सार्थक झाले जन्माचे (Short Story : Sarthak Jhal...

सार्थक झाले जन्माचे (Short Story : Sarthak Jhale Janmache)

सार्थक झाले जन्माचे


– रेखा नाबर

घेतलेली जबाबदारी माईसाठी असिधारा व्रतच होतं. अचला व अमोघ माईजवळच राहत होते. जसजसे दिवस जात होते, तसतशी माईची परिस्थिती कठीण होत होती. कामावर जाताना तिला आत ठेवून, बाहेरून कुलूप लावून जाताना दोघांचा जीव कासावीस होई. रोजचा नऊ ते सहाचा तुरुंगवास तिने स्वखुषीने पत्करला होता.
जीवनांतील एका दुःखप्रद अध्यायाची समाप्ती झाली होती. अचलाचा एका वर्षापूर्वीचा अगतिक चेहरा मालतीच्या नजरेसमोर तरळू लागला. मालतीचा प्रस्ताव ऐकल्यावर तिच्या डोळ्यांतून वाहणार्‍या अश्रुधारांबरोबर मनातील अढी पातळ होऊन वाहून चालली होती. तिच्या मनावर येत असलेल्या दडपणाची जाणीव होऊन मालतीने धीर दिला.
“अचल, कसलंही टेन्शन घ्यायचं नाही. मी आहे ना सगळं सांभाळायला. काही काळजी करू नकोस.”
“माई. मला माझ्या वागण्याची लाज वाटतेय गं. डोंगराएवढे उपकार करतेयस तू माझ्यावर. कातड्याचे जोडे करून घातले तरी फिटायचे नाहीत.”
तिचा तणाव हलका करण्यासाठी मालतीने गंमत केली.
“अगं बाई, माझ्या मापाचे जोडे दुकानांत मिळत नाहीत की काय? आईचे कसले उपकार गं?”
“सगळीकडे सगळं मिळेल. तुझ्यासारखी माई त्रिखंडात
नाही मिळायची.”
त्यानंतरची कार्यपद्धती सुरळीत पार पडली. घेतलेली जबाबदारी माईसाठी असिधारा व्रतच होतं. अचला व अमोघ माईजवळच राहत होते. जसजसे दिवस जात होते, तसतशी माईची परिस्थिती कठीण होत होती. सुरुवातीला तपासणीसाठी अचला तिला रिक्षातून नेत असे. नंतर डॉक्टर घरीच येऊन तपासत. कामावर जाताना तिला आत ठेवून, बाहेरून कुलूप लावून जाताना दोघांचा जीव कासावीस होई. रोजचा नऊ ते सहाचा तुरुंगवास तिने स्वखुषीने पत्करला होता. सुरुवातीला सोसायटीतील शेजारी चौकशी करीत. अचला कशीतरी वेळ मारून नेई. नंतर नंतर तिलाही अवघड वाटू लागले. गोष्ट षट्कर्णी होऊ नये ह्या हेतूने कामवालीला सुद्धा काढून टाकले. माईला काम करावे लागते या विचाराने अचला अस्वस्थ होत असे. भरपूर पुस्तके, मासिके आणलेली होती. फळफळावळांची रेलचेल व टी.व्ही., म्युझिक सिस्टिमसुद्धा दिमतीला होते. तरीसुद्धा घडाळ्याचे काटे हट्टी मुलासारखे जागचे हालत नाहीत, असे माईला वाटे. मनातील घालमेल मुलांकडे व्यक्तसुद्धा करता येत नसे.
“माई, तू मजेत राहा. भरपूर फळं खा. मस्त टी.व्ही. बघ. तू समाधानी राहावंस अशी आमची इच्छा आहे.”
“अच्चू, आनंदात आहे मी. पण टी. व्ही. काय किंवा गाणी काय हळू आवाजातच लावावी लागतात. न जाणो बाहेर कुणाच्या कानावर पडायचं. मोबाईलसुद्धा बंद करून ठेवलाय. फक्त मेसेजवर संभाषण.”
इतकी दक्षता घेऊन सुद्धा सोसायटीतील सभासदांना संशय आलाच.
“अचला, माईंना आत ठेवून बाहेरून कुलूप लावून जाता की काय?”
“हल्ली कुणीही येतात. दार उघडलं की सरळ आतच घुसतात, चोरी करतात. जिवालासुद्धा धोका असतो. म्हणून तिनेच सुचवलं.”
“नक्की हेच कारण आहे की दुसरं काही? माई कधीच बाहेर पडत नाहीत. रोज संध्याकाळचं देवदर्शन आणि बागेतल्या फेर्‍या कधी चुकल्या नाहीत त्यांच्या.”
सोसायटीच्या सभासदांना अचलाचे समर्थन पटले नसावे. दिवसागणिक तिची बेचैनी वाढत होती व पर्यायाने माईची सुद्धा. अखेर तो दिवस उजाडला. दुसर्‍या मजल्यावरच्या मोकाशी काकूंनी
अचलाला अडवून उलटसुलट प्रश्‍न विचारून भंडावून सोडले. त्यांना सत्य परिस्थितीची कुणकुण लागली असावी. अचला गांगरून गेली. धाडकन दार उघडून आत शिरली तेव्हा ती घामाघूम झाली होती. ऊर भात्यासारखा वरखाली होत होता. माई घाबरली. जवळ बसून तिला थोपटले व पाणी पाजले. ती जराशी शांत झाली.
“मा…ई…मा.ई त्यांना कळलंय गं. मला भीती वाटते. मोकाशी काकूंनी जाब विचारला.”
माई अंतर्यामी हादरली असली तरी अचलाला धीर देणे आवश्यक होते.
“चल गं! जाब विचारणार्‍या त्या कोण? त्यांनी नुसता खडा टाकून पाहिला असेल. सत्य परिस्थिती त्यांना कळलीच नसेल. भिंतीला म्हणे कान असतात. भोकं नसतात.”
“नाही गं माई. त्या अगदी खात्रीपूर्वक बोलत होत्या. त्यांनी धमकीसुद्धा दिलीय आपल्यावर बहिष्कार टाकण्याची.”
“धमकी द्यायला ही काय मोगलाई लागून गेलीय? बहिष्कार कसा टाकतील? आगाऊ भाडं भरलंय एका वर्षाचं. आमचे प्रॉब्लेम्स आम्ही निस्तरतोय. ह्यांना कशाला नसत्या पंचायत्या? तू नको टेन्शन घेऊस. काही होणार नाही.”
वरवर असा निर्वाळा दिला तरी आगामी वादळाची चाहूल माईला लागली होती. त्याच्याशी सामना करण्यासाठी आपली मानसिक पार्श्‍वभूमी तयार करण्याचा तिने चंग बांधला. संध्याकाळी येतायेताच अमोघने धक्का दिला.


“माई, येत्या रविवारी मला सोसायटीच्या सभासदांसमोर सर्व परिस्थितीचं विश्‍लेषण करण्याविषयी सेक्रेटरींनी सूचना केली आहे. मला त्यांनी खूप प्रश्‍न विचारले. सध्या मी काहीच उत्तर दिलेलं नाही, पण तुम्हाला कोंडून ठेवण्याचं कारण काय हा सर्वांनाच पडलेला यक्षप्रश्‍न आहे. काय करायचं आता? आपण कुठेतरी निघून जाऊ या का रातोरात?”
“अमोघ, गोष्टी आता इतक्या पुढे गेल्यात, की इथून निघून गेल्यामुळे गुंतागुंत वाढून समस्यांमध्ये भरच पडेल.”
अचला गोंधळून गेली व घाबरून
रडू लागली. हतबल झाल्यामुळे अमोलचा तोल ढळला.
“अचला, मूर्खासारखं रडून परिस्थिती आणखी गंभीर करू नकोस. सुटकेचा काही मार्ग सुचत असेल तर बघ. नाहीतर आत जाऊन गप्प झोप.”
भलत्याच वळणावर जाऊ पाहणार्‍या चर्चेला माईंनी खीळ घातली.
“अचल, तू रडू नकोस आणि अमोघ तू ओरडू नकोस. आत्ताच आलाय ना कामावरून, म्हणून चिडचिड होतेय. फ्रेश व्हा. थोडा वेळ शांत बसा. तोपर्यंत मी जेवणाची तयारी करते. नंतर आपण एकेकट्याने विचार करू आणि उद्या सकाळी रविवारच्या मीटिंगच्या वेळी काय करायचं ते ठरवू.”
दोघांनाही प्रस्ताव मनोमन पटला. रविवारची मीटिंग व्यवस्थित पार पडली. आता काही दिवसांचाच प्रश्‍न होता. हत्ती गेला, परंतु राहिलेलं शेपूट हत्तीपेक्षाही वजनदार होतं. रविवार म्हणजे आनंदचा स्काईपवर येण्याचा दिवस. आनंद म्हणजे अचलाचा मोठा भाऊ. फोन अचलाने घेतला.
“अच्यू, कशी आहेत सगळी तिकडे? विशेषतः माई?”
तो जास्तच निरखून बघतोय असे अचलाला वाटले.
“बरी आहेत सगळी. माईसुद्धा ठीक आहे रे. तू असं का विचारतोयस?”
“आपल्या बिल्डिंगमधल्या शितोळ्यांचा मुलगा मधू इथेच असतो शिकागोला. तो भेटला होता परवा. काहीबाही बोलत होता आपल्याविषयी.” त्याला थांबवून अचलाने फोन माईंकडे दिला.
“कसा आहेस अंदू?”
“मी उत्तम होतो. पण मधू शितोळेकडून आपल्या घरांतल्या परिस्थितीविषयी कळून मी हैराण झालोय. काय आहे हे गौडबंगाल?”
“अरे बंगाल नाही आणि पंजाबही नाही. सगळं आलबेल आहे. जीवनात अशी काही अवघड परिस्थिती निर्माण होते ना, की ती पार करताना विचारपूर्वक निर्णय घेऊन काळजीपूर्वक कार्यप्रणाली करावी लागते. मी आहे ना समर्थ सगळं निस्तरायला? तू शांतपणे काम कर आणि लवकर परत ये.”
“माई, कसला गं शांतपणा? जे ऐकलंय त्यानं पुरता ढवळून निघालोय मी.”
“मला कल्पना आहे की, तू काय ऐकलं असशील त्याची. योग्य वेळ येताच सगळ्याचं स्पष्टीकरण मिळेल. फक्त त्यासाठी थोडा धीर धर.”
“माई, तुला आणखी एक सांगायचंय. तू सूनमुख पाहायला अधीर झाली होतीस ना? तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल. माझ्या मित्राची बहीण संपदा देसाई मला आवडलीय. मी तिला आपल्या कुटुंबीयाविषयी
सगळं सांगितलंय. आम्ही तिकडे येऊन लग्न करणार आहोत. पण आता कळलेल्या वृत्तांतामुळे…”
“अरे वा! खूपच आनंदाची बातमी दिलीस रे. कधी येणार आहात? जरूर या. मी सुनेच्या स्वागताला सज्ज राहीन. अंदू, तुला खात्रीपूर्वक सांगते, कोणतंही लज्जास्पद कृत्य आपल्या कुटुंबातल्या कोणाकडून झालेलं नाही. पण आता लगेच मी तुझ्या शंकांचं निरसन नाही करू शकत. नाइलाज आहे माझा. विश्‍वास ठेव माझ्यावर. सगळं ठीक होईल.”
त्याला माईबद्दल खात्री होतीच. पण कानावर येणार्‍या उलटसुलट बातम्यांमुळे तो भांबावून गेला होता. माईच्या आश्‍वासनाने तो शांत झाला. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे घटना घडत गेल्या. एके सकाळी सोसायटीच्या प्रांगणात टॅक्सीतून अमोघ, अचला व माई उतरले. अचला व माईच्या हातात नवजात बालक होते. सोसायटीतील सभासद एक एक करून बाहेर येऊन त्यांना निरखीत होते. चर्चेला ऊत आला होता.
“अगं बाई, माईंना किती दिवसांनी पाहिलं. तब्येत सुधारलीय त्यांची.”
“पण ही दोन लहान मुलं कोणाची? अचला तर गरोदर नव्हती. म्हणजे माईंची? डोक्यावरून पदर सुद्धा घेतलाय बाळंतिणीसारखा. बाप रे!”
“माईंची कशी असतील मुलं? दत्तक घेतली असतील अचला-अमोघनं.”
“दोन-दोन कशाला घेतील? कोणाची आहेत कुणास ठाऊक?”
“असली भानगडबाज माणसं सोसायटीत म्हणजे अस्तनीतला निखारा.”
“सगळ्याचा उलगडा होईल लवकरच. अमोघ स्पष्टीकरण देणार आहे. ते ऐकण्यासाठी ऑफिसमध्ये जमायचं आहे.”
उत्कंठा शिगेला पोहोचलेले सर्व सभासद कानात प्राण आणून अमोघचे म्हणणे ऐकू लागले.
“अचलाच्या आणि माझ्या लग्नाला पंधरा वर्षे झाली तरी आम्हाला अपत्यप्राप्ती न झाल्यामुळे आम्ही डॉक्टरी उपाय चालू केले. तिथेही निराशाच पदरी पडली. शेवटी डॉक्टरनी अचलाचं गर्भाशय अत्यंत नाजूक असल्यामुळे अपत्यवाढीस अयोग्य असल्याचं निदान केलं. आम्ही दोघेही निराशेच्या गर्तेत गेलो. मूल दत्तक घेणं दोघांनाही मंजूर नव्हतं. तेव्हा डॉक्टरनी सरोगसीचा पर्याय सुचवला. आम्हाला हवी तशी स्त्री सरोगेट मदर म्हणून मिळेना. आमचा तर धीरच सुटला. तेव्हा माईंनी स्वतःच पुढाकार घेऊन तयारी दर्शविली.”
“काय माई? सरोगेट मदर?”
“ ऐकावं ते नवलंच.”
“खरंच आश्‍चर्यच आहे हे. पण आपल्या मुलीसाठी त्यांनी हे दिव्य केलं. ह्याच्या आधी एक वर्ष अचलाच्या बाबांचं निधन झालं होतं. माईंच्या ह्या स्थितीमुळे शंकाकुशंकांचं पेव फुटलं असतं. त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले असते आणि आम्हा सर्वांनाच जिणं मुश्कील झालं असतं. म्हणून सर्वानुमते माईंनी घरातच राहावं असं ठरलं. सहा महिने माईंनी हा कारावास सहन केला. फक्त आमच्यासाठी. महान आहेत त्या. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन; असंच झालं. माईंना जुळी मुलं झाली. मुलगा आणि मुलगी. मुलं अचलाची आणि माझीच आहेत. फक्त वाढली आहेत माईंच्या गर्भाशयात. याचा निर्वाळा डॉ. देशपांडे देतील.”

ही ‘न कही न सुनी’ कथा ऐकून सगळे थक्क झाले. नंतर डॉ. देशपांडेनी स्पष्टीकरण दिले.
“सुरवातीपासून मी सर्व घटनांची साक्षीदार आहे. नीतिमत्ता सोडून काहीही झालेलं नाही. खरं पाहिलं तर माई कौतुकाला पात्र आहेत. ही घटना म्हणजे वैद्यकीय शास्त्राच्या संशोधनाचा आविष्कार आहे. वैधव्य दशा, प्रौढवय याबरोबर लोकापवाद, अब्रूवर उडणारे शिंतोडे, अपकीर्ती, निर्भत्सना या सर्वांचा विचार मनांत येऊन सुद्धा ह्या माउलीने हे धाडस केले. आपल्या मुलीच्या आणि जावयाच्या ओसाड जीवनांत ओलावा निर्माण करण्यासाठी. त्यांच्या त्यागाला वंदन करून पेढे बर्फीचा आस्वाद घ्या आणि नवजात बालकांना मनापासून आशीर्वाद द्या.”
उपस्थितांच्या चेहर्‍यावरच्या शंकेच्या सावटाची जागा आदराने घेतली. सर्वांनाच माईंना भेटण्याची इच्छा होती, पण त्यांची मनःस्थिती बरोबर नसल्यामुळे ते शक्य झाले नाही. त्या अग्निदिव्यातून बाहेर आल्या होत्या. आता वेळ होती समारोपाची.
“बेटा अचल, तुझी आणि अमोघची इच्छा पूर्ण झाली. मला भरून पावलं. देवानं भरभरून दान दिलंय. आपल्या मुलांसमावेत सुखानं संसार करा.
मी चालले.”
अचला जवळजवळ किंचाळलीच.


“निघाले. म्हणजे कुठे?”
“महिलाश्रमात. जिथून तुमच्या बाबांनी मला आणून पत्नीचा दर्जा दिला. त्यावेळी तुमच्या आईच्या मृत्यूला एक वर्षं झालं होतं. आनंद आणि तू लहान होतात. जीव लावून मी तुमची देखभाल केली. आता तुझा संसार मार्गी लागलाय. आनंदला त्याची जीवनसाथी मिळालीय. तोसुद्धा आपल्या संसारात रमेल. माझी कर्तव्यपूर्ती झालेली आहे. मला मातृत्वाची स्त्रीसुलभ आस होती. परंतु तुमच्या बाबांना तिसरं मूल नको होतं. कदाचित मी आपपरभाव करेन अशी त्यांना भीती वाटली असेल. सरोगसी पत्करून मी माझी आस पूर्ण केली. तेच मातृत्व मी तुला प्रदान करते
आणि निघते.”
हुंदके देत अचला माईंच्या
गळ्यात पडली.
“माई. चाकोरीच्या बाहेर जाऊन तू मला मातृत्व मिळवून दिलयंस. जन्मोजन्मी ऋणी राहीन मी तुझी. सावत्र आई या नात्याविषयी इतरांकडून ऐकलेल्या कटू अनुभवांमुळे माझं मन कलुषित झालं होतं. त्यामुळेच मी तुझ्याशी वाईट वागत होते. तरीही ते मनात न धरता तू मला बहुमोल मदत केलीस. खर्‍या अर्थाने माझी ओटी भरलीस तू. माता नव्हेस महन्माता आहेस तू. शब्दांच्या पलीकडचं नातं प्रस्थापित केलयंस तू. आता तुझं आईपण संपलंय. आणि तुला आजीच्या भूमिकेत शिरायचं आहे. दुधावरची साय दुधापेक्षा दाट असते ह्याचा सुखद अनुभव घे. आणि हो, माझ्या मुलांवर चांगले संस्कार कोण करणार? ते कर्तव्य पार पाडण्यासाठी तुला इथे राहिलंच पाहिजे.”
“छान हं अच्यू, चांदीच्या बेड्या काढल्यास आणि सोन्याच्या घातल्यास. हुशार आहे ग बाई. हरली तुझी माई.”
सगळे खदखदून हसत असताना माई आणि अचला एकमेकींच्या मिठीत आनंदाश्रूंची बरसात करीत होत्या.
जिवाशिवाची भेट घडली॥
अंतरीची किल्मिषे लोप पावली॥
महन्मातृत्त्वाची अनुभूती आली॥
सुख सागराला भरती आली॥