नवी पहाट (Short Story: Navi Pahat)

नवी पहाट (Short Story: Navi Pahat)

नवी पहाट


– सुहासिनी पांडे

कुठे जावे काय करावे समजत नव्हते. शेवटी मला सुलभाताईची आठवण झाली आणि मी तडक पुणे गाठले. आज सुलभाताईंचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. तिने व श्रीकांत भाऊजींनी मला इथे आणून सोडलं.
रात्रीचे दहा वाजून गेले. अजूनही नंदन आला नाही. आता मात्र निलीमाला काळजी वाटायला लागली. तिने मोबाईलवर फोन केला, पण स्वीच ऑफ असल्यामुळे फोनही लागला नाही. समीर आणि सारंग अभ्यास करत बसले होते.“झोपा राजांनो आता
दहा वाजले.”
“आई गं बाबा नाही आले अजून. तू ही एकटीच कशी बसतेस? बाबा येईपर्यंत आम्हीही तुझ्याबरोबर जागेच राहतो” समीर म्हणाला.
इतक्यात मोटारसायकलचा आवाज आला आणि निलीमाने बाहेरचे गेट उघडले. गाडीला लॉक लावून नंदन घरात आला. “किती उशीर? केव्हाची वाट पहातेय मी.”
“मी काय गोट्या खेळत बसलो असं वाटलं की काय तुला?” तो आवाज चढवतच निलीमाच्या अंगावर खेकसला. “अहो हळू. मुलं जागी आहेत अजून.”
“मला धमकी देतेस की काय? आधीच एक वैताग सुरू आहे. राजीनामा देऊन आलोय मी नोकरीचा.”
“काय?” निलीमा एकदम ओरडली. “किती मुश्कीलीने ही नोकरी मिळाली होती नंदन. मनात आल्या आल्या नोकरी सोडायची चैन परवडणार आहे का सध्याच्या काळात आपल्याला?” पण नंदनचा रागीट चेहरा बघून निलीमा मूग गिळून गप्प बसली.
अन्न गरम करून तिने टेबलावर दोघांची पानं मांडली तर नंदन बाटली काढून प्यायला बसला. “नंदन उगाच त्रागा करू नकोस. आण ती बाटली इकडे. स्वत:ला सावर.” पण नंदन जास्तच भडकला.“तुझ्या जीवावर जगतोय का मी? माझे बँकेत भरपूर पैसे आहेत. दुसरी नोकरी मिळेपर्यंत लगेच काही उपाशी राहून रस्त्यावर येणार नाही आहोत आपण. तुला जर वाटत असेल तुझे पैसे मी दुसरी नोकरी मिळेपर्यंत मी वापरतोय, तर ते अगदी चूक आहे. तुम्हाला तिघांना पोसायला समर्थ आहे मी.” ग्लासमधल्या स्कॉचचा भलामोठा घोट घेऊन त्याने तो दणकन टेबलावर आपटला. ग्लासमधील ड्रिंक हिंदकळून टेबलावर सांडले.
“हळू जरा. तो ग्लास आणि टेबलाची काच दोन्ही फुटेल ना.” निलीमा
चिडून म्हणाली.
“हं ओरड माझ्यावरच. आता तर काय माझी नोकरी गेली म्हटल्यावर तुझे मला ऐकून घ्यावेच लागेल, नाही का?” इतक्यात खोलीत अभ्यास करत बसलेला समीर धावतच स्वयंपाक घरात आला. “बाबा प्लीज भांडू नकोस ना आईशी.”
“मी? मी भांडतो तुझ्या आईशी?” हातातला ग्लास पुन्हा टेबलावर आपटून नंदन त्याला मारायला धावला. बाबांचा तो अवतार बघून समीर घाईने खोलीत परत गेला व त्याने दाराला आतून
कडी घातली.
बराच वेळ बडबड करून शेवटी नंदन न जेवताच झोपून गेला. निलीमाची भूक तर केव्हाच निघून गेली होती. तिने सगळी आवराआवर केली व लाईट बंद केला. समीर अजून झोपला नसेल याची तिला खात्री होती. त्याच्या खोलीजवळ जाऊन तिने हलकेच दारावर
टकटक केली.
“कोण आहे?” दार उघडण्यापूर्वी त्याने आतूनच विचारले. “मी आहे सोन्या, दार उघड.” निलीमाने त्याला आवाज दिला. दार उघडल्याबरोबर तो आईला बिलगला. “रडतो आहेस तू?” निलीमाने मायेने त्याला थोपटत विचारले. “आई तो असा का वागतो गं आपल्याशी?” डोळ्यातील पाणी पुसतच त्याने विचारले. “अरे टेन्शन आहेत ना त्याला खूप.”
“उगाच त्याची बाजू घेऊ नकोस.” “नाही रे राजा पण पूर्वी असा होता का तो? तुमचे किती लाड करायचा.” “लाड नको करू दे ग. पण तुझ्याशी कशाला भांडतो?”
“ मी उद्या सकाळी समजावते हं त्याला. चल झोपू या.” तिने झोपलेल्या सारंगला उचलून कॉटवर ठेवले.
एका बाजूला सारंग व दुसर्‍या बाजूला समीरला जवळ घेऊन ती आडवी झाली. पण कितीतरी वेळ तिला झोप येईना. आठ वर्षांच्या समीरवर नंदनचे असे धावून जाणे तिलाही आवडले नव्हते, पण एकदमच मुलांसमोर नंदनला खोटं ठरवणे तिला प्रशस्त वाटले नाही.
हल्ली नंदनच्या वागण्यात खूपच फरक पडला होता. त्याची पहिली नोकरी कंपनीतल्या अंतर्गत राजकारणामुळे गेली होती आणि दुसरी नोकरी जॉब सॅटिसफॅक्शन नसल्यामुळे त्यानेच सोडली होती. डोक्यावर घराचं, गाडीचं कर्ज होतं. हप्त्याची सोय करता करता निलीमा शिणून जायची आणि आता तर काय हा नोकरी सोडून घरी बसला. त्यामुळे निलीमाचा संयमच संपला होता. त्यातूनच नवीनच निर्माण झालेले त्याचे मित्रमंडळ व ती पिण्याची सवय. निलीमाचा जीव नुसता मेटाकुटीला आला होता.
गेल्या 5-6 महिन्यापासून घरातील शांतताच बिघडून गेल्यासारखे झाले होते. खरं तर नवर्‍याने मिळवून आणलेल्या पैशात सुखानं संसार करण्याचं तिचं स्वप्न होतं. पण मिळालेली नोकरी नंदनने टिकवून ठेवली नाही. सगळं आयुष्य सुतासारखं सरळ गेलेल्या नंदनला नोकरी जाण्याचं संकट झेपलंच नाही. आयुष्यात येणारे अडथळे, संकट यांच्याशी टक्कर देणं अपरिहार्य असतं, हे लक्षात घेऊन परिस्थितीशी दोन हात करणं त्याला कधीच जमलं नाही. आपण निभावून न्यायला समर्थ होतो पण तो वाकला तो पुन्हा उठलाच नाही. आधीच शांत स्वभावाचा नंदन सुरुवातीला बावरला, बावचळला आणि मग चिडचिडा व संतापी झाला. आधी दारूला स्पर्शही न करणारा नंदन सुरुवातीला थोडी थोडी, ते ही अनिच्छेने घ्यायला शिकला व नंतर त्याला ते आवडायला लागलं. आता तर तो स्वत:वरचा ताबाच गमावून बसला आहे.
त्याच्या व्यक्तीमत्त्वातील बदल निलीमाने पचनी पाडून घेतले. त्याचं वागणं सुधारायची सहन करायची शिकस्त केली, पण शेवटी ती ही थकून गेली व नाईलाजाने घर सोडून मुलांसकट
बाहेर पडली.
किती कठीण दिवस पाहिले मुलांनीसुध्दा. आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करणारा बाबा नंतर नंतर त्याला हवं तेव्हा आपल्याला स्विकारतो. नको तेव्हा आपल्याला नाकारतो हे सत्य त्यांनी पचवलं. स्वत:चं घर, स्वत:ची सुरेख सजवलेली खोली सोडून मामाकडे राहणं समीरला अजिबात आवडत नव्हतं. पण निमूटपणे त्याने सगळं स्विकारलं. सारंग पाच वर्षांचा होता त्याला एवढं कळत नव्हतं. निलीमाला मात्र स्वत:च्या मानसिक त्रासापेक्षा मुलांच्या मनाचे हाल पाहवत नव्हते. राहून राहून तिला पूर्वीचे दिवस
आठवत होते.


औरंगाबादसारख्या ठिकाणी किती हौसेने प्लॅनिंग करून दोघांनी 5-6 खोल्यांचा बंगला बांधला होता. नंदनच्या हौसेखातर त्याने गाडीही घेतली होती. घराचे आणि गाडीचे बरेच हप्ते फिटायचे होते आणि आता तर नंदन पूर्णत: पिण्याच्या आहारी गेला होता. निलीमा घरात होती तोपर्यंत त्याला थोडा धाक तरी होता, पण आता तर त्याला रान मोकळे झाले होते.
नगरला निलीमा आईकडे राहायला आली, पण अजूनही तिचे मन रमत नव्हते. आपला आणि मुलांचा भार माहेरच्या लोकांवर पडायला नको म्हणून तिने जवळच्याच शाळेत नोकरी धरली. पण दोन अडीच हजाराच्या नोकरीत मुलांच्या शाळेचा खर्च कसा काय निघणार? आणि आपण अशा परावलंबी होऊन आई बाबांकडे किती दिवस राहणार? आई बाबा काही म्हणत नाहीत पण रमेश आणि वहिनीकडे आश्रिताप्रमाणे राहणे निलीमाला असह्य झाले होते.
औरंगाबादला निलीमाचा चुलत दीर राहत होता. मध्यंतरी त्याचा फोन आला. घराचे हप्तेे न फेडल्यामुळे बँकवाल्यांनी घराला सील ठोकले आहे. गाडीही ताब्यात घेतली आहे. नंदन मात्र कुठे गेला माहीत नाही. आता मात्र निलीमाला काळजी वाटायला लागली. कुठे गेला असेल हा? त्याच्या काळजीने तिला रात्रभर झोप आली नाही.
शेवटी दोन दिवसांची रजा घेऊन मुलांना आईजवळ सोडून आणि रमेशभैय्याला सोबत घेऊन ती औरंगाबादला गेली. नंदनच्या मित्रमंडळींकडे तिने चौकशी केली
पण तिला त्याचा काहीही थांगपत्ता लागला नाही.
नंदनला बहीण भाऊ कोणी नव्हते त्यामुळे तो कोणा नातेवाईकांकडे जाणे शक्य नव्हते. त्याची एक मानलेली बहीण सुलभा पुण्याला होती. तिने सुलभालाही फोन केला आणि तिच्या तोंडून जे ऐकलं त्याने ती अवाक झाली. दुसरे दिवशी तिने पुणे गाठलं. एका व्यसनमुक्ती केंद्रामध्ये सुलभाने नंदनला अ‍ॅडमीट केलं होतं. तिथे त्याच्यावर उपचार सुरू होते.
नंदन अतिशय कृश झाला होता. त्याचा संपूर्ण कायापालटच झाला होता. निलीमा त्याला भेटायला त्याच्या रूममध्ये गेली. निलीमाला अचानक समोर पाहून तो आश्‍चर्यचकित झाला.
तिच्याकडे एकटक बघत तिला म्हणाला,“निलू मला क्षमा करशील? मी तुझा आणि मुलांचाही अनंत अपराधी आहे. मी तुम्हाला खूप दु:ख दिलं. घराला सील लागलं त्या दिवशी तर मला तुमची खूप आठवण आली.आणि माझे डोळे उघडले. कुठे जावे काय करावे समजत नव्हते. शेवटी मला सुलभाताईची आठवण झाली आणि मी तडक पुणे गाठले. आज सुलभाताईंचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. तिने व श्रीकांत भाऊजींनी मला इथे आणून सोडले म्हणून आज मी उभा आहे. आपलं सगळं घर गेलं आणि गाडीही गेली. तुमच्या सुखाला ही मी पारखा झालो. निलीमा…खरंच तुमच्या सर्वांचा मी अनंत अपराधी आहे.”
पश्चातापाने दग्ध झालेल्या नंदनचे तोंडचे उद्गार ऐकून निलीमाला ही अश्रू आवरता आले नाहीत.
“नंदन तुझी जर खंबीर साथ असेल तर त्या बंगला आणि गाडीचं काय घेऊन बसलास? तू मला पूर्वीसारखा परत मिळालास. मुलांना त्यांचे बाबा परत मिळाले यातच सारं काही आलं. उद्याची नवी पहाट आपली वाट पाहत आहे. आपली पिल्लं वाट पाहत आहेत. आता आपण उद्यापासून नवीन आयुष्याला सुरुवात करूया. मी पण एकटीने हा संसाराचा गाडा ओढताना पार थकून गेले आहे रेे,”असे म्हणून निलीमाने नंदनच्या खांद्यावर डोके ठेवले व अश्रूंना वाट करून दिली.