संस्कार (Short Story : Sanskar)

संस्कार (Short Story : Sanskar)

संस्कार


– प्रमोद कांदळगावकर

गयाबाई ही धोंडदेवाची चार नंबरची लेक आईबाबांकडे हट्ट करणारी पण भाबडी. इतक्यात सर्वजणी आल्या आणि गयाबाई सांगू लागली की, आज बाबा आपल्या सर्वांना गोड बातमी सांगणार आहेत. कसली बातमी, असा एकच आवाज झाला. सांगा ना बाबा ?
सकाळची वेळ होती. नुकताच पावसाळा संपून मासळी व्यवसायाचे दिवस सुरू होणार म्हणून धोंडदेव आणि अनुसया उभयता फार खूश दिसत होती. कारण या व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मार्ग मोकळा होणार होता. त्या आनंदात अनुसयाने आपल्या लेकींना ’‘तुमच्यापैकी दोघींनी रापणीवर जा! मी बाबा काय आणतील ते घेऊन बाजारात जायचं की मिठाला खारवून ठेवायचं ते पाहते,‘’ असे म्हणून अनुसया तेथून गेली. मग ठरल्याप्रमाणे सुशीला आणि सिंधू या कातवणला रापणीवर जाण्यासाठी निघाल्या.
धोंडदेव सुद्धा भल्या पहाटे समुद्राच्या दिशेने जात असताना वाटेमध्ये असलेल्या सवंगड्याना साद घालत होता. त्यांनी आपली नौका हाकली. अर्ध्यापर्यंत गेल्यावर कुणकेश्वर मंदिराचे त्याला दर्शन घडले. त्यांनी सर्व सहकार्‍यांना, ’‘आज आपण देवगड दीपगृहाच्या आसपास वीस गावात मासळीसाठी जाळी सोडून घरी परत येऊया!“
तोपर्यंत इकडे सुशीला, सिंधूने कातवणचा डोंगर चढण्यास सुरुवात केली होती. घराकडे थांबलेल्या शालिनी आणि गयाबाईला आईने कामाची वाटणी करून दिली होती.
आजच्या दिवशी रापणीला मासळी मिळाल्याने सुशीलाने एक कवळा आणि सिंधूने एक कवळा मासळी घेत वेगवेगळ्या गावात जाण्याचे निश्चित केले. घेतलेल्या मासळीचे पैसे उभे करायचे ! आताच श्रावण संपल्याने कित्येक लोक ताज्या मासळीची वाट पाहत होते. रापणीतील मिळणारी मासळी मिश्र स्वरूपाची म्हणजे करमट म्हावरं म्हणून गावागावात ओळखलं जायचं !
दोन्ही बहिणींनी आपल्यात करार केला. “तू पैसे उभे कर ! मी त्या बदल्यात भात घेते.“
कष्टकरी शेतकरी सुद्धा चांगलं पीक आल्याने आनंदात होते. काहींनी पैसे देऊन मासे खरेदी केली. तर काहींनी भात देऊन मासळी घेतली. ठरल्याप्रमाणे दोघीजणी एका ठिकाणी एकत्र झाल्या. आई अनुसया लेकीची वाट पाहत अंगणात उभी होती. दोघीही हसत हसत आल्या, त्यांना पाहून अनुसयाने विचारले, “आज हसता कशाला?“ रोज भांडणार्‍या लेकी हसत खेळता येताना पाहून अनुसयाला आश्चर्य वाटलं. सूर्य उगविण्याची दिशा चुकली की काय?
एवढ्यात सुशीला स्वतःबरोबर सिंधूच्या कामगिरीचं भरभरून वर्णन करू लागली. आईला सांगू लागली की, “आज बाबा समुद्रावर गेल्यावर आम्ही सुद्धा जे घरातून गेलो त्यांचा फायदा झाला? रापणीत भरपूर मासे मिळाले, त्याप्रमाणे आम्ही आमचा मार्ग निवडला, त्यात आम्हाला यश मिळाले! घेतलेल्या मासळीचे पैसे उभे केले. पण शेतकर्‍यांनी नव्या दमाचे भात आम्हाला देऊन आमच्यात आत्मविश्वास फुलविला!“
एवढ्यात सिंधूची नजर तिच्या मागील बहीण शालिनीवर पडली. तिनं नेहमीच्या सवयीने विचारणा केली, “काय मग सांगून गेलेली कामं तू आणि गयाबाईंनी केलीत ना की, आमच्या वाट्याला ठेवलीत!“
इतक्यात गयाबाई पुढे होत म्हणाली, “आम्ही ती कामे केव्हाच हातावेगळी केलीत ! नाहीतर सुशीलाने आम्हाला जगायला दिले असते काय?’‘
हे कानी पडताच सुशीलाचा पारा चढला, “मला कशाला तुमच्या वादात ओढता.“
हे सर्व वाद, संवाद आई अनुसयाने ऐकून, “तुम्ही चौघीजणी कधी सुधारणार नाहीत. वाद कशाला घालता? तिकडे लवकर उठून तुमचे बाबा समुद्रात धंद्याला गेले होते. ते झोपले आहेत. तुमचा आवाज कमी करा! त्यांना जाग आली तर शिव्या घालतील.“
गयाबाई, आईला समजावीत होती. “अगं आम्ही कधीच वाद घालत नाही. या सुशीलाला प्रत्येक वेळी पराचा कावळा करायची सवय झाली आहे.“
“ठीक आहे. तुम्ही सर्वानी शांत राहायला काय घेणार?“ असे म्हणून आतल्या खोलीत अनुसया निघून गेली.
पुन्हा त्यांच्यात वाद सुरू झाला आणि बाबांना जाग आली. त्यांनी लेकींना विचारणा केली, “कशाला तुम्ही भांडत होता?“
“अहो बाबा, सुशीला नेहमीच वाद घालते. आम्ही काही काम करत नाही म्हणते? पण हिच्या पेक्षा आम्हाला कामे असतात. होय की नाही बाबा?“
सुशीला बाबांना आपल्या परीने सांगण्याचा प्रयत्न करीत होती.
“तुम्ही अशा भांडू नका. आता तुम्ही मोठ्या झालात. दुसर्‍याच्या घरात जायच्या आहात ! अशा भांडत राहिल्यास लोक काय म्हणतील? अमक्याच्या त्या लेकी भांडकुदळ आहेत,“ बाबा म्हणाले.

 


गम्मत करीत शालिनी बाबांना म्हणाली की, “बाबा तुम्ही आमच्या सर्वांची लग्न दूरदूरच्या गावात लावून द्या! म्हणजे तुम्हाला कोणी हसणार नाही आणि आम्हाला सारखे इथं यावं लागणार नाही.“
बाबा हसले म्हणाले, “तू या तिघांमध्ये चार पुस्तके जास्त शिकलीस म्हणून तुला जास्त कळायला लागलं असे तुला वाटते काय?“
“नाही बाबा, तुम्ही सारखं म्हणता म्हणून म्हणाली.“
“मग तुम्ही सर्वजणी दूरच्या गावी गेल्यात तर माझ्या पाठीमागे तुमच्या आईला कोण बघणार?“ बाबा म्हणताच, “असे काय म्हणता?“
शालिनी म्हणाली.
“आज-काल काय कुणाचं सांगता येतंय, बघता बघता तो दिगंबर काल गेला.“
“ते आजारी होते,“ असे म्हणून शालिनीने समजूत काढली.
“आम्ही तुम्हाला जड झालो की काय? म्हणून तुम्ही घाई करताय?“
“नाही नाही, असे काही नाही. वेळच्यावेळी तुमच्या डोक्यावर अक्षता पडल्या की, आम्ही देवदर्शनास जायला मोकळे.“
“मग यावर्षी तुम्ही आषाढीला पंढरपूरला जा ना आईला घेऊन.“
“बघूया प्रथम आईला विचार तिला वेळ आहे का? माझी इच्छा केव्हापासून आहे. पण तुझ्या आईला संसार सुटेल तेव्हा ना?“
शालिनी आणि बाबांमध्ये खूप वेळ चाललेला संवाद ऐकून, “काय लाडक्या लेकीसोबत गप्पा चालल्या आहेत.“
“अगं तिचे आणि माझे विचार जुळतात म्हणून आम्ही सतत बोलत असतो. बरं झालं तू आलीस. शालिनी म्हणते यावर्षी तुला घेऊन पंढरपूरला जायला सांगते आहे. जाऊया का? आपण देवाच्या भेटीला! मुलं आता मोठी झाली आहेत. उद्या त्यांची लग्न झालीत. मग आम्हाला कुठे जाता येणार?“
अनुसया म्हणाली की, “मी कधी तुम्हाला अडवलं होते.“
“मग तर झालं यावेळी तरी तुमच्यात या विषयावर एकमत झालं. अभिमान वाटला इतके वर्षे संसार केल्याचा. नाही तुझी गम्मत केली.“
अनुसया म्हणाली, “करा माझी मस्करी मीच भेटली का?“
“नाही ग तुझ्याशिवाय कोण आहे मला.“
“आज बरेच लाडात आलेले दिसताय?“
“मासळीच्या धंद्यात तुझ्या सुखदुःखात सोबत केली. पण तुझ्याकरिता फारसे वेळ देता आला नाही याच शल्य बोचतंय ग.“
“तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आपल्या मुलीच आपल्या संसाराचा भाग आहेत. त्या सुद्धा विचारी आहेत. पण फारशा शिकल्या नसल्याने तुम्हाला त्यांच्या लग्नाची काळजी लागली आहे. हे माझ्या लक्षात येतंय.“
“नाही हो.“
“अगं तुझं मन मला ओळखता येणार नाही तर कुणाला येणार?“
“अहो, तुमचा भक्कम पाठिंबा असल्याने मी कधीच मुलींच्या लग्नाची काळजी केली नाही.“
“अगं पाळणा पाहतो तो बाशिंग बघतो अशी म्हण आहे. तुला सांगितलं नाही, सुशीलास मालवण येथील स्थळ आले आहे. तर सिंधूला वेंगुर्ल्याचं स्थळ आले आहे.“
“काय म्हणताय मुलींना का?“
“आपल्या मुली तुझ्या माझ्या विचाराबाहेर आहेत का?“


“तसे नाही हो! तुमचा आमचा काळ वेगळा होता. आता तसे नाही.“
“अगं आपण हलाखीत जीवन काढलं म्हणून माझ्या मुलींच्या नशिबात ते नाही. सुखी, समाधानी जीवन जगतील अशी घराणी आहेत. मी वराच्या मंडळींना सांगितले की, तुम्हाला हुंडा मिळणार नाही. पण मुली मात्र लाखात एक आहेत. आज रात्रीचं जेवण आटोपल्यावर सर्व मुलींना एकत्रित बसून बातमी सांगणार आहे.“
“हे चांगलं केलंत, म्हणजे तुम्ही मुलींना विश्वासात घेताय. आपली कल्पना आवडली.“
ही चर्चा चालू असताना गयाबाई आली, “बाबा शेजारच्या घरात मालवणमधून पाहुणे येऊन गेले.“
“मग काय झालं?“
“नाही हो बाबा ते तुमची आणि सुशीलाताईची चौकशी करत होते.“
“हो ना मग आज रात्रीच्या जेवणानंतर तुम्हा मुलींशी मला बोलायचं आहे?“
“कशाबद्दल?“
“माझे मित्र आहेत, त्यांच्याकरवी आपल्या सुशीलाला आणि सिंधूला स्थळं सांगून आली आहेत. पण तुम्हाला सांगितल्याशिवाय मी अद्याप त्यांना शब्द दिला नाही.“
गयाबाई ही धोंडदेवाची चार नंबरची लेक आईबाबांकडे हट्ट करणारी पण भाबडी. इतक्यात सर्वजणी आल्या आणि गयाबाई सांगू लागली की, “आज बाबा आपल्या सर्वाना गोड बातमी सांगणार आहेत.“
“कसली बातमी, असा एकच आवाज झाला. सांगा ना बाबा?“
“आपल्या सुशीला व सिंधूला मागणे सांगून आले आहे.“
“इतक्यात बाबा तुम्ही सांगाल त्याप्रमाणे.“
“सुशीला तुम्ही माझ्या मुली नसून मुले आहेत. तुमच्या सर्वांच्या बद्दल माझ्या मनात अढळ स्थान आहे. तुमची साथ लाभल्याने आम्ही दोघांनी संसार केला. असाच संसार तुम्ही तुमच्या आयुष्यात करावा. हीच आमची इच्छा आहे.“
आणि बाबांचे डोळे पाणावले.