कथा – सुखाचा चहा (Short Story : Sukhacha ...

कथा – सुखाचा चहा (Short Story : Sukhacha Chaha)

“रस्त्यातच त्याला पावसाने गाठलं… आधीच सकाळपासुन वैतागलेला तो त्रागा करत त्याने गाडी बाजूला घेतली… रस्ता तसा रोजचा परिचयाचा पण कधी थांबावं लागलं नव्हतं… ह्या सहा महिन्यात पहिल्यांदा तो थांबला…
पत्र्याच्या शेड खाली छोटीशी चहाची टपरी होती… तसंही आज सकाळच्या घटनेमुळे चहा प्यायचा राहिला होता आणि आता वातावरणही छान होतं… हा पाऊसही त्याला पुढे जाऊ देणार नव्हता…..
टपरीवर एक जोडपं आणि छोटं मुल होतं…  ते मुल पत्र्यावरून पडणाऱ्या पन्हाळ्याच्या पाण्याखाली हात नाचवत होतं आणि खळखळून हसत होतं… मध्येच ओला हात आई बाबांवर झटकत होतं आणि त्याचा हा खेळ हे दोघे हसुन बघत होते….
त्याने चहाची ऑर्डर दिली आणि ओल्या झालेल्या बाकड्यावरचं पाणी झटकत तो बसला… एकदम थंड स्पर्श त्या टेबलाचा त्याला झाला… त्याचं त्यालाच छान वाटलं… समोर रस्त्याच्या पलीकडे दूरवर पसरलेली शेती आणि त्यामागे उभे अवाढव्य हिरवेगार डोंगर…. चिंब पावसात धूसर होऊन मजा करत उभे असलेले दिसले हे सगळं बघताना त्याचा फोन वाजला…. बायकोचाच ! त्याने कट केला. सकाळपासुन हा पाचवा फोन तिचा. काहितरी चुका करत राहते आणि आपला मूड घालवते. लग्नाला अजून चार महिने नाही झाले. पण बोर झालं हे सहजीवन, या भावनेने त्याने फोन कट केला….
तेवढ्यात चहाचा ग्लास घेऊन तो टपरिवाला समोर आला… आणि तितक्यात त्या बाई कडून काही ग्लास सुटले हातातून आणि त्या शांत वातावरणात खळकन आवाज झाला… ते मुल क्षणभर थबकलं पाणी खेळताना… तर त्या माणसाने हाताने आणि मानेनेच इशारा केला त्याला. काही नाही खेळ तू… आणि तो काचा भरू लागला… तिने आवाजाच्या दिशेने बघून हात जोडून चुकीची माफी मागितली… तर त्याने फक्त डोक्यावर हात ठेवला… एकूण चार पाच ग्लास फुटले होते म्हणजे आजची कमाई नक्की शून्य… पण तो माणूस शांत होता…
आता ह्याची बेचैनी अजून वाढली… ह्याला सकाळचा प्रसंग आठवला… आपणच मध्ये आलो आणि बायकोच्या हातातला कप फुटला तर आपण किती चिडलो… बोललो तिला. पण ती शांत होती… ह्या वातावरणासारखी आणि आपण ह्या चहासारखं गरम…  शब्दांच्या वाफा आपल्या तोंडातुन निघत होत्या… आपलं तर फारसं नुकसानही नव्हतं… पण आपण किती रिॲक्ट झालो…. त्यामुळे दिवसभर देखिल आपला मूड खराब होता…. आणि हा माणूस चिडण्याऐवजी उलट काचा वेचून परत आपल्या कामाला लागला… खूप काही शिकल्यासारखं वाटलं त्याला ह्या अनुभवातून… तो पैसे द्यायला काऊंटर जवळ आला… वीसची नोट देताच चहावाला म्हणाला, “सर सुट्टे नाही माझ्याकडे १० रु दयायला…. तुमच्याकडे असतील तर बघा…. त्याने खिसा तपासला पण नव्हते सुट्टे… “चॉकलेट देऊ” चहावाला म्हणाला, “त्यावर हसून ह्याने नकार दिला… आणि म्हणाला… “असू द्या तुम्हाला नाहीतरी तुम्ही मला एक फार मोठी शिकवण दिली… ग्लास फुटले तरी किती शांत राहिलात. मी तर आज एक कप फुटला म्हणून महाभारत करून आलोय घरात…”

चहावाला हसून म्हणाला… “तिला दिसत नाही तरी ती माझ्या कामात मदत करते. कधीतरी चूक होणारच. आपल्याकडूनही होते फक्त आपल्याला रागावणारं कोणी नसतं…. आणि जोडीदाराच्या सतत चूका शोधून त्याला जर असं रागवत राहिलो तर प्रेम करायचं कधी… आयुष्य क्षणभंगुर आहे. होत्याचं नव्हतं कधीही होऊ शकतं…. आता हिलाच बघा ना. लग्नाच्या वेळी डोळस होती ती आणि  एकाएकी दृष्टी गेली… डॉक्टर म्हणाले, ” येईल दृष्टी परत…” पण कधी ते नक्की नाही… खूप वाईट वाटलं… माझी चिडचिड होत होती…. एक दिवस तिनं माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली म्हणाली, “आता मी जे करते ते न चुकता करून दाखवा… मग लक्षात आलं सगळं किती अवघड आहे… त्या दिवसापासून ठरवलं कितीही नुकसान झालं तरी तिला रागवायचं नाही… माणूस नेहमी स्वतःच्या बाजूनी विचार करतो ना सर… थोडं समोरच्याला समजून विचार केला की लक्षात येत सगळं…”
ह्याला आता जास्त आश्चर्य वाटलं. अंध बायको असून किती शांतपणे स्वीकारलं आहे सगळं… आपण तर जणू चिडणं हा आपला अधिकार आहे अश्या अविर्भावात असतो सतत…. आपली बायको सकाळी किती घाबरली होती… त्याला आठवलं खरंतर रात्रभर पाय दुखतात म्हणून कुठले तेल घेऊन मालिश करत बसली होती… तिला चार दिवसाच्या पाळीने अशक्तपणा येतो… मग स्वतःला उभं करायला ती हे प्रकार करते. पण आपण तिच्या या कुठल्याच विश्वात नसतो त्यालाच एकदम भरून आलं…. त्याचे विचार सुरू होते आणि तेवढ्यात मघापासून मोगऱ्याच्या झाडाच्या कळ्या तोडून गजरा बनवून चाचपडत ती टेबलापाशी आली आणि म्हणाली,
“दहा रुपये सुट्टे नाहीत तर हा गजरा घ्या…. कुणाचे फुकट पैसे नाही ठेवत आम्ही… तसंही कपाने महाभारत झालं म्हणता घरात. ह्या गजऱ्याने मिटवून टाका… कसं आहे कपातलं वादळ लवकर मिटलं तर संसारामध्ये मजा असते नाही का….?”
इतक्या बारीक चूका पकडून जर संसार केला तर संसारात एकमेकांना जी मोकळीक द्यायची ती दिली जाईल का…? साहेब याच रोडवरून रोज येणं जाणं असेल तर येत जा अधून मधून गजरा घ्यायला आणि चहा प्यायला…
तो बघतच राहिला त्या जोडप्याला… एकमेकांना शारिरीक गुणांनी विसंगत असले तरी समजून घेणारं जोडपं… आता तो मुलाला आनंदी होड्या बनवून देत होता आणि ती दिसत नसलं तरी मनाच्या दृष्टीने ती होडी आनंदी गावाकडे जाणारी बघून हंसत होती… हे हास्य खरंच सुखी संसाराची साक्ष होतं…..
त्याने गजरा घेतला आणि वीस रुपयात खूप काही मिळालं ह्या भावनेने निघाला…
गाडीला किक मारताना सहजच टपरीची पाटी बघितली…
त्यावर नांव होतं
“सुखाचा चहा…”
व्हॉटस् अ‍ॅप वर आलेली ही सुंदर कथा, लेखक : अज्ञात