सहा तासात… (Short Story : Saha Tasat)

सहा तासात… (Short Story : Saha Tasat)

मैत्री कुठपर्यंत…? मृत्यूपर्यंतच की मृत्यूनंतरही…? मैत्रीची जबरदस्ती होते का? मैत्रीचा अतिरेक होतो का? ती वचनात एवढी बांधून ठेवता येते का? त्या वचनाचा गैरफायदा घेतला जातो का? सारेच प्रश्‍न…! त्यामुळं एक जीव हकनाक जिवाला मुकला.

दोन मित्र. बालपणापासूनचे. नकळत्या वयापासूनचे. चिमण दातांनी आवळे, पेरू तोडून खाण्यापासूनचे. शाळेत एकाच वर्गात, एकाच बाकावर बसण्यासाठी रडणारे; आपला डबा मित्राला देणारे. मित्रासाठी आईला वेगळा पदार्थ बनवायला सांगणारे! बाबा रागावले, आईनं मारलं यापासून ते बाबांनी मला नवा रेनकोट आणला, आई मला आवडतात म्हणून माझ्या वाढदिवसाला बेसनाचे लाडू आणि तुला आवडतात म्हणून दहीवडे करणार आहे… इथपर्यंतच्या सर्व गोष्टी एकमेकांना सांगणारे!
“तू मला वाढदिवशी काय देणार आहेस?” असं एकमेकांना निःसंकोच
विचारलं जायचं. त्याचं उत्तरही निरागसपणेच मिळायचं,
“मला काय माहीत? आई आणेलच काहीतरी चांगलं.”
ते एक सरप्राइज असतं, हे समजायचं आणि समजून घ्यायचं ते वयच नसतं. पुढे प्राथमिक शाळा सुटली आणि ते दोघं हायस्कूलमध्ये दाखल झाले. वय वाढू लागलं. एक-एक इयत्ता वर वर चढू लागले. विषय वाढले. विचार बदलले, आवडी-निवडी बदलल्या तरी मैत्री बदलली नाही.
कालांतराने महाविद्यालयात प्रवेश झाला. मनमोकळं फुलपाखरी जीवन सुरू झालं. ओळखी वाढल्या, जग विस्तारलं. मित्र-मैत्रिणी मिळाल्या. तशी यांची मैत्री आणिकच घट्ट झाली. असे हे तपन आणि जगन…
तपन मोदी आणि जगन देवधर.
एके दिवशी तपनला काय वाटलं कुणास ठाऊक. तो म्हणाला, “जग्या, आपली दोस्ती काहीही झालं तरी सोडायची नाही.”
जगन म्हणाला, “तप्या, वेडा आहेस का? अशी कशी सुटेल आपली मैत्री? उलट ही दिवसेंदिवस घट्ट होतेय.”
“जग्या, मला तसं वचन दे.”
“कसलं वचन?”
“कोणत्याही परिस्थितीत मैत्री सोडायची नाही.”
“दिलं वचन. ए, नाहीतर एक काम करू या.”
“बोल.”
“शिवाजी महाराजांनी रोहिडेश्‍वराच्या मंदिरात जशी स्वराज्याची शपथ घेतली. जिगरी मावळ्यांनाही घ्यायला लावली. तशी आपणही आपल्या मैत्रीची शपथ घेऊ या.”
“शपथ? चालेल. पण कुठं? कुणासमोर?”
“अंऽऽऽहूं आपण त्या श्रीकृष्ण मंदिरात जाऊन त्याच्यासमोर, त्याच्या साक्षीने शपथ घेऊ. आपल्या मैत्रीची एकमेकांना शपथ घालू. चालेल?”
“हो. चालेल की!”
“तर मग ठरलं. परवा रविवारी त्या मुरलीधर मंदिरात आपण जायचं आणि शपथ सोहळा करायचा.”
मग दोघं बाईकवरून मुरलीधर मंदिरात गेले. दोघांनी घंटा वाजवून कृष्णाला स्वतःच्या आगमनाची वर्दी दिली. दोघांनी त्याच्या पायावर पिवळ्या गुलाबाचं फूल वाहिलं. गळ्यात तुळशी हार घातले. मैत्रीचा नारळ फोडला. प्रेमानं एकमेकांना खोबरं भरवलं. बरोबर नेलेले पेढे श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवून एकमेकांना भरवले आणि म्हणाले, “श्रीकृष्णा, आम्ही तुझ्यासमोर अशी शपथ घेतो की, आम्ही दोघं बालपणापासूनचे मित्र आहोत.”
“कृष्णा, ही आमची मैत्री अशीच मरेपर्यंत कायम टिकू दे.”
“मरते दम तक आमची मैत्री राहू दे.”
“आमच्या मैत्रीची शपथ आम्हाला दोघांना आहे.”
“मृत्यूनेही आम्हाला वेगळं करू नये. याची मृत्यूलाही शपथ आहे.”
नंतर दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. तपन म्हणाला, “झालं ना रे सारं बोलून? काही राहिलं नाही ना?”
जगन म्हणाला, “आता आणखी काय सांगायचंय? आपण तर प्रत्यक्ष त्या मृत्युदेवतेलाच साकडं घालून संकटात टाकलं आहे!”
“हो. खरं आहे. जग्या, आपल्या बायका आल्या तरी ही मैत्री कमी होणार नाही. त्यांनाही आपल्या मैत्रीचा हेवाच वाटायला हवा.”
“हो वाटेल.”
म्हणत त्यांनी एकमेकांना मिठी मारली. तपनने जग्याला उचललं आणि दोघंही गरगर फिरू लागले.
शपथ सोहळा आटोपून दोघं बाहेर आले. त्यांनी एका टपरीवर वडापाव अर्धा-अर्धा, एक मिसळ हाफ-हाफ, चहा निम्मा-निम्मा घेतला आणि पैसेही हाफ-हाफच दिले. दोघे हातात हात घालून बाहेर पडले.
जग्या गुणगुणू लागला, “उसको कसम लगे जो बिछडके एक पल भी जिए। हम बने तूम बने दोस्ती के लिए।”
लगेच तपन गुणगुणू लागला.
“ये दोस्ती हम नहीं छोडेंगे.”
मग दोघं एका सुरात चेकाळून गायला लागले.
“तोडेंगे दम मगर, तेरा साथ


ना छोडेंगे।”
शपथ घेतल्यावर त्या दोघांना खूप खूप मोकळं, खूप छान वाटू लागलं होतं. जगन म्हणाला, “तप्या, मरेपर्यंत मैत्री निभावणं हे आपल्याला दोघांनाही बंधनकारक आहे.”
“जग्या, या बंधनातही किती आनंद असतो रे.”
“पण तप्या, शोलेमध्ये तो कोण तो, विजय का विरू…”
“हुं. विजयनं मात्र मैत्री निभावली. मरेपर्यंत साथ सोडली नाही.”
“पण वीरूने मात्र विजय मेल्यावर त्याची साथ सोडली, बघ.”
“अरे पण त्याच्या मृत्यूपर्यंत तरी त्याची साथ निभावली ना?”
“याला काय अर्थ आहे?”
“का?”
“मग काय? विजय गेल्यावर विरुने कड्यावरून किंवा विजय गेला त्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याचं दाखवायला हवं होतं का? पण मग त्या बसंतीचं काय?”
“ते मला नाही माहीत, पण जग्या आपण मरतानाही एकदमच मरायचं.”
“बघू, चल आता.”
“बघू! बघू काय? मला वचन दे, की आपण एक साथच मरायचं. अशी इतिहास घडवणारी मैत्री निभवायची.”
“जग्या, चहाच प्यायलो ना आपण. तुझ्या चहात कुणीतरी गुपचूप काहीतरी मिसळलं तर नाही ना? बरळायला लागलास ते…”
“बरळत नाहीये. खरी मैत्री कशी हवी ते सांगतोय.”
“पण व्यवहारात असं कसं चालेल?”
“पण मैत्रीमध्ये व्यवहार येऊच का द्यायचा? दे वचन.”
“कसलं वचन, तप्या?”
“म्हण, मैत्री निभावू, एक साथ मरू. धर हात माझा.”
“वेड्या मरण काही आपल्या हातात नसतं. त्याची वेळ, त्याचं ठिकाणही ठरलेलं असतं. मग कसलं वचन?”
“तू म्हणतोस ते खरंच आहे, तरी त्यापेक्षा जास्त विश्‍वास माझा मैत्रीवर आहे. आपली एकमेकांवरची दृढ आणि गाढ मैत्री वेळ आणि ठिकाण बदलून टाकेल बघ.”
“ते आपल्या हातात नसतं रे.”
“जग्या, मग आज आत्तापासून आपली मैत्री खल्लास! तू मोकळा,
मी मोकळा, समजलं?”
“काही तरी काय रे?”
“मग दे वचन.”
“घे दिलं. आता चल घरी.”
“नुसतं तोंडी नकोय वचन. ठेव माझ्या हातावर हात आणि दे वचन.”
“हूं. आपली मैत्री मृत्यूनंतरही तुटणार नाही. झालं?”
“वा. हे तर फारच चांगलं वचन आहे. ते मलाही नाही सुचलं बघ. वा छानच! आपण एक हॉटेल काढूया.”
“हुं. चल आता.”
“कॉफी होऊ दे, चांगल्या हॉटेलमध्ये.”
“तप्या, हॉटेलचं नावही ‘वचन’ ठेवलं तर रे?”
“छान कल्पना आहे. आपण तोच व्यवसाय करू या. मस्त हॉटेल उघडू, ‘हॉटेल वचन’ने गिर्‍हाइकांशी चांगल्या वचनाने जोडले जाऊ.”
“चला, दिवास्वप्नं फार झाली. जागा हो. घरी चल वेळ होतोय.”
“तू वचन दिलं आहेस, बरं का! लक्षात राहू दे.”
“दिलं नाही, तू घेतलं आहे.”
“म्हणजे? तुला द्यायचं नव्हतं का?”
“तसं नाही रे. उगीच गंमत!”
“बरं काही असो. आता आपण वचनाने एकमेकांशी जन्मोजन्मीसाठी बांधले गेलोय, हे विसरायचं नाही.”
“नाही. पण सध्या आपल्याला घरदार आहे हेही विसरून चालणार नाही बघ.”
शेवटी त्यांचं वचन प्रकरण संपलं. याही गोष्टीला काही वर्षं उलटली. दोघांनीही पुढं हॉटेल मॅनेजमेंटचा डिग्री कोर्स केला. नंतर हॉटेलही सुरू केलं. त्यांनी त्या बोर्डखाली एक टीप टाकली, ‘तुमचं समाधान, हेच आमचं वचन!’
त्यांनी हॉटेलमधील पदार्थांची उत्तम चव जपायचं वचन कसोशीनं पाळलं. व्यवसाय तेजीत चालू झाला. तीन वर्षांतच त्यांची दुसरी शाखा निघाली. एक हॉटेल जगन पाहत होता, दुसरं हॉटेल तपन निभावत होता. दोन्हीचा गल्ला एक होत होता आणि मग विभागला जात होता. तरी त्यातही कमी तिथे मी, हेच धोरण असे. दोघं वेगळे राहत होते, तरी एकच होते. त्यात तपनचं लग्न झालं होतं. एकदा हॉटेलच्याच काही कामासाठी दोघं गाडीतून बाहेरगावी गेले होते. परतत असताना गाडीला पाठीमागून एका मोठ्या टेम्पोची जोरात धडक बसली. गाडी पुढे ढकलली जाऊन स्टँडवर थांबलेल्या एस.टी.वर जाऊन आदळली.
तो मोठाच अपघात होता. दोन्हीकडून गाडी चेपली होती. स्थानिक लोकांनी गाडीच्या काचा फोडून दोघांना कसं तरी बाहेर काढलं. जग्याचा मृत्यू झाला होता. पोलीस आले. घरचे जमले. त्यांनी दोघांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं. तिथे डॉक्टरांनी जगनचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. तपन गंभीर जखमी होता. त्याच्यावर उपचार चालू होते; पण डॉक्टर खात्री देत नव्हते.
दोघंही परतायच्या मूडमध्ये होते. दोघांनी घरच्यांसाठी भरपूर खरेदी केली होती. तपनने पत्नीसाठी काही खास खरेदी केली होती. सारं सामान अपघात स्थळी विखरून पडलं होतं. दोघंही मौजमस्ती करत होते.
संध्याकाळचे सात वाजले होते. घरी पोहोचायला दहा तरी वाजणार होते; पण सात वाजताच अपघात झाला. तिथे कल्लोळ माजला होता. दुःख अनावर झालं होतं. कुणी कुणाला सावरायचं? तपनची पत्नी वेडीपिशी झाली होती. जगनचंही लग्न ठरलं होतं, तीही धावत तिथे आली होती.
तपन बेशुद्ध होता. तो एकाएकी बडबडू लागला,
“नाही जग्या, मी कसा येऊ? अरे, सिनेमात ठीक असतं रे. माझं नवीनच लग्न झालंय.”
“तप्या, माझंही ठरलंय. पण मी मेलोय. आता तूही चल माझ्यासोबत. आपण शपथ घेतली होती. तू मला तसं वचन दिलं होतंस.”
“नाही, तू जबरदस्तीनं ते वचन मिळवलं होतंस.”
“मग निभाव ना! चल.”
तपन बडबडत होता.
त्याच्या शेजारची नर्स त्यामुळे चमकलीच. कारण तो गंभीर जखमी होता. बेशुद्ध होता आणि मुख्य म्हणजे तो बरळत होता; पण त्याचं तोंड बंद होतं. तो काय बोलत होता, ते समजत नव्हतं. तो अस्पष्ट आणि खोल आवाजात बोलत होता.
तिनं लगेच डॉक्टरांना बोलावलं. त्यांनाही या गोष्टीचं नवलच वाटत होतं. तो खरंच काहीतरी बोलत होता. काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता. पण त्याचं तोंड बंदच होतं. त्याची इतर कोणतीच हालचाल होत नव्हती. तो शुद्धीवर येत नव्हताच. मग हे कसं? तेही चक्रावले. त्यांनी नर्सकडे पाहिलं, पुन्हा पेशंटकडे पाहिलं आणि पेशंटला एक इंजेक्शन द्यायला सांगितलं. ते आयसीयूमधून बाहेर गेले.
पेशंट बोलतोय म्हटल्यावर बाहेर तपनचे नातलग डॉक्टरभोवती जमा झाले. डॉक्टर म्हणाले, “सॉरी, आत्ताच काही सांगता येत नाही. आमचे उपचार सुरू आहेत.”
“पण, डॉक्टर तो बोलतोय ना?”
“नाही. बरळतोय आणि मलाही हे नवलच वाटतंय. तो बेशुद्ध आहे. हालचाल करत नाही. कशालाच प्रतिसाद देत नाही, तरी बोलतोय कसा. एवढ्या वर्षांच्या या व्यवसायात मला हा असा अनुभव पहिलाच आहे. असं समजा की, एखादा माणूस झोपेत बडबडतो, याचा अर्थ तो जागा आहे असा होत नाही. काय?”
“हूं. बरोबर.”
नातलग हवालदिल होत बाहेर बसून राहिले.
आतमध्ये डॉक्टरांचे उपचार आणि तपनची जगण्याची धडपड चालू होती नि जगनची विनवणी. इंजेक्शनने ग्लानीत गेलेला तपन बडबडतच होता,
“जग्या, मी तुझं सारं कुटुंब सावरीन. तुझ्या होणार्‍या पत्नीचा भाऊ होऊन त्या कुटुंबालाही सावरीन. तिचं लग्न लावून देईन. पण मी येत नाही.”
डॉक्टरांनी त्याला पुन्हा तपासलं; पण प्रगती शून्य. तरी बडबड चालूच. नर्सनं बाहेर येऊन विचारलं.
“हा जग्या कोण?”
“जग्या?”
“हो. जग्या म्हणजे कोण?”
“का? काय झालं?”
“झालं काही नाही. तुमचा पेशंट सारखं त्याचं नाव घेतोय.”
“इथे आणण्यापूर्वीच ज्याचा या अपघातात मृत्यू झाला तो जगन. हे दोघे खूप जवळचे मित्र होते. तो गेल्याचं तपूला कळलं नाही. समजल्यावर तो हा आघात सोसू शकणार नाही.”
“हूं.” म्हणत ती टक् टक् करत निघून गेली. हॉस्पिटल म्हणजे एक प्रयोगशाळा असते. तिथे भावभावनांना फारशी किंमत नसते.
तपनच्या वडिलांनी विचारलं, “डॉक्टर साहेब, आम्ही मोबाईलवर तपनचं बोलणं टेप करू शकतो का?”
ते म्हणाले, “नाही, कारण ते बेकायदेशीर आहे.”
मार्गच खुंटला. त्यांनी पुढं काही विचारलं नाही.
तपनचं बोलणं आता बदललं होतं. तो डॉक्टरांशीच बोलत होता. तो अस्पष्ट अशा खोल आवाजात बोलत होता,
“डॉक्टर, मला मरायचं नाहीये. मला जगायचंय. मला वाचवा.”
“नाही. तपन तुला आता
कुणीच नाही वाचवणार. मी तुला माझ्यासोबत नेणारच. चल तयार हो. वचनाला जाग.”
“नको रे जग्या, अशानं दोन घरं, दोन कुटुंबं उद्ध्वस्त होतील. लग्नात मी पत्नीला वचन दिलं आहे, जन्मभर साथ देण्याचं.”
“मग मला दिलेल्या वचनाचं काय? तू चल नाही तर मी तुझ्यात शिरून तुझ्या पत्नीवर…”
“शटअप्.”
“मग चल.”


“डॉक्टर, हा काय बोलतोय ते समजत नाही, पण याची अखंड बडबड चालू आहे. असं कसं?”
“जाऊ दे. तू त्याकडे लक्ष
देऊ नकोस. फक्त त्याच्या मॉनिटरवर लक्ष राहू दे.”
“पण सर, हे असं किती वेळ… म्हणजे…”
“त्याच्या या परिस्थितीवरून, त्याच्या रिस्पॉन्स न देण्यावरून तर समजतंच आहे. फक्त वाट पाहायची. सलाईन संपत आहे, पाहा.”
“येस सर.”
तिलाही माहीत होतं. वाट पाहायलाच हवी. प्रयत्न थांबवता
येत नव्हतं.
तशी तर तपनचीही जगण्यासाठीची लढाई चालूच होती. तो जगनला विनवत होताच. त्याच्याकडे प्राणासाठी भीक मागत होताच. तो म्हणाला,
“अरे, मैत्रीला तरी जाग.”
“तप्या, तू वचनाला जाग.”
मध्येच तपन म्हणे, “डॉक्टर,
तो मला त्याच्याबरोबर नेणारच. पाहा. त्याच्यापुढे तुमचे प्रयत्न कमी पडणार.”
डॉक्टरांनी विचारलं, “तो कोण? कोणी नाही. उगीच घाबरू नका.
कोणी नेणार नाही तुम्हाला. शांत राहा. लवकर बरे व्हाल.”
आता चार तास उलटले होते. पण फारसा फरक पडत नव्हता. शुद्ध तर नव्हतीच! मग हे असं कसं? डॉक्टरांनाही पेच पडला होता. त्यांचे प्रयत्न प्रामाणिकपणे चालूच होते. तपनचं बोलणं मधूनच त्यांना समजत होतं. ते त्याला धीर देत होते. परंतु, ते त्याच्यापर्यंत पोहोचतं की नाही, हे डॉक्टर असूनही त्यांना कळत नव्हतं.
आता पाच तास उलटले होते.
पेशंट किती वेळात शुद्धीवर येईल,
ते डॉक्टरांच्याही हातात नसतं. पण
इथे ही बेशुद्धीही म्हणता येत नव्हती.
“तपन, मी तुला एकूण सहा तासांची मुदत देत आहे. आता फक्त एकच तास उरला आहे.”
“कशाला?”
“माझ्यासोबत यायला.”
“हा तर जुलूम झाला. ही मरायची जबरदस्ती झाली. जग्या मला सांग, जर मी तुझ्यासारखा जागेवरच मृत झालो असतो नि तू वाचला असतास; तर तू माझ्याबरोबर आला असतास? वचन निभावलं असतंस?”
“हो.”
“मला नाही तसं वाटत. तसं घडलं नाही, म्हणूनच तू हो म्हणतो आहेस.”
“का नाही वाटत?”
“कारण जगण्याचा मोह प्रत्येकालाच असतो. जगात प्राणापेक्षा प्रिय काहीच नाही. मला जगायचं आहे. मला नाही यायचं तुझ्याबरोबर. ”
“नाही. मी वचन निभावलं असतं. तुला मृत्यू पावायचं आहे. तुला माझ्यासोबत यायचं आहे.”
तपनची मृत्यूशी, नाही तर मित्राशीच जीवन-मृत्यूची झुंज चालली होती.
शेवटी मृत मित्र जिंकला. त्यानं ठरवल्याप्रमाणं तपनला हरवलं होतं. रात्री एक वाजता तपनचा मृत्यू झाला. सहा तासांची त्याने दिलेली मुदत त्यानेच पाळली. तपनला नाइलाजानं मृत व्हावं लागलं. सहा तासांनंतर त्यांचा सहप्रवास पुढे चालू झाला होता.
प्रवास चालू झाला खरा, पण मैत्रीचं काय? नाराज तपन त्याची मैत्री विसरून जाईल. ते दोघं पुढची जन्मही मैत्रीसाठी एकत्रच घेतील. माहीत नाही.
ही सत्य घटना असून गुजरातेतील मोरवी या गावची आहे. या घटनेला 20 वर्षे झाली.
असंही घडू शकतं???
असंही घडलं आहे!!!