फॅमिली मॅटर्स (Short Story: Family Matters)

फॅमिली मॅटर्स (Short Story: Family Matters)

फॅमिली मॅटर्स

– मनीषा सोमण
अचानक काय झालंय प्रसन्नाला? गेल्या सहा वर्षांत आम्ही जिवंत आहोत की नाही, याची दखलही घ्यावीशी वाटली नाही त्याला आणि आता… गेले सहा महिने सतत येतोय… चिनूला हैद्राबादला काय घेऊन जातो, महागडी गिफ्ट काय घेतो, वीकएण्डला घरी राहायला घेऊन जातो! याच्या मनात आहे तरी काय?… तिच्या डोक्यात कल्लोळ माजला!

रेवानं घड्याळात बघितलं. सहा वाजले होते. समोर गिलानी प्रेझेंटेशन देत होता; पण तिच्या डोक्यात काहीही शिरत नव्हतं. पावणेआठचं फ्लाइट होतं तिचं, मुंबईचं. इथून एअरपोर्ट तासभर, म्हणजे अगदी जेमतेमच पोहोचणार होती ती. तिची अस्वस्थता बाजूलाच बसलेल्या सुरिंदरच्या लक्षात आली. तिच्याकडे झुकून कुजबुजत्या आवाजात त्यानं विचारलं,
“क्या बात हैं रेवा, कुछ टेन्शन?”
“ना, टेन्शनवाली तो कोई बात नहीं हैं. पर मेरी फ्लाइट हैं साडेसात बजे! और छे तो बज चुके हैं.”
“ओ. तो तू निकल, वैसे भी प्रेझेंटेशन तो खतमही होनेवाली हैं. बाकी इतना इंम्पॉर्टंट तो कुछ हैं नही!”
“पक्का? मैं निकलू?”
सुरिंदरनी ग्रीन सिग्नल देताच तिनं पर्स उचलली आणि निघाली. लिफ्टमधून खाली उतरताना मोबाईल चेक केला. चिन्मयचे आठ मिस्ड कॉल्स होते!
“स्वारी खूपच आतुरतेने वाट बघतेय वाटतं! चिन्मय बारा वर्षांचा झाला! विश्‍वासच बसत नाहीये!” त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला तिनं केलेला केक, चिकन टिक्का आणि चॉकलेट मूस हवंच, अशी फर्माईश होती त्याची. म्हणून तर दर वेळेसारखी शनिवारी न निघता तिनं शुक्रवारचीच फ्लाइट बुक करायला सांगितली होती. ‘साहेबांची फर्माईश पूर्ण करणं काही सोपं काम नाहीये.’ ती स्वत:शीच विचार करत हसली आणि गाडीत बसली!
“पापाजी, ट्रॅफिक का क्या हाल हैं? पोहोचेंगे या नहीं?” तिनं ड्रायव्हरला विचारलं.
“तुसी टेन्शन ना लो मॅडमजी. आराम से पहुचेंगे. आज तो वर्किंग डे हैं! तो इतनी भी ट्रॅफिक नहीं हैं.”
त्याचं बोलणं ऐकतानाच तिनं चिन्मयला फोन लावला, “चिनू! अरे…”
तिचं वाक्य तोडतच तो म्हणाला, “आई, परत चिनू? मी आता बारा वर्षांचा झालोय!”
“अरे सॉरी सॉरी… चिनू… आपलं… बरं ते जाऊ दे. इतके मिस्ड कॉल्स? काय झालं?”
“आई, बाबा आलाय आणि त्यानं मला काय
आणलं असेल…?”
“अं…” तिला काय रिअ‍ॅक्ट करावं तेच कळेना. हल्ली प्रसन्ना वरचेवर घरी येऊ लागलाय. चिनूला भेटण्याची कारणं शोधत असतो. मनात आलेला
विचार झटकून टाकत ती चिनूचं बोलणं ऐकू लागली… “बोल ना!”
“अरे, मला कसं कळणार?”
“तरी एक गेस…”
“अं… मोबाईल?”


“नो, राँग… टॅब! मस्त ना! मला प्रोजेक्टसाठी किती उपयोग होईल याचा…” चिनू काय बोलत होता ते तिच्या मेंदूपर्यंत पोहोचतच नव्हतं! अचानक काय झालंय प्रसन्नाला? गेल्या सहा वर्षांत आम्ही जिवंत आहोत की नाही, याची दखलही घ्यावीशी वाटली नाही त्याला आणि आता… गेले सहा महिने सतत येतोय… चिनूला हैद्राबादला काय घेऊन जातो, महागडी गिफ्ट काय घेतो, वीकएण्डला घरी राहायला घेऊन जातो! याच्या मनात आहे तरी काय?… तिच्या डोक्यात कल्लोळ माजला!
“हॅलो आई… आई… ऐकू येतंय ना तुला?”
“अं… हो… बोल…” ती भानावर येत म्हणाली.
“अगं बोल काय? मी विचारलं, किती वाजताची फ्लाइट आहे तुझी? तुला टॅब कधी दाखवतो
असं झालंय!”
“पावणे आठची.” फोन डिस्कनेक्ट झाला.
पण तिच्या डोक्यातले विचार काही थांबेनात!
सवयीनं तिनं चेकइन केलं. फ्लाइटची अनाउन्समेन्ट होण्याची वाट बघत होती. डोक्यात विचार पिंगा घालतच होते… चौदा वर्षांपूर्वी तिचं आणि प्रसन्नाचं लग्न झालं!
ती कमर्शिअल आर्टच्या फायनल इयरला होती.
तिला अ‍ॅडव्हर्टायजिंगमध्ये करिअर करायचं होतं.
तिचे प्रोफेसर म्हणायचेही, रेवाचं फ्युचर ब्राइट असेल! रेवा जितकी हुशार होती, तितकीच देखणीही होती! भरतनाट्यमही छान करत असे. एका कार्यक्रमात प्रसन्नानं बघितलं. प्रसन्ना दवे… सुप्रसिद्ध उद्योगपती. गडगंज श्रीमंत. अशा प्रसन्नानं दोन-चार भेटीत तिला प्रपोज केलं. मग काय, घरी समजल्यावर इतकं चांगलं, श्रीमंताचं स्थळ हातचं कोण जाऊ देईल… अर्थात, तिलाही प्रसन्ना आवडला होताच.
विचाराच्या नादातच ती फ्लाइटमध्ये बसली. इतका उमदा, देखणा, सतत हसत-बोलत राहणारा प्रसन्ना कोणालाही आवडेल असाच होता. ग्रॅज्युएशन पूर्ण होण्याआधीच लग्न झालंही. लग्न झालं, आता ग्रॅज्युएशन करायची काय गरज आहे? हे सासरच्या सगळ्यांचं म्हणणं आणि त्याला प्रसन्नाचा दुजोरा, ही तिला खटकलेली पहिली बाब! पण कोणाचंच न ऐकता तिनं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. पुढे नोकरी करायची काही गरज नाही, हे तिला पटलं नसलं तरी तिनं ते मान्य केलं. खरं तर प्रसन्नाच्या इतक्या फर्मपैकी एक ‘अ‍ॅड अँड पी.आर.’ फर्मही होती. कधीतरी तिथे काम करण्याची संधी मिळेल, असं तिला वाटलं होतं. पण तसं कधीच झालं नाही.
जसजशी वर्षं उलटत गेली तसतशी ती घरात रुळण्याऐवजी दूर होत गेली. तिच्या नणंदा, सासू-चुलत सासू येताजाता तिच्या मध्यमवर्गीय माहेरावरून टोमणे मारत असत. त्यांची बुद्धी तितकीच, म्हणून रेवानं
ते कधी मनावर घेतलं नाही की प्रसन्नाकडे तक्रारही केली नाही. तसंही प्रसन्ना घरात असायचाच कुठे!
लग्न झाल्यावर हनिमूनला म्हणून ऑस्ट्रेलियाला गेले होते, तेवढेच पंधरा दिवस ते दोघं काय एकत्र होते. त्यानंतर प्रसन्नाचा एक तासही कधी फक्त रेवासाठी म्हणून नव्हता! लग्नानंतर दोनच वर्षांत चिन्मयचा जन्म झाला. मुलगा झाला म्हणून सासू कंपनी खूष झाली खरी; पण तेही तेवढ्यापुरतंच! त्यानंतर चिनूच्या बाबतीत तिच्या सासवा-नणंदा परस्पर निर्णय घेऊ लागल्या, चिनूच्या समोरही तिला घालून-पाडून बोलतच राहिल्या… या सगळ्याचं तिला टेन्शनच येऊ लागलं होतं.
आजही तिला लख्ख आठवत होतं, चिनू तेव्हा जेमतेम पाच वर्षांचा होता. कुठेसं जायचं होतं, म्हणून रेवानं त्याच्यासाठी कपडे काढून ठेवले होते.
“आई, मी नाही घालणार हे कपडे. जुने झालेत.
मला नवे हवेत.”
“चिनू, दोनदाच घातलेस ना रे हे. मग जुने व्हायला काय झालं? चांगले नवे तर आहेत, आज हेच घालायचेत.”
“ममा, तू म्हणजे अगदी भिकारी आहेस. सगळं जुनं-जुनं वापरणारी!”
“काय?” चिनूचं हे बोलणं ऐकून ती हबकलीच, “चिनू…” ती त्याला फटका मारायला पुढे गेली.
“मग काय, बडी बा आणि फई असंच म्हणतात. तुझी आई आणि तिच्या घरचे ते सगळे भिकारी आहेत. तू त्यांच्यासारखा होऊ नकोस!”
हा सगळा कसला परिणाम आहे, हे तिच्या लक्षात आलं. त्याला बोलण्यात, रागावण्यात काहीच अर्थ नव्हता. त्या वेळी तिनं विषय बदलला खरा; पण तिच्या मनातून काही ते जाईना.
प्रसन्ना परत आल्यावर तिनं पहिल्यांदाच त्याच्याकडे त्याच्या घरच्यांविरुद्ध तक्रार केली. पण याची दखल घ्यायची सोडून, “नाही त्या गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही. तुला जमेल तसं पटवून घे. नाहीतर तुझ्या खोली बाहेर पडू नकोस, म्हणजे कटकटच नाही.” म्हणत त्यानं तिला उडवून लावलं!
“अरे पण, हा चिनूच्या भविष्याचा प्रश्‍न आहे.”
“त्याच्या भविष्याची काळजी करण्याचं काही कारण नाही, त्याचा बाप समर्थ आहे.”
“प्रसन्ना, अरे या वयात तो कसं बोलायला लागलाय ते बघ ना!
धिस इज नॉट राइट…”
“म्हणजे, तुला काय म्हणायचंय? माझ्या घरचे त्याला हे बोलायला शिकवतायत? रेवा, यू आर द लिमिट! स्वत: कधी घरच्यांशी मिळून मिसळून वागली नाहीस आणि आता चिनूलाही तोडायला बघतेयस? हे बघ, हे माझं घर आहे आणि जीवन ऑफिस जॉइन करेपर्यंत घराची, बिझनेसची पूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे. तेव्हा पुन्हा माझ्या घरच्यांविरुद्ध मला काहीही ऐकून घ्यायचं नाही.”
शब्दानं शब्द वाढत जाऊन त्यांच्या नात्यात इतकी कटुता आली की, रेवानं घर सोडलं. ती माहेरी गेल्यावर प्रसन्नानं तिला एकदाही फोन करून परत कधी येतेयस विचारलं नाही. मग त्याच्या घरच्यांकडून अपेक्षा करणंच चुकीचं होतं. रेवानं स्वत:च्या हिमतीनं स्वत:चं आयुष्य घडवलं. एका अ‍ॅड फर्ममध्ये नोकरीला लागली आणि आज ती त्या फर्मची क्रिएटिव्ह हेडच नाही, तर पाच टक्के शेअरहोल्डरही झाली होती. विचारांच्या नादात विमानाचं लँडिंग कधी झालं, तेही तिला कळलं नाही.
“आई…” ती आत शिरताच चिनू आनंदानं धावत तिच्यापाशी आला, “हा बघ टॅब…” तिला टॅब दाखवत त्याच्या फंक्शन्सविषयी सांगत होता. पण रेवाच्या मेंदूपर्यंत काही पोहोचतच नव्हतं!
“चिनू, अरे तिला जरा फ्रेश तर होऊ देशील. अजून जेवण व्हायचं असेल तिचं.” तिची वहिनी आतून येत म्हणाली, “रेवा, जा अंघोळ करून फ्रेश हो, तोवर पानं वाढतेच. आम्ही दोघं थांबलोय तुझ्यासाठी.”
जेवतानाही रेवाला बोलण्याचा, गप्पा मारण्याचा फारसा उत्साह नव्हताच. तिच्या दादानं तिला याबद्दल विचारलंही;
पण तिनं दमल्याचं कारण देऊन विषय टाळला. झोपायला गेली, तरी तिच्या डोक्यात तेच घोळत होतं. डोक्याशी टॅब ठेवून चिनू गाढ झोपला होता. त्याच्या कपाळावर ओठ टेकवून, दोन दिवस पार्टीच्या तयारीत जाणार, तेव्हा आत्ता झोपलेलं बरं, असा विचार करून तिनंही कूस बदलली!
पुढचा दिवस कसा गेला ते तिला
कळलंही नाही.
चिनूच्या वाढदिवशी पुन्हा प्रसन्ना आला, “यंग बॉय… सरप्राइज!”
“अजून एक? काय?”
प्रसन्नाच्या मागोमाग चार माणसं आत आली. सगळेच आश्‍चर्यानं बघत होते.
“सो यंग बॉय, धिस इज फॉर युवर ग्रँड बर्थ डे पार्टी. पिझ्झा, बर्गर… जे काही हवं
ते! लाइव्ह काउंटर! आय नो,
या घरात फार जागा नाहीये,
बट दे विल मॅनेज!”
“ओ! वॉव!” चिनूचे डोळे विस्फारले.
“अँड वन मोअर. धिस इज अ स्पेशल केक फॉर स्पेशल बर्थडे बॉय.” भलं मोठं केकचं खोकं घेऊन अजून एक माणूस आला.
“ओ, बाबा. थँक्स…”
चिनूचा आनंद बघून रेवाला प्रसन्नाला काही बोलावसं वाटेना. तरी मानसी तिच्या जवळ येऊन हळू आवाजात बोललीच, “रेवा, हे तू बरोबर करत नाहीयेस. तो बिघडू नये म्हणून तू घर सोडलंस ना? आणि आता? त्याला त्याच्या बापापासून तोडायचं नाही, त्याच्याबद्दल वाईट सांगायचं नाही, इथंपर्यंत ठीक आहे; पण तो चक्क त्याला बिघडवतोय. स्पष्टच सांगते, तो त्याला आपल्या बाजूनं वळवायचा प्रयत्न करतोय.”
“आय नो, वहिनी. मला कळत का नाहीये हे, पण मी काय करू? बघतेयस ना, चिनू किती आनंदात आहे ते.”
“आणि तू काल दिवसभर खपून त्याच्या फर्माईशी पूर्ण केल्यास ते? आता या बर्गरफिर्गर पुढे मुलं त्याकडे बघणार तरी आहेत का?”
“असू दे गं. माझ्यासाठी चिनूचा आनंद सगळ्यात महत्त्वाचा.”
“मग तो तुझ्यापासून लांब गेला तरी?” मानसीनं तीक्ष्ण स्वरात विचारलं, “रेवा, तुला चांगलंच माहितेय चिनू आपल्यापासून लांब गेलेला, ना तुला चालेल ना मला, तेव्हा वेळीच सावध हो.”
“अँड धिस इज वन मोअर…” प्रसन्नानं त्याच्या हातात दोन पिशव्या दिल्या.
“ओ, डिझायनर वेअर?” चिनूच्या आनंदाला पारावार उरला नाही.
“मग! तू माझा मुलगा आहेस! गो अँड गेट रेडी!”
रेवानं त्याच्यासाठी जीन्स आणि त्याच्या आवडत्या निळ्या रंगाचा शर्ट आणला होता; पण प्रसन्नानं आणलेल्या कपड्यांपुढे ते अगदीच सामान्य होते.
“आई, मी तयार होऊन येतो. तूही तयार हो ना, माझे मित्र येतीलच!” चिनू नुसता उत्साहानं सळसळत होता.
प्रसन्ना, रेवा जवळ आला, “धिस इज फॉर यू! मला माहितेय तू नाही म्हणणार, तरीही…” तिच्या हातात पिशवी देत म्हणाला.
हा हे सगळं का करतोय, हा विचार काही रेवाची पाठ सोडेना. प्रसन्नानं दिलेली पिशवी बाजूला ठेवून तिनं चिनूला आवडणारी निळी शिफॉनची साडी नेसायला काढली.
ती बाहेर आली तोवर चिनू कपडे बदलून आला होता. त्याला बघून तिला आश्‍चर्यच वाटलं! त्यानं प्रसन्नानं आणलेले नाही, तर रेवानं आणलेले कपडे घातले होते.
ती त्याला काही विचारणार इतक्यात त्याचे मित्र येऊ लागले. तरी तिनं मानसीला याबद्दल विचारलंच; पण तिलाही काही माहीत नव्हतं.
केक कापण्याच्या वेळीही चिनू म्हणाला, “आई, तू केलेला केक आण ना कापायला, बाबांनी आणलेला आपण पार्टीसाठी ठेवू. दॅट इज टू बिग. आमच्या सेल्फीमध्ये यायचा नाही कदाचित! बाबा, आय होप यू डोन्ट माइंड.”
“नो, नो. नॉट अ‍ॅट ऑल. गो अहेड.” प्रसन्ना पुन्हा मागे वळून मोबाईलवर बोलण्यात गर्क झाला!
हा रेवाला दुसरा धक्का होता. आपलं पोरगं इतकं शहाणं आहे, हे बघून तिचे डोळे भरून आले आणि बहुधा तेही चिनूला समजलं असावं. तो तिच्याजवळ जाऊन गळ्यात पडला आणि केक कापायला गेला. चिनू… नाही चिन्मय, खरंच खूप मोठा झालाय. वयापेक्षाही मोठा. तिनं मनाशीच विचार केला.
पार्टीच्या वेळेलाही, “आई, हे सगळे माझे हावरट मित्र-मैत्रिणी तू केलेला चिकन टिक्का खायला आलेत. दे आर क्रेझी फॉर इट. पिझ्झा-बर्गर तर काय आम्ही नेहमीच खातो.” चिनूच्या म्हणण्यासरशी सगळी जमलेली मुलं, वॉव! चिकन टिक्का!… करून ओरडायला लागली. तशी रेवा घाईघाईत आत जाऊ लागली.
“आई, हे पिझ्झावाले लोक आहेत ना, ते देतील
ना टिक्का करून? तू केलेली तयारी दे यांना! बाबा देतील ना ते?”
“यस ऑफकोर्स. त्याबरोबर बर्गर आणि पिझ्झाही देतील.” आता प्रसन्नाच्या चेहर्‍यावर दिसू लागलेलं आश्‍चर्य रेवानं टिपलं!
पोरं धुडगूस घालून निघेपर्यंत दहा वाजत आले
होते. चिनूही दमला होता आणि पेंगुळलाही. “चिनू…
ओ सॉरी चिन्मय…” रेवा हसत म्हणाली.
“आई, आज माफ आहे तुला, यू कॅन कॉल मी चिनू!” तोही हसत म्हणाला.
“ओ, ग्रेट. थँक्यू सो मच. बरं गंमत पुरे आता.
चल अंघोळ कर आणि झोप. उद्या सकाळी शाळा आहे, लक्षात आहे ना!”
“ओ नो रेवा, धिस इज नॉट फेअर,” प्रसन्ना पुढे
येत म्हणाला, “आज त्यानं इतकं एन्जॉय केलंय,
सो लेट्स टेक हिम रेस्ट! एक दिवस शाळा बुडाल्यानं काही फरक पडत नाहीये.”
“नो बाबा, फरक पडतो. अँड वन मोअर थिंग, आई माझ्यासाठी जे करते, ते फेअरच असतं. प्लीज हे मोटी बालाही सांगा.”
त्याचा स्वर ऐकून रेवा त्याला दटावत म्हणाली, “चिनू!”
“सॉरी आई, पण मी खरं बोलतोय. अँड बाबा, अ‍ॅम नॉट अ किड! मलाही समजतं काय चांगलं, काय वाईट ते! बाबा अचानक तुला माझ्याबद्दल प्रेम का वाटायला लागलंय, हेही कळलंय मला.”
“चिनू, इनफ…” रेवा म्हणाली.
तशी मानसी चिनूजवळ येऊन म्हणाली, “रेवा, त्याला गप्प करून काय होणार आहे? आणि तो काय वाईट, चुकीचं किंवा उद्धटासारखं बोलतो आहे. बोलू दे त्याला, तो म्हणतो तसं, तोही आता इतका लहान नाहीये!”


रेवा पुढे काहीच बोलू शकली नाही.
“बाबा, मला माहितेय, जीवनकाकाला एकच मुलगी आहे आणि दुसरं मुलं होणं शक्य नाही, म्हणून मोटी बाला हा घरचा मुलगा तिच्या घरी हवाय. मी ऐकलंय सगळं ती बोलत होती ते. मला आपल्या स्टेट्सप्रमाणे वागायला लावण्यासाठी ती तुम्हाला इथे पाठवतेय, हेही कळलंय मला. आणि त्यांच्या लेखी आईची किंमत शून्य आहे, हेही! पण आईने मला कधीच तुमच्या कोणाबद्दल काहीच वेडंवाकडं, वाईट सांगितलं नाही. तुमचं दोघांचं पटत नव्हतं, म्हणून ती वेगळी राहते इतकंच सांगायची कायम. तुम्ही मला भेटायला आलात, मला बाहेर घेऊन गेलात, घरी राहायला घेऊन गेलात, तरी आईने कधीच ऑबजेक्शन घेतलं नाही. व्हॉट डज् इट मीन्स? की आई जे करते ते माझ्यासाठी फेअर असतं, हेच ना! प्रसन्ना दवे… वेलनोन, सक्सेसफूल बिझनेसमन माझे बाबा आहेत, याचा मला खरंच खूप अभिमान आहे. पण त्याहून जास्त आईचा अभिमान आहे आणि आय लव्ह हर! आई इतकं प्रेम मी कोणावरच करू शकत नाही आणि आईही माझ्या इतकं प्रेम कोणावर करत नाही! आई, मी, स्वरांगी आणि मामा-मामी इज माय ट्रू फॅमिली.”
चिनूचं बोलणं ऐकताना रेवाच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. मानसीचीही काही वेगळी अवस्था नव्हती, तर दादा थक्क होऊन त्याचं बोलणं ऐकत होता.
“सॉरी बाबा, इफ यू आर हर्ट; पण हेच खरं आहे. अँड आय हॅड टू टेल यू धिस!”
प्रसन्ना काही न बोलता पुढे आला. चिनूच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला, “तुमच्या या पाच जणांच्या फॅमिलीत माझा नंबर कधी लागतोय याची वाट बघतोय मी चिनू. चिनू तुम्ही दोघं मला हवे आहात, माझ्यासाठी, माझ्या घरासाठी किंवा घरच्यांसाठी नाही. आय मीन इट रेवा. तुम्ही फक्त हात पुढे करा, मी इथेच आहे हाताच्या अंतरावर.” इतकं बोलून प्रसन्ना मागे वळूनही न बघता निघून गेला. आणि रेवानं धावत जाऊन चिनूला कुशीत घेतलं.
“आई, झोप आलीय गं. उद्या सकाळची शाळा आहे ना?” चिनू तिला घट्ट मिठी मारत म्हणाला, “मला कडेवर उचलून ने ना झोपायला.”
हे ऐकून रेवाच्या चेहर्‍यावर हसू उमललं. दादा पुढे होऊन म्हणाला, “कडेवर ना? आई कशाला, हा मामा आहे की! ये हो, मी घेतो तुला कडेवर आणि मामीला सांगतो बाटलीतून दूध पाजवून झोपवायला!” त्यानं
खरंच चिनूला उचलून घेतलं. “मानसी, बाळाची
बाटली आण गं!”
डोळ्यांत अश्रू आणि ओठावर हसू घेऊन रेवा, खदखदा हसणार्‍या चिनूकडे बघत होती!