स्वमान (Short Story: Katha – Swaman)

स्वमान (Short Story: Katha – Swaman)

स्वमान

जो तो आपल्या व्यापात, आपल्या कामात व्यग्र होता. रोजचं जीवन तसं सुरळीत चालत असताना गडद अंधार व्हावा अन् भिंतीवर डोकं आपटावं तसं झालं. माधवरावांना मोठा अपघात झाला.

सुजाताने घड्याळाकडे बघितलं. अजून रात्रीचे दोनच वाजलेले. गेल्या तीन-चार वर्षांपासून हे असंच चाललंय. सकाळ होण्याची वाट बघता बघता झोप कधीतरी लागते.
‘लक्ष्मीप्रसाद’… भव्य बंगला. कुणालाही हेवा वाटेल असा. सुजाता आणि सदानंदांचा संसार. ट्रक टायरचा व्यवसाय उत्तम चाललेला. सुजातासारखी हौशी, सुंदर आणि गुणी बायको. सदानंद स्वतः कर्तबगार. व्यवसायात दूरदृष्टी ठेवणारे. सुजयसारखा एकुलता एक मुलगा, त्या घराचं सर्वस्व होता. या तिघांकडे बघून लोक म्हणत, ‘कधी कधी देव एकावरच इतका मेहेरबान का होतो? धीस इज नॉट फेअर!’ हा हेवा, मत्सर स्पष्ट दिसायचा. सगळं कसं सुरेख, नीटनेटकं आणि दृष्ट लागण्यासारखं!
बंगल्याच्या बाजूच्या कोपर्‍यात माधवरावांचं जेमतेम दोन खोल्यांचं घर. बंगल्याला लागून असल्याने किमती वस्त्राला ठिगळ असावं, तसं वाटायचं. त्यांच्या दोन मुली. मोठी वेदिका आणि धाकटी देविका. माधवराव कुठे खाजगी कंपनीत कारकून. कावेरीकाकू तर अगदीच साध्या. घराच्या आसपास मात्र फुलबाग छान फुलवलेली. काटकसरी; पण समाधानी जीवन होतं त्यांचं! सुजय अधूनमधून गप्पा मारायला यायचा. वेदिका, देविका आणि सुजय यांची निष्पाप, निर्मळ मैत्री. शाळेतलं विश्‍व एकसारखं. त्यामुळे बोलायला खूप काही.
इथे सदानंदांना मात्र ही मैत्री मान्य नव्हती. माधवरावांचं घर डोळ्यात खुपायचं. पण काही करू शकत नव्हते. सुजयवर मात्र बरीच बंधनं घातली गेली.
शाळा संपली आणि तिघांनीही कॉलेज विश्‍वात प्रवेश केला. खरं तर, सुजयला मोठ्या शहरात हॉस्टेलवर राहायची इच्छा; पण त्याच्या आईवडिलांना मान्य नव्हतं. मुलगा नजरेसमोर हवा होता. कॉलेजचे दिवसही मंतरलेले होते. जीवनाच्या वसंतवैभवाचा सुवर्णकाळ! दोघी मुली शिकवण्या करून शिक्षण घेत होत्या आणि माधवराव त्यांच्या लग्नासाठी पै पै जोडत होते.
जो तो आपल्या व्यापात, आपल्या कामात व्यग्र होता. रोजचं जीवन तसं सुरळीत चालत असताना गडद अंधार व्हावा अन् भिंतीवर डोकं आपटावं तसं झालं. माधवरावांना मोठा अपघात झाला. जिवावरच बेतलं. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, “ऑपरेशन करावं लागणार.” लाख-दीड लाखाचा खर्च ‘आ’वासून उभा राहिला. काय करावं? नातेवाईक दुरूनच चौकशी करत. कुठून आणावे इतके पैसे? विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली. बाबा म्हणजे त्या घराचा, त्या घरातल्यांचा प्राण! कसं शक्य होईल? त्यांच्याशिवाय जीवन जगण्याचा विचारच भयंकर होता. कसंही, काहीही करून पैसे उभे केलेच पाहिजेत. अगतिकता, असहायता शापासारखीच असते; पण ऑपरेशनसाठी पैसा कुठून तरी आणायला हवाच होता.

सगळ्या भावना बाजूला सारून मन दगडासारखं केलं आणि पुढच्याच क्षणी वेदिका नि देविका सदानंदांसमोर उभ्या राहिल्या.
“काका, मदत हवीय. केलीत तर बाबांचा जीव वाचेल. तुमच्याशिवाय कोण आहे? जन्मभर उपकार विसरणार नाही!”
सदानंदरावांचं त्या घराशी वितुष्ट होतं; पण माणुसकी अजून शिल्लक होती.
“एका अटीवर देईन.”
“बोला, काका.” मुलींनी अधीरतेनं विचारलं.
“यापुढे तुम्ही इथं राहायचं नाही. आणखी कुठेही जा; पण या बंगल्याच्या आसपास दिसता कामा नये.”
“तसंच होईल, काका.” देवाचा प्रसाद घ्यावा, तसा चेक घेतला. सदानंदांच्या पायावर डोकं ठेवून निघून जाण्याचं वचनही दिलं. देवकृपेने माधवराव वाचले. तीन महिन्यात हिंडू-फिरूही लागले. कामावर रुजूही झाले; पण आवराआवरही सुरू झाली. कॉलेजचे आता काही शेवटचे दिवस. स्टँडवर जात असताना मागून येणार्‍या सुजयने हाक मारली, “ए देविका, थांब जरा!”
“हे बघ सुजय, यापुढे असा भेटू नकोस. बाबांना ते आवडणार नाही.”
“माहित्येय मला. पण ऐक, यापुढे मनात आणलं तरी भेटणार नाही. पण आपापल्या वाटेवर जाण्याआधी एक कप कॉफी घेऊ या?”
देविकाने होकार दिला. दोघे हॉटेलच्या दिशेने वळणार, इतक्यात सुजयचा जिवाभावाचा मित्र शौनक अचानक समोर आला.
“चला, आमच्या नवीन लॅबचं उद्घाटन झालंय. दाखवतो.”
तिघेही चालत निघाले. लॅबची इमारत जवळच होती. सुंदर, चकचकीत, अत्याधुनिक सुखसोयींनी युक्त! कोपर्‍यात तीन मोठ्या खोल्या होत्या. सुंदर निळसर रंग, मास्क घातलेले लॅब कर्मचारी.
“हे वेगळंच दिसतंय!” सुजय काहीशा आश्‍चर्याने म्हणाला.
“अरे, आपल्या शहरातली एकमेव स्पर्म बँक आहे.” सुजय, देविका चकीतच झाले.
शौनक भराभरा सगळी माहिती देत होता. देविका ओशाळल्यागत निमूटपणे सगळं बघत होती. मानवी प्रगती कुठून कुठे पोहोचली आहे! जीवन इतक्या गुंतागुंतीचं! शास्त्र-विज्ञानात प्रगती करता करता मानव स्वतःच ब्रह्मदेव बनू पाहतोय.
ऋतू बदलत राहिले. वर्षामागून वर्षं गेली. लक्ष्मीप्रसादच्या त्या कोपर्‍यात आता माधवरावांचं घर नाही; तिथे एक गॅरेज उघडलं गेलंय. बंगल्याला अवकळा आली होती. खरं तर, सुजाता आणि सदानंद यांच्यानंतर आता सुजयचा संसार तिथे बहरायला हवा होता. पण तसं काहीच झालं नाही. दोघं साठी पार केलेले. संपन्न आयुष्याच्या खाणाखुणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर होत्या. पण एक प्रकारची पोकळ शांतता…
नको नको वाटावी, भीषण वाटावी आणि एकदम रिती!
माधवरावांच्या कुटुंबाने आपला शब्द पाळला होता. वाहतुकीच्या कामाशी निगडीत एकाने ती जागा विकत घेऊन तिथे गॅरेज थाटलं. सुजयही उच्च शिक्षणानंतर परदेशी स्थायिक झाला. सुजाता-सदानंदांनी खूप मनधरणी केली; पण सुजयने ऐकलं नाही. निर्मोही होऊन सरळ निघून गेला. त्यांच्या नात्यात एक प्रकारचा अबोलाच होता. सुजयच्या बरोबरीचं मित्रमंडळ आयुष्यात स्थिरावलं होतं. गृहस्थाश्रमात रमलं होतं. व्यग्र होतं.
परदेशात सुजयला अ‍ॅना भेटली. मनमोकळ्या स्वभावाची, महत्त्वाकांक्षी, हुशार! दोघांची मैत्री वाढत गेली आणि एके दिवशी एकमेकांसोबत आयुष्य काढायचा निर्णय घेतला. औपचारिकता म्हणून घरी कळवलं. अ‍ॅना आणि सुजय आनंदी होते. सगळं छान चाललं होतं. आता सोबत्यांची कुटुंबं वाढली होती. एक-दोन मुलांचे पालकही झाले होते. सुजयलाही वाटू लागलं की, आता मुलं हवीत. त्याने अ‍ॅनापुढे हा विषय काढला. पण कसलं काय! अ‍ॅनाला मुलांमध्ये अजिबात रस नव्हता.
तिला जागतिक पातळीवर काम करायचं होतं. मुलांचा अडसर नको होता. आणि वाटलंच तर पुढे अ‍ॅडॉप्ट करू. अ‍ॅडॉप्शन इज सर्विस टू गॉड! ही तिची मतं. सुजय निराश झाला. अ‍ॅनाला खूप समजावलं. पण ती एकदम व्यवहारी होती. डोन्ट मेक इट अ‍ॅन इश्यू, असं तिनं सुजयलाच समजावलं. तो काहीच करू शकत नव्हता. घटस्फोट घेण्याइतकी टोकाची परिस्थितीही नव्हती. सगळं थांबल्यासारखं झालं. इतरांचे संसार फुलत चालले होते. आताशा मधूनच घराची आणि आईबाबांची आठवण येई. मनात खूप काही साठत गेलं. लाँग ड्राइव्हवर जाण्यासाठी त्याने कार काढली.
हायवेवर कार धावत होती. आसपासच्या मोकळ्या वातावरणाने मन पिसासारखं हलकं झालं. ‘जाऊ दे अ‍ॅनाचा विचार’ अस्तित्वच ढग होऊन आकाशात तरंगतंय, असं वाटत होतं. काय झालं कळलंच नाही.
डोळे उघडले तेव्हा हॉस्पिटलमध्ये होता. पूर्ण शुद्धीवर आल्यावर त्याला हळूहळू आठवलं. पोलिसांनी सगळी माहिती घेतली. कमरेखाली काही जाणवत नव्हतं. डॉक्टरांनी सांगितलं की, व्यायाम आणि औषधोपचारांनी सुधारणा होईल; कदाचित हिंडू-फिरू लागेल. पण भविष्यात तो पिता मात्र होऊ शकणार नाही! किती भीषण भविष्यवाणी! सुजाता-सदानंद गळूनच गेले. आईबाबांच्या स्वप्नांना सुरुंग लागला. एवढी संपत्ती, हे वैभव भोगण्याकरता पुढची पिढीच नव्हती. तो धक्काही त्यांनी कसाबसा पचवला. त्यांना नातवंडांची आशा होती.
तिथलं सगळं आवरून, सुजयला घेऊन ते लक्ष्मीप्रसादला परतले. “इट्स लाइफ… सच थिंग्स डू हॅपन…” म्हणून अ‍ॅना तिच्या मार्गाने गेली.
सगळंच रितं रितं झालं होतं. कोणताच मोहर येणार नव्हता. भविष्य समोर होतं… सुजयला आधार देत फिरणं. बघणं फार कष्टदायक होतं. पण हळूहळू सवय झाली. पैसा होता; पण उपभोगाची इच्छा नव्हती. एक प्रकारची विरक्तता, अलिप्तता होती. एकत्र असूनही एक प्रकारचं नीरस, आत्माहीन आयुष्य प्रत्येकाच्या वाट्याला आलं होतं.
चैत्र लागला असावा. वातावरणात बदल जाणवायला लागला. आज रविवार असल्याने सगळे घरीच होते. एरवीही काही फरक नसायचा. गेटवरून वॉचमनने जुन्या ओळखीचे लोक भेटायला येत असल्याची माहिती दिली. सुजय, सुजाता आणि सदानंद हॉलमध्ये येऊन बसले. उत्सुकता लागली होती. पोर्चमध्ये कार थांबल्याचा आवाज आला. ‘कोण बरं असावेत?’ जिन्यात पावलं वाजली. दोन-तीन जण असावेत. दारातून देविकाने प्रवेश केला. बरोबर दोन गोंडस मुलं होती. एक मुलगा आणि एक मुलगी. देविकाची बोटं घट्ट पकडलेली. आश्‍चर्यचकित होऊन बघत होती.
“देविका! तू देविका ना?”
सुजाताला उचंबळून आलेला आनंद लपवता आला नाही. सुजय, सदानंदही आश्‍चर्यचकित झाले होते.
“ये ये, बस ना! या मुलांनो, बसा!” सुजाता प्रेमाने म्हणाली, “अचानक कसे निघून गेलात तुम्ही? कुठे होतीस? बाकी सगळे कुठे आहेत?”
प्रश्‍नांच्या भडिमारानंतर देविकाने हळूहळू आपली सारी हकिकत सांगितली.
“गोड आहेत हं ही मुलं,” सुजाता प्रेमाने म्हणाली. देविका जरा वेळ थांबून सगळ्यांकडे बघत म्हणाली, “काका-काकू, तुमचीच नातवंडं आहेत ही!”


“आँ… काय?” सुजाता, सदानंद आणि सुजय तिघेही एकदम म्हणाले.
“नाही, नाही! माझा देविकाशी असा संबंध कधीच नव्हता!!” सुजय न राहवून म्हणाला.
पण सुजाता अधीरतेनं मुलांजवळ आली. “ही आपली नातवंडं? कशी?”
तितक्यात देविकाने कुणाला फोन केला. दीर्घ श्‍वास घेऊन गतकाळाबद्दल सांगायला सुरुवात केली.
सदानंदकाकांना वचन दिल्याप्रमाणे परीक्षेनंतर ते आपल्या खेडेगावी गेले. नोकरी नव्हती; पण लहानसहान कामं करत माधवरावांचं कुटुंब पुन्हा उभं राहिलं. वेदिकाचं लग्न होऊन ती तिथेच स्थिरावली. देविका मात्र घराबाहेर पडली. कॉम्प्युटरच्या परीक्षा देत शहरात नोकरी मिळवली आणि मीराकाकूंकडे पेईंग गेस्ट म्हणून राहू लागली. अधूनमधून शौनक भेटत होता. सुजयबद्दलची सगळी हकिकत कळली. मधल्या काळात सुजयने अ‍ॅनाबरोबर संसार थाटल्याचं कळलं, तेव्हा देविकाला बरं वाटलं. छान! आता काका-काकू एकटे असणार नाहीत. सदानंदकाकांनी केलेली मदत ती कधीच विसरू शकत नव्हती. आणि नियतीने एकदम सगळंच हिरावून नेलं. सुजय पिता होऊ शकला नाही. खरंच, लक्ष्मीप्रसाद आणि त्यात राहणार्‍या सर्वांना दृष्ट लागली. देविकाची तहानभूकच हरपली. सतत सुजयचा विचार, नजरेसमोर काका-काकूंचे दीनवाणे चेहरे! काय होऊन बसलं हे सगळं! महिनाभर विचार केला आणि देविकाने जगावेगळा निर्णय घेतला.
एकदा गप्पा मारताना शौनक म्हणाला होता, “आम्ही सगळे दूर असलो, तरी लॅबमध्ये एकत्र आहोत.” ते असं की, आईबाबा होण्याचे इच्छुक जोडपी तिथे येत. स्पर्म लॅब असल्याने त्यांची स्वप्नं साकार होत.  शौनक, सुजय आणि त्यांच्या मित्रांनीही स्पर्म डोनेट केले होते. सुजयच्या अपघाताचं आणि त्यानंतरच्या परिस्थितीचं कळल्यानंतर देविकाने एक धाडसी निर्णय घेतला. मीरा काकूंना विश्‍वासात घेतलं. शौनकच्या मदतीने सगळ्या औपचारिकता पूर्ण केल्या आणि सुजयचं द्रवरूपी अस्तित्व आपल्या शरीरात रुजू दिलं, वाढवलं आणि दोन गोंडस निरोगी मुलांना जन्म दिला.
फार फार कठीण प्रसंग आता समोर उभा राहिला. कसं करायचं? मीराकाकू, वेदिकाने मदत केली. आईबाबांनी तर तिच्याशी बोलणंच टाकलं. गरोदरपणात देविकाच्या मनात फक्त सुजय आणि काका-काकूंचा विचार असायचा. मातृत्वाची भावना कुठेही स्पर्श करत नव्हती. मुलं जन्मल्यावरही मनावर दगड ठेवून काळजीपूर्वक; पण निर्लिप्तपणे त्यांना मोठं केलं. समाजाची खूप बोचरी टीका सहन करावी लागली; पण सगळ्याला तोंड देत तिने आपला निर्णय तडीस नेला. फार कष्ट आणि वाईट परिस्थितीतून जावं लागलं. मुलांना कळू लागल्यावर लक्ष्मीप्रसाद, आजी-आजोबा आणि बाबा, सुजयबद्दल सांगत राहिली. आता ऑफिसची मोठी कामं असल्याने त्यांना आजी-आजोबांकडे राहावं लागण्याची मानसिक तयारीही करून घेतली. लॅबची सगळी कागदपत्रं, फोटो आणि इतर माहिती तंतोतंत खरी होती. त्यात शौनकनेही फोन करून पुष्टी केली. आज सुजाता, सदानंद आणि सुजयला त्यांचा अमूल्य ठेवा परत मिळाला.
हॉलमध्ये एकदम शांतता पसरली. दुसर्‍याच क्षणी सुजाताने हात पसरले, “आमच्या बछड्यांनो!” म्हणत त्यांना कवेत घेतलं. सुजय आनंदाने रडत होता. अ‍ॅना बरोबरचा तणाव, अपघाताचा धक्का आणि समोर असलेलं अविश्‍वसनीय; पण सुंदर सत्य! त्याने सरळ जाऊन देविकाचे पाय धरले. दोघंही बोलत नव्हते; पण शब्दांवाचून अडलंही नव्हतं.
जीवनाला जाग आली. रोमरोम बहरलं. लक्ष्मीप्रसाद आनंदाने फुलला. ‘ही आमची नातवंडं!’, ‘ही माझी मुलं, मी त्यांचा बाबा’ त्यांना अत्यानंदाचा आवेग आवरत नव्हता.
देविका सगळं बघत होती. तिच्या चेहर्‍यावर अतीव समाधान होतं. सदानंदकाकांकडे जाऊन म्हणाली, “काका, मी निघते आता.”
तिला थांबवत सदानंद म्हणाले, “अगं तू कुठे निघालीस? आता तू या घरची.”
“क्षमा करा, काका,” देविका शांतपणे म्हणाली, “माझ्या बाबांना वाचवण्यात तुमची मदत अनमोल होती. तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही. ही परतफेड समजा. सुजयला कोणीही चांगली मुलगी मिळू शकेल. हल्ली तर वेगवेगळ्या परिस्थितीत अ‍ॅडजस्ट करून लोक संसार थाटतात. आणि हो, माझा एक मित्र आहे. त्याला सगळं माहीत आहे. आम्ही लग्न करणार आहोत. तो माझी वाट बघतोय. तुम्ही सगळे सांभाळा. मी शक्य तेव्हा येईनच!”
बाल्कनीत उभी राहून सदानंद, सुजाता, सुजय आणि मुलं देविकाला पाहत होती. सगळ्यांची मनं आनंदानं फुललेली, बहरलेली. लक्ष्मीप्रसाद गुणगुणत होता.