मराठी भाषा म्हणजे संस्कार… (Short Story: Marath...

मराठी भाषा म्हणजे संस्कार… (Short Story: Marathi language means Sanskar…)

मराठी भाषा म्हणजे संस्कार…

  • सुधीर साळसकर

साधारण माझं वय तेव्हा पंधरा सोळा वर्षे असेल. तेव्हा मला आठवतंय की मी मे महिन्याच्या सुट्टीत मुंबईला माझ्या मावशीकडे आलो होतो. तेव्हा माझा मावस भाऊ आम्हा मुलांना रवींद्र नाट्यमंदिरला नटसम्राट नाटक पाहायला घेऊन गेला होता. नुकतंच श्रीराम लागू यांनी हे नाटक सोडलं होत आणि यशवंत देव यांनी हे नाटक करायला सुरुवात केली होती. शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारं नाटक पाहताना अश्रू अनावर होत होते. ही ताकद वि. वा. शिरवाडकर यांच्या लेखनाची आणि मराठी भाषेचीही होती. त्या काळातील नाटक सिनेमा निर्मितीमध्ये व्यावसायिकता नव्हती तर मनोरंजनातून समाज प्रबोधन करण्याचे ते एक साधन होतं आणि त्यावेळच्या लेखकांनी आणि कवींनी ते प्रभावीपणे वापरलं होतं. पण  हळूहळू सर्वच क्षेत्रात व्यावसायिकता आली, परिणामी समाजमनही बोथट होत गेलं. अशाच बोथट होत चाललेल्या समाजमनाचा वेध घेण्याचा छोटासा प्रयत्न आज करीत आहे.

मराठी भाषा आणि मराठी भाषेतून होणारे संस्कार

“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती” संत तुकाराम महाराजांनी साडेतीनशे… चारशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या अभंगाची ही सुरुवात. लता मंगेशकर यांच्या मंजुळ आवाजाने अजरामर झालेला हा अभंग बऱ्याच मराठी मुलांनी ऐकलाही असेल……..आपण कल्पना करूया की या इथे आजूबाजूला उंच उंच वटवृक्ष आहेत आणि त्या वटवृक्षांची सावली सगळीकडे पसरली आहे, झरे झुळु…झुळू… वाहत आहेत, पक्षांचा किलबिलाट सुरू आहे. मंद वारा वाहत आहे आणि अशा शांत प्रसन्न वातावरणात आपण एखादं आपल्या आवडीच्या विषयाचं पुस्तक घेऊन वाचत बसलो आहोत…. या नुसत्या कल्पनेनेच काही क्षण आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात आणि आपण नकळतच त्या वातावरणात रंगून जातो…. हीच तर मराठी भाषेची गोडवी आणि ताकद आहे.

पुढे काय परिस्थिती ओढवणार आहे, हे  बहुतेक तुकाराम महाराजाना तेंव्हाच कळले असावे म्हणून त्यांनी चारशे वर्षांपूर्वी लिहिलेला अभंग आजही मनाला भावतो. एका कडव्यात महाराज म्हणतात “आकाश मंडप…..पृथ्वी आसन, रमे तिथे मन क्रीडा करी” मित्रानो किती सुंदर कल्पना आहे. कल्पना विश्वातून तुम्ही बाहेर आला असाल तर आजूबाजूचं वास्तववादी चित्र काय आहे? तुम्ही जाता येता याचा अनुभवत घेत असालच. महाराज ज्या आकाशाला  मंडप म्हणजे डोक्यावरील छत म्हणतात ते छत  प्रदूषणामुळे काळवंडलेलं आहे, अखंड पृथ्वीला ते आसन म्हणत आहेत. ती जागा… जिच्यावर इथस्थता पसरलेला कचरा आणि थुंकलेल्याचे डाग पडले आहेत, गगनाला भिडणाऱ्या इमारती,सिमेंटचे रस्ते आणि सिमेंटच्या या जंगलात आग ओकणारा सूर्य. क्रीडा करायला इथे मन रमेल का?

आपण कुठेतरी निसर्गाचं, समाजाचं देणं लागतो हे संस्कार आपल्यावर व्हायला हवे असतील तर त्यासाठी भाषा हे माध्यम म्हणून खूप प्रभावी साधन आहे असं मला वाटतं.याच प्रेरणेतून आपण कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून कार्बन उत्सर्जन कमी व्हावं म्हणून सोलार एनर्जी,सुक्या कचऱ्याचा पुनर्वापर,ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती इत्यादी प्रकल्प राबवित आहोत.जेणेकरून निसर्ग संवर्धनामध्ये आपलाही हातभार लागावा हा त्यामागचा उद्देश.

मित्रानो भाषा बोलता वाचता येणं आणि ती समजणं यात खूप फरक आहे. देशातील प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या भाषा आहेत आणि त्या भाषेला मायबोली म्हटलं जातं. माय म्हणजे माझी आणि बोली म्हणजे भाषा असा अर्थ अभिप्रेत नसून माय म्हणजे आई आणि बोली म्हणजे  संस्कार. आई सारखे संस्कार करणारी भाषा म्हणजे माझी मातृभाषा मराठी भाषा.

मराठी भाषा खूप समृद्ध आणि समजायला सोपी आहे. म्हणून तर इतर भाषिक लगेचच मराठी बोलू लागतात. इतर भाषां पेक्षा मराठी भाषेत खूप विविधता आहे.

मराठी भाषेमध्ये अनेक स्थनिक भाषा आहेत आणि त्या स्थानिक भाषेमध्ये पोट भाषाही आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर मी कोकणातला त्यामुळे आमची कोकणातली बोली भाषा मालवणी आहे. कुठेही आजूबाजूला कोणी माका… तुका केलं की लगेच आमचे कान टवकारतात. मग  एकमेकांची ओळख ,विचारपूस सुरू होते. कधी अचानक एखादा जवळचा मित्र भेटला की “अरे मेल्या तू हय खय”? म्हणून  प्रश्न विचारला जातो. तोही आनंदाने आणि दिलखुलासपणे आपल्या प्रश्नाला दाद देतो. खरं तर मेल्या ही एक शिवी पण त्यात आपुलकी आणि प्रेम हे स्थानिक बोली भाषेमुळे निर्माण झालेले असते. अशी ही आपुलकी, आपापसातील प्रेम व जवळीक वाढवणारी “माझी माय” माझी “मराठी भाषा. आज मराठी भाषा दिन या दिवशी मला माझे विचार मांडण्याची संधी मिळाली हे माझे भाग्यच आहे. आपणा सर्वांचे आभार आणि मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

धन्यवाद