावर आले, अमरने घड्याळात पाहिले अकरा वाजून गेले होते, अरे बापरे बराच वेळ झाला. पोरांनो तुम्ही व्हा पुढे, मी येतोच, हा ते ठीक आहे दादा पन हे नवीन पाहूणं कोन म्हणायचं.. अमर हसला आणि म्हणाला, “नवीन नाही जूनच आहे मी ओळख करून देतो ही अरूणा माझी होणारी बायको आणि तुमची वहिनी..” अरे वहिनी साहेब नमस्कार करतो असं म्हणत अरुणाच्या सगळे पाया पडतात.. तुमच्याबद्दल, तुमच्या हुशारी बद्दल आणि हो तुमच्या दोघांच्या प्रेमा बद्दल बरंच ऐकलं आहे अमर दादा कडून. तुमच्या दोघांबद्दल लई अभिमान हाये बगा आम्हासनी. चला निघतो वहिनी.

 


“बरं दादा आज तू नाही आलास तरी चालेल आजचं काम आम्ही सांभाळून घेतो काय, तुमचं चालू दे.” हसत हसत पोर बोलली.
“लै शहाणे आहात समदे. चला व्हा पुढे, मी आलोच.”
अमरने अरुणाचा हात हातात घेतला आणि म्हणाला, “आता आपल्या लग्नाबद्दल आपण घरी बोलावं असं मला वाटतं. तुझं काय मत आहे?” अरुणाने त्याच्या हातातून एकदम हात सोडवून घेतला, अमरला कळलंच नाही काय झालं एकदम, “अरुणा काय झालं काही प्रोब्लेम आहे का? तसं सांग आपण नंतर बोलू लग्नाबद्दल..”
“नाही तसं नाही पण मला तुझ्याशी लग्न नाही करता येणार, सॉरी मला माफ कर…”
अमरला एकदम धक्का बसतो काय बोलावं सुचत नाही. “अगं हे अचानक.. तू काय बोलतेयस कळतंय का.. मी वेड्या सारखा इतके वर्ष थांबलो आहे का.. आणि आपण एकमेकांना दिलेलं वचन त्याचं काय? शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण लग्न करायचं असं आपण कबूल केलं होतं ना घरातल्यांंन समोर, कुठे गेला तो दिलेला शब्द असं म्हणत तिला तिच्या दोन्ही खांद्याला धरून हलवतो.. तिच्या डोळ्यात नजर रोखून तिला विचारतो, “तुझ्या आयुष्यात दुसरा कोणी आला आहे का?…” असं विचारताच अरूणा मानेनेच त्याला हो म्हणते…
त्याला एकदम धक्का बसतो, त्याचा राग अनावर झालेला पाहून अरुणाला एकदम हसायला येतं, अमरला थोडा वेळ काहीच सुधरत नाही, तो वेड्यासारखा तिच्याकडे बघत असतो… “अरे अमर मजा केली तुझी मी.”
“मजा ही असली? जीवघेणी मजा, मी जवळपास संपलो होतो.. बाकी तू कसलीही मजा कर पण असली मजा नको.. तुला माहीत आहे मागच्या पाच वर्षात दादासाहेबांनी माझं मन वळवायचे किती प्रयत्न केले तुझ्याबद्दल खोटंनाटं सांगून भडकावून द्यायचे मला, आता ती शहरात गेली, आता तिकडचा कोणीतरी बघून तिकडच्या तिकडे पळून जाईल, एक ना अनेक वावड्या उठवायचे…”
“अरे अमर माझी परिस्थिती तुझ्याहून थोडीच वेगळी होती आपल्या गावातले कोणी शहरात कामा करता आले की आई त्यांच्याजवळ मला द्यायला काय काय द्यायची. तुझी खुशाली राहिली बाजूला पण तुझ्याबद्दल काय काय सांगून कान भरायचे माझे, तुझा साखरपुडा सुद्धा करून टाकला घरच्यांनी गुपचूप इथपर्यंत माझ्या कानावर गोष्टी आल्या होत्या… पण खरंच सॉरी मी अशी मजा कधीच करणार नाही…” आणि तिने तिचे कान पकडले.. अमरने हसून तिला आपल्या मिठीत घेतले..
ठरल्याप्रमाणे लग्न व्यवस्थित पार पडले.. दोन्ही घरून आडकाठीचा प्रश्नच नव्हता.. कारण त्यांनी त्यांचे वचन पाळले होते आणि दिलेला शब्द खरा केला होता.
लग्न झाल्यानंतर दोघांनी गावाच्या विकासात लक्ष घालायला सुरवात केली, अनेक योजना आखल्या त्यामधे त्यांनी दादासाहेबांना पण सामिल करून घेतले कारण दादासाहेब अतिशय हुशार आणि अनुभवी माणूस.. आता दादासाहेब पूर्वीसारखे राहिले नव्हते, खूपच नरम झाले होते. अमर आणि सुनेला त्यांच्या कामात मदत करत होते, अगदी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे होते.
बघता बघता गावाचा कायापालट व्हायला सुरवात झाली. गावात दवाखाना आला, महिलांच्या बचतगटांचे काम अरूणाने सासुबांईवर सोपवले तसंच गावातील ज्येष्ठ लोकांना शिकवायची जबाबदारी अरुणाच्या वडीलांनी आनंदाने स्विकारली होती.

 


आज सकाळपासूनच गावात खूप लगबग सुरू होती. झेंडूची तोरणं, फुलांच्या पायघड्या.. मिठाईचे बॉक्स.. नुसती धांदल उडाली होती
आज अरूणाने जे स्वप्नं पाहिलं होतं ते प्रत्यक्षात साकार होणार होतं, आज कॉलेजचं उदघाटन होतं, दादासाहेबांनी आनंदाने त्यांची जमीन कॉलेज करता दिली होती, पण या आनंदच्या प्रसंगी ती हजर नव्हती, तिचे दिवस भरत आल्याने ती माहेरी गेली होती पण आजचा मुहूर्त म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक होता त्यामुळे तो चुकवू नका, उदघाटन करून घ्या असं तिने अमरला सांगितलं होतं .. तरी अमरचं निम्मं लक्ष अरुणाच्या बातमीकडे लागलं होतं, आज सकाळपासूनच तिला कळा यायला लागल्या होत्या, अमरची बहीण तिच्या बरोबर होती. त्यामुळे काळजीचं कारण नव्हतं..
सगळ्या बायका अगदी नऊवारी साड्या नथ घालून नटलेल्या होत्या. येणार्‍या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत अत्तर लावून आणि गुलाब देऊन केलं जात होतं.
आणि ज्या क्षणाची सगळे आतुरतेने वाट बघत होते तो क्षण आला दादासाहेबांच्या हस्ते कॉलेजचं उदघाटन झालं.. आणि नावावरचा पडदा बाजूला होताच दादासाहेबांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले कारण कॉलेजचं नाव होतं ‘दादासाहेब ऊर्फ प्रतापराव देशमुख महाविद्यालय’
दादासाहेबांना अमर आणि अरुणाकडून सरप्राईज होतं. उद्घाटन झाल्यानंतर दादासाहेब बोलायला उभे राहिले, इतक्यात अमरची बहिण धावतच अमरकडे आली आणि तिने त्याच्या कानात आनंदाची गोड बातमी सांगितली. अमरच्या आनंदाला पारावार उरला नाही, त्याने ही बातमी दादासाहेबांनां सांगितली तसं दादासाहेबांनी फर्मान सोडलं पेढ्यांबरोबर बर्फी पण मागवा रे आम्ही आजोबा झालो, आम्हाला नात झाली, सर्व गावकर्‍यांनी त्यांचे अभिनंदन केले.. तसं दादासाहेब बोलले, “आजच्या या मंगलमय दिवशी मी असे जाहीर करतो की यापुढे गावातल्या मुलींना दहावीपर्यंतचे शिक्षण मोफत असेल.” दादासाहेबांचा निर्णय ऐकून गावकरी खूप खुश झाले, हे ऐकून अमरचे डोळे पाणावले. त्याला कधी एकदा ही बातमी अरुणाला सांगतोय आणि त्याच्या चिमुरडीला भेटतोय असं झालं होतं, त्याने वाकून दादासाहेबांनां नमस्कार केला.
आज खर्‍या अर्थाने अमर आणि अरुणाने बघितलेल्या स्वप्नांची स्वप्नपूर्ती झाली होती.