निदान… (Short Story: Nidaan)

निदान… (Short Story: Nidaan)

निदान…

– प्रिया श्रीकांत

तिला नक्की काय हवं हेच ती शोधायला लागली. आधी नोकरी… ती धावपळ, प्रेझेंटेशन्स, कॉन्फरन्सेस, मीटिंग, ‘मीट द टारगेट’चे आव्हान मनापासून पूर्ण करत आली. काळ सरकत होता. आताशा मनात कुठेतरी रिकामं वाटत होतं, ती पोकळी भरून यावी असं आता वरचेवर वाटायला लागलं होतं व त्याच्या शोधातच मन भटकायला लागलं…
आज साडेनऊ वाजताच म्हणजे लवकरच, दीपशिखा ऑफिसहून आली होती. नाहीतर रोजचे साडेदहा तर वाजायचेच. कॉर्पोरेट जगाच्या धुमश्चक्रीत तिने चार वर्षाआधी प्रवेश केला होता. यायची जायची वेळ ठरलेली नव्हती. पगार चांगला होता. हळूहळू सगळं अंगवळणी पडत गेलं. दिवसामागे दिवस जात राहिले; पण हल्ली काहीतरी हरवल्यासारखं वाटायला लागलं. सगळंच हिरावून नेल्यासारखं झालं होतं. तुम्ही कधी, कुठे, काय करायचे ते बॉस व इतरांच्या हाती होतं. आधी नवीन नवीन दीपशिखा ते शेड्युल अगदी मनापासून जगत होती, ’माझी न मी राहिले’… अशी अवस्था झाली होती.
तिला नक्की काय हवं हेच ती शोधायला लागली. आधी शिक्षणाचा उपयोग करू म्हणून छानपैकी नोकरी… ती धावपळ, प्रेझेंटेशन्स, कॉन्फरन्सेस, मीटिंग, ‘मीट द टारगेट’चे आव्हान मनापासून पूर्ण करत आली. काळ सरकत होता. आताशा मनात कुठेतरी रिकामं वाटत होतं, ती पोकळी भरून यावी असं आता वरचेवर वाटायला लागलं होतं व त्याच्या शोधातच मन भटकायला लागलं…
वर्ष पुढे पुढे सरकत गेली.
’दीपा, आज जरा लवकर आली आहेस तर जेवून घे गं दोन घास गरम गरम,’ आई मायेनं म्हणाली.
जेवताना आईने सांगितलं, ” अगं तुझ्या दादा वहिनीने होणार्‍या मुलांची नावं निवडलीत बरं. समायरा व विवान. काय बाई! नवीनच ऐकतेय मी ही नावं!”
दीपशिखाचा भाऊ अमेरिकेत असल्याने वहिनीच्या तीन महिन्याच्या चेकअपमध्ये जुळी आहेत असं कळलं. एक मुलगा व एक मुलगी आहेत हेही कळालं. मग नावंही त्यांनीच ठरवली. दीपशिखाला आवडत्या भाजी-पोळीची चव उगाचच कडवट वाटली.
”ही काय नावं आहेत? असो.”
हात धूत असताना शेजारच्या काकू आल्या. ”दीपा, आज बरी भेटलीस. काय करू गं? हल्ली तब्येत ठीक नसते. काय होतं कळतच नाहीये. सगळं पथ्यपाणी सांभाळते तरीही, कधी काय, कधी काय!”
”ते तर आहेच हो…” काकूंशी थोडं बोलून दीपशिखा आपल्या खोलीत गेली.
ती आत्या होणार होती. पण दादा वहिनींनी मुलांची नांवे परस्परच ठरवली होती; ती पण ही अशी परकीयांची उधार नावं! काही
वेगळं हटके करण्याच्या नादात आपण आपलं सगळंच हरवत चाललोय हे का नाही कळत लोकांना? आपण गडगंज श्रीमंत असताना दुसर्‍याच्या दारात मागणं …असं झालं ! असो!! विचार झटकून दीपशिखा ने तोंडावर पांघरुण घेतलं व दिवा विझवला.
बरेलीला होणार्‍या सेमिनार मध्ये आजचं प्रेझेंटेशन फारच महत्त्वाचं होतं. आपल्या दोन सहकार्‍यांबरोबर मिळून खूप मेहनतीने तयार केलं होतं. उत्पादनाची महत्ता व गुणवत्ता हे खात्रीलायकवाटलं पाहिजे. समोरच्याला पटले पाहिजे, म्हणजे अर्धी लढाई जिंकली! बाकी पुढे निगोसिएशन व फॉरमॅलिटीज करणं वेगळं. कसं असतं नाही! जे थोडंफार असतं ते मोठ्ठं करून दाखवायचं असतं. जे नसतं त्याचा आभास निर्माण करायचा! आधी तर दीपशिखाला खूप मजा वाटायची. मग हळूहळू तीही टिपिकल कॉर्पोरेट क्राउडचा एक हिस्सा बनली. तिचं वागणं बोलणं यावर एक एक थर चढू लागले. फक्त घरीच ती दीपशिखा असे. ऑफिस करता ती बाहेर पडली की जणू तिच्यावर अनेक मुखवटे चढत. आधी
चढवावे लागायचे; आता आपोआप होत होतं!


लग्न कर म्हणून सगळे पाठीमागे लागले होते. आता 29 ची झाली होती. पण काय करावं? मनाला हवा तो निवांतपणा मिळत नव्हता. मन कशाच्या तरी शोधात होतं हे मात्र नक्की! आज दुपारच्या फ्लाइटने सहकार्‍यांबरोबर ती बरेलीला आली. त्यांचा प्रोजेक्ट आता देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचवायचा होता. हा प्रदेश वेगळा, लोकांची मानसिकता वेगळी. दीपशिखाने नेहमीप्रमाणे मेहनत करून आपली कामगिरी छान पार पाडली. पुढच्या फ्लाईटने परतायचं होतं. मध्ये एक तास वेळ होता.
‘चला, इथली प्रसिद्ध रेवडी गजक घेऊ..’ म्हणून ती प्रसिद्ध पंछी च्या मोठ्या दुकानात गेली.
बिलाच्या रांगेत उभी असतांना एक विदेशी बाई सेंड्रा, आपल्या चार-पाच वर्षाच्या मुलीबरोबर भारतामध्ये कसल्या अभ्यासाकरता आली होती. शब्दांची देवाणघेवाण झाली. मुलगी गोड व बोलकी होती. तिघींची मैत्री झाली. तिची आई तिला ’सॅवी..सॅवी’ म्हणून बोलवत होती. दुकानातून बाहेर पडताना तिने सावीच्या आईला विचारलं, ”वाव व्हेरी क्युट एंड डिफरंट नेम”
ती मोकळेपणाने हसून म्हणाली, ”हर नेम इज सावित्री अँड माय एल्डर डॉटर इज तारिणी…हर फादर इज इन चेन्नई.”
बरीच माहिती कळली होती. एकमेकींना शुभेच्छा देऊन त्यांनी निरोप घेतला.
आज ऑफिसमधून परतताना कारमध्ये दिपशिखा वेगळ्याच विचारात होती. मागे मान टाकून डोळे मिटले. त्या फॉरेनर आईचा व तिच्या मुलीचा चेहरा डोळ्यांसमोर येत होता. सावित्री व तारिणी…
मुख्य म्हणजे नावांचा अर्थही तिला चांगलाच माहीत होता. ’ए ब्यूटिफुल इंटेलीजंट प्रिन्सेस हू वन ओवर डेथ गॉड अंड सेव्हड हर हजबंड … आपल्या नवर्‍याचे प्राण वाचवणारी व सासर माहेरचे कल्याण करणारी सावित्री… धीस नेम इज युनिक… एंड मदर गॉडेस, सगळ्या संकटातून आपल्याला तारून नेते ती तारिणी..मिनिंग फुल नेम…’ म्हणणारी ती विदेशी बाई दीपशिखाच्या नजरेसमोर आली. मन कुठेतरी स्थिरावल्या सारखं वाटलं …कुठून तरी थंडगार हवेची झुळूकही येत होती…
आज ऑफिसमध्ये नेहमीसारखं, पण कुठेतरी खूट्ट झाल्यासारखं वाटत होतं. विश्वेश्वर बोसने राजीनामा दिला होता. तो कुशल ऑफिसर होता. ऑफिसचा महत्त्वाचा माणूस. मनमिळावू व दीपशिखाचा फारच चांगला मित्रही! लंच अवर मध्ये तिने विचारलंच, ”का सोडून चाललास? सगळं तर छान आहे.”
”म्हणून तर!! जिथे छान नाही तिथे जायचंय, माझ्या बंगालच्या गावी परत.”


”यू आर वेल ऑफ हिअर…” दीपशिखाने खडा टाकला.
”हो, बट मेनी ऑफ अस आर नॉट वेल देअर… ” हळूहळू तो बोलता झाला.
पश्चिम बंगालच्या छोट्याशा खेड्यात त्याची भरपूर जमीन होती. थोडंफार उत्पन्नही, मजूरही मिळतात.
“मला वाटतं शिखा, ते गावही माझी वाट बघतंय आणि असं किती लागतं आपल्याला? तेव्हढं तर तिथेही मिळेल. तहानलेल्यांना, आसुसलेल्यांना पाणी द्यावं असं काहीसं वाटतंय. आता जे आहे त्यात खितपत पडलोय असं वाटायला लागलंय. नवीन मार्ग नवीन दिशा नवीन शोध घ्यावेसे वाटतात, काही वेगळं हटके करावसं वाटतं म्हणून. पुढच्या आठवड्यात इथला पसारा आवरून मी माझ्या गावी जाणार बंगालमध्ये. तुझी खूप आठवण येईल …” म्हणत त्याने हळूच दीपाचा हात हाती घेतला. ”काळजी घे…”
आज खूप दिवसांनी दीपशिखा घरीच होती. नेहमीची धावपळ घाई गडबड नव्हती. शांत, स्थिर चित्त, प्रसन्न, समाधानी वाटत होती. कसल्याशा आनंदाने तिचा चेहरा खुलला होता. शेजारच्या काकूंचे आजारपणही तिला त्रासदायक वाटत नव्हते. दीपशिखाला स्वतःचे निदान समजले होते. आपल्या मातीशी, संस्कृतीशी असलेली नाळ आणखी घट्ट करायची होती, सृजन, नवनिर्मितीचा आनंद उपभोगायचा होता. आपल्याहूनच दूर गेलेल्या आपल्याला भेटून घट्ट मिठी मारायची होती…
घरात विश्वेश्वर सगळ्यांना माहीतच होता. दीपशिखा लंडन किंवा अमेरिकेला सेटल होईल हा सगळ्यांचा अंदाज चुकला होता. पण तिचा लग्नाचा हा निर्णय घरच्या सगळ्यांना कुठे तरी फार फार सुखावून गेला.
निघण्यापूर्वी दीपशिखा व विश्वेश्वर देवीला नमस्कार करीत मनापासून म्हणाले… ”विश्व तारिणीमाते …आमरा एसेची…आम्ही येतोय..”.