मीनूच्या सासूबाई ( Short St...

मीनूच्या सासूबाई ( Short Story: Minoochya Sasubai)

मीनूच्या सासूबाई – विनायक शिंदे

मीनूला तिची सख्खी मैत्रीण कादंबरी करपे हिने हज्जार वेळा सांगितले असेल, “त्या खारकर आळीतल्या प्रमोद गुळगुळे बरोबर तुझी ही जी प्रेमाची थेरं चालली आहेत ना ती वेळीच बंद कर! त्याला विसरून जा. नाहीतर त्याला तरी तुझ्या जीवनातून कल्टी घ्यायला सांग.“
त्यावर मीनूचे एक कायम ठरलेले उत्तर असे, ”का ग असा दुःस्वास करतेस माझ्या प्रमोदचा. तो गोरा आहे. त्याचे केस काळेभोर दाट आहेत. सडसडीत बांधा, लाघवी स्वभाव… शिवाय लग्नाच्या बाजारात एक नंबर पसंतीचे क्लासीफिकेशन इंजिनियर… ते आहे त्याच्याकडे! शिवाय तो आत्तापासून माझे सर्व म्हणणे ऐकतो. समज आम्ही दोघं लग्नानंतर हनिमुनला राजस्थानमधल्या वाळवंटात गेलो आणि रणरणत्या उन्हात मला जर तहान लागली आणि मी नुसताच ’पाणी’ शब्द उच्चारला तर तो आकाश पाताळ एक करून मला लगेच आइस्क्रीम आणून देईल. इतका तो गुणी आहे. शिवाय तो 25 माळ्यांच्या सूर्यदर्शन सोसायटीच्या 6व्या मजल्यावरल्या पॉश ब्लॉकमध्ये राहतो. तरी सुद्धा तू…”


”त्या सूर्यदर्शन सोसायटीचे कौतुक मला सांगू नकोस, त्यानंतर त्या टॉवर समोर हा हा म्हणता चंद्रदर्शन सोसायटीचा टॉवर उभा राहिला. नतीजा काय झाला? सूर्यदर्शनच्या भाडेकरूंच्या नशिबात दिवसा काळोख दर्शन पदरी पडले. ते जाऊंदे. प्रमोद इंजिनियर आहे. खरे तर होता म्हणायला पाहिजे, कारण त्याला म्हणे कुठल्याशा तांबडे की चावरे बाबांचा साक्षात्कार झाला की, तू हे सर्व काही सोड आणि साधू संताची चित्रे काढ. त्यातच तुझा भविष्यकाळ उज्ज्वल होईल. झाले. याने इंजिनियरगिरी गुंडाळली आणि लागला चित्रे काढायला. तेही ठीक आहे. पण तुझी सासू श्रद्धाताई, किती खडूस आहेत हे माहिताय तुला? त्यांची फक्त स्वतःवर श्रद्धा आहे. समोरच्यावर त्यांचा मुळीच विश्वास नाही. यांचे माहेर माझ्या मामेबहिणीच्या शेजारी होते. ती कधी यांच्या बागेत देवपूजेसाठी फुले तोडायला गेली तर ही सरळ तिचा हात धरून तिला मनाई करायची आणि परडीतली फुले काढून घ्यायची व म्हणायची, ”आमच्या बागेतली फुले आमच्या देवाला घातली पाहिजे. नाहीतर आमचा देव कोपेल आमच्यावर.” असली मेली खट्याळ 1 नंबरची! तुला सांगते प्रमोद पहिल्यांदा चित्रे काढायला तयार नव्हता, तर तिने याला साधूंचे खोटे नाटे चमत्कार सांगून घाबरवले. अमक्या बाबांच्या शापाने गाय मेली तर तमक्या बाबांच्या दाहक नजरेने कावळा मेला.
”अगं कादु (कादंबरी) तू ही उद्या कोणाची तरी पत्नी होणार आहेस. तुला चांगली सासू मिळणार आहे. भारी साड्या नेसणारी! मधाळ बोलणारी.”


”हं.. असल्या भंपक गोष्टीवर मी विश्वास ठेवणार नाही. मी टि.व्ही वर सासू सुनांच्या मालिका रोज पाहते. त्यातली एक तरी सासू चांगली असते का? सर्वजणी कामधंदा नसल्यासारख्या 24 तास सुनांचे हेवेदावे काढीत असतात. म्हणूनच तुला सावध करायला, तुझ्या भल्यासाठी मी सांगतेय ती बघ, ’अशी नसावी सासू’ या गाजलेल्या टीव्ही सिरियल मधल्या ललिता काकूंसारखीच आहे, ही प्रमोदची आई; एक नंबरची डांबरट, 2 नंबरची खोचक, 3 नंबरची ठुकरट.!”
”बास झाले सासू पुराण! तू अशीच बोलत राहशील आणि ही संख्या 20 वर जाईल.”
शेवटी प्रमोद आणि मीनलच्या मनासारखे झाले. एका रविवारी त्यांचे लग्न ठरले. या लग्नाला प्रमोदची आई अगोदर मुळीच तयार नव्हती. त्यांना मध्यमवर्गीयांचा जाम तिटकारा! त्यांना जन्मताच सोन्याचा चमचा घेऊन आलेली, गडगंज संपत्ती असलेली, एकुलती एक श्रीमंताची लेक अशी मुलगी सून म्हणून हवी होती. पण त्याचे असे झाले, कुणाच्या तरी ओळखीने किंवा वशिल्याने सह्याद्री वाहिनीवर ’रंग आला हो’ या कार्यक्रमात प्रमोदची मुलाखत एका बुधवारी संध्याकाळी प्रसिद्ध झाली. मुलाखतीत निवेदकाने विचारलेल्या प्रश्‍नांची प्रमोदने अत्यंत खुमासदार उत्तरे दिली. अधूनमधून त्याने निरनिराळ्या बाबांची रंगवलेली चित्रे दूरदर्शनवर दाखवण्यात आली. त्यांचा संपर्क मोबाईल नंबर दाखवण्यात आला. त्यानंतर मग कलाकारांच्या बाबतीत लेखक एक वाक्य हमखास लिहितात. मग त्याने मागे वळूनही पाहिले नाही. प्रमोदच्या बाबतीत नेमके तसेच घडले. श्रद्धा ताईंच्या नातेवाईकानी ती मुलाखत पाहिली आणि श्रद्धा काकू कशाबशा तयार झाल्या. कल्याणची कल्याणी मावशी (वय वर्षे 78) तिला म्हणाली, अर्थात मोबाइलवर ”बेबी, आता कशाला हवी आहे गं श्रीमंत सून? आता तुझ्या लेकाकडे लक्ष्मी चालत येणार, मग तूच होशील गडगंज संपत्तीची मालकीण. अगं आमची सुमा (लेक) पिंकीचे गेली तीन वर्षे लग्न जमवायला पाहातेय, तर तिचे बाशिंग बळ पुढे पुढे सरकतेय. पूर्वी रविवारच्या पेपरात बघून लग्ने जमायची, पण आता आपल्या माणसानी ते काम खाजगी एजंटांकडे (वधू-वर सूचक मंडळ) सोपवल्यामुळे ते रजिस्ट्रेशनचे पहिले पैसे वसूल करतात. मग त्यांचा फोन बहुतेक वेळा स्विच ऑफच असतो. यात सुमाचे चांगले दहा-बारा हजार उडाले वरती पिंकीचे लग्न झाले नाहीच. तर राणी असशील तर या लग्नाला हो म्हण. तिचा कॉल संपतो न संपतो तोच परळच्या प्रभा आत्याचा फोन आला, बेबी, मुलाचे लग्न करते आहेस असे समजले. या लॉकडाऊनच्या काळात वाजवून घे लग्नाचा बार. खर्च कमी येतो. नायतर तुझा पैसा म्हटला की हात आखडतो.
ठेव फोन. असे म्हणून श्रद्धा ताईंनी खटकन् मोबाइलचे बटण दाबले. तरीही पलीकडून प्रभा आत्याच्या मोठमोठ्याने हसण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला तो पडला. प्रभा आत्याजवळ असती तर त्यांनी नक्कीच त्यांना जोराचा चिमटा काढला असता. आईकडे पाहून प्रमोद हसला. त्याला पाहून मीनू ही हसली. ”प्रमोद, ही नवरी असली म्हणून काय सारखं सारखं तिच्या पाठी गोंडा घोळायला नको. तू आपल्या कामाला लाग आणि तू ग नोकरी कामधंदा करतेस ना की सिरियल मधल्या नटव्यांसारखं.”
”काय तरीच काय आई? मी घरून काम करते वर्क फ्रॉम होम.”
”म्हणजे त्या 6व्या फ्लोअर वरल्या तोरस्करांच्या सुनेसारखं वर्क फ्रॉम होमचं दळण दळीत बसायचे आणि घरातल्या काडीलाही हात लावायचा नाही. दोन वेळा सासू उपसतेय कामाचा ढोपरभर पसारा,सून लॅपटॉप वरून ताटावर आणि तिथून पुढे गादीवर -”
”सासूबाई (बरे झाले आई नाही म्हटलेस ते. इति सासूबाई) आम्ही लवकरच बेंगलोरला हनिमुनला जाणार आहोत… हो किनई प्रमोद… (तो आईकडे बोट दाखवतो) त्यांना काय विचारायचे… त्या हसत हसत परवानगी देतील.”
”मुळ्ळीच नाही. काय ग मीनल, पेपर वैगेरे वाचतेस की नाही? टी.व्ही. वर तर मिन्टामिन्टाला, आज किती मिळाले, वरती किती गेले, वाचले किती याची अद्ययावत माहिती दिली जाते. तुम्ही जाल गंमतीने आणि येताना त्या परुळेकरांच्या सुनेसारखे करोनाचे बियाणे घेऊन याल…”
मीनलने रागाने प्रमोदकडे पाहिले तेव्हा तो म्हणाला, ”मीनू एवढी हातघाईवर येऊ नकोस. आपले मुख्यमंत्री म्हणाले आहेत ना, मी करोना शून्यावर आणणार आहे, तो आला की जाऊया हनिमुनला.”
मीनलने कपाळावर हात मारून घेतला. आपल्या प्रेमात होता, तेव्हा आपला प्रत्येक शब्द तो फुलासारखा झेलायचा आणि आता चक्क आईच्या ताटाखालचं मांजर झालाय; म्हणजे तो या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्यात एकदम पटाईत दिसतोय. शेवटी कादंबरी म्हणत होती तेच खरे झाले. आई अशी तर मुलगा तसा. आता पश्चात्ताप करून काय उपयोग? हिंदी सिनेमातल्या हिरोसारखे परतीचे सर्व मार्ग आता बंद झाले आहेत. आता फक्त लढ म्हण म्हणून लढत राहणेच हातात उरले आहे. कादंबरीला हे सर्व सांगावे तर ती म्हणेल, ’पोपट झाला रे म्हणतात ना तशी मीनू तू गाढव झाली आहेस.’ हे सगळे विचार मीनूच्या डोक्यात भराभर येऊन गेले.
तेवढ्यात सासूबाई पचकल्या, ”काय ग मीनू कसला एवढा विचार करते आहेस? सासरी येऊन एक दिवस नाही झाला तर लगेच आई-वडिलांची आठवण यायला लागली? मग लग्न तरी कशाला केलेस? आयुष्यभर तिथेच राहायचे पोषित स्वखर्चाने.”
बाजूला प्रमोद फुरसुंगीकर – भोसरीवाले बाबांचे पोर्ट्रेट तन्मयतेने काढीत होता. मीनूला वाटले हा आपल्या आईला म्हणेल, ”अगं, अगं आई तुझ्या जिभेला काही हाड आहे का? नव्या नवरीशी असे बोलतात? तर त्याचे हावभाव एखाद्या सराईत नटासारखे होते – मी कानाने तर बहिरा आहेच; पण डोळ्यांनी सुद्धा आंधळा आहे.”
तेवढ्यात श्रद्धाताई पचकल्या – ”काय ग, ते सर्व मरुंदे, तू मला सांग तू वॅक्सीन घेतलेस का? का तेही…”
”नाय घेतले, राहिले आहे. या वर्क फ्रॉम होममुळे वेळच मिळाला नाही. पूर्वी आम्ही ऑफिसात आठ तास काम करायचो, आता घरी दहा-अकरा तास होतात.”
”तुझ्या वर्कचे मसण्या घरून कामाचे ठेव बाजूला. पहिल्यांदा ते काम करून ये, नाहीतर काहीतरी व्हायचे आणि आम्हाला निस्तरायला लागायचे. अरे बापरे, मी तुझ्याशी काय बोलत बसले आहे. मला देवपूजा करायची आहे,” असे म्हणून सासूबाई तरा तरा आतमध्ये निघून गेल्या.
लग्नासाठी बॉसने फक्त दहा दिवस सुट्टी दिली होती. त्यापुढे एक दिवस जरी जास्त झाला तर या करोना – लॉकडाऊनमध्ये एक लाख लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत, त्यात एक लाख एक हा तुझा नंबर असेल.


एक तर सासूबाईंच्या हट्टापायी मीनूचे सगळे मुसळ केरात गेले होते. ती दुपारची आराम करायला गेली तर आल्याच सासूबाई. आल्या कीर्तनकारासारख्या बडबडल्या, ”आमच्या घरात बायकांनी दुपारचे झोपायची पद्धत नाही. अशाने घरातली लक्ष्मी बाहेर जाते आणि बाहेरची अवदसा घरात येते. समजले.”
चित्रपट आणि नाट्यव्यवसायाला करोनामुळे सरकारने टाळे लावल्यामुळे मालिका विश्वाला सुगीचे दिवस आले होते. कोण? कुठले? कधीही न पाहिलेले कलाकार अचानक उदयाला आले. नावीन्याच्या नावाखाली नवीन नवीन मालिका पाहणे घरगुती प्रेक्षकांच्या नशिबी आले. आईच सर्व करते, मन हळदीत गेले, मन आकाशी उडाले, तुझ्या माझ्या घराला किती भांडी हवी अशा एकापेक्षा एक मालिका (या एकाच चॅनेलच्या मालिका सांगितल्या. इतर वाहिन्यांच्या सांगितल्या तर लिखाणाला जागाच उरणार नाहीत.)
त्या दिवशी श्रद्धाताई टी.व्ही.जवळ बसून अगदी आवडीने त्यांची आणि श्रद्धाळू जनतेच्या गळ्यातला ताईत बनलेली ’आईच सर्व काम करते’ ही मालिका पाहत होत्या. तेवढ्यात मीनू तिथे आली. तिला तिची आवडती जी चांदणी चॅनेलवर दिवसा-संध्याकाळी मध्यरात्री लागते ती मालिका ’मनी उडाली आकाशी’ पाहायची होती. म्हणून सासूबाईना तिने विनंती केली, ”आई, जरा माझी आवडती मालिका लावायला देता? मनी उडाली आकाशी?”
”ती गेली उडत, आज आमच्या मालिकेतल्या आईचे ऑपरेशन आहे कोकीलाबेन हॉस्पिटलमध्ये. हा एपिसोड अजिबात चुकवायचा नाही असे मी ठरवले आहे. मला कळायला नको डॉ. गायतोंड्यानी तिचे ऑपरेशन नीट केले की नाही ते?”
आईच्या बाजूला पडलेला रिमोट घ्यायला मीनू पुढे सरसावली आणि एकदम मागे सरकली.
”आई, हे काय? तुमच्या अंगात ताप चढलाय आणि कालपासून तुम्ही अधूनमधून खोकताय सुद्धा. समोरच्या चंद्रदर्शन सोसायटीतल्या बचतगटाच्या महिला गोव्याला गेल्या होत्या. घरी आल्यावर त्यांना ताप आला. त्यांच्या नवर्‍याने हयगय न करता करोनाची त्यांची टेस्ट केली तर पॉझिटिव्ह आली. तुम्ही टंगळमंगळ…”
”शुभ बोल नार्‍या, अगं, मीनू काय बोलते आहेस? एवढ्यातच सासूला वरती पोचवतेस? तुला झालंय तरी काय? माझ्या समोरून जा अगोदर?”
”अहो आई, मी खरे तेच बोलते आहे. तुमचे अंग खरोखरच तापले आहे. प्रमोद आईचे अंग तापले आहे.” (प्रमोदने हातातला ब्रश खाली ठेवला व तो धावत येऊन त्याने आईच्या कपाळाला हात लावला. तो एकदम दचकला.) आईला खरोखरच ताप आला होता.
”आई आता मी मुळीच ऐकणार नाही; आत्ताच डॉ.. कावरेंच्या हॉस्पिटलमध्ये तुला अ‍ॅडमिट करूया. काय नसेल तर तुला अ‍ॅडमिट न करता सोडतील.”
”अरे प्रमोद, माझं ऐक, पराचा कावळा करू नकोस. काट्याचा नायटा करू नकोस. हिनेच तुझ्या कानात सांगितले मला करोना झालाय म्हणून तिला मी घरात नकोच आहे. तिकडे हॉस्पिटलमध्ये जाऊन मरेना असेच वाटत असेल हिला.”


”आई, काय बोलतेस तरी काय? टी.व्ही मालिका पाहून तुझे डोके सैल झाले की काय?…. त्यातलीच एखादी सासू तुझ्या अंगात संचारली नाही ना?”
रात्री श्रद्धाताईना सडकून ताप आला आणि त्यांची श्वासाची तक्रार सुरू झाली. अलीकडे त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता; पण कोणाला कळले तर डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये रवानगी होईल आणि तिथून पुढे काय होईल ते ब्रह्मदेवालाही सांगता आले नसते. म्हणून त्या जाणूनबुजून सर्वांपासून ही गोष्ट लपवत होत्या.
डॉ. कावरेंच्या हॉस्पिटलमध्ये श्रद्धाताईना प्रमोदने अ‍ॅडमिट केले तेव्हा त्यांना वाटले लवकरच आपला प्रवास वरच्या दिशेने सुरू होणार, एवढ्या त्या घाबरल्या. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असून त्या घाबरून प्राण सोडतील म्हणून डॉक्टरानी त्यांना सांगण्याचे टाळले. त्या जवळ जवळ बेशुद्ध अवस्थेत होत्या. प्रमोद तर रडकुंडीला आला होता; पण मिनूने त्याना धीर दिला.
”आई, मुळीच घाबरू नका. तुम्हाला काहीही झालेले नाही आणि होणार नाही. मला रेकी करता येते. ती मी तुमच्या शरीरावर करते. असे म्हणून मीनूने त्यांच्या छातीवर दोन्ही हाताचे पंजे ठेवून ती काहीतरी मंत्र पुटपुटली.”
”आई, तुम्ही खडखडीत बर्‍या झाल्या आहात” आणि श्रद्धाताई उठून बसल्या. डॉ. कावरेंनी मीनूचे आभार मानले व सासूबाईंना घरी नेण्याची परवानगी दिली. सोळा दिवस त्या घरात होत्या. डॉ. कावरेनी तशी सूचना मीनूला दिली होती. खरे तर त्या डॉक्टरांच्या उपचाराने बर्‍या झाल्या होत्या पण सगळा बनाव डॉक्टर कावरेंच्या संमतीने रचला गेला होता. कारण डॉ. कावरे हे मीनूचे सख्खे मामा होते. आपल्या सासूची कहाणी अगोदर मीनूने त्यांना सांगितली होती. सूर्यदर्शन सोसायटीत श्रद्दाताईनी सर्वांना सांगायला सुरुवात केली, माझ्या गुणी सुनेने मला वाचवले. नाहीतर माझे काही खरे नव्हते. त्या दिवसापासून मीनू त्यांची सून नव्हे तर लाडाची लेक झाली.