ऋणानुबंध… (Short Story: Runanubandh)

ऋणानुबंध… (Short Story: Runanubandh)

ऋणानुबंध…


– शिल्पा केतकर

”ए.. मीरा, मीरा…“ राधाने 4-5 हाका मारल्या तरी त्या तुळशीबागेतल्या गर्दीमुळे मीराला काही ऐकू गेल्या नाहीत. दोन्ही हातातल्या सामानाच्या पिशव्या सांभाळत राधाने तिला गाठलेच.
खांद्यावर कोणाच्या तरी हाताची चाहूल लागताच मीरा थोडीशी दचकली… आणि मागे वळून पाहते तो काय तिची बालमैत्रीण राधा.. तिला काय बोलायचं सुचेना.. खूप वर्षांनी दोघी एकमेकींना भेटत होत्या.
”अगं किती हाका मारल्या तुला, शेवटी धावत येऊन गाठलेच तुला… अगं अशी भूत बघितल्यासारखी काय बघतेस माझ्याकडे.. अगं मी राधा. तुझी बालमैत्रीण, आठवत नाहीये का?“ राधा अगदी लहान मुलासारखे डोळे करून पाहत होती..
”अगं वेडे ओळखलं ना, न ओळखायला काय झालं? इतक्या वर्षांनी तू अशी अचानक समोर आल्यामुळे खरं सांगू का.. मला काही सुचलंच नाही…“
”तसंही तुला बोलायला सुचतं का? अजून आहे तशीच आहेस की अबोलीच्या फुलासारखी.“ मीराने तिला हळूच चापट मारली.
”तुझ्यातपण काही बदल नाही हो. तश्शीच आहेस… बोलघेवड्यासारखी…“ (दोघी एकदम खळखळून हसल्या)
”बरं, ऐक ना मीरा, जरा गडबडीत आहे गं, तुझा नंबर दे मला. तुला फोन करते.. मग बोलू निवांत.“
”एवढी कसली गं गडबड? चल, कुठे तरी कॉफी तरी घेऊ. इतक्या वर्षांनी भेटलो आपण, कॉफी प्यायला तरी चल.“
”अगं आले असते, अनिकेतची मुंज आहे. अरे हो, अनिकेत माझा मुलगा. बरं मुंजीला नक्की यायचं आहे. तसं मी रीतसर बोलावणं करेनच. आधी तुझा नंबर दे पाहू. म्हणजे निवांत बोलता येईल.“
मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली आणि बाय म्हणत राधा गर्दीतून वाट काढत गेली सुद्धा…! तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे मीरा पाहत राहिली. आहे तश्शीच आहे अजून, उत्साहाने वाहणारी नदी. स्वतःशीच हसून ती घराकडे चालायला लागली. एकेक पावलागणिक ती भूतकाळातील दिवसांत पोचली.
मीराच्या पणजोबांचा पेठेमध्ये भला मोठा वाडा. त्यात दहा-एक तरी भाडेकरू असतील. वर भाडेकरू राहायचे आणि खाली मीरा व तिचे आई वडील, मोठा भाऊ राहुल, काका काकू, त्यांची मुलगी समिरा, आजी आजोबा.. एकत्र कुटुंब. वरच्या माडीवर राधा आणि तिचे आईबाबा राहायचे. आई बाबा दोघेही नोकरीला जात. त्यामुळे राधा घरी कमी आणि मीराकडे जास्त असायची. पण दोघींचे स्वभाव एकदम विरुद्ध. मीरा एकदम शांत, संयमी, नीटनेटकेपणाची आवड असलेली; त्या विरुद्ध राधा एकदम बडबडी, जरा म्हणून शांत बसणार नाही, उत्साही खळखळ करत वाहणारी नदी. मात्र अभ्यासात दोघीही तोडीसतोड हुशार.
वाड्याला हा मोठा दिंडी दरवाजा. मोठं अंगण, अंगणात छान सुबक तुळशी वृंदावन, वाड्यातील सगळी बच्चेकंपनी त्या मोठ्या अंगणात खेळायची. राधाच्या आई-बाबांना, मीराच्या आजी-आजोबांनी सांगूनच ठेवलं होतं, अहो, जशी आम्हाला मीरा तशीच राधा.. तुम्ही निर्धास्त नोकरीला जा. त्यामुळे राधेच्या आई बाबांची एक काळजी मिटली होती. भातुकलीचे खेळ खेळता खेळता दोघी कधी मोठ्या झाल्या कळलंच नाही.
दोघीजणी दहावीला उत्तम मार्कांनी पास झाल्या. मीराने आर्ट्सला अ‍ॅडमिशन घेतले आणि राधाने कॉमर्सला. त्यामुळे आता दोघींचं कॉलेज वेगळं, क्लासच्या वेळा वेगळया.. मग एका वाड्यात राहून दोघींची भेट थेट रात्री, अंगणात… तुळशी वृंदावनापाशी. दिवसभर काय
काय झालं सगळं बोलायच्या. अर्थात राधाला किती बोलू, काय काय सांगू असं झालेलं असायचं.
राधाच्या वडिलांनी आता स्वतःचा फ्लॅट घेतला होता, त्यामुळे लवकरच आता ते वाड्यातील जागा खाली करणार होते. मीरा आणि राधाच्या घरातल्यांना इतकी एकमेकांची सवय झाली होती, त्यांच्यामधे भाडेकरू आणि घरमालक हे नातं नव्हतंच कधी. अर्थात त्यांनी स्वतःची वास्तू घेतली हा आनंद होताच… पण आता ते वाडा सोडणार हे पचनी पडणं सगळ्यांनाच जड जात होतं.
त्यातच राधाचा वाढदिवस जवळ आला होता, राधाने हट्टच धरला, वाढदिवस वाड्यात साजरा करून मगच वाडा सोडायचा… आई बाबांना तिचं म्हणणं पटलं. मग काय वाड्यातील सगळे, म्हणजे इतर भाडेकरू, मीराच्या घरचे.. आणि राधाचे कॉलेज फ्रेंड.. असा मस्त वाढदिवस साजरा करायचा ठरलं. राधाच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी मीरा आणि राधा नेहमीप्रमाणे अंगणातल्या तुळशी वृंदावनापाशी भेटल्या. आज दोघीजणी एकदम गप्प गप्प होत्या. काय बोलायचं सुचत नव्हतं. राधानं मीराचा हात हातात घेतला. तशा दोघीही रडायला लागल्या. दोघींना काय बोलावं सुचेना. तितक्यात त्यांच्या रडण्याच्या आवाजाचा मागोवा घेत मीराची आजी तिथे आली. दोघी एकदम बोलल्या, ”आजी तू जागी कशी, झोपली नाहीस.“ असं म्हणत दोघींनी डोळे पुसले.. ”अगं आज नेहमीसारखा तुमच्या, बोलण्याचा, खिदळण्याचा आवाज नाही.. म्हटलं काय झालं ते पाहावं.. आणि माझी शंका खरी ठरली.. अगं पोरींनो सासरी चालल्या सारख्या काय रडताय, की आत्तापासूनच प्रॅक्टिस करताय रडायची…“
”काहीतरी काय आजी, अजून अवकाश आहे आमच्या लग्नाला.“
”अगं मीरे. राधा वाडा सोडून चालली आहे, म्हणजे आपल्याला सोडून नाही काही, अगं अधूनमधून आपण भेटत राहूच की.
आपण त्यांच्याकडे जाऊ, ते आपल्याकडे येतील आणि काय ते तुमच्या भाषेत म्हणतात… एकत्र जमण्याला…“
” गेट टुगेदर म्हणायचं आहे का तुला आजी?“
”हां हां, तेच तसं पण करू काय. आणि तुम्ही भेटालच की या ना त्या निमित्ताने. अगं इतक्या दिवसांचे आपले ऋणानुबंध आहेत, असे थोडेच संपणार आहेत. चला पळा. आता झोपायला जा. उद्या राधाच्या वाढदिवसाची तयारी करायची आहे. धमाल करायची आहे ना. मग झोप नको का व्यवस्थित व्हायला.“
“ हो आजी जातो झोपायला.“ गुड नाइट म्हणत दोघींनी आजीला मिठी मारली आणि पळाल्या झोपायला. त्या दोघींच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहताना आजीच्या डोळ्यांच्या कडा मात्र नकळत पाणावल्या.
राधाच्या वाढदिवसाच्या दिवशी मीराची शंतनूशी ओळख झाली. अतिशय खेळकर स्वभावाचा. समोरच्याला पटकन आपलसं करून घेणारा शंतनू आवडण्यासारखाच होता. मीरा प्रेमातच पडली होती असं म्हणायला हरकत नाही. दोन दिवस झाले, तिचा डोळ्याला डोळा लागत नव्हता. खाण्यात लक्ष नाही की अभ्यासात लक्ष नाही, राधाला नेहमीप्रमाणे अंगणात भेटायला पण गेली नाही. ना जाणो पण राधाच्या लक्षात आलं तर…? असा विचार तिच्या मनात चमकून गेला. पुढचे 8 दिवस तसे धावपळीतच गेले.
राधाच्या घरची सामान बांधाबांध… शिफ्टिंग…. चांगला दिवस पाहून राधा नवीन घरी राहायला गेली. सुरुवातीला खूपच चुकल्यासारखं
झालं. पण आता हळूहळू सवय झाली. मीराला मात्र आता शंतनूशिवाय चैन पडत नव्हती. राधाशी शंतनूबद्द्ल बोलावं का? असा पुसटसा विचारही मनात येऊन गेला. हो नाही करता करता मीराने राधाजवळ शंतनूबद्दल बोलायचं ठरवलं. राधाच्या घरी त्या दिवशी कोणीच नव्हतं. तिचे आई-वडील एका लग्नाकरता बाहेरगावी गेले होते. त्यामुळे राधाने मीराला घरी राहायलाच बोलावलं होतं. मीराने पण ठरवलं, आत्ताच वेळ आहे राधाला शंतनूबद्दल आपल्याला काय वाटतं हे सांगायची. रात्री दोघीजणी मस्तपैकी कॉफी पित गॅलरीमध्ये गप्पा मारत बसल्या होत्या.
”राधा, मला तुला काहीतरी सांगायचं आहे.“ जास्त आढेवेढे न घेता मीराने शंतनू आवडतो असं सांगून टाकलं… राधाचा दोन मिनिटं तिच्यावर विश्वासच बसत नव्हता. तिला काय बोलावं सुचेना. ती एकदम गडबडून गेली. आणि मीरा शंतनूबद्द्ल भरभरून बोलत होती.
राधा एकदम भानावर आली. हिला आत्ताच सावध करावं का…? शंतनूबद्द्ल…
राधाने सगळ्या प्रकारे मीराला सांगून पाहिलं पण शंतनूच्या बाबतीत मीरा काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती.
”अगं शंतनू दिसतो तसा अजिबात नाही. पैशांची अफरातफर, व्यसनी, खोटं वागणारा असा आहे,“ या गोष्टींवर विश्वासच बसत नव्हता.
राधा म्हणाली, ”आम्हाला सुद्धा हे पटत नव्हतं. पण जसजसे अनुभव आले तसे आम्ही हळूहळू त्याच्यापासून चार हात लांबच राहायला लागलो.“
शंतनूमुळे मीरा आणि राधामधे दुरावा निर्माण झाला, तो कायमचा… त्यानंतर आज अशी अचानक ती तुळशीबागेत भेटली. त्याक्षणी मीराला तिला कडकडून मिठी मारावी असं वाटलं. किती समजावून सांगितले होते तिने आपल्याला, वेळप्रसंगी भांडली पण होती.. पण आपण तिचं अजिबात ऐकून घेतलं नाही, त्यावेळी तिचं ऐकलं असतं तर आज ही वेळ आपल्यावर आली नसती.
राधाच्या मुलाच्या मुंजीला मीरा आवर्जून तिच्या दोन जुळ्या मुली जुई आणि सईला घेऊन गेली होती. खूप वर्षांनी राधाचे आई बाबा भेटले. राधाने तिच्या सासरकडील सगळ्यांची ओळख करून दिली. राधाच्या मुलाची आणि मीराच्या मुलींची मस्त गट्टी जमली. मुंज सोहळा छान पार पडला. निघताना मीरा राधाला बोलणार इतक्यात राधाच पटकन तिचा हात हातात घेऊन बोलली,
”भेटूयात नक्की. खूप काही बोलायचं आहे तुला, माहितेय मला. भेटू नक्की.“ मीराचे डोळे पाणावले.
ही खरी मैत्री. पूर्वी झालेली भांडणं, दुरावा कुठेही राधाच्या बोलण्यातून दिसत नव्हता, जणू काही घडलंच नाही.
”कुठे भेटायचं?“ असं ठरत असतानाच… दोघी एकदमच बोलल्या,” वाड्यातल्या तुळशी वृंदावनापाशी.“
अर्थात आता वाडा नाही, मोठं कॉम्प्लेक्स झालं आहे. पण आजीच्या इच्छेनुसार तुळशीवृंदावन मात्र आहे. आज मीरा आणि राधा भेटणार होत्या.
राधा आणि मीरा ठरलेल्या ठिकाणी भेटल्या. जुन्या वाड्यातल्या आठवणी बोलता बोलता, मीराने सरळ विषयालाच हात घातला. ”इतक्या वेळा तू मला सांगत होतीस शंतनूबद्दल पण बहुतेक मलाच ऐकून घ्यायचं नव्हतं, काही वेळा समोरचा आपल्या चांगल्या करता सांगत असेल ही साधी गोष्ट सुद्धा आपल्या लक्षात येऊ नये. इतके आंधळे झालेलो असतो आपण प्रेमात, की कळत असून वळत नसतं.“
”अगं मीरा ते वयंच तसं असतं…“

”बरं जाऊ दे आता. सांग.. शंतनू काय करतोय सध्या. तू नोकरी करतेस की नाही, की घरीच असतेस.“
”शंतनू ना वर आहे.“ आकाशाकडे बोट दाखवत मीरा बोलली.
“काय… !“ राधा जवळ जवळ ओरडलीच. ”अगं कधी? आणि कसं…?“ राधाला पुढे बोलताच येईना.
”सांगते सांगते.. सगळं सांगते, सगळ्यांच्या विरोधाला न जुमानता आम्ही लग्न केलं आणि भाड्याच्या 2 खोल्यांमध्ये आमचा संसार सुरू झाला. पहिले काही दिवस छान गेले. पण तू सांगितल्याप्रमाणे, शंतनूने स्वतःचे रंग दाखवायला सुरुवात केली. ज्या ज्या लोकांकडून त्याने पैसे घेतले होते, ती लोेकं आता घरी येऊन तमाशा करू लागली. मी एका शाळेत नोकरीला होते, त्या पगारात कसंबसं घर चालवत होते. शंतनू फक्त माझ्याकडून पैसे घेण्यासाठी आणि त्याची पुरुषी तहान भागविण्यासाठी घरी येत असे. माहेरी जाऊ तरी कुठल्या तोंडाने, पण मला ज्यावेळी सई आणि जुईच्या वेळी दिवस गेले तसा मी निर्णय घेतला, त्यादिवशी मी मनाचा हिय्या करून माहेरी गेले. माझी ही अशी अवस्था पाहून तर राहुल दादा पोलिसात तक्रार दाखल करायला निघाला होता. पण मीच त्याला समजावून सांगितले, त्याचा काही फायदा होणार नाही, उलट माझ्या त्रासामध्ये भर पडेल.“
”अगं मग मला फोन का नाही केलास? अशावेळी मैत्रीमधली भांडणं, राग बाजूला ठेवायचे असतात गं.“ राधा म्हणाली.
”मान्य आहे गं. पण खरं सांगते माझा धीरच झाला नाही तुझ्याशी बोलायचा… माझी सगळी जबाबदारी दादा वहिनीने घेतली.“
”सई आणि जुईच्या जन्मानंतर मी नोकरीसाठी परत प्रयत्न करायला लागले आणि एक दिवस मला कॉलेजमधून नोकरीकरता कॉल आला. किती आनंद झाला म्हणून सांगू. माझ्या या दोन मुलींचा पायगुणच. आता माझ्या मुलींचा खर्च मी करू शकते, मला कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही. एक वेगळाच आत्मविश्वास माझ्यात आला. अर्थात घरातल्यांनी कधीच मला काही कमी पडू दिलं नाही. माझे आणि शंतनूचे संबंध कधीच संपले होते. मध्ये कधीतरी त्याच्या एका मित्राकडून तो गेल्याचं कळलं. खरं सांगते राधा मला काही सुद्धा वाटलं नाही की डोळ्यात पाणी सुद्धा आलं नाही. काय मजा आहे बघ. ज्या माणसावर मी जिवापाड प्रेम केलं तो गेल्याचं कळल्यावर मला काही सुद्धा वाटू नये. आजी आजोबा दोघे गेले, वाडा पण जुना झाला होता, तो आम्ही बिल्डरला दिला आणि पैसे घेतले. दादा वहिनी, त्यांची 2 मुलं बंगलोरला असतात. काका काकू आणि आई, आम्ही सगळे जवळच राहतो कोथरूडमध्ये. म्हणजे आमचे फ्लॅट वेगवेगळे आहेत, दहा मिनिटाच्या अंतरावर. बाबा 2 वर्षापूर्वी अचानक गेले अन्… समिरा, काका काकूंची मुलगी आठवतेय का? तिचं पण लग्न झालं. आता ती दिल्लीमध्ये असते. खरं सांगू राधा तुझ्याशी बोलले आणि माझ्या मनावरचं ओझं उतरलं बघ, आज अगदी मोकळं आणि छान वाटतंय. मला पण खूप छान वाटलं मीरा. दुरावा दूर झाला.“
”काही गोष्टी घडायच्या असतात त्या घडतातच. वेळ आणि काळ कोणाकरता थांबत नाही हेच खरं. आजी काय म्हणायची आठवतंय मीरा, अगं आपले वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध… असे थोडेच संपणार आहेत.“