डस्टबीन (Short Story: Dustbin)
डस्टबीन (Short Story: Dustbin)

डस्टबीन
– सुधीर सेवेकर
“आम्ही शिफ्ट व्हायचं ठरवलंय आम्हाला आमच्या घरी एकही ‘डस्टबीन ‘ नकोय ! ”
डस्टबीन ?सुनीताबाई दचकल्या !
डस्टबीन म्हणजे ?
” आम्ही दोघांनी हैद्राबादला शिफ्ट व्हायचं ठरवलंय ! तिथं हायटेक सिटी परिसरात आम्ही एक फ्लॅटही बुक केलाय! आमची ठिकाणं तिथून जवळच आहेत!”
समीर सांगत होता. त्याची पत्नी मोहिनी शेजारीच शांतपणे उभी होती.
सुनीताबाईंनी टीव्ही बंद केला आणि त्या समीरचं म्हणणं ऐकू लागल्या. समीर आणि मोहिनी गेली दोन वर्षे ‘वर्क फ्रॉम होम ‘ परिस्थितीमुळे सुनीताबाईंसोबतच राहात होते. सुनीताबाई या दोघांच्या कामाच्या वेळा सांभाळत त्यांचं खाणंपिणं ,चहाफराळ इत्यादी सगळं करण्यात मनापासून रमल्या होत्या. आपला एकुलता एक मुलगा समीर आणि नवीनवेली कर्तृत्ववान सुनबाई मोहनी यांच्यासाठी राबण्यात, त्यांची बडदास्त राखण्यात त्यांना अतीव समाधान लाभत होतं. पण कोरोनामुळे ओढवलेली परिस्थिती नंतर बदलली; ‘वर्क फोम होम ‘ संपले. कंपनीने समीर – मोहिनीस मुख्यालयात हैद्राबादेस जॉईन व्हायला सांगितले. हे सगळे समीरने सुनीताबाईंना काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. त्यामुळे आज ना उद्या ते हैद्राबादेस शिफ्ट होणार हे निश्चित होते.
परंतु त्याने तिकडे वेबसाईटवर ‘सर्च ‘ करून घर हुडकले. ते बुक केले वैगेरे मात्र त्यांना माहिती नव्हते. त्यामुळे हे सगळे समीर आणि मोहिनी यांनी घरबसल्या सगळे फायनल केले, याचा त्यांना आनंदच होता. नवी पिढी संगणक, वेबसाईट्स, ऑनलाईन व्यवहार वैगेरेंबाबत विलक्षण स्मार्ट आहे याचा त्यांना अभिमानही होता. त्यांची स्वतःची सगळी हयात प्राथमिक शाळेची मुख्याध्यपिका म्हणून खर्ची पडलेली होती. वाचन -लेखन ,वैचारिक बैठक वैगेरेंबाबत त्या खूप आधुनिक होत्या. पण हे ‘ऑनलाईन ‘ व्यवहाराचे तंत्र मात्र त्यांना आत्मसात करता आले नाही. अर्थात त्याची त्यांना खंतही नव्हती. उलट समीरच्या वडिलांच्या अकाली अपघाती निधनानंतर आपण एकहाती समीरला वाढवले , उच्चशिक्षित केले याबाबत त्या विलक्षण समाधानी होत्या. समीरने परप्रान्तीय , परभाषिक मुलीशी लग्न करायचे ठरविले; या त्याच्या निर्णयालाही त्यांनी सहर्ष सहमती दिली होती. लग्नही थाटामाटात लावून दिले होते.
आपली मुलं कायमस्वरूपी आपल्यासोबत राहाणार नाहीत; ते त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे पंख पसरत त्यांच्यात्यांच्या क्षितिजाकडे झेपावणार हेही त्यांना माहीत होते. त्याची असंख्य उदाहरणे त्या आसपास पाहात होत्याच. त्यामुळे समीर -मोहिनी हेही आपल्यापासून दूर जाऊ शकतात , हेही त्यांच्या अनुभवी आणि परिपक्व मनाने मान्य केलेले होते.
परंतु आजच्या बोलण्यात समीरने जो ‘डस्टबीन ‘ हा शब्द उच्चारला , वापरला, त्याचा अर्थ काय? ‘डस्टबीन ‘ म्हणजे कचरा आणि निरुपयोगी वस्तू टाकण्याचा डबा. हा शब्दकोषातील अर्थ सुनीताबाईंना माहिती होता. समीर म्हणतोय , त्याप्रमाणे आज हे ‘डस्टबीन ‘ म्हणजे आपण स्वतः तर नव्हे?
हा प्रश्न सुनीताबाईंच्या मनात फणा काढून उभा राहिला आणि त्या मुळापासून हादरल्या. जीवनातील अनेक बऱ्यावाईट प्रसंगांना तोंड देताना त्या कधीही डगमगल्या नाहीत. प्रत्येक प्रतिकूलतेवर त्यांनी खंबीरपणे मात केलेली होती. असंख्य कडुगोड प्रसंग पचविले होते.
पण आज आपण ‘डस्टबीन ‘ झालोय , म्हणजे निरुपयोगी झालोय. कचराकुंडी झालोय असे जे समीरने त्याच्या बोलण्यातून सुचविले ते त्यांना विलक्षण व्यथित करून गेले.
“अरे , मी कचराकुंडी नाही. मी डस्टबीन नाही !”
असे समीरला आणि आजच्या पीढीला ओरडून सांगावे असे त्यांना वाटू लागले.
” तुम्हालाही मुले होतील . तेंव्हा तुमच्या बायकांची बाळंतपणं , तान्ह्या मुलांना वाढवणं , मोठं करणं, त्यासाठी खस्ता खाणं , जाग्रणं करणं हे सगळं तुमच्या बायकांना करणं होणार आहे का? त्यासाठी मी म्हणजे खस्ता खाणारी आजीचं हवी. तुमची अत्याधुनिक सूतिकागृहे ,पाळणागृहे , आधुनिक सेवासुविधा वैगेरेंना ते शक्य नाही. घरच्या माणसाला , आजीच्या मायेला , कोडकौतुकाला आणि मुख्य म्हणजे अत्यन्त आस्थेनं , स्वेच्छेने केल्या जाणाऱ्या परिश्रमाला तुमचं आधुनिक जग अजूनतरी पर्याय शोधू शकलेलं नाही. कधीच शोधू शकणार नाही!”
अंतर्यामी आक्रन्दणाऱ्या सुनीताबाईंच्या मनात अशा विचारांचं एकच काहूर माजलेलं होतं. पण प्रत्यक्षात त्यांच्या तोंडून समीर -मोहिनी यांना बोलण्यासाठी एकही शब्द फुटत नव्हता ———–
“आम्ही तुझ्यासाठी इथंच एक तुझी सर्व काळजी घेणारी बाई फिक्स केली आहे. ती तुझी देखभाल करेल ——- ”
समीर सांगत होता. पण त्याचे यापुढचे शब्द सुनीताबाईंच्या कानावर पडूनही त्यांच्यासाठी ते अजिबात महत्त्वाचे नव्हते. आजवर नाना चढउतार पाहिले . पचविले. आता हाही टप्पा आपण नक्कीच सहन करू असा आत्मविश्वासही त्यांना होता. कालाय तस्मै नमः !