एक धागा सुखाचा (Short Story : Ek Dhaaga Sukhacha)

एक धागा सुखाचा (Short Story : Ek Dhaaga Sukhacha)

एक धागा सुखाचा


आपण सारेजण सुखाच्या मागे धावत असतो. ते मिळवण्यासाठी धडपडत असतो. पण सुख हे मानण्यावर आहे आणि आपल्याला पाहिजे तसे सुख आपणही मिळवू शकतो. कसं ते पाहा.
आधुनिक महाकवी ग. दि. माडगूळकर यांचं चित्रपटातील एक गाणं फारच लोकप्रिय आहे. ’एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे’ अर्थात् सुख हे दुर्मिळ आहे. हे आपल्याला कळतंय् पण वळत नाही, अशी स्थिती आहे. कारण या सुखाच्या मागे आपण सारेजण धावत असतो. सुख मिळवण्यासाठी धडपडत असतो.
सुख हे मानण्यावर आहे. कसं ते पाहा!
एका व्यासपीठावर दोन प्रसिद्ध मराठी उद्योगपतींची मुलाखत चालली होती. दोघेही यशस्वी उद्योगपती होते. लक्ष्मी त्यांच्या घरी पाणी भरत होती. दोघांचेही संसार सुखाचे चालले होते. तरीही मुलाखतकर्त्याने त्यांना तुमची सुखाची कल्पना काय आहे?’ असा प्रश्न विचारला.
एक उद्योगपती म्हणाले की, मी माझ्या कामात अहोरात्र बुडालो असतो. तेव्हा वेळात वेळ काढून, संपूर्ण कुटुंबाला घेऊन ओबेरॉय शेरेटन (आताचे ट्रायडंट हॉटेल) किंवा ताजमहाल हॉटेलात जाऊन राहतो. तिथे मी काम विसरून घरातील माणसांसोबत सुट्टी एन्जॉय करतो. उंची हॉटेलात खाणेपिणे, स्वीमिंग पूलमध्ये पोहणे आणि डोक्याला ताण न देता आराम करणे, हा कार्यक्रम करतो. मला त्यात खूप आनंद मिळतो
दुसरा उद्योगपतींनी सांगितलेली आपली सुखाची कल्पना अक्षरशः जगावेगळी होती. ते म्हणाले की, आज माझ्याकडे ऐश्वर्य आहे. मी व माझ्या घरची माणसे विमानाशिवाय प्रवास करत नाही. परंतु माझ्या नात्यागोत्यात अशी असंख्य माणसे आहेत. विशेषतः वृद्ध ज्यांना कधी विमानप्रवास झेपला नाही. अशा 20-30 नातेवाईकांना मी नित्यनेमाने विमान प्रवास घडवतो. त्यात मला मिळणारे सुख अवर्णनीय आहे
त्यांच्या या अवर्णनीय सुखाच्या कल्पनेला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली! तेव्हा असे नाही तर तसे, म्हणजे आपल्याला पाहिजे तसे सुख आपणही मिळवू शकतो. कसे ते पाहा –

सोळावं वरीस सुखाचं

एका पाहणी अहवालातून असं दिसून आलं आहे की, 16 ते 18 वयाची किशोरवयीन – तरुण मंडळी सगळ्यात जास्त सुखी असतात. ते बेफिकीर असतात किंवा त्यांच्यावर कोणती जबाबदारी नसते म्हणूनही असेल कदाचित, पण ते मजेत असतात. तरुणपणाचा आनंद उपभोगत असतात. सगळ्यात कमी खूश पन्नाशीतील माणसे असतात. एकतर त्यांच्या कल्पनेतील सुख उपभोगून झाले असावे, म्हणून किंवा योग्य ते सुख मिळाले नाही, या विचारांनी ते कमी सुखी असतात.
थट्टामस्करी करणारे लोक कामाच्या ठिकाणी 70 टक्के अधिक मेहनती असतात. त्यामुळे ते इतरांपेक्षा जास्त यश मिळवतात. म्हणजे सुखी माणसाकडे यश चालून येते, असं म्हणायला हरकत नाही.

रोगप्रतिकारक शक्ती जास्त

जे लोक खुशालचेंडू जीवन जगतात, ते सुखी असतात, अशा खुशालचेंडू लोकांची रोग प्रतिकारक शक्ती जास्त असते. अगदी 52 टक्क्यांनी जास्त असते. असे लोक डोक्याला ताप करून घेत नसल्याने सुखी असतात. रोग त्यांच्या अंगात शिरत नाही अन् रोग प्रतिकारक शक्तीचे प्रमाण घसरत नाही. तेव्हा सुख मिळायचं असेल तर खुशमिजाज बना.

सुखोपचार अंगिकारा


आपलं बिघडलेलं आरोग्य सुधारण्यासाठी निरनिराळ्या थेरपीज् अर्थात् उपचार असतात, त्याप्रमाणे काही देशांमध्ये सुखोपचार पद्धती सुरू झाल्या आहेत. अर्थात् हॅपीनेस थेरपी. जवळपास 90 देशात ही पद्धत सुरू आहे. त्यामध्ये डॉक्टर, नर्स, पेशंट असे सगळे मिळून डान्स करतात. एकमेकांना गळामिठी घालून सकारात्मकता आदान-प्रदान करतात. त्यासाठी हॅपीनेस क्लास नावाचा कोर्स करायचा असतो. असा कोर्स अमेरिकेमध्ये 1998 साली पहिल्यांदा सुरू झाला आहे. आपल्याकडे काही वर्षांपूर्वी दिल्ली सरकारने असे सुखोपचार देणारे, हॅपीनेस क्लासेस चालवले होते. त्याच परिणाम चांगले दिसून आले. तेव्हा असे सुखोपचार तुम्ही पण अंगिकारा. अन् खुश राहा.

कॉफी पिऊन सुख

फिनलॅन्डच्या खालोखाल नॉर्वे हा जगातील सर्वात जास्त सुखी माणसांचा देश समजला गेला जातो. इथल्या लोकांची सुखाची कल्पना फारच सोपी आणि साधी आहे. हे लोक कॉफी पिण्याच्या निमित्ताने एकत्र येतात. या कॉफीपानाने सुख मिळते, ही त्यांची कल्पना आहे. हे कॉफी पिणे, नॉर्वेकरांचे इतके आवडते आहे की, तिकडच्या कॉफी हाऊसमध्ये बसून बडेबडे राजकीय नेते आणि उद्योगपती, सामान्यजनांप्रमाणे कॉफी पितात. समतेची ही भावना आपल्याला एकत्र आणते. अन् सुख मिळते ही त्यांची कल्पना आहे. हा प्रयोग आपल्याकडे पूर्वीपासून चालला आहे. पूर्वीच्या काळी या नं आमच्याकडे चहाला’, असं म्हणून घरी येण्याचे निमंत्रण देण्याची पद्धत आपल्याकडे होती. विदर्भाचे लोक यात अग्रेसर आहेत. चहापानाला एकमेकांना बोलावण्याचे, जाण्याचे गुण त्यांच्या अंगी आहेत. अगदी तुमच्याकडे आलेल्या पै पाहुण्यांना देखील घेऊन या असं त्यांचं आग्रही निमंत्रण असतं. अशा बैठकीने दोन कुटुंबात सलोखा, स्नेह वाढतो. अन् अर्थात्च सुख लाभते. या चांगल्या पद्धती आपण विसरलो, अन् सुखाला वंचित झालो आहोत.
या निमित्ताने करंटेपणाचे उदाहरण डोळ्यासमोर येते. आपल्या राज्यात विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी सरकारतर्फे चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला असतो. सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्यात सलोखा निर्माण व्हावा, खेळीमळीच्या वातावरणात विधानसभा अधिवेशन पार पडावे, ही त्यामागची भावना. पण आपल्याकडे विरोधी पक्ष या चहापानाच्या कार्यक्रमावर कायमच बहिष्कार घालताना दिसतात. अन् सुख लाथाडतात. याशिवाय या कार्यक्रमावर केलेला खर्च वाया जातो. त्याचे जनतेला किती दुःख होत असेल, याची जाणीव या बहिष्कार टाकणार्‍यांना होईल, तो सुदिन म्हटला पाहिजे.

चांगल्या बातम्या वाचा

काही मानसशास्त्रज्ञांच्या मते, सुखी राहण्याचा सुपरहिट मंत्र म्हणजे वर्तमानपत्रातील चांगल्या बातम्या वाचणे. वर्तमानपत्रातील फक्त चांगल्या व सकारात्मक बातम्या वाचल्या तर आनंद मिळतो, असं या तज्ज्ञ मंडळींचं मत आहे. शिवाय अशा आनंदी बातम्या दुसर्‍यांशी शेअर करा अन् त्यांनाही सुखी करा, असं ते म्हणतात. एका संशोधनातून हे उघडकीस आलं आहे की, या कृतीने खुशी 60 टक्क्यांनी वाढते. आता बर्‍याच लोकांनी वर्तमानपत्र वाचणे बंद केले आहे. कारण हे लोक मोबाईलवर बातम्या वाचतात. हरकत नाही, मोबाईलच्या बातम्यांना हीच फुटपट्टी लावा, अन् सुखी राहा.

सर्वात सुखी माणूस


जगी सर्व सुखी असा कोण आहे? – असं आपल्याकडे एक विचारलं जातं. अन् कुणीच नाही’, असं त्यावर उत्तर दिलं जातं. पण हे खरं नाही. या जगात कुणी ना कुणी सुखी असणारच. बरीच असतीलही. पण मॅथ्यू रिकर्ड नावाचा एक गृहस्थ आहे. तो जगातील सर्वात सुखी माणूस गणला जातो. त्यानं सुखी राहण्यासाठी खालील 5 उपाय सांगितले आहेत. हे त्याने स्वतःचा 45 वर्षे अभ्यास करून सुचविले आहेत.
1. नेहमीच फक्त स्वतःचाच विचार करत राहिल्याने, पदरी दुःखच येतं. तेव्हा दुसर्‍याचाही विचार करा. दुसर्‍याला मदत करा. तुम्ही सुखी व्हाल.
2. दर तासाने हात वर करून शरीराला ताण द्या. त्याच्याने शरीरातील मांसपेशी सैल होतात, अन् अंगात आनंद निर्माण करणारी केमिकल्स सक्रीय होतात.
3. आपल्या सहवासात असलेल्या चांगल्या लोकांचे फोटो आपल्या घरात व आपल्या कामाच्या ठिकाणी लावावे. ते बघून सुखाची भावना मनात निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी शक्य नसेल, तर मोबाईल स्क्रीनवर असे फोटो ठेवून त्यांचे दर्शन घ्यावे.
4. अक्रोड आणि चॉकलेटस् अधून मधून खावेत. त्यांच्यात असलेला पॉलिफिनॉल्स हा घटक, मेंदुतील आनंदाची लहर निर्माण करणार्‍या भागास चालना देतो.
5. जेव्हा काही कारणांनी घबराट निर्माण होते किंवा मरगळल्यासारखे वाटते, तेव्हा इच्छा नसली तरी जोरजोराने हसा. तोंड उघडताच, मेंदुमधील आनंदाच्या लहरी निर्माण करणारे मज्जातंतू सक्रीय होतात, अन्, सुख मिळते.