घोड्याने जमवले (Short story: Ghodyane Jamavale)

घोड्याने जमवले (Short story: Ghodyane Jamavale)

घोड्याने जमवले

– विनायक शिंदे

नकटीच्या लग्नाला म्हणे सतरा विघ्ने! पण केतकीचे नाक चाफेकळी, दात कुंदकळ्यांसारखे; वेणीचा शेपटा काळ्या नागिणीसारखा; चाल हरणीसारखी शिवाय पदवीधर, शिवाय एम.एन.सी. मध्ये मोठ्या पगाराची नोकरी. एवढे असूनसुद्धा तिचे लग्न जमत नव्हते. पूर्वी कवी, लेखक सुंदर चेहर्‍याच्या ललनेला हमखास चंद्राची उपमा द्यायचे. चाँदसा मुखडा, चौदहवी का चाँद, चौथीचा चंद्र असे काढायला गेलो तर खूप काही निघेल, पण मानव चंद्रावर गेला. त्याने तिथून उपग्रहाद्वारे चंद्राचे फोटो पाठवल्यावर लोकांना कळले चंद्रावर किती खड्डे आहेत ते! आपल्याकडले रस्ते तसे आपल्याला नेहमीच गुळगुळीत लाटलेल्या पोळीसारखे वाटतात, पण एकदा मुंबईचा तो सुप्रसिद्ध वैताग देणारा पाऊस सुरू झाला की रस्त्यावरल्या खड्ड्यांचे फोटोग्राफरने काढलेले ठळक फोटो पाहिले की समजते रस्ता नुसता खड्ड्यांनी भरलाय! ते कधी 152 असतात तर 521 इतके बहुसंख्य असतात.
तसेच केतकी देखणी असली तरी तिच्या लग्नाच्या बाबतीत सतराशे साठ अटी होत्या. त्या फक्त इतर सोडून तिच्या आईवडिलांनाच ठाऊक होत्या. त्या दुसर्‍यांनी ऐकल्या तर दुसर्‍या मिनिटाला ते पळून जातील. लगेचच चक्कर येऊ नये म्हणून! पूर्वी तिची आई केतकी तिसरी की चौथीत असताना लाडाने (आता मॉम) म्हणायची, “आमच्या केतूला (राहू केतू मधला नव्हे) परमेश्‍वराने इतकी रुपसंपदा दिली आहे की तिला रस्त्यावरला चोरही पळवून नेईल.” (हे बोलायला ठिकायै पण प्रत्यक्ष घडले तर?) पण कसचे काय तेव्हा काळ मोठा कठीण होता. घसघशीत हुंडा देऊनही वर पिता त्याच्या मनाचे समाधान होईल इतकी मालमत्ता देऊ करूनही, ‘काय बरे विसरलो?’ असे आठवीत वधू पित्याला प्रसंगी वाटाण्याच्या अक्षता लावायला कमी करीत नव्हते.
जसे क्रिकेटच्या खेळात अचानक बाजी पलटते. हा संघ जिंकणारच असे म्हणता म्हणता शेवटच्या शेपटाने लागोपाठ दोन षट्कार खेचल्यामुळे तो संघ डोळ्यादेखत हरतो. लग्नाच्या बाजाराची नेमकी तीच अवस्था झाली आहे. पूर्वी वर पिता मान ताठ करून सांगायचे आमचा मुलगा डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, सी.ए. आहे. त्याचे लग्न आम्ही मोठ्या थाटामाटात करणार. मग कोणीतरी भावुकपणे विचारले,“सगळा खर्च कोण करणार?” तर त्यांचे उत्तर तयार असायचे – “अर्थात मुलाचा होणारा सासरेबुवा.”
आता म्हणजे वीस वर्षांपूर्वी सरकारी नियमांचे काटेकोर पालन केल्यामुळे अचानक लोकसंख्येला मर्यादा आल्या. पूर्वी म्हणायचे, ‘पहिली बेटी – धनाची पेटी’ नंतर इंटरव्हल झाल्यावर म्हणायला लागले, ‘पहिली बेटी नंतर अनंत कटकटी’ काळाचा महिमा! दुसरे काय! अनंत लटपटी करून एखादे स्थळ केतकीला चालून आले की ती त्याला धडधडीत नकार द्यायची. आता काय झाले? हा प्रश्‍न आईने विचारल्यावर ती म्हणायची,“याच्या वडिलांना पूर्ण चंद्रासारखे चकचकीत टक्कल आहे; म्हणजे आज ना उद्या याला हमखास टक्कल पडणार. नंतर मैत्रिणींनी चिडवायला नको – म्हणून वेळीच नकार दिलेला बरा.”
तर तिची आई एखाद्या संभावितासारखी म्हणायची,“अगं तू टिव्ही वरल्या जाहिराती पाहत नाहीस वाटतं? हजार रुपयांचे वाटिका हेअर ऑईल, दीड हजारांचे भ्रृंगराज ऑईल हे सगळे आता घरबसल्या ऑनलाइन मिळते. ते नवर्‍याच्या डोक्यावर थापले की आठ दिवसात डोक्यावर केसांचे भरपूर पीक येते.”
“अगं, आई उगीच माझ्या डोक्याला शॉट देऊ नकोस. ते सर्व काही टि.व्ही.त…. वास्तवात शुद्ध फसवणूक!”
बाबा पुढे होऊन म्हणणार,“केतकी, मग त्या कानविंद्याच्या सुहासला का नाकारलेस. तो तर गोर्‍या रंगाचा, घार्‍या डोळ्यांचा, काळ्याभोर कुरळ्या केसांचा शिवाय कॅलिफोर्नियात कंम्प्युटर इंजिनियर – पगार पाहून डोळे फाटतील. मोजायला गेलो तर हात दुखतील. एवढ्या भरभक्कम पगाराचा धनी असताना – त्याला नकार द्यायचे कारण काय होते?”
“मला वाटतं तुम्ही रोजचा पेपर वाचत नाही…आमच्या ऑफिसमध्ये कामाचा कितीही पसारा असला तरी पहिल्यांदा मी तो संपूर्ण पेपर वाचून काढते. मग कामाला हात घालते.”
“तुमचे बॉस तुझ्यावर डाफरत नाहीत?”
“ते नेहमीच उशिराने येतात. त्यांच्या मिसेसना संधिवाताचा त्रास आहे ना… सकाळच्या वेळी नेमके त्यांच्या हातापायांचे सांधे धरतात. मग सकाळचे सगळे गृहउद्योग आवरून त्यांना ऑफिसला यावे लागते; शिवाय बायको आणि मेव्हण्याच्या सांगण्यावरून दादरचा वन बीएचके विकून त्यांनी स्वस्तात मिळतो म्हणून ना धड कल्याण, ना धड डोंबिवली अशा निसर्गरम्य वातावरणात फोर बीएचके फ्लॅट घेतला. तो ऐतखाऊ मेव्हणा म्हणतो कसा – भावोजी पाहा आता आमच्या ताईची तब्येत लगेच सुधारेल? सुधारतेय कसली डोंबलाची! बिघडली…आपल्या कर्माचे भोग! ते इथेच भोगावे लागतात. ते मरुं दे… आमच्या ऑफिसातली कवियत्री – उषा उचले (हिला सर्वजण ऑफिसमध्ये नेक्स्ट टू शांता शेळके म्हणतात) चिडवतात तर तिच्या रोजचे ताजे वर्तमानपत्र आणण्याच्या सवयीमुळे मी पुढे येणार्‍या संकटातून बचावले. वर्तमानपत्रातल्या तिकडच्या वार्ताहराकडून अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया इथल्या परदेशी मुलांशी (भारतीय) लग्न केलेल्या इथल्या पुणे, मुंबई, नागपूरच्या मुलीनी केलेले विवाह कसे असफल झाले. त्यांच्या पदरी घोर निराशा पडली. यांचे वाईट किस्से दर दोन दिवसांनी आपल्या वर्तमानपत्रात छापून येतात. ”
“एक नववधूला म्हणतो – इकडे घरकामवालीला पगार देणे परवडत नाही. तेव्हा सर्व काम तुला करावे लागेल. माझ्या मैत्रिणींकडेही काम करावे लागेल. पटत नसेल तर तिकीट रिटर्न इंडिया निघायचं, घटस्फोट घ्यायचा. तर दुसर्‍याची वेगळीच तर्‍हा – तो म्हणतो, आपल्या बरोबर माझी मैत्रीण ल्युसी की फूसी राहील. सध्या ती माझ्याबरोबर लिव्ह इन रिलेशनमध्ये राहाते. लवकरच व्हॅलेन्टाइन डे ला लग्न – दोघं करणार आहेत. तेव्हा तुझी या घरातली जागा मोलकरीण म्हणून राहील. दुर्दैवाने माझ्या पदरी असा एखादा नतद्रष्ट आला तर मला परदेशात सवत माझी लाडकी असे म्हणत दिवस कंठावे लागतील.”

 


ही सर्व कर्मकहाणी ऐकल्यावर केतकीच्या आई-वडिलांची वाचा एकदम बंद झाली. मग त्यांनी जे बर्‍यापैकी सुस्थितीत संवाद करीत होते. त्यांना विनंतीवजा आर्जवे सुरू केली.
“या चढेल पोरीला तिच्या हिताच्या चार गोष्टी सांगा आणि तुम्हाला जो बरा वाटतो अशा मुलाचे स्थळ आणून आम्हाला उपकृत करा.”
झाले त्यांनी मनावर घेतले. धडाधड त्यांनी मुलाच्या फोटोसकट त्यांच्या पत्रिकांची झेरॉक्स पाठवायचा सपाटा लावला. त्यातली अर्धी अधिक स्थळे ही बाहेरगावची होती. वैगुण्य दाखवण्यासारखे एकही स्थळ नव्हते. तरीपण केतकीने आईवडिलांना स्पष्टच सांगितले, “मुंबई सोडून बाहेरगावचे स्थळ नको आहे. तुम्ही म्हणाल, का? तर त्याचे उत्तर आहे. मला बाहेरगावचा प्रवास सहन होत नाही. मागे मैत्रिणीच्या बहिणीच्या लग्नाला मोठ्या हौसेने पालघरला गेले आणि माझी प्रकृती अचानक बिघडली. मला भयानक सर्दी झाली. डॉक्टर झाले, वैद्य झाले, आयुर्वेदिक औषधे झाली. एकही औषध त्या माझ्या सर्दीवर प्रभाव पाडू शकले नाही. चांगली पंधरा दिवस ती सर्दी माझ्या नाकावर ठाण मांडून बसली होती. तर मला त्या भयंकर आठवणी पुन्हा उगाळायच्या नाहीत, विषय संपला.”
मंगलताईंचा हा आपल्या लेकीसाठी चाललेला खटाटोप किंवा जीव तीळ तीळ तुटणे हे रोजचंच चाललेलं पाहून त्यांच्या शेजारी मीनाताई बडवे (मुख्याध्यापिका न्यू इंग्लिश स्कूल मराठा कॉलनी) त्यांच्याच्याने हे मंगलताईंचे हाल बघवत नव्हते.
न राहवून त्या म्हणाल्या, “एवढे चोचले बरे नाही, लाडाची असली म्हणून काय झाले. तिच्यासाठी तुम्ही रात्रीचा दिवस करून स्थळे शोधताय पण तिला आहे का त्याचे सोयरसुतक? तुम्ही तिला एखाद्या सायकिअ‍ॅट्रिस्टला का दाखवत नाहीत?”
मीनाताईंचे हे बोल ऐकून मंगलाताईंच्या अंगाचा नुसता तीळपापड झाला. त्या रागाने म्हणाल्या, “मीनाताई, जिभेला लगाम घाला. तुम्हाला काय वाटले ती डोक्यावर पडली आहे? आमची मुलगी आम्हाला जड झालेली नाही. तुम्ही जाऊ शकता.”
कुणाचे करावे चांगले तर तो भलताच अर्थ काढतो, असे म्हणून मीनाताई हिरमुसल्या होऊन बाहेर परतल्या. नंतर केतकी एका रविवारी रटाळ जीवनात काहीतरी चेंज हवा म्हणून ऑफिसातल्या चक्रम ग्रुपबरोबर महाबळेश्‍वरला अचानक ट्रीपला गेली. खरेतर त्यावेळी महाबळेश्‍वरचा पारा शून्यावर आला होता. ऑफिसातले, घरचे, नातेवाईक घसा फोडून सांगत होते, “जाऊ नका! थंडीने वाकडे व्हाल.” चक्रम ग्रुपने एकदा ठरवले अमुक ठिकाणी जायचे मग ते ब्रह्मदेव जरी खाली येऊन म्हणाला असता ना प्लीज नका ना जाऊ… तर ते म्हणतील, “गप्प बसा! तुम्ही तुमचे काम करा.” आता अशी यांची तर्‍हा असेल तर कोण समजावील यांना?
महाबळेश्‍वरच्या ‘सो कोल्ड’ हॉटेलमध्ये सकाळचे अकरा वाजले तरी चक्रम ग्रुपचा प्रत्येक सदस्य अंगावर शाल, ब्लँकेट शिवाय प्रत्येकी नेपाळी डबल स्वेटर घालून बसला होता. आज त्यांनी बरेच दिवस कुटले नाही म्हणून आज अख्खा दिवसभर रुममध्ये बसून पत्ते कुटायचा बेत आखला. केतकी आणि तिची मैत्रीण उषा उचले स्वतःशीच चुळबुळ करीत होती; कारण पत्ते खेळणे आणि जागा गरम करणे हे पहिल्यापासून त्यांच्या स्वभावात बसत नव्हते. तेवढ्यात उषाला खिडकीतून दोन उमदे सफेद घोडे ऐटदारपणे चालताना दिसले. त्या बरोबर तिला क्षणात घोड्यावर बसण्याची जाम हुक्की आली, ‘केतू, आपल्या अळणी जेवणासारख्या बेचव जीवनात राजयोग चालून आलाय! घोड्यावर बसून तू हो महाराणी, ताराराणी आणि मी होईन महाराणी लक्ष्मीबाई.’
दोघींच्या अंगावर रोमांच उठले. त्यांनी या दोन महान ऐतिहासिक व्यक्तिरेखा – राजवेषात छोट्या पडद्यावर (टीव्ही) पाहिलेल्या होत्या. घोडेवाल्याबरोबर त्यांनी पैशांची मुळीच घासाघीस केली नाही. ठरलेला दर त्याच्या हातावर ठेवला. केतकी ऐटीत सफेद घोड्यावर बसली. तेवढ्यात कुुठे माशी शिंकली कुणास ठाऊक, मुंबईचा एक मराठी सिरियलमध्ये काम करणारा हॅन्डसम तरुण तिथे धावत आला व म्हणाला,“मिस, कृपया या घोड्यावर तुम्ही अजिबात बसू नका. अमावस्येला हा घोडा अचानक उधळतो. शिवाय आज दर्श अमावस्या आहे. घोड्याला थंडीने सर्दी झाली आहे. शिंकतोय बघा.”
या पूर्वी घोड्यावर बसण्याचा राजयोग आला नव्हता व यापुढे कधीच येणार नाही म्हणून आपण हा योग जुळवून आणतोय तर हा हिरो (सिरियलचा) आपल्यावर छाप मारण्यासाठी काहीतरी फालतूगिरी करून आपले मनसुबे उधळण्याच्या बेतात आहे. त्याला वेळीच आळा घालायला हवा असे दात चावीत मनातल्या मनात उषा उचले म्हणाली.
“वो मिस्टर ‘पाटलीण’ सिरियलमधले रायबा म्हणून चार दिवस महाराष्ट्रीयन जनता ओळखते म्हणून इतके चढलात… तुम्हाला काही चांगले झालेले पाहवत नाही?”
तेवढ्यात घोडेवाल्याने केतकी बसलेला घोडा पुढे काढला. त्यामुळे उषाचे त्या तरुणाशी होत असलेले संभाषण आपोआप तुटले. ती त्या घोड्यापाठोपाठ धावायला लागली. खरे तर तिलाही केतकीच्या घोड्यापाठोपाठ आपला घोडा घेऊन जायचे होते. तिला त्या घोडेवाल्याचा मनस्वी राग आला होता. तिचे मन पायदळी (घोड्याच्या) तुडवून त्याने आपले घोडे पुढे दामटले होते. अचानक सर्व पर्यटकांनी उषाला केतकीच्या घोड्यापाठोपाठ धावताना पाहिले. तो तरुणही धावायला लागला. तो घोडा अचानक उधळला होता. मालकाने त्याला आवरायचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्याच्या डोक्यावर इतक्या जोराने लाथ मारली की त्या माराने तो खाली कोसळला व बेशुद्ध पडला. तो घोडा जोराने डोके फिरल्यासारखा धावत होता. तो लडविक पॉइंट जवळ आला. खाली खोल दरी… सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. तेवढ्यात तो सिरियल हिरो सत्यजित तीरासारखा धावला. घोड्यावर स्वार होऊन त्याने घाबरलेल्या केतकीला घट्ट पकडले व घोड्याचा लगाम इतक्या जोराने ओढला की तो जागच्या जागी थांबला. सगळ्यांनी सुटकेचा श्‍वास सोडला. केतकीने तर जिवाची आशा सोडली होती. सत्यजित (हिरो)ने जिवावर उदार होऊन तिचे प्राण वाचवले. नंतर उषाने सत्यजितची हज्जार वेळा माफी मागितली. केतकी तर काठोकाठ त्याच्या प्रेमात पडली. सत्यजितला पाहता क्षणी आवडली होती. केतकीचे लग्न जमले. ही बातमी मंगलताईंच्या नातेवाइकांमध्ये वधू-वर सूचक मंडळामध्ये सुगंधासारखी पसरली. तेव्हा सर्वजण आश्‍चर्यचकित झाले. ते म्हणाले, “पाहा, आम्हाला जे जमले नाही ते एका घोड्याने जमवले.”