पोळी वाली बाई (Short Story: Polivali Bai)

पोळी वाली बाई (Short Story: Polivali Bai)

  • प्रिया श्रीकांत

कोणी म्हणेल पोळीवाली बाई, त्याचं काय ते (महत्त्व? उच्चारत नाही, खूप काही आहे म्हटलं तर)

६०/७० चे दशक, आम्ही शाळेत होतो, नाशिक सारखं छोटं निसर्ग रम्य शहर, आमची मराठी मुलींची शाळा, आपल्या मैत्रिणींचा ग्रुप म्हणजे हक्काची घरे व जवळची माणसं. एकदा आम्ही जमलेलो असताना गप्पा रंगल्या व विषय निघाला कामवालीचा …तर विद्युत काळजीच्या स्वरात म्हणाली, आमची पोळीवाली बाई संध्याकाळी येणार नाहीये आणि मी तिला जास्तीच्या पोळ्या करायला सांगायची विसरले,… म्हणजे ? तुझी आई पोळ्या करत नाही?  स्वयंपाक तर करता ना?  मग?

खरं सांगते, त्यावेळी मला चांगलाच धक्का बसला होता. आपण स्वतः पोळ्या न करता ती बाई पोळ्या करते म्हणजे काय ! बाकी एवढा स्वयंपाक करतोच ना आपण, मग पोळ्या का नाही करायच्या? मला पटतच नव्हतं व हे असंच आहे हे मान्य करणेही अवघड होते … मला तेव्हाच साधारण कळालं की बहुत करून अनेकांकडे पोळीवाली बाई आहे आणि घरातल्या प्रत्येकाला तो / ती किती खाणार हे विचारून तेवढ्या पोळ्या केल्या जातात, मनात माझ्या पटकन प्रश्न डोकावला, जास्ती खावी वाटली तर?

मला जेव्हापासून आठवतं म्हणजे  कळायला लागल्यापासून, माझी आई ‘अम्मा’ हिच्याच हातच्या पोळ्या खात आलोय, माझी आई शिक्षिका होती, घरात नऊ दहा माणसं, येणारा पै पाहुणा वेगळा, पितळेच्या परातीत मोठा कणकेचा गोळा मळला जायचा. भगभगणारा स्टोव,  त्या तापलेल्या तव्यावर फराफरा लाटलेल्या पोळ्या एका मागून एक पडत, पोळी पडताच आलटून पालटून उलटली जायची, अशी छान टम्म फुगायची,  दोन्ही बाजूने तपकिरी डाग लागला की पोळपाटावर आपटत तूप लावून फसकन दाबत घडी घातली जायची, असा मस्त वास सुटायचा पोळीचा…. गरम, खमंग, खरपूस पोळी नुसती खायलापण आवडायची. सुट्टीच्या दिवशी तर आम्ही आईभोवती कोंडाळा करून बसायचो. खास मागणी असायची तूप साखरेच्या पोळीची. पोळ्या झाल्यानंतर शेवटच्या लाट्या साखरपोळीं करता, पोळी लाटून मध्ये तूप साखर घालून करंजी सारखी बंद करायची, तव्यावर तूप सोडून छान भाजली गेली की एकेकाच्या ताटात अशी पोळी पडली की आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच! विरघळलेल्या तूप साखरेच्या पोळीचा गरम घास जिभेला लागताच तृप्तीने डोळे बंद होत, त्याच्यासारखी स्वीट डिश दुसरी नाही.

अम्माला बघता बघता मीही शिकले पोळ्या करायला. गरगर लाटी फिरवत, फरफर पोळी लाटत तव्यावर छान भाजून तपकिरी डाग पडून फुगली की पोळपाटावर ठेवून तुपाच्या हाताने थपडा मारत घडी घालायची! माझ्या मैत्रिणींना कायम आश्चर्य वाटायचं, “तुमच्याकडे पोळीवाली बाई नाही?”  मला उत्तर सुचायचं नाही. मनात विचार यायचा, कदाचित आपण खंरच गरीब आहोत म्हणून आपल्याकडे पोळीवाली बाई नाही! मैत्रिणींकडे जेवायचा प्रसंग आला की त्या पांढऱ्या फटक पातळ पोळ्या बघून काय करावं ? वाटायचं ! अशी कशी पोळी, कच्चट!  आणखी एक हवी म्हणायची चोरी वाटायची, नकळत जाणवायचं,  मनातलं प्रेम, वात्सल्य, भावना, चव होऊन पोळीत उतरतात म्हणूनच अम्माच्या पोळ्या अशा खमंग टम्म फुगलेल्या दरवळतात…

आज संसारात इतकी वर्ष झाली तरी मोलकरीणी असूनही पोळ्या मीच करते. मुलं मोठी होऊन मार्गी लागली, आता आम्ही दोघेच घरी, मैत्रिणी म्हणतात,” आता एवढ्या सुख सोयी आहेत, वाट्टेल तेव्हा वाटेल ते मिळतं,  जन्मभर काय तेच करायचं ?” मीही मनात म्हणते,” होय, खरंय अगदी, त्या आमच्या घरी आल्या की मात्र त्या पोळ्यांचा आस्वाद घेत वरून म्हणतातही “एवढीच हौस आहे तर विकत दे, छान खप होईल, रग्गड पैसा मिळेल”,  मी त्यांचा संवाद कधीकधी त्यांनाच ऐकवते, “पोळीवाली बाई गावाला गेलीय गं… आज तिला बरं नाही…. आज सुट्टी घेतली आहे… आणि चेहऱ्यावर त्यांच्या जगबुडीचा भाव !!!

आजही या वयात माझ्या फ्रीजमध्ये एका दिवसापुरता कणकेचा गोळा असतोच. कुठेही बाहेर गेलो तरी काळजी नसते, घरी येऊन जेवायचं असेल तर अडत नाही, मीच माझी पोळीवाली बाई, ताटात गरमागरम खरपूस पोळ्या खात असतांना माझ्यासारखी श्रीमंत मीच असते!!!