प्रेम तुझे नि माझे (Short Story : Prem Tujhe Ni...

प्रेम तुझे नि माझे (Short Story : Prem Tujhe Ni Maajhe)

पण तुझं काय? तू काय ठरवलंस? तुझा होकार आहे का? तू खरंच शेखरवर प्रेम करतेस का? तू त्याच्याशी लग्न करणार आहेस की…. बाबांनी शोधलेल्या मुलाबरोबर लग्न करून निरस संसार करणार आहे?… माझ्यासारखा !
आशु ताई ऽ ..! अशी अचानक? व्हॉट ए सरप्राईज? मोनाली धावत आसावरीजवळ गेली. तिने मोनालीला जवळ घेतलं. तुझ्या या सरप्राईजमुळे अगं कित्ती आनंद झाला म्हणून सांगू आशुताई?
मोनाली, तुझ्या आनंदाकरिताच आलेय मी. तुला असं आनंदी बघायला खूप आवडतंय. आईऽ बघ, आशुताई आली. मोनालीनं आनंदान आईला हाक मारली.
अगं आसावरी अशी अचानक? फोनवर काही बोलली नाहीस? सगळं ठीक आहे नं? आईनं आनंदमिश्रीत आश्चर्यानं विचारलं.
हो ग! सगळं ठीक आहे. म्हणून तर आले.
आज या अचानक येण्यानं बाबा पण खूप आनंदात होते. आईने आठवणीने श्रीखंड, पुरी, बटाटेवडे असा आवडीचा स्वयंपाक केला. मस्त जेवणं झालं. खूप सार्‍या गप्पागोष्टी झाल्यात. थोडा आराम झाला.
आई ऽ
काय ग आसावरी…?
आम्ही थोडं फिरून येतोय.
या. पण लवकर घरी या.
हो हो !… लवकर येऊ. काळजी करू नको. कुठे जायचंय आशुताई?
थोडं बगिच्यात जाऊ. फ्रेश वाटतं ग !

प्रेम तुझे नि माझे, Short Story, Prem Tujhe Ni Maajhe
बगिच्यात गेल्यावर एका बेंचवर निवांत बसल्या.
मोनालीने विचारले, ताई काय झालं ग? काही प्रॉब्लेम?
आहे नं… तुझ्या लग्नाचा… नेहमीसारखं किंचित हसू आसावरीच्या ओठावर होतं.
आशुताई , तेवढं सोडून बोल. तो विषय नको.
अगं, त्याच विषयावर बोलायला मी आलेय. मला तुझ्याशी बोलायचं आहे. मोनाली आपण बहिणी असलो तरी तुझं माझ नातं मैत्रिणीसारखं आहे. तर बोल… शेखर काय म्हणतो?
अगं शेखर तयार आहे. पण बाबा ?… शेखरची हिंमत होत नाही बाबांना विचारायची आणि मलाही भिती वाटते बाबांची!
मोनाली, पण त्याचं खरंच प्रेम आहे का? त्याला तुझ्याशीच लग्न करायचं आहे नं?
हो ग आशुताई. त्याचं खरंच मनापासून प्रेम आहे. तो लग्न करायला तयार आहे. मोनालीनं हृदयापासून सांगितलं.
पण तुझं काय? तू काय ठरवलंस? तुझा होकार आहे का? तू खरंच शेखरवर प्रेम करतेस का? तू त्याच्याशी लग्न करणार आहेस की…. बाबांनी शोधलेल्या मुलाबरोबर लग्न करून निरस संसार करणार आहे?… माझ्यासारखा !
अगं आशुताईऽ… तिचा सूर हळवा झाला.
मोनाली, तुझा होकार?… अशानं आयुष्य करपून जातं ! संसार निरस होतो!
आशुताई …! काय झालंय ? खरं सांग.
अगं तेच सांगायला आले. आजवर मनात दडवून ठेवलेलं …. तुला सारं सांगते.
मी संगीत क्लासला जायची ….तिथे माझी ओळख मल्हारशी झाली. फार सुंदर गायचा. रागदारीत त्याचा हातखंडा होता. मजा म्हणजे तो मलाही त्याच्या बरोबरीने रागदारी गायला लावायचा. काही युगल गीतं आम्ही तयार केली होती. आवडती गाणी गातांना आम्ही सुरात चिंब चिंब भिजून जायचो. गाताना आम्ही सूरसंगात, शब्दरंगात, भावगंधात रंगून जायचो. ते संगीत सुरांचं, प्रेमाचं विेश होतं. स्वर्गीय आनंद होता…
क्षणभर आवंढा गिळून आसावरी म्हणाली, मनापासून वाटायचं मल्हारने बाबांना सांगावं. तसा तो आपल्या घरी एक दोनदा आला होता. त्यानं संगीतात पीएच.डी. केली होती… तो नेहमी म्हणायचा …
आसावरी, जीवन जगायला तुझी आणि सुरांची साथ हवी !…
पण बाबांशी बोलायची त्याची हिंमत नव्हती!…..माझ्या मनात एकदा आलं की, हे सर्व मी बाबांना सांगावं! पण माझ्यात तेवढं धैर्य नव्हतं.!….मला स्वतःचाच राग आला. मी का प्रपोज केलं नाही… अगं केव्हा सांगावं, कसं सांगावं कळलंच नाही.
प्रेम तुझे नि माझे, Short Story, Prem Tujhe Ni Maajhe
पुढे काय झालं…? …त्याचं कुणाशी लग्न झालं? मोनालीनं अनावधानानं विचारलं.
मल्हारनं लग्न नाही केलं. पण प्रेम केलं. त्याने एका चॅनेलवर मुलाखतीत सांगितलं, मी प्रेम केलं. मी प्रेम करतो. तो सार्‍या जगाला सांगतो मी प्रेम केलं… आसावरीचा आवाज कातर झाला. डोळे भरून आले.
कुणावर? कुणावर गं? काय सांगतो तो? किती हळुवार अधीरतेनं मोनालीने विचारलं.
तो सांगतो …संगीतावर ! संगीतावर मी प्रेम केलं. संगीतावर मी प्रेम करतो ! …तो प्रेमात मॅड झाला होता..!
अलगद डोळे पुसून ती सांगू लागली….. त्यावेळी त्याला बाबांची भिती वाटली आणि पुढे पाऊल घ्यायला मी कचरले. कदाचित माझ्या होकाराविषयी तो साशंक असावा. मी माझं प्रेम प्रकट केलंच नाही….हुं ऽऽ! आसावरीनं क्षणभर हुंकार भरला. अखिलशी माझं लग्न झालं. सुखांत आहे मी. पण जीवनाचे सूर जुळलेच नाही. जखम ती सुकलीच नाही … मोनाली सुन्न बसून ऐकत होती.
अगं म्हणून म्हणतेय व्हॅलन्टाईन डे आहे. एक गुलाबाचं फुलं दे. अगं तो लाल गुलाब मनातलं खूप काही सांगून जातो. हृदयातलं प्रेम दर्शवितो. प्रेमाची कबुली देऊन जातो. किती सुंदर कल्पना आहे ही…!
ताई …तू न!!!. कशी थोडी लाजली होती मोनाली.
वेडाबाई , तू स्वतः तुझ्या मनातलं शेखरला सांग. तुझं प्रेम त्याला कळू दे… हे सगळं तुला सांगायला मी इथे आलेय. अगं चूप राहण्यामुळे एकमेकांना आपण दुखावतो. आयुष्यभर एकमेकांपासून दुरावतो. हातातून सारं निसटून जातं. आयुष्याला वेगळं वळण लागतं !….
प्रेम तुझे नि माझे, Short Story, Prem Tujhe Ni Maajhe
खरंय ताई ! प्रेमाच्या या अडीच अक्षरात खूप ताकद असते. जीवनाचा आनंद प्रेमात साठला आहे . जीवनाला अमृत देणारी विलक्षण जादू प्रेमात आहे. ही अडीच अक्षरं ज्याच्या झोळीत पडलीत तो नशीबवान असतो. मोनाली भावुक झाली होती. अगं प्रेमवेडे, तुला तुझं प्रेम हवय ना? मी तुझ्या पाठीशी आहे. मी बाबांना समजवेन. आईचा प्रश्नच नाही. हो आशुताई. कदाचित स्त्री पहिल्या प्रेमापासून वंचित राहत असेल. पहिलं प्रेम मनात ठेवून आनंदात संसार करत असेल.!
हो असेल ! आता असं व्हायला नको ! स्त्रीनं आपलं पहिले प्रेम मिळवायला हवं!….तर मॅडम तयारी करा. मी बुके आणून देईन. लाल गुलाब आणून देईन. दोघी खूप खळखळून हसल्या.
अगं आजच्या प्रेमीजनांकरिता हा छानसा प्रेम दिवस आहे. या दिवशी आपण आपलं प्रेम व्यक्त करू शकतो. किती वेळ तरी मोनाली आसावरीचा हात हाती घेऊन बघत होती.
थँक्यू आशुताई. थँक्यू व्हॅलनटाईन डे!
आय लव्ह यु
मीना खोंड

 

प्रेमांकूर (Katha – Premankur)