निर्णय (Short Story : Narnay)

निर्णय (Short Story : Narnay)

– अनुपमा राव

किरणला रमाचा फार आधार वाटत असे. तिच्या लंगडत चालण्याकडेही त्याने साफ दुर्लक्ष केलं होतं. पण आता परिस्थिती सुधारली होती. नोकरीच्या जोडीला त्याच्या साइड बिझनेसने चांगलाच जम बसवला होता. त्यामुळे हप्ता, कर्ज सगळं संपलं होतं. आता तिची नोकरी म्हणजे निव्वळ डोकेदुखी कशी आहे, हेच तो जास्तीत जास्त वेळा सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असे.
कालपासनं रमाचं डोकं विचार करून करून थकलं होतं. एकामागोमाग एक उद्भवणार्‍या समस्यांना अंतच नव्हता मुळी! लग्न झाल्यापासनं सारखी तडजोडच करतोय आपण. गेल्या दोन दिवसापासून ऑफिसच्या कामातही लक्ष लागत नव्हतं. विचार करता करता तिनं भिंतीवरल्या घड्याळाकडे नजर टाकली. बापरे आठला पाच मिनिटे आहेत. किरणचा डबा भरायचाय अजून. पटपट शेवटच्या दोन पोळ्या करून तिनं गॅस बंद केला.
तेवढ्यात सासुबाईंची हाक कानावर आली.
‘रमाऽऽ चहा शिल्लक असेल तर दे जरासा.’
त्याचवेळी किरणनेही तिला हाक मारली. ‘रमाऽऽ उशीर होतोय मला. डबा दे लवकर.’
सासुबाईंसाठी चहा गरम करायला ठेवला. तोपर्यंत तिनं किरणचा डबा भरला. सासुबाईंचा चहाचा कप उचलेपर्यंत किरण निघालाही. ती उघड्या दाराकडे शून्यपणे पाहात राहिली.
त्याच्या मागोमाग तीही निघाली. रिक्शा लगेच मिळाली पण नेहमीची ट्रेन मात्र निघून गेली होती. तिथनं ती प्लेटफॉर्म क्रमांक आठ वर गेली. आठवर जाणं म्हणजे मोठी कसरतच. केवढं लांबलचक चालावं लागायचं. तिच्या अधू पायामुळे तिला धावपळ करणं जमत नसे. शेवटी ऑफिसला पोहोचायला थोडा उशीरच झाला.
आल्या आल्या प्यूनने तिला सांगितले की मोठ्या साहेबांनी तिला केबिनमध्ये बोलावलंय.
तिला कापरंच भरलं. आता मोठे साहेब विचारतील, काय उत्तर द्यायचं?
तिच्या टेबलापाशी साहेबांच्या प्यूनला पाहताच तिची मैत्रिण अमिताने, हातातलं काम टाकून तिच्या जवळ येत हळू आवाजात विचारलं, ‘परत कशाला गं बोलावलंय?’
‘माहित नाही. जायला तर हवं.’
तिनं खांद्यावरची ओढणी व्यवस्थित केली. उगीचच केसावरून हात फिरवला. अन् मोठ्या साहेबांच्या केबिनचं दार ठोकलं. ‘सर… येऊ का?’
‘यस… कम इन.’
आत गेल्यावर क्षणभर ती घुटमळली. तिला काय बोलावं सुचेना. तिच्या मनाची अवस्था कुठल्याही विचारी माणसाला उमगली असती तशी ती पोंक्षे सरांच्या अनुभवी नजरेला लगेच जाणवली.
‘बसा. मिसेस साटम. मग काय निर्णय झाला तुमचा?’
‘सर, प्लीज मला आणखी एक-दोन दिवसांचा अवधी द्याल?’
‘का नाही? जरूर. अं… आज शुक्रवार ना. मला सोमवारपर्यंत सांगितलं तरी चालेल. सांभाळून घेईन मी. वेल, मिसेस साटम, तुम्ही कामात हुशार आहात, मेहनती आहात. योग्य तो निर्णय घ्या. अडचणी काय नेहमीच्याच असतात.’
केबिन बाहेर आल्यावर तिनं दीर्घ श्‍वास घेतला. साहेबांच्या समजूतदारपणाचं तिला कौतुक वाटलं. नाहीतर किरण! सतत नवरेपणा गाजविणारा, स्वतःचा इगो जपणारा, प्रत्येक गोष्ट त्याच्या मनासारखीच झाली पाहिजे.
रमा एका को-ऑपरेटिव्ह बँकेत नोकरीला होती. याच बँकेची नवीन शाखा नागपुरात उघडणार होती. मोठ्या साहेबांनी तिला आठ एक महिन्यांसाठी तिथे पाठवायचे ठरवले होते. तिथून परतल्यावर प्रमोशन ठरलेलं होतं. तिच्या चोख कामावर खूश होऊनच मोठ्या साहेबांनी हा निर्णय घेतला होता. इतकी आनंदाची बातमी पण मन मात्र दुःखी, सतत विचार… तिचा नवरा किरण, मुलगी दुर्गा, छोटा मुलगा ओजस् आणि सासुबाई सारे एकामागून एक डोळ्यासमोर येत होते.
या सगळ्यांना सोडून एवढ्या लांब राहायचं. कसं शक्य होणार? त्यात सासुबाईंना सांधेदुखीचा आजार, दुर्गा यंदा सातवीला गेलीय. स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसायचं म्हणतेय. बर्‍यापैकी स्वतःचं सगळं करतेय खरी. पण ओजस तसा लहान आहे. अवखळही आहे. मार्ग तरी कसा काढायचा यातून? किरणचा होकार मिळवणं जवळजवळ कठीणच. पुन्हा संधी येईल न येईल. खरं तर कालच ही बातमी घरी सांगायला हवी होती. पण हिम्मतच झाली नाही.
रमा सर्वसाधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातील. जन्मापासूनच तिच्या पायात व्यंग होतं. उजव्या पायाच्या तुलनेत डावा पाय तोकडा आणि बारीक होता. त्यामुळे चालताना ती लंगडत चालत असे. वडील एका खाजगी शाळेत कर्मचारी होते. पण आता निवृत्त झाले होते, तर आई गृहिणी होती. दोन वर्षांपूर्वी दादाचं लग्न झालं हेतं.
रमा कॉलेजात शिकत असतानाच बर्‍याच ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न करीत होती. पदवीधर झाली आणि सुदैवाने तिला बँकेत नोकरी मिळाली. पण लग्न काही जमत नव्हतं. कुठे पत्रिका जुळत नव्हती तर कुठे तिचे व्यंग आड येत होतं. शेवटी एका विवाहमंडळातूनच किरणचं स्थळ आलं. मुख्य म्हणजे मुलगा सुदृढ प्रकृतीचा होता. रूपानं ठीक. नोकरी मात्र सामान्य. घरची परिस्थिती ही बेताचीच होती. रमाला तिच्या बँकेतल्या नोकरीमुळेच त्यानं पसंत केली. पण दुसरीकडे तिचं व्यंग पाहून त्याचा विरसही झाला होता. तिला मात्र किरण प्रथमदर्शनीच आवडला होता. एक गोष्ट तिला प्रकर्षाने जाणवली होती, ती म्हणजे त्याच्या डोळ्यात स्वप्नाळूपणा अजिबात नव्हता. त्याऐवजी व्यवहारचातुर्याचं चलाख पाणी खेळत होतं.
चाळीतलं राहतं घर विकून, कर्ज घेऊन फ्लॅट घेतला. शिवाय बहिणींच्या लग्नात बर्‍यापैकी कर्ज झालं होतं. फ्लॅटचा हप्ता, कर्ज या काळात किरणला रमाचा फार आधार वाटत असे. घरातल्या दैनंदिन व्यवहाराचा खर्चही तीच पाहात असे. तिच्या लंगडत चालण्याकडेही त्याने साफ दुर्लक्ष केलं होतं. पण आता परिस्थिती सुधारली होती. नोकरीच्या जोडीला त्याच्या साइड बिझनेसने चांगलाच जम बसवला होता. त्यामुळे हप्ता, कर्ज सगळं संपलं होतं. आता तिची नोकरी म्हणजे निव्वळ डोकेदुखी कशी आहे, हेच तो जास्तीत जास्त वेळा सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असे. तिला चालताना होणार्‍या त्रासामुळे घरातली कामे ती सावकाश उरकत असे. ह्या बाबतीत तिला तो सतत टोमणे देत राही अन् जोडीला सासुबाईही.
‘अगं , बयो, कुठे हरवलीस? चल आज आपण बाहेरच जाऊया लंचला.’ तिच्या हाक मारण्याने रमा भानावर आली.
‘इतकी चांगली बातमी आणि अशी काय तू?’
‘ते कळलं गं.’ ती पुटपुटली. आवाजात प्राण नसल्यासारखी. तिच्या चेहर्‍यावरचा नर्व्हसनेस लपत नव्हता. तिनं मान खाली घातली. एक टपोरा थेंब टेबलावर पडला.
‘प्लीज रमा ऽ ऽ बोल ना.’ अमिता तिच्या खांद्यावर थोपटत म्हणाली.
मनातले बोलावे की न बोलावे याच तिला संभ्रम पडला. मग संकोचाने म्हणाली. ‘मी अजून ही बातमी घरीसुध्दा सांगितलेली नाहीय. अग अमिता, ह्या अगोदर मी तुला किरणविषयी फारसं काही बोलले नव्हते. अग माझं नागपूरला जाणं त्याला आवडणार नाही. त्याच्या मते बायको नवर्‍यापेक्षा पुढे गेली की त्याला जुमानत नाही म्हणे. तुला माहितच आहे मी लॉ ला अ‍ॅडमिशन घेतलं होतं ते. पहिल्याच वर्षाच्या परीक्षेच्या वेळी मोठा प्रॉब्लेम आला.’
‘तू बोलली नाहीस मला.’
‘काय सांगणार होते मी? अगं खूप अभ्यास केला. त्याच्या नकळत पहिले दोन पेपर दिलेही. पण नेमकं तिसर्‍या पेपरच्या वेळेस गावाहून पाहुणेमंडळी आली होती. विचार केला, स्वयंपाक आटपून निघेन. पण शक्यच झालं नाही. जेव्हा किरणला आणि सासुबाईंना हे कळलं. त्यांना त्या गोष्टीची जराही खंत वाटली नाही. मी नेहमी हाच विचार करून सगळं सहन करते की, कधीतरी परिस्थिती बदलेल. पण कसलं काय?’
‘उगीच हातपाय गाळू नकोस. काही महिन्यांचा तर प्रश्‍न आहे. काहीतरी व्यवस्था कर. पूर्ण वेळ घरकामासाठी बाई बघ.’ अमिताने तिला धीर दिला.
‘बघते. आज बोलते त्याच्याशी.’
आता तिचं मन थोडं थोडं मोहरू लागलं. दुपारी ती अमिताबरोबर लंचला बाहेर गेली. मस्तपैकी पावभाजी आणि आईस्क्रिम खाल्लं. तिला आता खूप मोकळं, हलकं वाटत होतं. ऑफिस सुटल्यावर ती सरळ मिठाईच्या दुकानात गेली. सासुबाईंसाठी त्यांच्या आवडीचे फिके खाजे, किरणसाठी आणि मुलांसाठी जिलेबी आणि समोसे घेतले.
घरी यायला तसा थोडा उशीरच झाला होता. घरात पाऊल टाकताच तिला जाणवलं की, सासुबाई तापलेल्या आहेत. त्या रागाने धुमसतच पोळ्या करत होत्या. तिला पाहताच त्यांचा राग अनावर झाला. तिची चूक अशी होती की, आज ती घरी उशीरा आली होती आणि नेमक्या पोळ्या बनवणार्‍या मावशी आल्या नव्हत्या. सासुबाईंना दुपारी भातावरच भागवावं लागलं होतं.
तेवढ्यात तिला किरणचा आवाज ऐकू आला. तिला थोडं आश्‍चर्यच वाटलं. त्याची घरी यायची वेळ म्हणजे रात्री आठनंतरची. तिनं पोळ्यांचं आवरून बाजुला ठेवलं आणि बेडरूममध्ये गेली. स्वतः थकून भागून आलेल्या रमानं त्याला गार पाण्याचा ग्लास देत विचारलं. ‘आज लवकर…’
‘का? तुला नाही आवडलं?’
‘नाही… तसं नाही तुमच्यासाठी थोडा चहा टाकू का? मिठाई आणलीय.’
‘काही विशेष?’ तिच्याकडे रोखून पाहत त्यानं विचारलं.
‘अं… आहे. पण नंतर सांगेन.’
त्याने तिच्याकडे प्रश्‍नार्थक नजरेनं पाहिलं. तिनं त्याच्याकडे पाहिलं न पाहिल्यासारखं केलं आणि मुलांना हाका मारत हॉलमध्ये गेली. मुलांनी आवडीचं खाणं पाहून गोंधळच घातला. सासुबाईंच्या चेहर्‍यावरची रेघ हलली नाही. खाजे मात्र चवीचवीने खाल्ले.
रात्री सगळे डायनिंग टेबलाशी जेवायला बसले. जेवताना त्यानं विचारलं. ‘आज पोळी नेहमीसारखी नाहीये.’


सासुबाई रमाकडे नापसंतीदर्शक कटाक्ष टाकून उद्गारल्या. ‘अरे आज पोळीवाल्या मावशी आल्या नव्हत्या.’
रमाला वाद टाळायचा होता, म्हणून ती काही बोलली नाही. आज घाईघाईत पोळ्या कडेने जरा जाड झाल्या होत्या. तिच्या मनात आलंच, पोळी पानावर पडताच किरण नक्की काहीतरी बोलेल.
मुलं झोपली. सगळं आवरून उसंत मिळताच ती फ्रेश झाली. स्वच्छ गाऊन घालून ती बेडरूममध्ये गेली. ती बेडवर बसताच त्याने लगेचच लाइट काढला. तिने मनातल्या मनात स्वतःला बजावलं. आज थकायला झालंय खरं, पण तरीही आढेवेढे न घेता लगेचच नमतं घ्यायला हवं. तिने त्याच्याकडे स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला. त्याची मात्र नेहमीची वृत्ती. तो पाठ फिरवून झोपलाही. तिनं ह्याला हळूच हलवलं. जरा लाडात येऊन बोलायला सुरुवात केली. त्याच्याकडून काहीच प्रतिसाद नाही. तिने परत प्रयत्न केला तर, ‘सकाळी बोलू,’ म्हणाला.
ती तशीच खूप वेळ जागत राहिली. स्वप्न रंगवत राहिली. नागपुरला जायचं. रोजच्या जबाबदारीतून थोडीशी मोकळीक. पंजाबी ड्रेसच्या जोडीला कधीतरी साडी नेसू. साडीत तिला चालताना जरा अधिकच अडखळल्यासारखं होई. रोजची धावपळ नसेल तेव्हा मस्त प्लेन पेस्टल शेडची एखादी जॉर्जेट घेऊ. वाटलंच तर जीन, कुर्ता… किती वर्ष झाली. लग्न झाल्यापासून जीन्स वापरलीच नाहिये. मुंबईला परतल्यावर प्रमोशन. विचारांच्या हिंदोळ्यावर झुलता झुलता तिला झोप कधी लागली ते कळलंच नाही.
ती सकाळी नेहमीपेक्षा लवकरच उठली. आंघोळ वगैरे आटपून सकाळचा नाश्ता बनवला. त्याला उठवलं आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागली.
सासुबाई पूजा आटपून देवाचा जप करीत बसल्या होत्या. मुलं नाश्ता करून अभ्यासाला बसली होती. किरण सगळं आटोपून नाश्त्यासाठी आला. त्याला नाश्ता देत ती बोलू लागली.
‘ऑफिसमधून मला नागपूरला जावं लागत आहे. आठएक महिन्यांसाठी. तिथेच राहावं लागेल. आणि मग…’
तिचं वाक्य संपण्याआधीच तो म्हणाला. ‘जमणार नाही.’
त्याची नाराजी, अनिच्छा स्पष्ट जाणवत होती. त्याचे शब्द ऐकून तिचा बांध फुटला. गळा दाटून आला. ती म्हणाली, ‘ऐकून तर घ्या.’
‘त्यात काय ऐकायचं. माहित आहे सगळं. मीही जातो ऑफिसला. त्यात हा तुझ्या पायांचा प्रॉब्लेम.’
‘होऽ पण. दुर्गा बर्‍यापैकी स्वतःचं सगळं करते. दोघांचीही शाळा दुपारची असल्याने आईंना त्यांचा दिवसभर असा त्रास नाहीये. केर, धुणीभांडीसाठी बाई आहेच. वरच्या कामासाठी, स्वयंपाकासाठी मालुआक्कांना बोलावून घेऊ. गावी त्या एकट्याच असतात ना. मुलंाबरोबर त्यांचंही मन रमेल.’ असं बरंच काही ती एका दमात बोलून गेली. पण तो मात्र खाण्यातच गुंग.
‘बोला नं काहीतरी. दोन दिवसांनी मला साहेबांना निर्णय कळवायचाय.’
‘एकदा सांगितलं ना. जमणार नाही सांग तुझ्या साहेबाला.’
‘न जमायला काय झालं. काही महिन्यांचाच तर प्रश्‍न आहे.’
‘पण हे कोण तू एकटीने ठरवणार? सरळ नकार दे आणि उलट प्रश्‍न विचारू नकोस. स्वतःच्या मर्यादेत रहा.’
तिचाही स्वर आता काहीसा रूक्ष झाला होता.
‘आई आहेत ना मुलांवर लक्ष ठेवायला.’
‘तुला काय वाटतं माझ्या आईने अजूनही घरासाठी राबावं?’
‘मी तसं कुठे म्हणतेय. योग्य वेळेस पतीने पत्नीला साथ देणं कर्तव्य असतं.’
‘तू माझं कर्तव्य शिकवू नकोस. प्रमोशनपेक्षा साधी नोकरी कर. प्रमोशन मिळालं की, व्याप वाढतील. स्वतःच्या प्रगतीपेक्षा मुलांना घडविण्याकडे लक्ष दे.’
दोन क्षण स्तब्ध होऊन तिने स्वतःचं मत मांडलं.
‘नोकरीत तुमची प्रगती व्हावी, तुम्हाला कोणताही त्रास होऊ नये म्हणून मी कायम प्रयत्नशील राहिले. खरंतर तुम्ही माझं अभिनंदन कराल अशी माझी अपेक्षा होती. पण तुम्ही वादच घालायला लागलात. एकानं फुलावं तर दुसर्‍याने कोमेजावं, असं का? मी ठरवलंय. मी नागपूरला जाणार. मी माझ्या कोणत्याही कर्तव्यात कसूर करत नाही, तरी ही सूडबुध्दी का?’
एवढं बोलून ती गप्प झाली. एक विचित्र शांतता तेथे पसरली. त्याची चीड अनावर झाली. त्याने तिचा दंड पकडून विचारलं
‘स्वतःला काय समजतेस? मी तुला जाऊ देणार नाही.’
‘तुम्ही तसं करू शकत नाही.’
‘अन् केलंच तर?’
‘मुलांना घेऊन निघून जाईन.’
‘नवरा, संसार, मुलं यापेक्षा प्रमोशन जास्त प्रिय आहे तर. जाऊन कुठे जाशील? तो म्हातारा बाप काय तुझा सांभाळ करणार आहे?’
अनावर संतापाची लाट रमाच्या मनात उसळून आली. ओठांवर आलेले त्वेषाचे शब्द तिने गिळून टाकले. स्वतःला आवरलं.
किरण तयार होऊन ऑफिसला गेला. ती मात्र कितीतरी वेळ तशीच बसून राहिली. तिनं फोन करून अमिताला ऑफिसला येत नसल्याचं कळवलं.
दुपारी मुलं शाळेत गेली. तिच्या मनातलं कोंडलेपण सार्‍या खोलीत पसरलं होतं. अख्खा दिवस उदासवाणा गेला. तिला वाटलं आईचा सल्ला तरी घ्यावा. आईला फोन लावला तर तिचं व्याख्यान सुरूच.
‘लग्नानंतर नवर्‍याच्या इच्छेप्रमाणेच वागावं. तुझं असं व्यंग असतानाही असा चांगला नवरा मिळालाय
नशीब समज.’
‘हो आई. त्यांच्या मनाप्रमाणेच वागतेय. त्यांनी किती वेळा माझा अपमान केलाय. मी सगळा अपमान गिळून वर हसरा चेहरा ठेवून राहतेय ना. अग आई त्याला गरज होती तेव्हा माझी नोकरी करणं आवडायचंच ना.’
‘तो स्थिरस्थावर झालाय आता. तो म्हणत असेल तर तू नोकरीही सोड.’
‘अग आई, काय बोलतेस हे तू? प्रत्येक वेळेस स्त्रीनेच का आपली स्वप्नं, आपल्या महत्त्वाकांक्षा यांना संसाराच्या चौकटीत बंदिस्त करायचं? मी संसार नीट सांभाळतेय ना, मग सहा महिन्यांचाच तर प्रश्‍न आहे.’
तिच्या बोलण्यापुढे काही न सुचून
आई एवढंच म्हणाली. ‘तुझ्या या निर्णयाचा तुझ्या संसारावर काय परिणाम होईल याचा विचार कर. आणि हे बघ, आपली सहनशक्ती वाढवून संसार सावर.’
रमाच्या डोक्यात विचारचक्र चालूच होतं. विचार करतच ती कंटाळून आडवी झाली. इतक्या वर्षात बरंच काही आपण जोखलं, सोसलं… नवरा-बायकोचं नातं असं असतं? लग्नाला इतकी वर्ष झाली तरी सुंदर, निखळ सहजीवनाचा आनंद आपण कधी अनुभवलाच नाही. वटपौर्णिमा, सोमवार, शुक्रवार सारं काही केलं. पण काय मिळालं? गेल्या काही वर्षात अनेकदा मतभेद झाले, पण आपण सामोपचारानेच वागलो. पहिल्यांदाच निर्णयाला विरोध केला तर… बायकोचं साहचर्य हवं असतं, पण तिचं स्वतंत्र अस्तित्व, तिची प्रगती नको असते.
नवर्‍याने बायकोला बरोबरीनं वागवावं, ही खरं तर अभिमानाची गोष्ट. स्त्री पुरुषांच्या बरोबरीने कमावत असली तरी घरात आल्या आल्या तिनं तिचं कमावतीचं वस्त्र उतरवून ठेवायचं हा आपल्या समाजाचा रिवाज आहे.
रमाच्या डोक्यात हे विचारांचं वादळ घोंगावत होतं. तिनं मग पुढे जाऊन निर्णय घेतला. घरात चाललेला हा वाद आपल्या लेकीपर्यंत पोहोचला असेल. तिच्यावरही हेच संस्कार होतील. एकदा का वाकायची सवय लागली की, मनाचा कणाच मोडून पडतो. स्त्री म्हणून, माणूस म्हणून ताठ मानेने जगण्यासाठी दुर्गावरही चांगलेच संस्कार व्हायला हवेत.
स्वतःच्याच मनाशी साधलेल्या या संवादानं तिला उभारी आली.
सकाळी रमा तिच्या ठरल्यावेळी उठली. तिचं मन शांत होतं. नेहमीप्रमाणे सर्व आवरून ती ऑफिसमध्ये गेली आणि गेल्या गेल्या मोठ्या साहेबांना नागपूरला जात असल्याचा निर्णय तिने कळविला.