कोणती साडी नेसू (Short Story : Konti Saadi Nesu)

कोणती साडी नेसू (Short Story : Konti Saadi Nesu)

कोणती साडी नेसू

“ऐक ना, पुढच्या महिन्यात सोनूचं लग्न आहे. लग्नात कोणती साडी नेसू मी?”
कपाटामधल्या ढीगभर साड्यांची चळत वरखाली करत चंदाने विचारलं आणि अस्मादिक (म्हणजे आम्हीच) तीन ताड उडालो. क्षणभर डोळ्यांसमोर काय काय तरंगू लागलं… आता आपल्याला काय काय सहन करायला लागणार? आता ही पंधरा प्रकारच्या साड्या दाखवून विचारणार, ही कशी आणि ती कशी? याचा रंग मला शोभत नाही, याचा पोत बरोबर नाही, ही फॅशन आता नाही, ही मी अमकीच्या लग्नात नेसली होती, ती डिट्टो ताईच्या, नाहीतर वहिनीच्या साडीसारखीच वाटते ना रे?… एक नि दोन… बरं लक्ष नाही दिलं तरी राग, लक्ष देऊन काही सांगितलं तरी आपलंच म्हणणं खरं करणार. आणि अखेरीस ‘शि…! तुला आपली बायको चांगली दिसावी असं वाटतच नाही का रे! त्या सुनीलकडे बघ. बिंदीसाठी काय काय आणत असतो. आमच्याकडे बघा, सख्ख्या बहिणीच्या लग्नात नेसायला ढंगची
साडी नाही. नशीब हो नशीब.’
आम्ही काही म्हणायचं ठरवलं, तरी बोलणं मुश्कील! मुसमुसून रडण्याची तयारी. डोळ्यांत गंगा-यमुना तयार होत्याच. आम्हाला बोलायला आणि कपाटातून साड्यांचा ढीग खाली पडायला एकच वेळ झाली. आम्ही एकवार त्या ढिगार्‍याखाली आलेला आपला पाय हळूच बाहेर काढत मऊ आवाजात म्हटलं,
“चंदा, मी तरी काय दुसरं सांगत होतो. हे घे क्रेडिट कार्ड आणि गाठ बरं मार्केट. राणी तुझ्या गोर्‍या रंगावर खुलणारी नारी पैठणी किंवा पेशवाई घे. पण प्लीज मला बरोबर नको बोलवू. मला त्यातलं काही समजत नाही.”
क्षणार्धात चेहर्‍यावरचे भाव बदलले, “अय्या! खरंच? मी लगेच मितालीला कळवते. आम्ही दुपारीच निघू. अय्या… मी तुला चहा विचारायला आले होते. आणि बघ साडी पुराण लावलं. राज, तू कित्ती चांगला आहेस रे. मी पटकन चहा ठेवते.”
हुश्श!! दुपारी निघालेल्या चंदा आणि समस्त महिला वर्ग आता रात्रीशिवाय उगवत नाही. तेव्हा आपल्या समदुःखी मित्रांना घेऊन आम्ही चांगले चार तास मॅच एन्जॉय करू शकतो. भरपूर खाण्याचे पदार्थ टेबलावर काढून बसलो. तोंडी लावणं म्हणून बायकांची कपडे खरेदी हा समस्त नवरदेवांच्या आवडीचा विषय होताच!
“खरंच यार, कितीही कपडे असू देत कपाटात, कोणाचं लग्न म्हटलं की आधी यांना स्वतःलाच काय घालू हा प्रश्‍न पडतो. अरे! मीसुद्धा सुरूला सांगून दमलो; पण नाही. सतरा वेळा भांडी आपटली. शेवटी म्हटलं, जा बाई तुला काय घ्यायचं ते घे. काय हौस असते या बायकांना? मला तर साडी विकणार्‍या दुकानदाराची कीव येते कीव.” सुरेशने पिझ्झाचा तुकडा
तोंडात कोंबत म्हटलं.


“अरे! मी एक सॉलिड जोक सांगतो. कोणत्याही परिस्थितीत
या बायकांना कळू देऊ नकोस हां. अरे!! सोनूसाठी ज्या विवाह मंडळात नाव घातलं होतं, ते माझ्या ओळखीचे. ते नेहमी एकेक मजेशीर किस्से सांगतात. एका उपवर मुलीला म्हणे जी फाईल दाखवली त्यात मुलाचं वर्णन वगैरे खूप छान होतं. गडगंज श्रीमंत, मोठ्ठा बंगला, गाडी, नोकरचाकर. फक्त दिसायला तो काळा, बसक्या नाकाचा, बाहेर आलेले जाड ओठ वगैरे असा होता. एका उपवर मुलीने काय विचारलं असेल? म्हणे याच टेक्शरचा थोड्या कमी जाडीचा, ब्राइट रंगाचा, असेल तर दाखवा ना. बघा! म्हणजे नवर्‍याची तुलनाही कपड्यांबरोबर!”
खोखो हसत महेंद्र सांगत होता, “अरे यार कपडे घालून कोणाला दाखवायचे, तर एकमेकींनाच बरं का! सुनीबरोबर शॉपिंगला गेलो होतो. मायक्रो स्कर्टपासून सुरू केलं ते शेवटी तंबू सारखं एक कापड गुंडाळून आली ट्रायल रूममधून. यार मी ओळखलंच नाही. किती वेळा मी ‘वॉवऽऽऽ क्यूट, मार्वलस’ बोललो असेल त्याला सीमा नाही. अरे एक लेंगा आपण लोक घालत होतो, तो पण या बायकांनी प्लाझो म्हणून वापरायला सुरुवात
केली. ‘एक नूर आदमी दस नूर कपडा’ याची चांगलीच सवय या बायकांना लागलीय. तिला सारखं सारखं क्यूट दिसतं वगैरे बोलून बोलून माझ्या घशाला कोरड पडली.”
“अरे… शहाण्या तुझं लग्न व्हायचंय अजून, म्हणून तू पेशन्स ठेवून इतका वेळ कपड्यांचा ढीग धरून उभा राहिला. आमची तर आता हिंमत होत नाही. त्यापेक्षा क्रेडिट कार्ड स्वाधीन केलं
की सुटलो, खरं ना मन्या?”
“हो यार. या बायका थकत कशा नाहीत? बरं कपडे खरेदी करण्यात जेवढा उत्साह असतो, त्याच्या दुप्पट समोरच्या बाईपेक्षा माझा पोषाख कित्ती छान आहे, हे न्याहाळून पाहण्याची घाई यांना. परवा एका समारंभात गेलो होतो गौरी आणि मी. मी आपला जुन्या कलीगबरोबर गप्पा मारत बसलो, तर गौरी सारखी रनिंग कॉमेंट्री देत होती. महेंद्र, ती मेनका बघ ना काय टुकार ड्रेस घालून आलीय. आणि राणीच्या ब्लाऊजचा मागचा कट पाहिलास?… श्शी! किती चीप दिसतंय. कसं काय गौरव सहन करत असेल?… अ‍ॅक्च्युअली माझं काही तिच्या त्या लो कट ब्लाऊजकडे लक्ष नव्हतं; पण ती म्हणाली म्हणून पाहिलं. मला मात्र भारी सेक्सी वाटला राणीचा तो कट. आणि खरं सांगू? गौरवचा हेवा वाटला.”
त्याच्या टाळक्यात एक हाणत सुरेश म्हणाला, “चूप बस हं…
तुझ्या क्लिनिकमध्ये तुला काय कमी हिरवळी दिसतात? ते सोड, या बायका नक्की का बरं इतक्या कपड्यांचा सोस करत असतील, हा खरा संशोधनाचा विषय आहे.”
“संशोधनाचा नव्हे, चिंतेचा विषय आहे.”
चिंतन नावाप्रमाणेच नेहमी काहीतरी चिंतनीय भाष्य करणार, हे नक्की. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करत सुर्‍या म्हणाला, “अरे! महेंद्र मी जोक नाही करत. मी तुला परवा क्लिनिकवर भेटायला आलो होतो बघ. चार तास तुझ्या क्लिनिकमध्ये मी होतो. तुम्हाला खोटं वाटेल, काय टाइपचे कपडे घालून येतात पेशंट? मिनी, मायक्रो स्कर्ट. हा पोषाख हॉस्पिटलमध्ये घालण्यालायक आहे का? एकदा तर चांगली वीस-बावीस वर्षांची मुलगी वीतभर चड्डी घालून आलेली बघून मी हादरलो. अरे? काय हे, आपण डॉक्टरांकडे शरीराच्या आजारासाठी जातोय की देह प्रदर्शन करण्यासाठी? मी तावातावाने महेंद्रला काही सांगू म्हणून आत गेलो, तर याची ज्युनिअर! विचार यालाच काय कपडे घालून आली होती.”
“जाऊ दे ना चिन्या, आपल्याला काय करायचंय? डॉक्टर म्हणून ती चांगली आहे. माझा कंसेन्ट त्याच्याशीच.”


“अरे पण नोबेल प्रोफेशन समजतो आपण काही क्षेत्रातील लोकांना. उद्या सैन्यातील लोकांनी प्रोटोकॉल पाळला नाही तर, चालेल का? म्हणून म्हटलं चिंतेचा विषय आहे.”
सुरेश कोल्ड ड्रिंकचा घोट घेत म्हणाला, “अरे! माझ्या एका स्टाफची गोष्ट ऐकण्यासारखी आहे. पक्या म्हणून क्लर्क आहे आमच्याकडे. त्याच्या मुलीने त्या कोणत्या त्या कार्यक्रमाचं नाव रे, त्यात नाव… तो काही उखाणा घेतला की कोणते तरी खेळ खेळले की पैठणी मिळते अँड ऑल, तर त्यासाठी फोन लावला आणि स्वतःच्या आईचं नाव-पत्ता सांगितला. आणि पक्याची बायको सिलेक्टही झाली. तर हा पक्या माझ्याकडे कर्जासाठी अर्ज घेऊन आला होता. मी आपली सहज चौकशी केली, तर थोडं चिडूनच म्हणाला, बघा ना साहेब पोरीने काय घोळ घालून ठेवलाय. आता टीव्हीवर बायको आणि आमचं घर दिसणार, म्हणजे खर्च आलाच ना!… अरे पण त्यासाठी कर्ज? तर म्हणाला, काय सांगू साहेब, टीव्हीवर इतर झकपक घरं बघून बायको आणि मुलगी मागेच लागले, घर सारखं करा, मम्मीला नवीन साडी घ्या, एक ग्रॅमचं का होईना, पण तीन-चार दागिने आणा. घ्या, आता एका पैठणीसाठी त्याला पंचवीस हजारांचं कर्ज घ्यायचं होतं. मी म्हटलं, यार त्यापेक्षा पाच हजाराची पैठणी घेऊन दे की तिला. सगळ्यात जोक म्हणजे, त्याच्या बायकोला पैठणी मिळालीच नाही. पण सोस बघा किती.”
“हो यार, गौरीला मी कधीही ब्रँडेड कपडे घ्यायला तयार असतो. कधीच नाही म्हणत नाही. तरीही पावसाळ्यात ओल्या कपड्यांचा सेल म्हणून धावते. सणांच्या निमित्ताने जेव्हा एकावर एक फ्रीची ऑफर ऐकली की, नुसती धावते. काय या बायकांची आवड असते, ते समजतच नाही.”
तेवढ्यात चंदा, मिताली आणि गौरी खरेदीच्या भरपूर सार्‍या बॅग्ज घेऊन आल्या. अर्थात, खरेदीच्या निमित्ताने एवढ्या बिचार्‍या थकल्या होत्या की बाहेरूनच जेवून आल्या. आमच्यासाठी उदारपणे पार्सल आणायला मात्र विसरल्या नव्हत्या.
आता आमच्या अंगावर मोठीच जबाबदारी आदळणार, हा संभाव्य धोका ओळखून एकेका मित्रानं हळूच काढता पाय घेतला. उरता उरलो आम्ही, द ग्रेट राज आणि चंदा! बेडरूममध्ये साड्यांच्या बॉक्समधून एकेक साडी काढत, आपल्या खांद्यावर पसरून आरशात बघत, “राज,
बघ ना कित्ती छान दिसते ना?”
“अं… हो. सुंदर. हा फे्रेश रंग खुलतो तुझ्या अंगावर.” आम्ही आपले काही बोलायचं
म्हणून बोलत होतो. खरं म्हणजे, आम्हाला तरी काय फरक कळतो. आम्ही आपले वॉव, खूब करत महाराणींना खूश करण्याचा प्रयत्न करत होतो. बाईसाहेब एवढ्या खरेदीनंतर नक्कीच अस्मादिकांवर खूश असतील! पण कसलं काय.
आमच्या सौभाग्यवतींना त्यांच्या मातोश्रींचा फोन आला. आणि चंदा त्यांना तावातावाने सांगत होती, “आई, अगं गौरीने नेमका मला आवडला तोच रंग उचलला. म्हणजे माझ्यापेक्षा छान पैठणी तिचीच ना! मी परत उद्या जाणारे त्या शॉपमध्ये. तिच्यापेक्षा जास्त छान साडी घेऊन
येते बघ!‘’
– चित्रा नानिवडेकर