ध्येय (Short Story: Dhyeya)

ध्येय (Short Story: Dhyeya)

ध्येय


– गिरीजा पागनीस

कोण तो वश्यामामा! ना नात्याचा ना गोत्याचा. आईचा मानलेला भाऊ. त्याला तो बिलकूल आवडायचा नाही. दरवेळी असाच खायच्या-जेवायच्या वेळी यायचा. समोर बसायचा. ‘मंदी, मंदी’ करायचा. ती त्याला जेऊ खाऊ घालायची. त्याबदली कसल्या तरी पेपरवर आईची सही घेऊन जायचा. त्यात लक्ष घालण्याएवढा आईच्या भाषेत मी मोठा नव्हतो ना?
सकाळची नऊ-दहाची वेळ. परेश आणि मंदा आई आणि मुलगा पुढ्यात पोह्यांची कढई घेऊन खायला बसलेले. चाळीतील घर, दरवाजा अर्धवट उघडा.
“ येऊ का?” असं म्हणत वशामामा सरळसरळ घरातच शिरला.
“काय पर्‍या, कसा आहेस?” असं म्हणत पर्‍याच्या पाठीवर थाप मारीत तो पण तिथेच फतकल मारुन बसला.
परेशने आपल्या समोरचे पोहे कसेतरी घशात कोंबले अन् पाठीवर दप्तर टाकून तो पळाला. त्या आधीच मंदाने ती कढई म्हणजे त्या कढईतील सर्व पोहे बशीत घालून त्याच्यासमोर ठेवले.
खरं तर पशाला आणखी हवे होते. परंतु आईचे हे कृत्य त्याला दरवेळचेच पाठ झाले होते.
कोण तो वश्यामामा! ना नात्याचा ना गोत्याचा. आईचा मानलेला भाऊ. त्याला तो बिलकूल आवडायचा नाही. दरवेळी असाच खायच्या-जेवायच्या वेळी यायचा. समोर बसायचा. ‘मंदी, मंदी’ करायचा. ती त्याला जेऊ खाऊ घालायची. त्याबदली कसल्या तरी पेपरवर आईची सही घेऊन जायचा. त्यात लक्ष घालण्याएवढा आईच्या भाषेत मी मोठा नव्हतो ना?
बाजारातून काही वस्तू आणायला किंवा कसल्या घरकामात जर मी मदत केली नाही तर आई मला डाफरायची.
“एवढा मोठा झालास, स्वतःची कामं स्वतः करायला लाग जरा.” तेव्हा मी मोठा होतो.
“अगं आई, नेहमी वश्यामामा येऊन तुझी कसली सही घेतो आणि कशाकरता?” अशा आणि अनेक प्रश्नांवर आई मला ओरडायची. ‘तू लहान आहेस अजून. तू तुझा अभ्यास कर, मोठ्यांच्या गोष्टीत नाक खुपसू नये.’
अशी बरीच म्हणजे पाच-सहा वर्षे लोटली. मी दहावीपर्यंत पोहोचलो. आईच्या भाषेत मोठा झालो. वयानं सज्ञान झालो नसलो तरी व्यवहारापुरता नक्कीच सज्ञान व मोठा झालो होतो. पुढचा मार्ग म्हणजे कॉलेज प्रवेश, शिक्षण यासाठी काहीतरी हातपाय हलवणं जरुरी होतं.
आईची इच्छा होती मी पुढे शिकावं. परंतु परिस्थितीनं तिचे हातपाय बांधलेले. तिची तुटपुंज्या पगाराची नोकरी. आम्ही कसंतरी भागवत होतो, ते तिचं तिला नि माझं मलाच माहीत होतं.
तरीपण यातून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे असा विचार करता करता माझ्या डोक्यात एक कल्पना सुचली. थोडे फार साठवलेले पैसे होते ते खिशात टाकून मी निघालो.
“आई, मी मित्रांबरोबर थोडं भटकायला जाऊन येतो. माझी वाट पाहू नको. बहुतेक मी उद्याच येईन.” आईची परवानगी न घेताच मी निघालो.
“बरं, जा नीट. सांभाळून जा.” आईची सूचना.
मी तडक रेल्वेनं वसई गाठली. घरत वकिलांच्या घरी गेलो. त्यांचा मुलगा इशांत व पुतण्या प्रबोध दोघेही माझे लहानपणीचे मित्र होते. त्यांना पाहून खूप आनंद झाला. मी लहान असताना इकडे येत असे. माझी आजी मला तिची जमीन आहे ’ती माझ्यामागे तुमचीच आहे’ असे सांगत असे.
घरत वकिलांना त्याबद्दल मला विचारायचं होतं. खरं तर मी लहान असताना आजीबरोबर यायचो, तेव्हा अ‍ॅड. घरत म्हणजे माझ्यासाठी आदर्श होते. तेव्हा ते पण छोट्याशा घरात राहायचे. पण त्यांचा पोशाख, रुबाबदारपणा मला खूप आवडायचा. मोठेपणी आपण असं व्हावं असं वाटायचं. परंतु, पितृछत्र हरवलं अन् सगळं संपलं.
त्या रात्री त्यांनी मला आग्रहानं ठेवून घेतलं. सकाळी मी धीर करून त्या जमिनीबद्दल विषय काढला. घरत काका फार प्रेमळ होते व हुशारही होते. त्यांनी त्या जमिनीचे कागद आपल्या कारकूनाकरवी मागवून घेतले.
त्यांनी मला एक प्रश्न केला, “हा वसंत शेटकर कोण रे?”
“हां. तो वश्यामामा ना? आईचा मानलेला भाऊ. तो अधूनमधून येतो. कसल्यातरी पेपरवर आईची सही घेऊन जातो.”
“हो. त्यानेच हा सगळा घोळ केला आहे. तू अगदी वेळेवर आलास इकडे. ती सर्व जमीन तो एका बिल्डरच्या घशात घालणार होता. परंतु ते अद्याप पूर्ण झालेलं नाही. तू एक काम कर. आज, नव्हे आत्ताच तुझ्या आईला बोलावून घे.”
“नको, नको. थांब. मी त्या जमिनीचे सात-बारा मागवतो. ते कोणाच्या नावावर चढले आहेत की ते बघतो. मग आपण ठरवू.”
मी तर अक्षरशः रडवेला झालो, पण आईचा आणि त्यापेक्षा त्या वशामामा कसला… ’वशाडमामाच’ तो! त्याचा भयंकर राग आला. परंतु वेळेवर मला स्वामींनी बुद्धी दिली. अ‍ॅड. घरत यांच्याकडे यायची आणि ते तर स्वामींप्रमाणेच उभे राहिले, माझ्या पाठीशी.
मला स्वामींचे वाक्य आठवले, ’भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’.
अ‍ॅड. घरत यांनी बरेच कष्ट करून त्या व्यवहाराची छाननी केली. जेवताना त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवून म्हटलं, काही काळजी करू नको. सगळं व्यवस्थित होईल आणि त्या वसंताला पण सरळ करुया.

“हो हो. थँक्स काका. खूप आभारी आहे तुमचा.” मी हात जोडून म्हटले.
“अरे, आभार कसले मानतोस? एकतर माझा व्यवसाय आहेच व अडचणीतील माणसांना मदत करणं हे माझ्या रक्तातच आहे. शिवाय तू तर आमच्या शांतू मावशीचा नातू. ती तर आम्हाला परकी नव्हती आणि आम्ही पण तिला. हक्काने तिच्या घरी जाऊन पिठलं भाकरी खायचो आम्ही.” घरत काका जुन्या आठवणीत रमले.
’…….’ मी.
“अरे, ते जाऊ दे. या कामाचं टेंशन नको घेऊस. ते तर होणारच. तू पुढे काय करायचं ठरवलंस ते सांग.” काका अगदी आपुलकीने प्रेमाने बोलत होते.
“आता दहावीचा निकाल लागल्यावर बघू कुठे लहानशी नोकरी मिळते का. ती करून कॉलेज करायचा विचार आहे.” मी सावकाशपणे बोललो.
अ‍ॅड. घरत काका थोडेसे विचार करत थांबले व बोलू लागले, “हे बघ परेश, मी काय सांगतो, ते तू नीट ऐक. तू तुझ्या शिक्षणाची व खर्चाची मुळीच काळजी करू नको. मी दरवर्षी एका विद्यार्थ्याचा खर्च करतोच. 11-12वीचा या वर्षीचा तो खर्च तुझ्या नावे हे ठरलं. त्यानंतर जर तू पदवी घेतलीस तर मग पुढे त्याचा विचार करू आता नको करुस.”
“काका मी एक माझ्या मनातलं बोलू का?” मी जरा चाचरतच विचारलं.
“अरे बोल, बोल. घाबरतोस कशाला?” काका हसतच बोलले.
“काका मी लहानपणापासून सुट्टीत इकडे येतो. तेव्हापासूनच ही तुमची कपाटातील वकिलीची, कायद्याची पुस्तकं पाहून मला खूप भारी वाटायचं की आपण पण असं काकांसारखं वकील व्हावं…पण?”
“अरे, पण त्यात काय तू नक्की वकील होशील आणि माझ्यानंतर ही सर्व पुस्तकांची माझी मालमत्ता मी तुझ्या स्वाधीन करीन. याचं कारण हे आमचे दोन्ही मुलगे इशांत व प्रबोध दोघे या लाइनीत येणारच नाहीत. ते दोघे इंजिनिअरिंगला जाणार हे नक्की. त्यामुळे तू काळजीच करू नको.” काका अगदी प्रेमाने सांगत होते.
मी मनोमन स्वामींना हात जोडले व मनातल्या मनात म्हटले, ’अशक्यही शक्य करतील स्वामी.’
दुसर्‍या दिवशी काकांनी त्या जमिनीच्या संबंधित सर्व लोकांना बोलावून घेतलं. तोपर्यंत माझी आईपण येऊन पोचली होती.
काकांची बाहेरची प्रशस्त खोली म्हणजे त्यांचं ऑफिसच होतं. तिकडे दरबार भरला होता. जणू काय स्वामींचाच तो दरबार भरवला होता. प्रश्नोत्तरे, उलट तपासण्या सुरू झाल्या. थोड्या वेळाने भिकू दादाने (त्यांच्या घरचा जुना नोकर) वशामामा उर्फ वसंत शेटकरला आणून हजर केला. सर्व दरबार पाहून तो थोडा टरकला व माझ्याकडे रागाने व तिरस्काराने पाहू लागला.
शेवटी खोट्याचे पितळ उघडे पडले. सत्याची बाजू चकाकली. मला व माझ्या आईला न्याय मिळाला. आमची जमीन आम्हाला मिळाली. शिवाय झालेल्या मनःस्तापाबद्दल आणि गरीबाची फसवणूक केल्याबद्दल नुकसान भरपाई म्हणून त्या लोकांकडून नकद रक्कम पण काकांनी वसूल करून घेतली.
सर्व पार पडल्यावर अ‍ॅड. घरत काका आईकडे वळून म्हणाले, “मंदाताई, तुझा मुलगा फार हुशार आहे. सर्व वेळेवर झालं म्हणून हातचं गेलेलं सर्व परत मिळालं.”
“नाही हो शरद दादा. सगळं तुमच्यामुळे हे शक्य झालं. नाही तर मी तर आधीच सर्व गमावून बसले होते.” आईने हात जोडले.
मी तर मनोमन जाणलं. काकांच्या रुपाने स्वामीच धावून आले माझ्या मदतीला. मी मोठं धाडस करून काकांकडे धावत आलो होतो.
कारण जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही. ज्याच्यात हिम्मत, त्यालाच जगात किंमत.
‘ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड. श्री स्वामी समर्थ’ असे म्हणून मी व आई परत आमच्या घरी आलो.
मनात फक्त अ‍ॅड. काकांचे शब्द मनात रुंजी घालत होते. ‘मोठा हो. वकील हो आणि इकडे ये.’
माझ्या डोळ्यांसमोर माझ्याच नावाची पाटी तरळत होती.
‘ अ‍ॅडव्होकेट परेश यशवंत विचारे’ आणि हे मी चक्क जागेपणीच अनुभवत होतो.
आता फक्त अभ्यास व यश हे एक व काकांचे शब्द पूर्ण करण्याचे हे दुसरे ध्येय माझ्यासमोर होते.