एका लग्नाच्या आमंत्रणाची गोष्ट (Short Story: Ek...

एका लग्नाच्या आमंत्रणाची गोष्ट (Short Story: Eka Lagnachya Amantranachi Gosht)

एका लग्नाच्या आमंत्रणाची गोष्ट – Eka Lagnachya Amantranachi Gosht

दामल्यांच्या मुलाच्या लग्नाची तारीख तर जवळ येत चालली होती. दामल्यांचा पत्ता विचारण्याकरिता म्हणून जो फोन आला होता, त्यालाही महिना झाला होता. त्यानंतर लग्नाला या, असा फोनही आला नाही. पोस्टाने किंवा कुरिअरने लग्नपत्रिका तरी यावी, तर तीही आली नाही.
एका लग्नाची पहिली काय, दुसरी काय, तिसरीही गोष्ट होते, लग्नात हरवलेल्या करवलीचीही गोष्ट होते आणि या अशा सार्‍या गोष्टी वाचक आवडीने वाचतात. मग लग्नाच्या आमंत्रणाचीही गोष्ट का होऊ नये? लग्नाची आमंत्रणं आपल्याला नेहमीच येत असतात. जवळचे नातेवाईक घरी येऊन आमंत्रण करतात. अनेक जण फोनवरून आणि ई-मेलने करतात, नाहीतर बहुतेकांची पत्रिका कुरिअरने येते. आता कुरिअरने पत्रिका आलीच नाही तर… गमतीजमती होतात, गैरसमज होतात आणि मग एखादी गोष्टही घडते!
माझ्याच परिचयाच्या माझ्याच गावात राहणार्‍या दामल्यांच्या मुलाचं लग्न ठरलं होतं. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनात दोघांचा सहभाग असल्यामुळे परिचय झाला होता, नेहमी गाठीभेटी व्हायच्या; पण एकमेकांच्या घरी जाणं-येणं नव्हतं. एक दिवस दामल्यांनी फोन करून माझा संपूर्ण पत्ता लिहून घेतला, कारण काय तर मुलाचं लग्न!
पत्ता घेतला म्हणजे एक तर स्वतः घरी येऊन आमंत्रण
करणार किंवा फोन करून कुरिअरने किंवा पोस्टाने पत्रिका पाठवणार. मित्रमंडळींच्या बोलण्यांतून दामल्यांच्या मुलाच्या विवाहाची तारीख आणि लग्नाचा हॉल-ठिकाण हे सारं कानावर आलं होतं.
एक दिवस संध्याकाळी पत्नीबरोबर फिरायला बाहेर पडलो असता दामले एकटे आमच्याच भागात दिसले. घाईत दिसले. आमंत्रणं करायला बाहेर पडले असावेत. हातात लग्नाच्या पत्रिका होत्या. दुरून एका सोसायटीत शिरताना पाहिलं. माझ्या घरी आमंत्रण करायला येणार असते, तर बोलले असते. घरी मी किती वाजता परतणार हेही विचारलं असतं, माझ्या मनात असे विचार येऊन गेले.
नंतर माझ्या नोकरीच्या धावपळीमुळे आणि दामल्यांच्या लग्नकार्यातल्या व्यग्रपणामुळे त्यांची माझी कुठंहीभेट झाली नाही.


दामल्यांच्या मुलाच्या लग्नाची तारीख तर जवळ येत चालली होती. दामल्यांचा पत्ता विचारण्याकरिता म्हणून जो फोन आला होता, त्याला महिना झाला होता. त्यानंतर लग्नाला या, असा फोनही आला नाही. पोस्टाने किंवा कुरिअरने लग्नपत्रिका तरी यावी,
तर तीही आली नाही.
दामल्यांच्या मुलाचं लग्न दोन दिवसांवर येऊन ठेपलं. आमचा दोघांचा- म्हणजे दामल्यांचा आणि माझा कॉमन मित्र एकदा भेटला होता.
त्याने त्या लग्नाला जाण्याचा विषय काढला होता. मी येणार की नाही, याची चौकशी केली होती. “अरे, मला आमंत्रण पत्रिकाच आली नाही किंवा फोनही आला नाही.” असं मी सांगितलं होतं.
माझा मित्र म्हणाला, “अरे, पत्रिका आज-उद्याकडे येईल बघ. लग्नात भेटूच.”
लग्नाच्या दिवसापर्यंत दामल्यांकडची आमंत्रण पत्रिका किंवा फोन मला आलाच नाही. माझ्या मनात विचार आला. आपण काही दामल्यांचे इतके जवळचे मित्र नाही. दामल्यांना आपल्याला बोलावण्याची इच्छा असेल; पण लग्नाची आमंत्रणं जास्त झाल्यामुळे त्यांनी काटछाट केली असेल, त्यामुळे बोलावलं नसेल. दुसरं मन म्हणालं, मग त्या कॉमन
मित्राला कसं बोलावलं असेल? त्याचीही दामल्यांशी जास्त ओळख नव्हती.
मनात विचार सुरू झाले. त्या दिवशी हातात आमंत्रण पत्रिका घेऊन दामले माझ्याच कॉलनीत आले होते. मला ते ओझरते दिसले होते. त्यांनीही मला पाहिलं असेल; पण बोलले नाही, की घरी आमंत्रण करायला आले नाही. म्हणजे, त्यांना आपल्याला आमंत्रण करायचंच नव्हतं! म्हणजे पत्रिका पोस्टाने किंवा कुरिअरने येण्याचा प्रश्‍नच नव्हता. यथावकाश दामल्यांच्या मुलाचा विवाह पार पडला. माझा मित्र त्या लग्नाला गेला होता, असं कानावर आलं. पण तो मित्र भेटला नव्हता. आमंत्रण नसल्याने मी जाण्याचा
प्रश्‍नच नव्हता.
लग्नकार्य झाल्यामुळे दामलेही व्यग्र असणार! कदाचित कोकणात गावालाही गेले असावेत. एका महिन्यानंतर दामले मला रस्त्यात भेटले.
“मुलाच्या लग्नात तुमची अनुपस्थिती जाणवली हो! का नाही आलात?” दामल्यांनी भेटल्या-भेटल्या पहिलाच प्रश्‍न केला.
मी क्षणभर गोंधळलो! “दामले, तुमच्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण तुम्ही मला कुठे पाठवलं?” मी त्यांना प्रश्‍न केला.
“काय राव गरिबाची थट्टा करता? तुम्हाला मी आमंत्रण करणार नाही, असं होईल का? कुरिअरने लग्नपत्रिका मी तुमच्या पत्त्यावर पाठवली होती. फोन करून किती आधी मी तुमचा पूर्ण पत्ता विचारून घेतला होता. एक झालं, त्या गडबडीत तुम्हाला फोन करायचं राहून गेलं. म्हटलं पत्रिका पाठवली आहे. म्हणजे तुम्ही येणारच!”
दामले म्हणत होते ते खरं होतं. दामल्यांनी एक महिन्यापूर्वी मला फोन करून माझा पूर्ण पत्ता घेतला होता. मुलाचं लग्न आहे, असं मोघम तेव्हा ते म्हणाले होते. पण मला तर दामल्यांनी पाठवलेली आमंत्रण पत्रिका मिळालीच नव्हती.
दामले मला म्हणाले, “असं होणार नाही. जितक्या पत्रिका मी कुरिअरने पाठवल्या तेवढ्या सगळ्यांना त्या मिळाल्याच्या पोचपावत्या माझ्याकडे आहेत. तुम्हालाही पत्रिका मिळालेलीच आहे. उद्या-परवा त्यावर सही कुणाची आहे, ते बघून सांगतो.”
दामले निघून गेले; पण त्यांनी माझ्यावर ‘बॉम्बच’ टाकला. म्हणाले, पत्रिका कुरिअरने पाठवली आणि ती मिळाल्याची पोचपावती त्यांच्याकडे आहे! घरी आल्या-आल्या मी पत्नीला सारा प्रकार सांगितला. दामले नावाची कुठलीही लग्नपत्रिका आपल्याकडे आलेली नाही, हे पत्नीने निक्षून सांगितलं.
शेवटी माझ्या दोन्ही शेजार्‍यांकडे विचारणा केली. एक बर्वे आणि दुसरे गोखले; पण त्यांच्यापैकी कुणाकडेही माझी आमंत्रण पत्रिका दिलेली नव्हती. त्या दोघांनी खात्रीपूर्वक सांगितलं की, गेल्या महिन्याभरात कुरिअरवाल्यानं तुमचं कुठलंही कुरिअर आमच्याकडे दिलेलं नाही. मग ती आमंत्रण पत्रिका मला मिळालेली आहे, असं दामले खात्रीपूर्वक कसं सांगत होतं? आमंत्रणाचा हा गुंता वाढतच चालला होता.
चार दिवसांनी दामले रस्त्यातच भेटले. मला थांबवून म्हणाले, “कुरिअर मिळाल्याच्या सर्व पावत्या मी काढून पाहिल्या. तुमची पावती बघितली. सावंत नावाच्या तुमच्या शेजार्‍याकडे ही पत्रिका दिलेली आहे. त्यावर सावंतांची सही आहे.”

एका लग्नाच्या आमंत्रणाची गोष्ट, Short Story, Eka Lagnachya Amantranachi Gosht
“दामले, अहो सावंत म्हणून माझे कुणी शेजारीच नाहीत. आमच्या अख्ख्या सोसायटीत कुणी सावंत नाही,” मी दामल्यांना सांगितलं.
दामल्यांनी कुरिअरने मला लग्नाचं आमंत्रण पाठवलं होतं, हे सत्य होतं. कुरिअर मला मिळाल्याची, म्हणजे सावंत नावाच्या माणसाने ते घेतल्याची पावती त्यांच्याकडे होती. माझा शेजारी सावंत, बर्वे किंवा गोखले आहे, याची दामल्यांना काहीच कल्पना नव्हती. लग्नाची पत्रिका मला मिळाली नव्हती, हेसुद्धा एक सत्यच होतं.
“आता प्रश्‍न असा होता की, कुरिअरवाल्याने माझी पत्रिका कुणाला देऊन सही घेतली? बरं चुकून ज्या सावंतानं ती घेतली, ती त्याने आपली नाही म्हणून कुरिअरवाल्याकडे परत का नाही केली? सावंत व्यक्ती जवळ राहत असेल,
तर त्याला ती माझ्या घरी देता आली असती,” मी दामल्यांना म्हटलं. दोन दिवसांनी एक पाकीट पत्र माझ्या नावावर आलं. मी उघडून बघतो, तो त्यात दामल्यांच्या मुलाची लग्नपत्रिका होती. त्यावर माझा संपूर्ण पत्ता होता. सोबत एक चिठ्ठी होती.
“माफ करा, तुमचं पत्र कुरिअरवाल्यानं चुकून मला दिलं, मी सही करून ते घेतलंही. उघडल्यावर लक्षात आलं की, ते माझं नाही. दुसर्‍याच दिवशी महत्त्वाच्या कामाकरिता कोकणात गावाला जावं लागलं. त्यामुळे कुरिअरवाल्याला ते पत्र परत देता आलं नाही. गावाहून आल्यावर लगेच मी पोस्टाने ती पत्रिका आपल्याकडे पाठवत आहे; पण आता लग्नाची तारीख उलटून गेली आहे. क्षमस्व. आपला एस.टी.सावंत.”
मी लगेच दामल्यांना फोन लावला, “दामले, तुमच्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण आज मिळालं. सावंतांनी ती पत्रिका पोस्टाने माझ्याकडे पाठवली आहे. आमंत्रणाबद्दल खूप खूप धन्यवाद आणि गैरसमज टळल्याबद्दल आभार.”
– शंकर पेंडसे