एक नातं.. विश्वासाचं (Short Story: Ek Nate Visw...

एक नातं.. विश्वासाचं (Short Story: Ek Nate Viswasache)

एक नातं.. विश्वासाचं

प्रिती आणि पराग यांची मैत्री आणि पुढे मैत्रीचं रूपांतर प्रेमात… खरं तर दोघांचे विचार, भविष्याबद्दलची स्वप्नं खूपच वेगळी… खाण्यापिण्याच्या आवडीनिवडींपासून ते अगदी स्वभावापर्यंत काही सुद्धा जुळत नव्हतं… तरी सुद्धा आपल्याला पराग का आवडतो हा प्रश्न नेहमी प्रिती स्वतःलाच विचारायची… की केवळ एक आकर्षण… वयाच्या नियमानुसार येणारं?

पराग लवकरात लवकर बरा होशील, काळजी करू नकोस… एक मैत्रीण म्हणून मी कायम तुझ्या बरोबर असेन शेवटपर्यंत. परागचा हात हातात घेऊन तिने त्याला धीर दिला आणि ती नितीन बरोबर निघाली… अजिबात मागे वळून न पाहता… नाहीतर परत भावनिक गुंतायला झालं असतं. शेवटी… मनापासून केलेलं तिचं ते पहिलं प्रेम…
प्रिती आणि पराग यांची एका क्लास मधली मैत्री आणि पुढे मैत्रीचं रूपांतर प्रेमात… खरं तर दोघांचे विचार, भविष्याबद्दलची स्वप्नं खूपच वेगळी… खाण्यापिण्याच्या आवडीनिवडींपासून ते अगदी स्वभावापर्यंत काही सुद्धा जुळत नव्हतं… तरी सुद्धा आपल्याला पराग का आवडतो हा प्रश्न नेहमी प्रिती स्वतःलाच विचारायची… की केवळ एक आकर्षण… वयाच्या नियमानुसार येणारं?
प्रिती तशी हुशार आणि विचारी होती, प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणारी… तिला नक्की काय करायचं आहे भविष्यात हे तिचं पक्कं ठरलेलं आहे. त्यामुळे ते उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून त्याप्रमाणे वागणारी. त्याउलट पराग तसा स्वभावाने चंचल, आरंभशूर वैगेरे प्रकारात मोडणारा. भविष्याचा विचार करणं म्हणजे मूर्खपणा, असं त्याला वाटायचं; त्यापेक्षा वर्तमानात जगावे असा त्याचा सिम्पल फंडा म्हणा हवं तर.
दोघांच्या घरची परिस्थिती साधारण सारखीच होती, म्हणजे खाऊन पिऊन सुखी अशा प्रकारची. प्रिती एकुलती एक लेक, वडील एस. टी. महामंडळात कामाला होते, तर आई गृहिणी आणि दुपारच्या वेळेमध्ये 5 वी ते 7 वी च्या मुलांची शिकवणी घ्यायची. परागचा मोठा भाऊ प्रिंटिंग प्रेस मध्ये कामाला होता, वहिनी एका खाजगी कंपनी मध्ये कामाला होती. वडील कार्पोरेशन मधून सेवानिवृत्त झाले होते. आई काही वर्षांपूर्वी अचानक गेली.
परागला नोकरीमध्ये इंट्रेस्ट नव्हता. त्याला स्वतःचा बिझनेस करायचा होता, पण प्रितीचं म्हणणं असं होतं की, नोकरी करता करता त्यानं बिझनेस करावा. कारण बिझनेसकरिता एकदम भांडवल कुठून गोळा करणार, कर्ज काढून वैगेरे असल्या गोष्टी तिला पटत नव्हत्या. आणि एकदा बिझनेस मध्ये जम बसला की त्याने नोकरी सोडावी, असं तिला वाटायचं. त्यामुळे त्यांच्यात बरेचदा वाद व्हायचे.
पुढे व्हायचं तेच झालं. पराग पार्टनरशिप मध्ये बिझनेस करायला गेला आणि फसला. पार्टनरनं चांगलीच टोपी घातली त्याला. आता लोकांकडून पैसे घेतले होते, त्यांची दारात रांग लागली होती. भाऊ वहिनी तरी किती उपयोगी पडणार. शेवटी त्यांना त्यांचा संसार होताच, वडिलांची पेन्शन खूप काही नव्हती, तरी जमेल तितकी, वडिलांनी, भावाने मदत केली…. या सगळ्यात त्याला दारूचं व्यसन लागलं, मित्रांच्या संगतीने तो आता लॉटरी खेळायला लागला होता, दोन दोन दिवस गायब असायचा.
प्रितीने सर्व प्रकारे त्याला सांगून पाहिलं, अगदी वेळ आली तर तुला सोडून जाईन अशी धमकी पण देऊन पाहिली बर्‍याच वेळा. मग कसेबसे चार पाच दिवस तो नीट वागायचा… पण परत ये रे माझ्या मागल्या. तिच गत… प्रिती आता कंटाळली त्याला सांगून… तिने दोन तीन ठिकाणी त्याच्याकरता नोकरीसाठी प्रयत्न पण केले. पण तिथे तो जेमतेम दोन महिने टिकायचा. ऑफिसची काहीतरी कारणं सांगून नोकरी सोडली असं घरातल्यांना आणि प्रितीला सांगत असे.
आता प्रितीच्या घरातल्यांनी प्रिती करता स्थळं पहायला सुरवात केली. घरी परागबद्दल बोलण्यात काहीच फायदा नव्हता. कारण सध्याची परागची अवस्था पाहता त्याच्या बद्दल घरी काही न बोलणेच उत्तम.
प्रितीचे लग्न ठरले. मुलगा चांगला शिकलेला होता. घरची परिस्थिती पण उत्तम. बँकेत ऑफिसर होता. घरची मंडळी पण बोलायला वागायला अगदी छान. प्रितीच्या आईला तर खूपच आनंद झाला होता. पोरीने नशीब काढलं हो, सगळे आनंदात होते.
पण प्रिती त्या दिवशी अगदी गप्प गप्प होती. तिला परागची खूप आठवण येत होती. तिला कुठल्याही परिस्थितीत परागला भेटून लग्न ठरल्याचं सांगायचं होतं. तिला तिच्या आणि परागच्या नात्याबद्दल पण नितीनशी म्हणजे तिच्या होणार्‍या नवर्‍याशी बोलायचं होतं. थोडक्यात कोणालाही अंधारात ठेऊन तिला ना कुठलं नातं तोडायचं होत ना जोडायचं.
नेहमीच्या ठरलेल्या ठिकाणी ती परागला भेटली. परागची तब्येत फारच खराब झाली होती. त्याला पाहून प्रितीच्या डोळ्यात पाणी आले. काय अवस्था करून घेतली आहे परागनी, पण त्याच्यापासून डोळ्यातले पाणी लपवत आधी थोडफार इतर काही बोलत राहिली. मग बोलता बोलता तिने तिच्या लग्नाची कल्पना त्याला दिली. परागला खरं तर ऐकून थोडा धक्का बसला पण लगेच सावरत त्याने तिचे अभिनंदन केले.

’पराग, तुला काही नाही वाटलं, माझं लग्न ठरलं आहे ऐकून…’, प्रितीनं विचारलं.
अगं, असं कसं? वाटलं ना, खूप आनंद झाला. छान वाटलं तुला तुझ्या मनासारखा जोडीदार मिळाला, असं म्हणत त्याने डोळ्यात आलेलं पाणी लपवायला तिच्याकडे पाठ केली.
आणि तसंही माझ्याबद्दल तू घरी काय सांगणार होतीस, सांगण्यासारखं आहे तरी कुठे काय माझ्यात? असो… असं म्हणत त्याने डोळे पुसले आणि परत तिच्याकडे वळून पाहिलं आणि बोलला, आपली मैत्री आहे तशीच राहील.. काळजी करू नकोस. मी तुझ्या लग्नाच्या आड कुठेही येणार नाही. तू सुखात राहा. असं म्हणून तो झटकन तिथून निघून गेला.
प्रिती त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहत राहिली. डोळ्यातल्या पाण्यामुळे हळूहळू आकृती मात्र धूसर होत गेली.
प्रितीचं लग्न पार पडलं. लग्नाआधी पराग आणि तिच्या नात्याबद्दल तिनं सर्वकाही नितीनला सांगितलं होतं. कारण तिला आयुष्याची सुरुवात खोटेपणाने करायची नव्हती.
प्रितीचा संसार सुखाचा चालू होता आणि एक दिवस अचानक ऑफिसमधून घरी जात असताना तिला रस्त्याच्या कडेला पराग पडलेला दिसला. तिने तिची गाडी साइडला लावली आणि धावतच त्याच्याजवळ पोहोचली. त्याला उठवण्याचा तिने प्रयत्न केला पण तो उठत नव्हता. तिने रिक्षा, टॅक्सी थांबवायचा प्रयत्न केला पण, कोणी थांबायला तयार नाही. मग तिने नितीनला फोन करून सर्व सांगितले. तो लगेच बँकेतून निघाला आणि प्रितीने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचला. त्याला कारमध्ये घालून आधी त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. हॉस्पिटलचे सोपस्कार पूर्ण करून त्याला डॉक्टरांनी अ‍ॅलडमिट करून घेतले. एकूणच परिस्थिती पाहता डॉक्टर म्हणाले, ’यांना हॉस्पिटलमध्ये एक दिवस ठेवायला लागेल, मग ठरवू काय करायचं ते.’
दुसर्‍या दिवशी प्रिती आणि नितीन हॉस्पिटल मध्ये पोहोचले. त्याला सलाईन लावले होते. हॉस्पिटलमध्ये अँडमिट केल्यावर प्रितीने परागच्या भावाला फोन करून सर्वकाही सांगितले. प्रिती आणि पराग एकमेकांचे चांगले मित्र आहेत, हे दोघांच्या घरी माहीत होते. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर तिथे परागचा मोठा भाऊ सचिन भेटला. तो खरं तर खूपच अपसेट झाला होता. काय करावं सुचत नव्हतं. त्यातच त्याच्या बायकोचे दिवस भरत आले होते.
प्रिती आणि नितीन त्याला धीर देत होते. त्याला तर प्रिती आणि नितीनचे आभार कसे मानावेत तेच कळेना. तितक्यात डॉक्टर आले, त्यांनी सांगितले की, परिस्थिती खूपच कठीण आहे. इतकं त्याला दारूचं व्यसन लागलं आहे. आपल्याला काही टेस्ट कराव्या लागतील. त्या करून घेऊ. त्यांना आज इथेच राहू दे. उद्या सकाळी डिस्चार्ज देतो.
डॉक्टरांनी फक्त सचिनच्या खांद्यावर हात ठेवला आणि बोलले लवकरच काहीतरी निर्णय घ्या नाहीतर पोरगा हातचा जाईल.
प्रितीने हे ऐकल्यावर तिला एकदम धक्का बसला. काही वेळ कोणीच काही बोललं नाही. थोडावेळ मध्ये गेल्यावर, प्रीतीचा नवरा नितीन म्हणाला, ’आपण याला व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जाऊ. त्यांना सगळं काही सांगू. ते नक्कीच आपली मदत करतील. हे ऐकल्यावर प्रिती आणि सचिनने एकमेकांकडे पाहिलं. ते गोंधळलेत हे नितीनला स्पष्ट कळलं.
माझं ऐका. आपण त्याला त्यांच्याकडे घेऊन तर जाऊ, ते काय म्हणतात ते ऐकून तर घेऊ. बाकी पुढचं पुढे… पण एक मात्र नक्की की यातून लवकरात लवकर आपण परागला बाहेर काढायचं. ती आपली सगळ्यांची जबाबदारी.. आपणच धीर सोडला तर कसं होणार?
सचिनला पटलं. तो म्हणाला, तुमची साथ आहे ना मग मी माझ्या भावाकरता काहीही करायला तयार आहे.
आता कसं बोललात… चला चहा घेऊ फक्कड.. मी चौकशी करतो आणि तुम्हाला फोन करतो.
प्रितीला काय बोलावं सुचेना.. तिच्या डोळ्यात पाणी आलं. नितीन खरं तर आपला नवरा, त्याने हे सगळं परागकरता करायची काही गरज नाही. पण त्याला सगळं माहीत असूनही तो हे करतोय. मी खरंच किती भाग्यवान आहे की मला असा नवरा मिळाला. नाहीतर आजकाल एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून संशय घेणारे नवरे आपल्या आजूबाजूला बघायला मिळतात.
अगदी वेळेत निर्णय घेतलात. खरं तर अजून थोडा उशीर केला असतात तर लिव्हर खराब झाली असती. फाईल पाहिली मी. त्याप्रमाणे बाकीचे रिपोर्टस् नॉर्मल आहेत.
साहेब, होईल ना हो माझा भाऊ बरा, त्याची अशी अवस्था नाही पाहवत. सचिनचे डोळे भरून आले.
’होणार, नक्की बरा होणार. काय साहेब… बरोबर ना?’ नितीन सचिनच्या खांद्यावर हात ठेवत बोलला. ’हो नक्कीच.. तुम्ही निश्चिंत व्हा. आता परागची जबाबदारी आमची.’
ओके साहेब. निघतो. उद्या ठरल्यावेळी त्याला घेऊन येतो.
पराग कोणाशीही काही बोलत नव्हता. शांत शांत झाला होता. डोळे खूप खोल गेले होते. खूप निस्तेज झाला होता. तो व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाला. निदान सहा महिने तरी त्याला तिथे राहावं लागणार होतं…


दर पंधरा दिवसांनी सचिन आणि नितीन, प्रिती त्याला भेटून जायचे. त्याला धीर द्यायचे. हळूहळू परागमध्ये सुधारणा होताना दिसत होती. तब्येत पण सुधारू लागली होती. प्राणायाम, सूर्यनमस्कार हे तर चालू होतच पण तो आता केंद्राच्या क्टीव्हिटीज् मध्ये भाग घेऊ लागला.
आणि एक दिवस व्यसनमुक्ती केंद्राच्या साहेबांनी सचिन आणि नितीनला बोलवून घेतले आणि म्हणाले, ’तुम्ही आता परागला इथून घेऊन जाऊ शकता. तो आता बरा झाला आहे.’ सचिनला तर इतका आनंद झाला की, कधी एकदा घरातल्यांना हे सांगतोय असं झालं होतं त्याला.
दुसर्‍या दिवशी सचिन, त्याची बायको निशा, नितीन, प्रिती सगळेच त्याला घ्यायला आले होते. सगळ्यांनाच खूप आनंद झाला होता.
घरी पोचल्यावर निशाने त्याचं औक्षण केलं. परागच्या वडिलांचे डोळे भरून आले. त्याच्या डोक्यावरून त्यांनी प्रेमाने हात फिरवला आणि नितीनकडे बघून त्याला हात जोडत म्हणाले, ’नितीन तुमचे उपकार आम्ही सर्व आयुष्यभर विसरणार नाही. तुम्ही परागला दुसरं आयुष्य दिलंय.’ आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं.
”अहो बाबा, असं काय करताय, मी काहीच केलं नाही. जसा तो प्रितीचा मित्र तसाच माझाही. अहो मी जे काही केलं ते माझ्या मित्रासाठी आणि तुमच्या सगळ्यांची साथ होतीच की.”
’चला, हा आभार प्रदर्शन सोहळा उरकला असेल तर मस्त कांदे पोहे आणि गरमागरम चहा तयार आहे’, असं म्हणत निशा पोह्यांच्या डिश आणि प्रिती चहा घेऊन हॉलमध्ये आल्या.
गप्पा मारत कसा वेळ गेला कळलंच नाही, चला आता आम्ही निघतो, परत भेटू. पराग, सचिन बाय, बाबा नमस्कार करतो. येतो आता.
’वेळ मिळेल तसे येत जा रे..’ ’हो नक्की बाबा…’ असं म्हणून नितीन आणि प्रिती निघाले. पराग म्हणाला, ’मी त्या दोघांना खाली सोडून येतो.’
तिघे खाली आले.


नितीन मी तुला थँक्स म्हणून परकं करणार नाही. पण खरंच मला शब्द सापडत नाहियेत तुझे आभार मानायला. अरे सख्खे करणार नाहीत इतकं तू केलं आहेस माझ्याकरता, ते सुद्धा तुला माझ्या आणि प्रितीच्या आधीच्या नात्याबद्दल माहीत असूनही.
पराग आता आपण छान मित्र झालो आहोत एकमेकांचे. आता मागचं सगळं विसरून नव्यानं तू तुझ्या आयुष्याला सुरुवात करावीस असं मला वाटतं. खरं सांगतो तुमच्या दोघांचा मला एक गुण फार आवडला. तुम्ही दोघे खरे आहात, लपवाछपवी अजिबात नाही. तुमचं नातं खरं आहे. विश्वासाचं आणि शब्दाला जागणारं… आणि माझा माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. चल निघतो आता. काळजी घे.
पराग आता चांगल्या कंपनीमध्ये जॉब करतो. लग्न होऊन आता त्याला दोन गोड मुली आहेत. नितीन आणि प्रितीला पण एक मुलगा आहे. नितीनची बदली झाल्यामुळे ते आता बंगलोरला असतात. पण फोनवरून सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतात.
कुठल्याही नात्यामध्ये विश्वास महत्त्वाचा. हाच एकमेकांवरचा विश्वास नात्याची वीण घट्ट करत जातो. नाही का..

– शिल्पा केतकर