खंगत चाललेला डोंगर {Short Story: Khangat Chalal...

खंगत चाललेला डोंगर {Short Story: Khangat Chalalela Dongar)

खंगत चाललेला डोंगर– प्रमोद कांदळगांवकर

निवार्‍याला येणारी प्रेमीयुगुलं… वृद्ध, लहान मुलं… ह्या सर्वांच्या सुख-दुःखाचे हुंकार या डोंगराने पहिले आहेत. अनेक पिढ्या त्याने जवळून पाहिल्या आहेत. कालचक्राच्या वावटळी आल्या नि गेल्या. थंडगार वार्‍यानं तो कधी गारठला नाही. विजांच्या चमचमाटानं तो कधी हादरला नाही. पण त्या दिवशी घडलेल्या घटनेपासून त्याची माती गळून खाली पडू लागली. दिवसेंदिवस तो निष्कपर्ण होत चालला. एवढेच नव्हे तर त्या डोंगराजवळ कुणी येईनासं झालं. त्याचं महत्त्व संपलं.

मिठबांव खाडीच्या काठा-काठाने जाणार्‍या बांधावरील रस्त्यावरून दृष्टिक्षेप टाकला तर प्रथम दर्शनीच तो अवाढव्य आणि प्रचंड मोव्यातील डोंगर, हिरवागार माळ दृष्टीस पडतो. कित्येक वर्षे हा डोंगर दीपस्तंभासारखा उभा आहे. या डोंगराने प्रत्येक दिवसांतले क्षण अन् क्षण टिपले आहेत, अनुभवले आहेत. खाडीचा खरा वारा दुपारच्या उन्हातही मंदपणे वाहत असताना केवढी प्रसन्नता वाटते, हे या डोंगराखाली उभं राहिल्याशिवाय कळणार नाही. पलीकडे छोटीशी कोंडवाडी आहे. या कोंडवाडीत बसल म्हणजे खाडीच्या कठड्या पलीकडचा सागराचा निळसर पट्टा … त्या लवलवणार्‍या पट्ट्यावर मंदपणे हिंदकळणार्‍या होड्या… पश्चिमेला अस्तास जाणारा सूर्य… त्याची कोवळी सोनेरी किरणे… लांब दूरवर… फिक्कट निळसर डोंगराचा चिंचोळा भाग पाण्यात आलेला… त्यावरील झाडीमधूनच उंच दिसणारा डोंगर, हे नयनरम्य दृश्य नुसतं पाहत राहावं असं कुणाला वाटणार नाही? पाहणार्‍या माणसाला क्षणभर सुख-दुःखाचा खचित विसरच पडेल. अशा एकांत थंड वातावरणात सायंकाळी अनेक प्रेमी युगुलं गाठीभेटी घ्यायला येतात. त्यांचं मधुर हसणं… बोलणं डोंगरावरील पक्षांच्या किलबिलाटाशी स्पर्धा करतं. ते हुंकार… तो स्पर्श… या डोंगराने जवळून पाहिलेला आहे किंबहुना पिढ्यांपिढ्यांतलं सत्य या डोंगरानं जवळून पाहिलं आहे. निवार्‍याला येणारी प्रेमीयुगुलं… वृद्ध, लहान मुलं… ह्या सर्वांच्या सुख-दुःखाचे हुंकार या डोंगराने पहिले आहेत. अनेक पिढ्या त्याने जवळून पाहिल्या आहेत. कालचक्राच्या वावटळी आल्या नि गेल्या. थंडगार वार्‍यानं तो कधी गारठला नाही. विजांच्या चमचमाटानं तो कधी हादरला नाही. वादळी वार्‍याशी झुंज देण्याचा प्रसंग तर त्यावर अनेकदा आलेला आहे.
प्रत्येक वर्षी पडणार्‍या पावसाने त्याचे हे मोठेपण जास्त दिवस टिकू शकलं नाही! त्या दिवशी घडलेल्या घटनेपासून त्याची माती गळून खाली पडू लागली. त्याला पुन्हा वाट सापडली नाही. दिवसेंदिवस तो निष्कपर्ण होत चालला. एवढेच नव्हे तर त्या डोंगराजवळ कुणी येईनासं झालं. त्याच महत्त्व संपलं. प्रेमीयुगुलं यायची बंद झाली. त्याला शाप होता एका प्रेमीजनांचा ! एक भयंकर शाप !


तो दिवस मीच काय पण आमच्या गावातील प्रत्येक माणूस कधीच विसरणार नाही. तो प्रसंग नुसता आठवला तरी ते भयंकर दृश्य डोळ्यासमोर दिसू लागतं ! अंगावर शहारे आणणारं ते दृश्य ! आणि मग उभी राहते गयाबाईची निष्पाप प्रतिकृती ! गरिबीनं गांजलेली… त्रासलेली पण आल्या प्रसंगाला निर्धाराने तोंड देणारी… लाचारीने कुणापुढं हात न पसरणारी ! स्वतःच्याच पायावर उभं राहून प्रत्येक दिवस मोजत असलेली गयाबाई डोळ्यापुढे उभी राहते. तिनं आपल्या जीवनात फार मोठ्या आशा-आकांक्षा केल्या नव्हत्या. राहायला घर, रोजची हक्काची भाकरी… बस्स ! पण परमेश्वरानं तिच्या दारिद्रयाची जणू क्रूर थट्टाच करायची ठरविली होती.
हे सर्व आजही आठवलं म्हणजे आपोआपच डोळे पाणावतात. कंठ दाटून येतो. तिची ती केविलवाणी प्रतिकृती आठवते. तिचा भोळाभाबडा स्वभाव आठवतो. तिची देवावरची श्रद्धा आठवते. ज्या देवाची तिने निस्सीम भक्ती केली, तोच देव तिच्या बाबतीत अंतर्बाह्य दगड झाला होता. निष्ठुरपणे तिचं जीवन त्यानं उद्ध्वस्त केलं होतं.
समोरच्या घरातील खिडकीकडे माझं लक्ष जातं. दोन निरागस मुलांचे केविलवाणे दोन डोळे भिरभिरताना मला अद्यापही दिसतात. ते डोळे कुणाला शोधत असावेत ? त्यांची नजर रस्त्यावरून येणार्‍या जाणार्‍या लोकांना का शोधत आहे? त्या दोन जीवांना अद्यापही वाटत असावं का? आपली गयाबाई याच रस्त्यानं गेली होती… जाताना म्हणाली होती, माझ्या राजूला खाऊ आणीन हं . अगदी वेळेवर येईन मी. ती परत केव्हा येईल हे पाहण्यासाठी का त्यांचे डोळे त्या दिशेने भिरभिरताहेत.
लहान दत्ता गाल फुगवून म्हणाला होता ! त्या दिवशी आई आलीच नाही. आजही आली नाही. उद्या निश्चित येणार आहे? पण उद्या उद्या म्हणणार्‍या दत्ताला पुन्हा आई कधीच दिसली नाही. ह्याचं कोडं त्यालाही सुटलं नव्हतं. आणि मग आईच्या आठवणींनं त्याचा कंठ दाटून येतो. कधी कधी तो उफाळून बाहेर येतो आणि मग ते रडणं मला माझ्या बसल्या जागेपर्यंत ऐकू येतं ! मी अस्वस्थ होतो. ते रडणं मला असह्य होतं! रात्री ती दोन्ही मुलं आईच्या कुशीत निजण्याऐवजी एकमेकांच्या कुशीत झोपत होती. पहाटे लवकर दचकून उठत होती. आत कुणीतरी स्वयंपाक करीत आहे असं त्यांना उगीचच वाटायचं. आई आत आहे, ती आपल्यासाठी जेवण करीत आहे… आणि मग ’आई आई ’ करीत धावत आत जायची. त्यांच्या मुखात आई हा शब्द अर्धवटच राहत असे. समोर त्यांचे बाबा दिसायचे. आई तिथे नसायचीच, आई किती दिवस घरी आली नव्हती ! ती कधीच येणार नाही का ? पण त्या दिवशी आई म्हणाली होती. सायंकाळी मी माझ्या राजूला खाऊ घेऊन येणार आहे. पण आईनं खाऊ आणला तर नव्हताच, पण ती परत आलीच नव्हती. पैसे नसले म्हणजे ती खाऊ आणीत नसे, हे त्यांना माहीत होते. पण खाऊ नसला तरी आपण कधी हट्ट धरला नाही. मग आई का आली नाही? कां आली नाही? कां? कां? कां?
’ताई, आई कधी गं येणार आपली?’ हा प्रश्‍न त्यानं ताईला किती वेळा विचारला होता कुणास ठाऊक ! ’आज नक्की येणार आहे आपली आई’
’खोटं !’
’अरे, खरंच सांगतेय मी !’ ताईचा घास कोरडा पडतो. ’काल देखील तू असंच म्हणाली होतीस. पण आई आलीच नाही.’ त्याचं म्हणणं खर होतं आणि मग ताईचं तोंड बंद होतं. त्याऐवजी डोळे पाण्यानं भरून येतात. दत्ताच्या प्रश्‍नाचं उत्तर ती देऊ शकत नाही. एकदा ती अस्पष्टशी काहीतरी बोलली… ’आई, देवाघरी गेलीय’ देवाघरी ह्याचा अर्थ त्याला कधीच समजला नाही. पण त्यानंतर त्याला हळूहळू वाटायला लागलं … देवाघरी गेलेली आई आता परत कधी कधी येणार नाही… कधीच येणार नाही.
तो रविवारचा दिवस होता ! पहाटेच्या थंडगार वार्‍यामुळे गाढ झोपी गेलो होतो… आमच्या गावात जवळ जवळ सर्वच माणसे गाढ झोपी गेली होती. पहाटेचा तो शांत परिसर… तो निवांतपणा काळाला पटला नसावा. अन् त्या शांततेला काळानं प्रचंड धक्का दिलेला होता. त्या धक्क्यानं संबंध गाव जाग झालं. पण निश्चित काय घडलं असावं याचा कुणालाच अंदाज लागला नव्हता. जो तो हळहळत होता. उसासे सोडीत होता. मी अंदाज घेऊ लागलो. काय घडलं असावं ? पण काही कळण्या अगोदरच लांब दूरवर एक कुत्रा केविलवाण्या स्थितीत रडत असताना ऐकायला आलं. वातावरण अधिकच भेसूर… उदास झालं !
’फार वाईट झालं ! बाई… फार वाईट झालं !!’ माझ्या डोळ्यावर माझा विश्वासच बसेना ! असं काही पाहण्याची माझी ही पहिली वेळ ! पाहवलं नाही हे, मला ते ! दुसरं कुणीतरी हळहळलं. मी तिथे गेलो मात्र.. गप्पकन डोळेच मिटले. कोण होते ते ? काय घडलं तरी काय ? कुणीतरी दबक्या आवाजात उत्सुकतेने विचारीत होतं.
’अहो, रस्त्यावर केवढा मोठा अपघात झालाय. बघितला नाही तुम्ही ?’ एक भलामोठा ट्रक दुसर्‍या गाडीला आपटून ती धडक झाडावर आदळली.. ट्रकचा चक्काचूर झाला. मी सुस्कारा सोडला. असे अपघात या गावात कधीतरी घडतात. एखादा तर अपघात ! बहुदा ट्रक ड्रायव्हर जागच्या जागी ठार झाला असेल ! पण प्रत्यक्ष मात्र तसं घडलेलं नव्हतं. यापेक्षा आणखी भयंकर काहीतरी घडलं होतं !
एक मोटरट्रक त्या प्रचंड डोंगरावर आदळला होता. ट्रकचा चक्काचूर झाला होता. ड्रायव्हर वाचला होता. पण… पण… एक रस्त्यावरून जाणारी बाई मात्र त्या अपघातात ठार झाली होती.
’कोण होती ती बाई…?’ कुणीतरी विचारलं.
’ते ओळखताही आलं नाही मला ! अद्यापही ओळख पटलेली नाही. आपल्या गावातील कुणीतरी बाई असावी.’
’कोण असावी ती बाई…?
’त्या पहा, बायकाच धावत येत आहेत.’
”काय हो, कोण आहे ती बाई ?’
’गयाबाई… ?’
’गयाबाई…? गयाबाई…?’


वार्‍यासारखी बातमी संबंध गावात पसरली. संबंध गाव त्या बातमीनं थरारलं ! तिचा पती आक्रांतनं डोकं आपटू लागला. कोवळी मुलं मात्र वेड्यासारखी पाहत होती. काय घडलं हे त्यांना कळलंच नाही ! त्यांना कुणीच काही कळू दिलं नाही.
कुणीतरी आजीनं त्या पोरांना जवळ घेतलं. त्यांना थोपटलं… गोंजारलं… आईला तशा अवस्थेत पाहिलं तर पोरं घाबरतील… वेडीपिशी होतील.. त्यांच्या कोवळ्या मनावर परिणाम होईल… आणि म्हणूनच तिनं त्यांना आपल्या घरी नेलं होतं . भाकरी-भात खाऊ घातला होता. थोड्यावेळाने झोपी गेली ती मुलं !
तिच्या पतीनं धगधगत्या चितेकडे पाहत भरल्या डोळ्यांनी नि भरल्या कंठानं गयाबाईचा अखेरचा निरोप घेतला आणि तो तिथेच मटकन खाली बसला. दोघा मित्रांनी त्याला सावरलं. पण… पण तो आता कधीच सावरला जाणार नव्हता. त्याचं सर्वस्वच जणू हरपलं होतं. ताटातील चटणी भाकरीही काळानं हिरावून घेतली होती. आता नशिबी फक्त उरलं होतं दुःख… फक्त दुःख !
बिचारी गयाबाई अचानक निघून गेली. अत्यंत साधी… भोळी होती बिचारी ! कुणाशी भांडण नाही, सर्वांशी नम्रपणे बोलायची, कमीपणा घेण्यात तिला वाईट वाटत नसायचं ! तसंच तिला कुणापुढे लाचारीने वागणंही आवडत नसायचं !
नवर्‍याच्या पगारात भागत नव्हतं. महागाईला तोंड देता येत नव्हतं… आणि म्हणूनच ती ताजे मासे घेऊन बाजारात विकत होती. आपला संसार भला आणि आपला धंदा भला. न चुकता देवदर्शन करायचे. विठ्ठलाला सात फेर्‍या मारायच्या. मनोभावे दर्शन घ्यायचे. रस्त्यावरच्या आंधळ्या पांगळ्यांना पै-पैसे टाकायचा. अशा कठीण परिस्थितीतही मुलांना खूप शिकविण्याची तिची जिद्द होती. मुलांना चांगल्या मार्गाला लागलेलं तिला डोळे भरून पाहायचं होतं. ते तिचं हे स्वप्न साकार होण्याआधीच भंगलं होतं. शंभर तुकडे झाले त्यांचे !
जात-येता तो डोंगर अजूनही मला दिसतो. तिथून फिरकताना आता माणसांना भीती वाटते. झाडाजवळ कुणी थांबतही नाही. तो आता दिवसेंदिवस खंगत चालला आहे. आजूबाजूची माणसं त्याच्याकडे तुच्छतेने पाहताहेत. एका निष्पाप स्त्रीची आपल्या पायाशी पाशवी हत्या व्हावी, हा त्या डोंगराचा, त्या महापुरुषाचा मोठा अपमान होता. त्याच्या महानतेला तो सर्वात मोठा काळिमा लागला होता. कुणीतरी शाप द्यावा अशी त्या डोंगराची अवस्था झाली होती. त्याला हे लाजिरवाणं जीवन आता नकोसं झालं आहे. पानं पान गळू लागलं आहे. फांद्याही वाकल्या आहेत. जोराचा पाऊस अथवा वारा आला की एकेक फांदी काडकन मोडते. एक दिवस संबंध डोंगरच पायापासून कोसळेल की काय असं वाटू लागलं आहे.
आता कुणीतरी म्हणत, पहाटे या डोंगराजवळ गयाबाई उभी असते. जाणार्‍या येणार्‍या लोकांना ती कधी कधी दिसते. विचित्र हसते म्हणून हल्ली त्या बाजूला कुणी फिरकत नाही. खंगलेल्या डोंगराच्या नशिबी आता हेच जीवन आलं आहे. नको हे जीवन असं त्यास मनोमन वाटू लागलं आहे. तो आता वाट पाहतो आहे. प्रचंड वादळाची ! धरती दुभंगून जाणार्‍या विजेच्या कदादाची ! पण तसा पाऊस… वीज कधी येतच नाही… म्हणून तो डोंगर अद्यापही जगतो आहे मेल्यासारखा ! जगूनही मेल्यासारखा !!