“देवगडचा शिमगा आणि त्यातल्या गंमती !̶...

“देवगडचा शिमगा आणि त्यातल्या गंमती !”…. (Short Story: Devgadcha Shimaga Ani Tyatalya Gamati)

“देवगडचा शिमगा आणि त्यातल्या गंमती !”….

सौ. सुप्रिया प्रभुमिराशी, कणकवली 

“होळी रे होळी, पुरणाची पोळी!”…… इतकंच ठाऊक होतं. आणि अजुन काय काय बोललं जातं ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळ्यांना माहीत आहे. त्याबद्दल मी सांगायची गरज नाही आणि ते रास्तही नाही. पण नावं न घेता काही गंमती सांगणार आहे.
देवगडचा शिमगा म्हणजे गंमत पण, आनंद पण, भीती पण आणि चेष्टा- मस्करी पण….थोडक्यात काय? विविधांगी आणि विविध रंगी. म्हणजे “साळसूद” कोण? तेही नाही कळणार आणि “चोर” कोण? तेही नाही कळणार!…
सगळं अवती भवती असलं तरी लक्षात यायचं नाही, असा दिवस म्हणजे देवगड मधली होळी!…पुन्हा एकदा सांगतेय की नावं कुणाचीही मुद्दाम घेणार नाही कारण त्यातील काही मंडळी प्रतिष्ठीत आहेत. काही गेलेत पण…
सगळीकडे सडा- सारवण, रांगोळी,पूजा हे तर असायचंच पण , घरा बाहेरच्या उघड्या पडवीत,अंगणात शक्यतो काही ठेवायचं नाही. लाकूड- शेणी रचलेल्या माचावर माडाच्या झावळा टाकुन ठेवायच्या. म्हणजे कुणी काही काढलं तर झावळ वाजायची आणि कळायचं. बाहेरच्या दोरीवरचे वाळलेले कपडे काढून घरात आणुन ठेवायचे.संध्याकाळी उशीरा पर्यंत शक्यतो बाहेर नाही रहायचे, फिरायचे नाही म्हणजे लहान मुलानी, महिलानी. बाकी काही नाही. ती अद्वातद्वा बडबड कानावर पडू नये म्हणून. अगदी कातरवेळी, काळोख झाला की चोरी सुरू व्हायची. कुठलाही स्वार्थ नाही फक्त होळीसाठी. नेमके आम्ही देवासमोर पर्वचा पाढे म्हणायला बसलेले असू. मग त्यादिवशी सगळं म्हणतानाही लक्ष्य बाहेर असे कानोसा घेत .थोडथोड्या वेळाने गोठ्यातली गुरंही बघावी लागायची, ते काम आई करायची…. लवकर जेवणं आवरायची कारण तात्या आणि काका होळीच्या पूजा सांगायला जायचे असत. त्या संपूर्ण रात्री आई सोबत मी जागायची. शेजारपाजारची तरणी मुलं येऊन बोलून अंदाज घेऊन जायची. म्हणजे आपली कामं कितपत आवरली? गुरा वासरांचं गवत- पाणी आवरलं का. कधी झोपतील? याचा अंदाज घ्यायचे.
रात्री अकरा वाजता बटाटे वडे करायला घ्यायचे आणि चटणी. चहा तर काय चुलीवरच तयार असायचा . कुणीही आलं, मागितला की लगेच हातात. घरचं म्हशीचं दूध असायचं . चहा- वडे खायला हीच चोर मंडळी रुबाबात यायची. आनंदाने सगळ्याना ते द्यायचं. ती आपुलकी, आत्मियता, प्रेम कसं वेगळंच होतं. वाडीतच रहाणारे सगळे. राग नाही यायचा कुणाचा. तो एक दिवस म्हणजे वेगळीच गंमत.
घरातली माणसं आणि शेजारी सहकारी, नेहमीचे यशस्वी मदतनीस असायचे. तरी पंधरा वीस माणसं गप्पा मारून मनसोक्त वडे चहावर ताव मारायचे. रंगतच वेगळी होती. मग आई म्हणायची_ काय रे आता शहाळी काढुक खय जातलास?काय काय करतलास?काय ठरवलास काय? … तसे अगदी एकमुखाने सांगायचे _ श्यॅ!…. आता खय इतक्या खाव्न? आमीआता घराकडे जाव्न निजतलाव! आईला माहीत होतं ते काय दिवे लावणार ते…. पण त्यातही मजा होती….ते सगळे खाऊन गेले की तात्या _ काका होळीच्या पूजा सांगायला जायचे. तात्या वाणी अवाठात आणि काका नाईक अवाठात. घरातली सगळी झोपली तरी मी आईसोबत जागी असायची.करायचं काही नसायचं पण बाहेर काही , कुणी नासाडी करतील म्हणुन जागं राहून लक्ष ठेवायचं इतकंच!…. होळी घातली की अर्वाच्य बोलायचे. बायकाना नाही पण नको वाटायचं ऐकायला. मग काही ना काही कुणाचं उचलायचं आणि दुसर्याच कुणाच्यातरी दारात, परसवात नेऊन टाकायचं. एकेकदा कळायचंही नाही. एकदा_ एका बॅकेवरचा बोर्ड काढून कुण्या श्रीमंताच्या संडासावर लावला. कुणाचं पपईचं मोडलेलं झाड एका वकीलाच्या गेट समोर आणून आडवं ठेवलं. असं काहिही. काय सुचेल ते करत असत. खट्याळ पोरं सगळी…एका वर्षी आमच्या गोठ्यातला “सोमा” नावाचा मोठ्या शिंगांचा रेडा सोडून लावला. कधी? कसा? समजलंही नाही. त्याच्या गळ्यातल्या साखळीला चिठ्ठी बांधून संडासात ठेवली. ती नेमकी माझ्या काकाना मिळाली. आठवडाभर रेडा घरी आला नाही . त्याला कुठे बांधून ठेवला होता की कसं काय ते कळलं नाही. काका चिडले . त्यानी तुळशी समोर नारळ ठेवला आणि कडकडीत गार्हाणे केले.सांगणं केलं की माणसांची मस्करी करता ठीक आहे पण मुक्या प्राण्याना असा का त्रास देता? ही कसली मस्करी? “ज्या कुणी या निष्पाप जीवाला छळलय त्याला त्याची शिक्षा देच पण आमचा “सोमा” लवकर घरी येऊदे!”.. त्यांना वाचासिद्धी होतीच. संध्याकाळी सोमा घरी आला पण ज्याने हे केलं होतं तो खरंच आजारी पडला.बरा झाल्यावर तो घरी आला आणि काकांची क्षमा मागितली. तेव्हा ते म्हणालेही , अरे माझा तुझ्यावर राग नाही पण तू रेड्याला का त्रास दिलास?निष्पाप जीवाने तुझं काय बिघडवलं होतं? एरवी तुमच्या मस्करी बद्दल मी बोललो का कधी? जाऊदे! परत असं करू नकोस…..
शिमग्याला पंधरा दिवसांत वाणी अवाठात होळीचा मांड असे. तिथे पाच दिवस खेळे असत. गोवा किंवा बाहेर गावच्या “गणिका” आणत असत लोकांचं रंजन करायला. ती परंपराच होती. प्रत्येकाच्या घरी ग्राम दैवत दिर्बादेवी_ रामेश्वरचं निशाण येतं. खेळे येतात. राधा-कृष्ण, शंखासूर, सोबत गावातली काही मंडळी येतात. पेटी तबला सह.राधा कृष्णाचीच गाणी म्हटली जातात. पुराणातील गोष्टींच्या आधारे सोंगे आणली जातात. “गोमू”चंही सोंग येतं.म्हणजे पुरुषाला स्त्री वेशात सजवून घरोघरी जाऊन “शब्बय” मागतात. त्या गोमू सोबत थोडे बाईलवेडे, मजा मस्ती करणारे, नाचणारे असतात. यात वाईट काही नसतं ऊलट छान सादरीकरण झालं तर अजून करायला सांगतात. पैसेही देतात.देवाचं निशाण, पालखी हे पारंपरिक असतच. शिमग्याचा माहोलच वेगळा असतो…..
धूळवडीला म्हणजे दुसर्या दिवशी होलिका मातेला आणि देवाना पुरणपोळीचा नैवेद्य असतो. एक गोष्ट आठवली.. देवगडला खाडी जवळ एक घर आहे नाडकर्णीं बामणांचं. खूप मोठं घर खाली मोकळी जागा आणि खांब. वरती ती भाऊ बहीण दोघे रहायचे. अविवाहीत होते दोघही. अंगाला कोड असल्यामुळे कदाचित. असो! तर त्यांच्या त्या मोकळ्या जागेत एक साठीच्या वया दरम्यानचे नाटेकर आजोबा रहायचे. त्यांचे कुणीच नव्हते कदाचित. जमेल तसं फिरायचे. कोणी दिलं तर जेवायचे. पण कुणाचं सारवण करायचं तर आवडीने करायचे. त्या दिवशी जेवायचे पण तिथेच. शिमग्यात एक दिवशी त्यानी माझ्या आईकडे एक जुनी साडी मागितली. आता मी साडी म्हणते, तेव्हा “लुगडं” म्हणत असत.आईने त्याना लुगडं दिलं ते स्वतःला जसं जमेल तसं गुंडाळून ते नेसले आणि सतत एकच गाणं त्यांच्या तोंडी असे,ते म्हणायला सुरू केलं… ते असं_


” माझ्या बायकोला गं, बायकोला लिंबू – सोडा,
तिच्या पायात गं, पायात चांदीचा तोडा.
तिच्या लग्नाला गं, लग्नाला नाचणारा घोडा,
आमच्या लग्नात गं कुणी बाई घातला खोडा!”…..

किंचित परिणाम झाल्या सारखे एकटेपणाची जाणीव करून देणारीच गाणी म्हणायचे. पण जेवायला हवं म्हणुन कुणाचं तरी काही काम करायला हवं एवढं समजत होतं बाकी शांत स्वभाव. ती साडी दिली म्हणून आईला ते पैसे देत होते. म्हणजे मी नेसलो ना तर त्याचे पैसे घ्या. आई म्हणाली घेऊन जा मला पैसे नकोत.तसे रडून सांगायला लागले_ मला आईची लुगडी पांघरून झोपायची सवय होती. आता आईच नाही. तिची दोन तीन लुगडी होती ती एवढी वर्षे वापरली. आता त्यांच्या अगदीच धांधोट्या झाल्या, पांघरता येत नाहीत. ते असं सांगताहेत आणि रडतात हे बघून आम्हालाही असह्य झालं आईने अजुन एक लुगडं त्याना दिलं. कुणीच नाही सोबत , सामानही काहीच नव्हतं. नाडकर्णींच्या पडवीत झोपायचे. कुणाचं फुकट काही घेऊ नये यासाठी हा खटाटोप. या होळीच्या निमित्ताने ही गोष्ट लिहाविशी वाटली.जी कधी विसरलीच नव्हती.आम्हीही अशाच गोष्टीतून शिकत गेलो, घडलो.त्यानंतर नाटेकर आजोबा होते तोवर आमच्याकडे येत होते. त्याना चालायला झेपेनासं झाल्यावर नाडकर्णी ताई, चंद्रा आक्का त्याना जेवण देत असत. आज खूप वर्षांनी पुन्हा आठवणीनी ती होळी आठवली…. काय माहित कुठुन आले होते? काय काय भोगलं होतं?कुणाशीही काही न बोलता एकटेपणाचीच सोबत घेऊन शेवट पर्यंत आनंदी होते मात्र ते…बायकोचं गाणं सतत म्हणत….
नाहीतर ही तरुण मंडळी , भलतेच चाप्टर हो! घरी यायचं, गप्पात दंग ठेवायचं, चहा प्यायचा, पान खायचं आणि तोवर दुसर्या सहकार्यानी माडावर चढायचं शहाळी काढून, त्याच माडाच्या मुळात बसून, तिथेच शहाळी खायची आणि तिथेच टाकून जायचं . आणि हे सगळं दुसर्या दिवशी सकाळी दिसावं? हे कोण म्हणायचे हो? आणि रागवायचं तरी काय?चेष्टा, मस्करी, केंडी… “सब कुछ अपनोसेही_ अपनोंके लिये।”
मेल्यांनो खूप छळलात रे आम्हाला पण आज आठवणी आनंद देतात तो केवळ तुमच्यामुळेच! दर होळीला ही तुमची खट्याळकी आठवत फक्त डोळे भरून येतात. आता वडा कधीही खातो रे पण एकत्र खाल्लेल्या त्या वड्यांची चव आणि सरच नाही रे!
मनातले सगळे भेदभाव , संशय, नकारात्मकता या होळीच्या कुंडात दहन करा आणि कायम आनंदी, सौख्यपूर्ण, निरामय जगा!
होलिकोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!🙏😊