शूर वीरांगना- झलकारीबाई (Short Story : Jhalkari...

शूर वीरांगना- झलकारीबाई (Short Story : Jhalkari Bai)

शूर वीरांगना- झलकारीबाई

 


– अनघा शिराळकर

यंदाचे 2022 हे साल आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी व ऑगस्ट क्रांतीचे 80वे वर्ष आहे. ब्रिटिशांविरुद्ध लढा देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या स्वातंत्र्य सेनानींमध्ये काही शूर वीरांगनांचे बलिदानही तितकेच महत्वाचे आहे. या वीरांगणांचे कर्तृत्व फार मोठे असूनही त्यांना फारशी प्रसिद्धी मिळालेली नाही. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आपण यापैकी झलकारीबाई या शूर वीरांगणेच्या शौर्याची कथा जाणून घेणार आहोत.
अविश्वसनीय व अतुलनीय शौर्य गाजवणार्‍या अनेक वीरांगना काळाच्या पडद्याआड गेल्या. त्यातील काहींच्याच कर्तृत्वाची दखल घेतली गेली. झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या काळातील झलकारीबाई या अशाच फारशी दखल न घेतलेल्या वीरांगनांपैकी एक. सदोबा सिंग आणि जमुनादेवी यांची कन्या झलकारीबाई यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1830 रोजी झांशी जवळच्या भोजला या खेड्यात झाला. झलकारीबाई लहान असतानाच त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यामुळे झलकारीबाई या एकुलत्या एक अपत्याचा सांभाळ सदोबा सिंग यांना एकट्यानेच करावा लागला.
झलकारीबाईंच्या शौर्याच्या कथा
अत्यंत गरीब परिस्थितीमुळे झलकारीबाईंना शाळेत जाऊन औपचारिक शिक्षण घेता आले नाही. पण त्यांना घोडेस्वारी व विविध शस्त्रे चालविण्याचे धडे व्यवस्थित मिळाले व त्यात त्या पारंगत झाल्या. एकदा त्यांच्या गावातील एका व्यापार्‍याच्या घरावर दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता तेव्हा एकट्या झलकारीबाईंनी दरोडेखोरांशी मुकाबला करून त्यांना पळवून लावले होते. जंगलात हल्ला करणार्‍या चित्त्याला पण झलकारीबाईंने भाल्याने मारले होते. झलकारीबाईंच्या अशाप्रकारच्या शौर्याच्या कथा झांशीमधील घराघरात सांगितल्या जातात.
झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या सैन्यातील पूरण सिंग नावाच्या शूर सैनिकाशी झलकारीबाईंचा विवाह झाला. पूरण सिंग हे शूर व कुशल सैनिक होते. त्यांना राणीच्या सैन्यदलात खूप मान होता.

हुबेहूब राणी लक्ष्मीबाई…
एकदा गडावर साजरा होणार्‍या गौरीपुजेला गावातील स्त्रियांबरोबर झलकारीबाई गेल्या. त्यावेळी झांशीची राणी लक्ष्मीबाई यांची नजर झलकारीबाईंवर पडली. त्याला कारण म्हणजे झलकारीबाईंचे दिसणे हुबेहूब राणी लक्ष्मीबाईंसारखे होते. अधिक चौकशीअंती झलकारीबाईंच्या शौर्याबद्दल राणी लक्ष्मीबाई यांना माहिती मिळाली. ताबडतोब राणीने आपल्या स्त्री सेनांनीच्या दलात झलकारीबाईंची भरती केली आणि ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी त्यांना तोफा चालवण्याचे प्रशिक्षण दिलं. झलकारीबाई केवळ धाडसी आणि शूर नव्हत्या तर त्या मुत्सद्दी देखील होत्या. त्यामुळे अल्पावधीतच त्यांनी राणी लक्ष्मीबाईंच्या निकटवर्तीयांमध्ये स्थान मिळवलं. शूर असूनही अतिशय नम्र व विनयशील असणार्‍या झलकारीबाई लवकरच आपल्या कर्तृत्वाने राणी लक्ष्मीबाई यांच्या सल्लागार या पदापर्यंत पोहचल्या.

झलकारीबाईंचे कर्तृत्व
ब्रिटिशांविरुद्ध 1857 च्या भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात झांशीची राणी लक्ष्मीबाई यांची महत्वाची भूमिका होती. 1858 साली ह्यूग हेन्री रोझ हे फिल्ड मार्शल होते. त्यावेळी झांशी पूर्णपणे ताब्यात घ्यायचीच म्हणून ब्रिटिशांनी झांशीवर हल्ला केला. राणी लक्ष्मीबाई यांचा ब्रिटीशांविरूद्धचा हा पहिला लढा होता. अवघ्या 4000 सैन्यासह राणीने ब्रिटीश सैन्याला तोंड दिले. राणीने गड ब्रिटीशांच्या ताब्यात जाऊ न देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण तिच्याच एका सेनापतीने विश्वासघात केला. पराजय होणार असे कळताच एका विश्वासू सेनापतीने राणीला तिथून निसटण्याचा सल्ला दिला. या मोक्याच्या क्षणी झलकारीबाई राणी लक्ष्मीबाईंच्या मदतीला धावून आल्या.

झलकारीबाईंनी निकराने लढा दिला
राणीच्या चेहर्‍याशी आपल्या चेहर्‍याच्या असलेल्या साधर्म्याचा फायदा उठवत झलकारीबाईंनी राणी सारखा वेश केला आणि राणीच्या ठिकाणी लढायला मैदानात उतरल्या. त्यांनी सैन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. धोक्याची तमा न बाळगता झलकारीबाईंनी धाडसाने सरळ ब्रिटीशांच्या फिल्ड मार्शल (जनरल) ह्यूग हेन्री रोझ यांच्या तंबूत घुसून त्यांना बोलण्यात गुंतवले, जेणेकरून राणीला निसटून जाण्यास संधी व वेळ मिळेल. याचा फायदा घेऊन राणी लक्ष्मीबाई ब्रिटीशांची नजर चुकवून घोड्यावर स्वार होऊन गडावरून निघून गेल्या व सुरक्षित ठिकाणी पोहचल्या. तुटपुंज्या सैन्याच्या बळावर झलकारीबाईंनी ब्रिटीशांच्या सैन्याला तोंड दिले. झलकारीबाईंना झांशीची राणी लक्ष्मीबाई समजून ब्रिटिश सैन्य लढत राहिले. झलकारीबाईंनी झोकून देऊन राणी लक्ष्मीबाईप्रमाणे निकराने लढा दिला. या लढाईने ब्रिटीशांना धडकीच भरली. हे शक्य झाले ते हुबेहूब राणीसारख्या दिसणार्‍या झलकारीबाईंमुळे.

झलकारीबाईंनी दिवसभर ब्रिटीशांना झुंजवत ठेवले.
दुसर्‍या दिवशी दूल्हाजू नावाच्या माणसाच्या लक्षात आले की त्या राणी लक्ष्मीबाई नसून झलकारीबाई आहेत आणि त्याने ही गोष्ट हेन्री रोझ यांच्या पर्यंत पोहचवली. चिडलेल्या रोझनी अपमानित भावनेतूनच झलकारीबाईंना विचारले की या गुन्ह्याबद्दल तुला कुठली शिक्षा द्यायची. तेव्हा त्यांनी न घाबरता रोझच्या डोळ्याला आपले डोळे भिडवून मला फाशी द्या असे सांगितले. पण झलकारीबाईंचा मृत्यू नेमका कसा झाला हे माहित नाही. बुंदेलखंडात झलकारीबाईंच्या मृत्यूबद्दल अनेक आख्यायिका आहेत. कोणी म्हणतात त्यांना फासावर लटकवले तर कोणी म्हणतात त्यांना सोडून देण्यात आले आणि पुढे 1858 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

अभिमान आणि आत्मसन्मानाचं प्रतिक
बुंदेलखंड प्रांतात झलकारीबाई यांना अतिशय आदराचं आणि मानाचं स्थान आहे. त्या अभिमानाचं आणि आत्मसन्मानाचं प्रतिक आहेत. तसेच पुढील पिढीला त्या अनुकरणीय ठरल्या आहेत. अभिमानी आणि आत्मसन्मानी झलकारीबाईंच्या शौर्याची दखल अनेक वर्षे इतिहासकारांनी घेतली नव्हती. पण अलिकडच्या काळात काही इतिहासकारांच्या प्रयत्नांमुळे या वीरांगनेच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला गेला. झलकारीबाईंच्या ग्वाल्हेरमध्ये त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच भारत सरकारने 2001 साली झलकारीबाईंचा फोटो असलेले टपाल तिकीटही प्रकाशित केले.