गुगली (Short Story: Goggly)

गुगली (Short Story: Goggly)

– विमल वझे

सध्याकाळी ऑफिस सुटल्यावर अनुजा घरी निघाली. तेव्हा आकाश भरून आलं होतं. पाऊस कधी सुरू होईल याचा नेम नव्हता. पाऊस सुरू होण्याआधी लवकर घरी पोहोचावं म्हणून ट्रेनमधून उतरल्यावर प्लॅटफॉर्मवरच्या खचाखच गर्दीतून धक्के खात अनुजा स्टेशनच्या बाहेर आली अन् जोराचा पाऊस सुरू झाला. धावत जाऊन ती जवळच्या एका दुकानाच्या आडोशाला उभी राहिली. जोरात कोसळणार्‍या पावसाचे तुषार तिला भिजवू लागले.
‘शी! आताच बरी पावसाला सुरुवात झाली…’ ती मनाशी चडफडत म्हणाली. तिला सकाळचा प्रसंग आठवला. ती ऑफिसला निघाली तेव्हा स्वच्छ ऊन पडलं होतं. छत्री न घेता बाहेर पडणार्‍या अनुजाला तिची आई…संध्याताई म्हणाल्या ‘अनुजा छत्री घेऊन जा हं…’
‘अगं आई आत्ता किती छान ऊन पडलंय बघ… काही नको छत्री. त्या ट्रेनमधल्या गर्दीत सर्व सांभाळताना किती त्रास होतो.’ अनुजा म्हणाली.
‘तू ऐकणारेस थोडेच? “पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाचा कधी नेम नसतो गं…” संध्याताई म्हणाल्या. तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून अनुजा छत्रीशिवाय बाहेर पडली. तिच्या मनात आलं. सकाळी आईच ऐकलं असतं तर बरं झालं असतं.
‘हाय अनुजा… आज उशीर?’ अनुजाला भिजत उभी असलेली पाहून बाईकवरून जाणार्‍या स्वप्निलने विचारले. ‘हो…’ अनुजाने घुश्शात उत्तर दिले.
‘चल… भिजत नको उभी राहू… बस बाईकवर…’ स्वप्निल म्हणाला.
‘ नाही तू जा… मी पाऊस थांबल्यावर येईन.’
‘किती वेळ पावसात उभी राहणार आहेस? पाऊस लवकर थांबेल असं वाटत नाही.’
‘नको तू जा…’ अनुजा म्हणाली.
‘उगीच नखरे करू नको. लवकर बस मागे.’ स्वप्निल म्हणाला.
स्वप्निल आणि अनुजा एकाच सोसायटीत राहत. स्टेशनपासून जवळ असलेल्या सागर सोसायटीत एकूण चार बिल्डिंग होत्या. ए बिल्डिंगमध्ये दुसर्‍या मजल्यावर अनुजा राहायची. तिच्या समोरच्या डी बिल्डिंगमध्ये स्वप्निल राहत असे. दोन्ही ब्लॉकच्या बाल्कनी समोरासमोर होत्या. प्रत्येक बिल्डिंगमध्ये सोळा ब्लॉक असलेली ती सोसायटी, टुमदार कॉलनी झाली होती. बरेच वर्ष एकत्र राहिल्यामुळे सोसायटीतील सर्व कुटुंब खेळीमेळीनं रहात. सोसायटीच्या मेन गेटवर वॉचमन असल्यामुळे लहान मुले मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत बिनधास्त खेळत असत. सर्व लोक एकत्र येऊन गणेशोत्सव, दीपावली, संक्रांत वगैरे उत्सव साजरे करीत.
स्वप्निलचे आईवडील म्हणजे देशपांडे कुटुंब आणि अनुजाचे आईवडील म्हणजे बर्वे कुटुंब ही सोसायटी नवीन झाल्यावर एकाच वेळी राहायला आले. शिवाय दोघेही एकाच बँकेत असल्यामुळे त्यांचा विशेष घरोबा होता. स्वप्निलची आई वर्षाताई आणि अनुजाची आई संध्याताई या दोघी मैत्रिणी होत्या. वर्षाताईंना स्वप्निल आणि जुई अशी दोन मुले होती. तर संध्याताईंना अपर्णा आणि अनुजा या दोन मुली होत्या. बघता बघता मुले मोठी झाली. शिक्षण पूर्ण करून मार्गाला लागली. संध्याताईंच्या अपर्णाचे लग्न झाले. आणि ती पुण्याला गेली. दिसायला सुंदर, शिकलेली अनुजा वर्षाताईना सून म्हणून पसंत होती…. तर स्वप्निलसारखा हुशार शिकलेला जावई म्हणून संध्याताईंना योग्य वाटला होता. दोघेही शिक्षण संपवून सेटल झाल्यामुळे लवकरच लग्न करायचे ठरले होते.
पाऊस कमी व्हायच्या ऐवजी जास्त पडू लागला. दोघेही भिजले होते. रेस्टॉरंटपाशी बाईक थांबवून स्वप्निल म्हणाला, ‘चल कॉफी घेऊया.’
‘मला नकोय… तुला पाहिजे तर तू जा. मी जाईन भिजत…’, अनुजा नाखुषीने म्हणाली.
‘जास्त नखरे करू नको. येतेस का हात धरून नेऊ?’
चिडून अनुजा म्हणाली, ‘उगीच आले तुझ्याबरोबर.’ तिच्याकडे मिश्किलपणे बघत स्वप्निल म्हणाला, ‘बाईसाहेबांना भिजत ठेवून मी एकट्याने कसा येऊ?’ कॉर्नरजवळ असलेल्या टेबलवर बसल्यावर स्वप्निल म्हणाला. ‘मला सॉलिड भूक लागलीय. शिवाय इथला वडाही फेमस आहे. तू घेणार नं?’ तिच्या उत्तराची वाट न पाहता स्वप्निलने ऑर्डर दिली.
खूप दिवसांनी अनुजा त्याच्याबरोबर आली म्हणून स्वप्निल खुशीत होता. ‘खरंच अनु, असा कोसळणारा पाऊस… सोबत तू… आणि गरमागरम वाफाळलेली कॉफी…आहाहा… काय मस्त वाटतंय गं….’ स्वप्निल मूडमध्ये येऊन म्हणाला.
‘आणि रिया बरोबर असली की खूपच धमाल येत असेल नं?’ , अनुजाने त्याला टोमणा मारला.
‘अरे बापरे! त्या दिवशी रियाबरोबर कॉफी घेतली ते कळलं वाटतं?’
‘मांजराने डोळे मिटून दूध प्यायलं तरी दुसर्‍यांना कळतंच!’
‘अगं काय झालं… तिचा बर्थ डे होता. ती फ्रेन्डस्ना ट्रिट देणार होती. अचानक मी भेटलो. बर्थ डे आहे हे कळल्यावर तिला विश केलं. ती म्हणाली ‘चल… म्हणून गेलो त्यांच्याबरोबर. ‘इटस् सो फॉर्मल… नथिंग एल्स्…’
‘मला काय करायचं आहे तू कोणाबरोबरही कुठे गेलास तरी.’ अनुजा फणकार्‍याने म्हणाली.
‘कमाल आहे अनु तुझी… कुठला विषय कुठे नेतेस? हल्ली तुला झालंय तरी काय? पूर्वीसारखी भेटत नाहीस. बोलत नाहीस.’, स्वप्निल म्हणाला.
तेवढ्यात वेटरने कॉफी आणली. काही न बोलता अनुजा कॉफी पिऊ लागली. कॉफी प्यायल्यावर अनुजाला फ्रेश वाटलं. पाऊसही थांबला होता. अनुजा घरी आली तेव्हा संध्या आपल्या लेकीची वाट पाहत होती. ‘भिजलीस का गं अनु? छत्री नेली नव्हतीस म्हणून काळजी वाटत होती.’
‘आई तू पण ना… कमाल करतेस… कसल्या फालतू गोष्टीची काळजी करत बसतेस?’
‘तुम्ही मुलं बिनधास्त असता. आईचं मन नाही कळायचं तुला. तू फ्रेश हो. मी कॉफी ठेवते.’
‘मला नकोय कॉफी’, अनुजा वैतागून म्हणाली.
‘का? काय झालं? रोज तर अगदी आल्या आल्या कॉफी हवी असते.’
‘स्वप्निल भेटला स्टेशनवर. त्याच्या बाईकवरून आले. तेव्हा वाटेत कॉफी घेतली.’
‘स्वप्निल चांगला मुलगा आहे. त्याला किती मॅनर्स आहेत. सगळ्यांची काळजी घेतो.’
‘चांगला? दुसर्‍यावर इम्प्रेशन मारायची एकही संधी सोडत नाही.’ अनुजा वैतागून म्हणाली.
आपल्या लेकीला काय झालंय हेच संध्याला कळेना. हल्ली स्वप्निलचा विषय निघाला की अनुजा चिडते, असं संध्याच्या लक्षात आलं होतं. परवा वर्षा… स्वप्निलची आई भेटली होती. लवकरच स्वप्निल आणि अनुजाच्या साखरपुड्याचा मुहूर्त धरूया असं म्हणाली… आणि ही असं बिथरल्यासारखं का बोलते कुणास ठाऊक.
अनुजा कपडे बदलून टी.व्ही. समोर बसली. हातातल्या रिमोटशी चाळा करत होती. पण विचारात हरवली होती. काही केल्या रियाचा विषय तिच्या डोक्यातून जाईना. तिला तो दिवस अजून आठवत होता. आंघोळ झाल्यावर शॅम्पूने धुतलेले केस सुकवित ती बाल्कनीत उभी होती. आज रविवार असल्यामुळे सोसायटीत शांतता होती. इतक्यात मेन गेटमधून एक ट्रक आला. ट्रक पार्क करून ड्रायव्हर खाली उतरला. सी बिल्डिंगमधले कारखानीस काका नेहमीप्रमाणे मार्केटमध्ये खरेदी करून भली मोठी भाजीची पिशवी घेऊन येत होते. ड्रायव्हरने त्यांना लिहिलेला पत्ता दाखवला. त्यांनी स्वप्निलच्या शेजारी असलेल्या पाटकरांच्या ब्लॉककडे निर्देश केला. सहा महिन्यांपूर्वी पाटकर रिटायर झाले आणि पुण्याला सेटल झाले. तेव्हापासून ब्लॉक रिकामा होता. पाटकरांना हा ब्लॉक विकायचा होता. स्टेशनपासून जवळ असलेल्या सागर सोसायटीतला हा ब्लॉक मोक्याच्या जागी आणि प्रशस्त होता. खूप लोक या ब्लॉकच्या चौकशीसाठी येत पण किंमत ऐकून परत जात. ड्रायव्हरने वर जाऊन सामान आल्याची वर्दी दिली आणि सामान उतरवायला सुरुवात केली. तेवढ्यात जीन्स आणि टॉप घातलेली एक सुंदर आणि स्मार्ट मुलगी खाली येऊन त्यांना सूचना देऊ लागली. डायनिंग टेबलचा सेट, सोफा सेट, शो पिसेस, वगैरे महागडं सामान दिसत होतं.
आईने हाक मारली म्हणून अनुजा आत आली. ‘आई, पाटकरांच्या ब्लॉकमध्ये कुणी राहायला आलंय वाटतं.’
‘बरं झालं. परवा वर्षा भेटली ती म्हणत होती, पाटकरांचा शेजार गेल्यापासून करमत नाही. पाटकर काकू स्वभावाने खूप चांगल्या होत्या. वर्षाला त्यांची खूप मदत व्हायची.’ संध्याताई म्हणाल्या.
स्वप्निलची धाकटी बहीण जुई आर्किटेक्टच्या फायनल इयरला होती. तिला विश करायला अनुजा गेली. घरात गेल्या गेल्या अनुजा म्हणाली, ‘वा! मावशी काय सुंदर वास सुटलांय… आज काय स्पेशल?’
‘बरं झालं आलीस… मी विचार करत होते. अगं मटारच्या कचोर्‍या केल्या आहेत. तुला आवडतात म्हणून पाठवणार होते, पण जुईचा अभ्यास आणि स्वप्निल टी.व्ही. वरची टेनिस मॅच बघत बसला आहे. ये स्वयंपाक घरात.’ तिच्या हातात कचोरी आणि चटणीची डिश देत वर्षाताई म्हणाल्या.
तितक्यात बेल वाजली. ‘आन्टी आहात का घरात?’ शेजारच्या घरात राहायला आलेली ती मुलगी विचारत होती.
‘ये… ये ना..’ वर्षाताईंनी तिला स्वयंपाकघरात बोलावले अन् म्हणाल्या ‘अनुजा तुझी ओळख करून देते…. ही रिया.’ हस्तांदोलनासाठी हात पुढे करत ती म्हणाली ‘हॅलो ग्लॅड टू मीट यू… हाऊ नाईस…’
‘रिया अमेरिकेत असते. तिथे काहीतरी रिसर्च करते. हिचे वडील आर्मीत आहेत. सध्या त्यांचे पोस्टिंग काश्मीरमध्ये झाले आहे. लवकरच रिटायर होऊन इथं आपल्या शेजारी राहायला येणार आहेत. रिया मदतीसाठी आली आहे इथे.’, वर्षाताई म्हणाल्या.
अनुजाकडे पाहत ती गोड हसली तेव्हा तिचे सुंदर हात चमकले. गोरीपान…घार्‍या डोळ्यांची… चेहर्‍यावर आत्मविश्‍वास, असं छान व्यक्तिमत्त्व होतं तिचं. पहिल्याच भेटीत ती कुणालाही आवडली असती. एका डिशमध्ये कचोरी घालून त्या म्हणाल्या, ‘रिया तुला आवडली का कचोरी?’ हातात डिश घेत ती म्हणाली, ‘वॉव… आय लव्ह इट… इंडियन फूड खूप आवडतं मला. आन्टी मला शिकव हो…’
सागर सोसायटीला यंदा पंचवीस वर्ष पूर्ण झाली म्हणून रजत महोत्सव साजरा करायचा असं सोसायटीतल्या लोकांनी ठरवलं. निरनिराळ्या स्पर्धा, एकांकिका, ट्रीप आणि सहभोजन असा जंगी कार्यक्रम ठरला. सोसायटीतील तरुण मुलामुलींनी उत्साहाने भाग घेतला होता. कार्यकारी मंडळाचा स्वप्निल मुख्य सेक्रेटरी होता. सोसायटीतील सर्व तरुण मुलं आणि मुली उत्साहाने कामे करत होती. नवीन आलेली रिया आनंदाने त्यात सहभागी झाली होती. सर्व कार्यक्रम ठरवण्यासाठी रोज रात्री मिटिंग होत असत.
तीन दिवसांचा उत्सव दणक्यात पार पडला. तीन दिवस सोसायटीत धमाल होती. निरनिराळ्या स्पर्धा, डान्स, ऑर्केस्ट्रा अशा कार्यक्रमांमुळे खूप मजा आली. रियाने सर्व कार्यक्रम एन्जॉय केले. संगीतखुर्ची स्पर्धेच्या वेळी धावताना ती पडली आणि पाय फ्रॅक्चर झाला. स्वप्निलने तिला डॉक्टरकडे नेले. गेल्या काही दिवसांत स्वप्निलची रियाशी झालेली जवळीक पाहून अनुजा अपसेट झाली. रियाचा पाय पूर्ण बरा होईपर्यंत स्वप्निलने तिला खूप मदत केली होती.
भाद्रपद महिना सुरू झाला आणि सगळीकडे गणेशोत्सवाची गडबड सुरू झाली. अनुजाच्या घरी गणपती नसायचा परंतु स्वप्निलच्या घरी गणपती थाटात यायचा आणि गौरीबरोबर विसर्जन व्हायचे. दरवर्षी स्वप्निल नावीन्यपूर्ण आरास करायचा. अनुजा मदतीसाठी असे. स्वप्निल, जाई आणि अनुजा रात्र रात्र जागून सुंदर मखर बनवीत असत. पण या वर्षी अनुजा अजिबात गेली नाही. एक दोनदा स्वप्निलने फोन केला तेव्हा काहीतरी सबब सांगून तिने जाण्याचं टाळलं.
नेहमीच्या उत्साहात स्वप्निलच्या घरचा गणपती आला. दरवर्षी आरतीला येणारी अनुजा या वर्षी आली नाही म्हणून स्वप्निलच्या आईने संध्याताईंना फोन केला. नेमका अनुजाने फोन घेतला. ‘हॅलो… अनुजा कशी आहेस? ठीक आहे मी….’ अनुजा म्हणाली.
‘अगं या वर्षी गणपती आणायला आली का नाहीस? आरतीलासुद्धा येत नाहीस…. दरवर्षी गणपतीची आरास करायला येतेस. यंदा का नाही आलीस?’ वर्षाताईंनी विचारले असता अनुजा काहीच बोलली नाही. ‘बरं उद्या गौरीचं हळदीकुंकू आहे. मदतीला ये. जुईचं नेमकं प्रॅक्टिकल आहे. तिला वेळ नाहीये…’ वर्षा म्हणाली.
‘बरं….’ म्हणून अनुजानं फोन ठेवला.
या वर्षी गणपतीला जायचं नाही असं अनुजानं मुद्दामच ठरवलं होतं. गेले काही दिवस स्वप्निलच्या घरी रियाचं जाणंयेणं वाढलं होतं, ते अनुजाला आवडत नव्हतं. गणपती घरी आणायच्या वेळी सुद्धा स्वप्निल आणि जुईबरोबर रिया उत्साहाने गेली होती. वर्षामावशीनं गौरीच्या हळदीकुंकवाला आमंत्रण केल्यावर जाणं भागच होतं.
गौरीच्या दिवशी संध्याकाळी छानपैकी तयार होऊन संध्याताईंबरोबर ती स्वप्निलच्या घरी गेली. गेल्या गेल्या वर्षा म्हणाली,‘ अगं ये.. ही रिया साडी नेसायचं म्हणतेय. माझी साडी दिली आहे तिला… पण तिला नेसता येत नाही… तिला अमेरिकेत ड्रेसची सवय आहे नं… जरा नेसव तिला.’
‘ओ.के. आन्टी…शी विल टिच मी’, असं म्हणून रिया साडी घेऊन तिच्याजवळ आली. अनुजानं तिला साडी नेसवली. तिचा पदर पिनअप केला. गोरीपान शेलाट्या बांध्याच्या रियाला ती मोरपंखी मोठ्या काठाची साडी खुलून दिसत होती. रिया आरशापुढे जाऊन उभी राहिली. आरशातील आपली छबी पाहून ती एक्साइट झाली. ‘ओह… माय गॉड. आय कान्ट बिलिव्ह. इटस् मी.’, मोठाले डोळे करत ती म्हणाली. तिने अनुजाचे पुन्हा पुन्हा आभार मानले. आपल्या डिजिटल कॅमेर्‍यावर स्वप्निलला फोटो काढायला लावले. अनुजासोबत फोटो काढले. रियाचे सगळ्यांबरोबरचे फ्री वागणे अनुजाला अजिबात आवडलं नाही.
गाढ झोपलेल्या अनुजाचा सेलफोन वाजला आणि जाग आली. तिने घड्याळात पाहिले… रात्रीचे बारा वाजून गेले होते. झोपाळू डोळ्यांनी तिने मोबाईल कानाला लावला. ‘हॅप्पी बर्थ डे.’ स्वप्निलने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
‘माझी झोपमोड करून एवढ्या रात्री फोन करायचं अडलं होतं का? सकाळी फोन करता आला नसता?’ अनुजा म्हणाली.
‘अं… हं… सगळ्यांच्या आधी मला शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि तसं पण नंतर तू म्हणाली असतीस की, आत्ता आठवण झाली का?’
‘बरं ठेवू फोन?’
‘वा ग वा! दरवर्षीप्रमाणे तुझ्या नेहमीच्या आवडत्या हॉटेलात सेलिबे्रट करूया नं… उद्या ऑफिस सुटल्यावर संध्याकाळी वाट बघतो..’
‘सॉरी… मला जमणार नाही.’
‘आता का बाईसाहेब रुसल्या? दरवर्षी आपण दोघं करतो की सेलिबे्रट?’
‘तुझ्या शेजारणीला मदत करण्यापुढे तुला वेळ मिळाला तर ना?’
‘कम ऑन अनु… तुला कसं पटवू? रिया इतके दिवस अमेरिकेत होती. सध्या ती इथं एकटी आहे आणि माझ्या शेजारी राहते. काही अडचण आली तर मदत करायला नको?’
‘मी कुठे काय म्हणते? तू खुशाल तिची कामं करत बस… पण अमेरिकेत राहिलेल्या मुलीला मदत लागते? त्या तर एकदम बिनधास्त असतात.’
‘तू गैरसमज करून घेते आहेस. बरं ते जाऊ दे. उद्या भेटल्यावर बोलू. मी नेहमीच्या हॉटेलजवळ तुझी वाट बघतो.’
‘मी काही उद्या हॉटेलात येणार नाही.’
‘अनु प्लीऽजऽ अगं ऐक ना…’
अनुजाने फोन कट केला. पण नंतर तिला हुरहुर लागली. तिला झोप येईना.
आज अनुजाचा वाढदिवस म्हणून सकाळी ऑफिसला जायच्या आधी संध्याने तिला औक्षण केले. तिच्यासाठी खरेदी केलेली जीन्स आणि टॉप तिला दिला. नवीन जीन्स आणि टॉप घालून अनुजा ऑफिसला गेली. जाताना सगळ्यांसाठी केक घेऊन गेली. ऑफिसमध्ये सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या. दिवसभर सगळ्यांचे फोन येत होते. ऑफिसमधून घरी जाताना अनुजा अस्वस्थ झाली. स्वप्निलने बोलावल्याप्रमाणे जावं का हॉटेल ‘सनशाइन’मधे? अनुजाचे ते फेवरेट हॉटेल होते. तिथल्या सर्व पदार्थांची चव तिला आवडायची. म्हणून दर वाढदिवसाला स्वप्निल तिला तिथे ट्रीट द्यायचा. फोनवरच काल स्वप्नीलला येणार नाही म्हणून सांगितलंय. मग आता तिचा इगो आड आला आणि तिने जायचं नाही असा निर्णय घेतला. त्यामुळे स्वप्निल दुखावला. त्या दिवसानंतर स्वप्निल पूर्वीसारखा तिला फोन करत नसे. वाढदिवसाला तिने त्याच्याबरोबर जाण्यास नकार दिल्यामुळे जाता येता भेट झाली तरी तो तिच्याकडे दुर्लक्ष करायचा. तिने ठरवलं, आपणही त्याला फोन करायचा नाही. गेला उडत…
त्या दिवशी ती ऑफिसमधून घरी आली तेव्हा तिची मोठी बहीण अपर्णा पुण्याहून आली होती. ‘अरे… तू कशी अचानक आलीस?’ अनुजाने विचारले. तेव्हा ती म्हणाली, ‘अग… अभिजित काही दिवस टूरवर गेलाय. मी एकटीच असल्यामुळे इथं यायचं ठरवलं.’
‘किती छान… नाहीतरी मी हल्ली खूप बोअर झाले होते. तू आल्यामुळे मला कंपनी मिळाली.’ अनुजा म्हणाली. अपर्णा आल्यामुळे आईबाबांनाही आनंद झाला. घरात उत्साहाचे वातावरण बनले.
अपर्णाला माहेरी येऊन आठवडा झाला.रोज अनुजा ऑफिसमधून आली की दोघी बाहेर फिरायला जात. काहीबाही शॉपिंग करत. पण आज संध्याकाळी ती आली तेव्हा स्वयंपाकघरात संध्याताईची गडबड चालली होती. तिने पुरपोळीचा बेत केला होता. स्वयंपाकघरात येऊन अनुजा म्हणाली. “वा! आज अपर्णासाठी खास बेत दिसतोय. आज काय स्पेशल?” तेवढ्यात अपर्णाने डब्यात पुरणपोळ्या भरल्या आणि डबा घेऊन आईला म्हणाली, “मी जाऊन येते गंऽऽ”
“हे काय? तू कुठे निघालीस?” अनुजाने विचारले.
“स्वप्निलकडे…” अपर्णा म्हणाली.
“स्वप्निलकडे?”
“हो… आज त्याचा वाढदिवस आहे नं… त्याला आईच्या हातच्या मऊसूत आणि खुसखुशीत पुरणपोळ्या खूप आवडतात… म्हणून मुद्दाम आईने केल्या आहेत.” असं म्हणून अपर्णा गडबडीने गेली.
अनुजाला गिल्टी वाटलं…. ओ माय गॉड… आज त्याचा वाढदिवस कसा विसरलो आपण? शी! त्याला काय वाटेल? ती घाईघाईने त्याला सेलवर कॉन्टॅक्ट करू लागली. फोन डिसकनेक्ट झाला. परत तिने फोन कॉल केला. स्वप्निलने फोन स्वीच ऑफ केला होता. तिला काही सुचेना. गेले काही दिवस आपण त्याच्याशी बोलत नव्हता. रियाशी झालेल्या फे्रण्डशिपमुळे आपण चिडलो. ते खरं आहे. पण आता त्याने सिरीअसली घेतलं आहे असं दिसतंय. त्याच्या घरी जाऊन त्याला बर्थ डे विश करावं का?
काय करावं असा ती विचार करीत होती तितक्यात स्वप्निलच्या घरून अपर्णा आली. आल्या आल्या ती संध्याताईला म्हणाली. “आई स्वप्निलच्या साखरपुड्याची तारीख ठरली बरं का? वर्षामावशीने हॉलसुद्धा बुक केलाय…”
“हो मला ती म्हणतच होती. वीस तारखेचा मुहूर्त चांगला आहे म्हणून. हॉल मिळाला ते बरं झालं.” संध्याताई आनंदाने म्हणाल्या.
“साखरपुडा? कुणाचा?” अनुजाने विचारलं.
“स्वप्निलचा…” असं म्हणून अपर्णा उत्साहाने सांगू लागली. “आई अग… वर्षामावशीनं काय काय तयारी केलीय. थाटात साखरपुडा करायचा म्हणत होती.”
“हो नं… तिला खूप हौस आहे. सुनेचं हौशी हौशीनं करील… पण आता घाई होईल नाही.”
अपर्णा व आई उत्साहाने आणि आनंदाने स्वप्निलच्या साखरपुड्याबद्दल बोलताना पाहून अनुजा जाम नर्व्हस झाली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिने अपर्णाला विचारलं, “अग, स्वप्निलचा साखरपुडा कोणाबरोबर आहे? रियाबरोबर आहे नं?”
“अग घाईमधे तेच विचारायचं विसरले बघ. तू फोन करून विचारतेस का स्वप्निलला?” असं म्हणून ती आणि संध्याताई पुन्हा बोलण्यात गुंतल्या. अनुजाला तिथे बसणं अशक्य झाले. ती उठून खोलीत जाऊन विचार करत बसली. तिला वाटलं, रियाच्या आणि स्वप्निलच्या मैत्रीविषयी आपल्याला आलेली शंका खरी ठरली. रियासारखी सुंदर, हुशार, फॉरेन रिटर्न मुलगी मिळाल्यावर स्वप्निल बदलला. पण इतके वर्ष असलेल्या माझ्या आणि त्याच्या फ्रेंडशिपचे काय? आयुष्याचा भावी जोडीदार असं आम्ही एकमेकांनी ठरवलं होतं. वर्षामावशीने भावी सून म्हणून आपली काही जणांशी ओळख करून दिली होती. मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमधे आम्ही लग्न कधी करणार असं नेहमी विचारत असत. एवढंच काय आमच्या दोघांच्या आईवडिलांना आमच्या लग्नाला संमती दिली होती. स्वप्निलचे करिअर… चांगल्या जॉबसाठी धडपड यामुळे लग्न लांबत होते. आणि काही दिवसांपूर्वी आलेल्या रियामुळे तो एकदम बदलला.
अनुजाने सेलवर त्याला कॉल केला. मोबाईल स्वीच ऑफ होता. ती निराशेने रडू लागली. तिला काळोखात बसलेली पाहून अपर्णा तिथे आली आणि तिला रडताना पाहून तिने विचारले, “काय गं तुला बरं नाहीय का?” ती जोरात रडू लागली. “स्वप्निलचा साखरपुडा आहे, म्हणून तुला वाईट वाटतंय का?”
“मग? त्याचे हे वागणे बरोबर आहे का?” तिने रागाने उसळून विचारले.
“अग अनुजा हल्ली तुझं आणि त्याचं बिनसलं होतं नं? स्वप्निल सांगत होता, त्याच्याशी बोलत नाहीस. कितीही फोन कॉल आणि एस.एम.एस. केले तरी रिस्पॉन्स देत नाहीस.” अपर्णा म्हणाली.
“मी त्याच्यावर चिडले होते… कारण रियाशी त्याची खूप फ्रेंडशिप झाली होती. त्याच्या घरीसुद्धा रियाचे जाणे येणे वाढलं होतं. मला ते आवडत नव्हतं. पण आमची इतक्या वर्षाची रिलेशन तो कसा विसरला? त्याला मनासारखा जॉब मिळाल्यावर लग्न करायचं असं ठरलं होतं नं? अन् आता त्याने माझा विश्‍वासघात केला…” असं म्हणत अनुजा जोरात रडू लागली.
“जाऊ दे गऽऽ तुला दुसरा चांगला नवरा मिळेल… अगदी तुझ्या मनासारखा वागणारा…” अपर्णा तिला समजावत म्हणाली.
“नाही अपर्णा… स्वप्निलशिवाय मी दुसर्‍या कुणाशीही लग्न नाही करू शकणार.”
दुसर्‍या दिवशी ऑफिसला न जाता अनुजा संबंध दिवस उदास बसून राहिली. तिने काही खाणंपिणंही केलं नाही. स्वप्निलशी बोलण्यासाठी तिने पुष्कळ वेळा प्रयत्न केला. पण दरवेळी तो फोन कट करत होता. पूर्वी स्वप्निलने फोन किंवा एसएमएस केले तरी ती त्याला रिस्पॉन्स देत नसे. स्वप्निल आता आपल्याला धडा शिकवतो आहे हे तिने ओळखले. तिला काही सुचेना. ती संध्याताईंना म्हणाली. “आई तू आणि बाबा जाऊन स्वप्निलला जाब विचारा. माझ्याशिवाय तो दुसर्‍या कोणाशी साखरपुडा कसा करू शकतो?”
“अग अनुजा आईबाबांना तो जर म्हणाला, तुझ्यामुळेच मी असा निर्णय घेतला.. तर? शिवाय गेले काही दिवस म्हणजे रिया आल्यापासून तर तू त्याच्याशी बोलत नव्हतीस… तो त्याचा वैयक्तिक प्रश्‍न आहे असंही तो म्हणू शकतो.” अपर्णाने शंका काढली. आईबाबांनीही तिच्याप्रमाणेच मत व्यक्त केले. स्वप्निलच्या साखरपुुड्याविषयी कोणीच सिरीअस दखल घेत नव्हतं. उलट अपर्णाने आणि आईने स्वप्निलच्या साखरपुड्याच्या दिवशी नेसण्यासाठी नवीन साड्या घेतल्या. बाबाही उत्साही होते.
त्या दिवशी रविवार होता. सकाळी नाष्ट्यासाठी आईने बटाटेवड्याचा बेत केला होता. आई गरमागरम बटाटेवडे तळत होती. अपर्णाने डायनिंग टेबलवर नाष्ट्याची तयारी केली. सगळीकडे बटाटेवड्यांचा खमंग वास सुटला होता. तिला स्वप्निलची आठवण झाली. त्याला बटाटेवडे खूप आवडतात.
“अनुजा… चल गरम गरम वडे खाऊन घे.” अपर्णा म्हणाली.
“नको… मला भूक नाही.”
“भूक नसायला काय झालं? कालही जेवली नाहीस. अशाने आजारी पडशील…”
“पडले तर पडू दे आजारी… माझ्याबद्दल कुणाला काही वाटत नाही.”
तितक्यात बेल वाजली. अपर्णा दार उघडायला गेली. अनुजा खोलीत जाऊन रडत बसली. बाहेर आई, बाबा, अपर्णा मजेत बोलत होती.
“ये.. स्वप्निल” बाबा उत्साहाने म्हणाले.
“अनुजा… स्वप्निल साखरपुड्यासाठी बोलवायला आलाय गं.” अपर्णाने हसत अनुजाला सांगितलं.
स्वप्निल अनुजाजवळ जाऊन म्हणाला.
“रविवारी साखरपुडा आहे माझा.”


अनुजा रागाने म्हणाली.
“मला कशाला सांगतोयस?”
“ए, वेडाबाई… तुझ्याशिवाय साखरपुडा कसा होईल?”
“म्हणजे?” अनुजाने रडणे थांबवून आश्‍चर्याने विचारले. “आणि… रिया…”
“म्हणजे वाघाचे पंजे… आपल्या दोघांच्या साखरपुड्याचा आणि रियाचा काय संबंध?”
“स्वप्निल म्हणजे… आपल्या दोघांचा… खरंच?”
“तू रियाबद्दल किती गैरसमज करून घेेतला होतास? रियाबद्दल मी कितीदा सांगण्याचा प्रयत्न केला. पण तू ऐकायला तयार नव्हतीस की माझ्याशी बोलायलाही तयार नव्हतीस. मग मी अपर्णाला बोलावून घेतले आणि तिच्या मदतीने हा प्लॅन रचला.”
डोळे पुसून अनुजा म्हणाली, “आय अ‍ॅम सॉरी…”
“अनुजा… स्वप्निल अरे लवकर या नाष्टा करायला…” संध्याताई म्हणाल्या.
अनुजा आणि स्वप्निल दोघांचा जोडा बघून संध्याताईंना अलाबला काढली.
“आता तरी वेडाबाईची समजूत पटली का?” अपर्णाने मिश्किलपणे विचारलं.
“अनुजा संध्याकाळी आईने तुला बोलावलंय. अंगठी पसंत करायला जायचंय.” स्वप्निल म्हणाला.
“स्वप्निल अरे कोण कोण येणार आहेत अंगठी सिलेक्ट करायला? रिया येणार असेल नं…” अपर्णाने चिडवलं.
“अपर्णा तू गप्प बसतेस की नाही?” अनुजा म्हणाली.
“अनुजा तुला कळलं की नाही? कालच मी रियाला एअरपोर्टवर सोडून आलो.”
“रिया परत गेली?” अनुजाने आश्‍चर्याने विचारलं.
“अमेरिकेत तिचा परत काहीतरी रिसर्च चाललाय. तिच्याबरोबर रिसर्च करणार्‍या एका जर्मन मित्राबरोबर तिचं लग्न ठरलंय.”
“खरं सांगतोस?” अनुजा म्हणाली.
“अग खूप दिवस अमेरिकेत राहिल्यामुळे तिच्या वागण्याबोलण्यात मोकळेपणा होता. ती स्वभावाने चांगली मुलगी आहे. तिने तुझ्यासाठी कानातले टॉप्स दिले आणि तुझं अभिनंदन केलंय.”
“स्वप्निल, खरं तर तुझं अभिनंदन करायला हवं. तू इतकी परफेक्ट गुगली टाकलीस म्हणून काम फत्ते झालं.” बाबा म्हणाले.
“काय करणार बाबा… रियाबद्दल झालेल्या गैरसमजामुळे अनुजा बिथरली होती. माझ्याशी बोलणं… भेटणं… सगळं तिने बंद केलं होतं. तिचा गैरसमज कसा दूर करावा समजत नव्हतं. खरं की नाही अनुजा?” स्वप्निल म्हणाला.
“आता पुरे हं…” त्याच्याकडे हसून बघत अनुजा म्हणाली.