गफलत (Short Story : Gafalat)

गफलत (Short Story : Gafalat)

नारायणरावांनी वयाची साठी गाठली आणि ते आयकर खात्यातून निवृत्त झाले. कार्यालयातील निरोप समारंभ आटोपून हातात, मिळालेल्या भेटींचे पार्सल सांभाळत त्यांनी ताठ मानेने घरात प्रवेश केला. तेव्हा अर्धशतकाहून अधिक काळ त्यांचा संसार सांभाळणारी, त्यांच्या पत्नी सुशीलाबाई दारात तेवत्या निरांजनाचे तबक घेऊन स्वागतासाठी उपस्थित होत्या. निरांजनातील मंद ज्योतीचा प्रकाश त्यांच्या डोळ्यात चमकत होता. त्यात नारायणरावांना पत्नीच्या मनातील स्वप्नं दिसत होती. गेले काही दिवस ते एकच वाक्य घोकत होते. ‘एकुलता एक मुलगा राहुल याच्या अमेरिकेतील बंगल्यामध्ये निवांत जाऊन राहायचं?’ या संबंधात त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून धोशा लावला होता. तर त्यांच्या या उत्साहाला बांध घातला होता, तो नारायणरावांच्या ओशासन उद्गारांनी. फक्त सहा महिने धीर धर. सध्या ऑफिसात खूप कामं उरकायची आहेत. शिवाय यंदा रजा घेतली तर निवृत्तीनंतर उर्वरित सेवेचा रोख रकमेने मिळणार्‍या मोबदल्यास पण मुकावं लागेल. निवृत्तीनंतर मी माझ्या आयुष्याचा राजा आणि तू माझी पट्टराणी; असं आपण दोघं युवराजांचा अमेरिकी पाहुणचार घ्यायला मोकळे. काय पटतंय् का हो?
सुशीलाबाईंच्या चेहर्‍यावरची नाराजी लपली नव्हती. “पुरे हो तुमचे रोखीचे हिशोब. आयुष्यभर खस्ता काढल्यात लेकाला इंजिनियर करण्यासाठी. काय तर म्हणे, आपल्या देशात मोठमोठी धरणे बांधून देश सुजलाम् सुफलाम् त्याने करावा. काय झालं? तो गेला परक्या देशात. ‘तो’ देश सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी. तेही डॉलर्सनी… आणि मी तुमच्या इतकी ठणठणीत नाही हो. माझी तब्येत सतत ढासळतेच आहे. औषधांवर दिवस ढकलत्ये आहे. धड काही निदान होतच नाही. मला नाही वाटत तो गडगंज दिवस मी पाहीन असं…”
गफलत, Short Story, Gafalat
“काही तरी बोलू नकोस सुशीले. आणखी चार महिन्यातच आपण अमेरिकेच्या दिशेनं उड्डाण केलेल्या विमानात असू. ” नारायणरावांनी त्यांची समजूत घातली. पण…  नियतीच्या मनात वेगळाच हिशेब मांडला जात होता. सुशीला बाईंना कॅन्सर झाल्याचं निदान झालं आणि त्यांचं अमेरिका जाण्याचं स्वप्न पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं.
निवृत्तीनंतर मिळालेल्या पुंजीला, सुशीलाबाईंच्या उपचारांसाठी गळत तर लागली. पैसे खर्च झाले तरीही सुशीलाबाईंना वाचवता आले नाहीच. अखेरच्या क्षणी अश्रू भरलेल्या नजरेने त्या नारायणरावांना म्हणाल्या, “तुम्हीच जाऊन या हो अमेरिकेला एकटे. सासूबाईंना सांभाळायला बाई ठेवा आणि तुम्ही जाऊन या. मला तीच श्रद्धांजली असेल. ” सुशीलाबाईंनी देह ठेवला.
घरात आता दोघंच उरली. नारायणराव आणि त्यांची आई गंगाबाई! उतारवय असून दोघंही तसे सुदृढ, पण प्रत्येक गोष्टींसाठी एकमेकांवर अवलंबून. एक दिवस नारायणरावांनी निश्चय केला आणि निघाले, वृद्धाश्रमाकडे! कोट टोपी घालून ते तयार झाले, तेव्हा गंगाबाईंनी विचारले –
“नान्या, कुठे निघाला आहेस इतक्या सकाळी? आणि ही बॅग भरून काय नेतोस? ”
“आई, मी चौकशीला जातो आहे. माझ्या एका मित्राने तळेगावला, त्याच्या मळ्यावर वृद्धाश्रम सुरू केला आहे. तो बघून येईन म्हणतो… ”
“अरे नाना, कशाला वृद्धाश्रम बघायचा? आपण दोघंही धडधाकट-”
“आई, कसलीही शंका काढू नकोस. मी परतल्यावर तुला सगळं सांगतो सविस्तर. तू निर्धास्त राहा…”
आईला दिलासा देऊन नारायणराव झटकन् बाहेर पडले. ‘रजत जयंती सुखाश्रम’ ही पाटी पाहून नारायणराव आत शिरले. आणि त्यांनी हाक मारली – “गोपाळा… मी आलोय् रे. तुझा मित्र नान्या.”
सुखाश्रमाचे मालक ओळखीचा आवाज ऐकून बाहेर आले. आणि त्यांनी नानांना घट्ट मिठी मारली. “गोपाळा, अरे खूप दिवस तू बोलावत होतास ना. चला, म्हटलं जाऊया एकदा.”
“नानासाहेब, अखेर तुम्ही आलात तर. या चंदेरी केसांच्या वनात. वेलकम. काय मग, शेवटी निर्णय झालेला दिसतोय्, आईला इथे ठेवायचा. नीट सांभाळू हो आम्ही. ”
“नाही गोपाळा, तू गैरसमजूत करून घेऊ नकोस. आईला नाही ठेवत. मी स्वतःच तुझ्या सुखाश्रमात भरती होतोय.”
गफलत, Short Story, Gafalat
“काय? नान्या, अरे तुझी काहीतरी गफलत होतेय.. अरे, एखाद्याला चार तडाखे दिलेस, तर तो माणूस पाणी मागणार नाही, अशी तब्बेत तुझी. आणि तू …? ”
“गोपाळा, अरे सुशीला गेल्यानंतर आई सतत माझ्यावर विसंबून असते. त्यामुळे माझे जर आधीच काही बरेवाईट झाले तर तिची अवस्था…” डोळ्यांत अश्रू आल्याने नाना थबकले. सावरून पुढे बोलले, “पावलागणिक मला हाक मारायची, ही तिची सवय आहे. जी मला मोडायची आहे. म्हणून मीच येतो आहे.”
“ नाना, धन्य आहे तुझ्या दूरदृष्टीची. लोक इथे येतात, ते आपल्या वृद्ध मातापित्यांना घेऊन. अन् तू मात्र मातेच्या काळजीपोटी स्वतःच येतो आहेस… ”
“हो, विचित्रच आहे ना! पण मी आता घरी जाणार नाही. कोणी चौकशी केली तर सांगायचेस की, मी यांना मॅनेजर म्हणून ठेवलंय. अगदी माझ्या आईला देखील खरं सांगायचं नाहीस…”
इकडे नारायणरावांच्या घरी एक मध्यमवयीन स्त्री येते आणि त्यांच्या आईला सांगते, “मी एक संगीत शिक्षिका आहे. निराधार आहे. मला नारायणरावांनी पाठवलं आहे. मी तुमचं मनोरंजन करीन. तुम्हाला नारायणरावांची आठवण देखील यायची नाही… ठीक?…”
– मधुसूदन फाटक

आई [Story- Aai]