चाफ्याखाली…? (Short Story: Chaphyakhali)

चाफ्याखाली…? (Short Story: Chaphyakhali)

चाफ्याखाली…?

– विनायक शिंदे

यशवंता पारगावची शिक्षकाची नोकरी सांभाळून आठवड्याभरात तीनदा गावात आला होता. पण मारोतीचा खून झाला की त्याने आत्महत्या केली असा कोणताच ठळक पुरावा पोलिसांच्या हाती लागला नव्हता. मारोतीच्या बायकोला काही विचारावं तर ती जोरजोराने हंबरडा फोडी, मग पुढचे बोलणेच खुंटत असे. मारोतीचे आपल्यावरचं अपार प्रेम… त्याने खाल्लेल्या खस्ता… हे सगळं आठवलं की त्याला एकदम भडभडून यायचं.
मा रोती कांबळे राहत्या घरातून एकाएकी गायब झाला. त्यालाच आता जवळ जवळ महिना उलटून गेला होता. पोलीस तपास कासवाच्या गतीने चालू होता. त्यामुळे त्याचा धाकटा भाऊ यशवंता चांगलाच कातावला होता. तो प्राथमिक शिक्षक असल्यामुळे सततच्या बदलीमुळे गावापासून त्याची कायम फारकत सक्तीने झाली होती. शिक्षण नाही, सतत मागे राहण्याच्या वृत्तीमुळे मारोती तसा असून नसल्यासारखाच असायचा. घरची हलाखीची परिस्थिती, आईवडील थकलेले- मग पडेल ते काम करून चार पैसे कमावून त्याने घराचा कोसळता डोलारा कसाबसा सावरला. स्वतः अनपढ असून भावाला मात्र त्याने पोटाला चिमटा घेऊन शिक्षण घ्यायला लावले. अनंत खटपटी लटपटीतून सहीसलामत बाहेर पडून तो एकदाचा शिक्षक झाला तेव्हा मारोतीला आपल्या बेचाळीस पिढ्या उद्धारल्याचा आनंद झाला. खिशात दमडा नसताना एके दिवशी मारोतीचे लग्नदेखील झाले. सुंदरा- त्याची पत्नी गरीबाघरची लेक असली तरी नावाप्रमाणे ती खरोखरच सुंदर होती. केतकी वर्ण, चमकदार बदामी डोळे, धारदार नाक व चहूबाजूंनी फुलारलेली अंगकाठी असल्यामुळे ती जाईल तिथल्या लोकांच्या नजरा तिच्यावर स्थिरावायच्या. तिचा हा देखणेपणा तिच्या बापाला डोईजड झाला होता. सुंदराची आई तिच्या लहानपणीच वारली होती. तेव्हा नातेवाइकांनी लहानग्या मुलीची जबाबदारी आम्ही घेतो, असं सांगूनही त्याने प्रसंगी आई आणि बाप होऊन तळहातावरल्या फोडाप्रमाणे जपून तिचा प्रतिपाळ केला होता. सुंदरा जसजशी मोठी व्हायला लागली तसे तिचे मूळचेच सौंदर्य द्विगुणित व्हायला लागले आणि भल्याभल्यांच्या बुभुक्षित नजरा तिच्या अंगोपंगावरून भिंतीवरून सरपटणार्‍या पालीसारख्या फिरायला लागल्या. तिला शाळेत शिकायला जाण्याचा सल्ला बापाने दिला. पण प्रत्येक वेळी तिने तो हाणून पाडला. तिला शिकायचेच नव्हते. आवड असेल तर सवड काढून माणूस निवड करतो. पण हिला मात्र शाळेत जाणे म्हणजे काळ्या पाण्याची सजाच वाटत होती. तिचे मारोती कांबळेबरोबर लग्न झाले तेव्हा गावातल्या लोकांनी आश्‍चर्याने तोंडात बोटे घातली. काही जणांनी मारोतीचे नशीब फुटले म्हणून परमेश्‍वराला वेठीस धरले. कारण तिची एक दोन प्रकरणे गावात चांगलीच गाजली होती. ड्रायव्हर असलेल्या अल्लाबक्श पठाणाच्या पोराबरोबर ती चक्क सोलापूरला पळून गेली होती. तेव्हा तिच्या बापाचा मुंबईला हवालदार असलेला भाचा आत्माराम मोरे उपयोगी पडला होता. पठाणाच्या पोर्‍याला पोलिसी खाक्या दाखवून माफी मागायला लावून हिची सुटका केली होती. एवढ्यात भागलं नाही म्हणून आप्पा लिंगायताच्या पोर्‍याला नादी लावून ती त्याच्याबरोबर मुंबईला पळून गेली. तिचे रंगढंग लिंगायताच्या दत्तूच्या पथ्यावर पडणारे नव्हते. शेवटी तोच तिला गावात घेऊन आला आणि सर्वांसमक्ष गावातल्या शंकराच्या देवळात देवासमोर देवाची गावकर्‍याची माफी मागून ङ्गयापुढे अशी बगावत माझ्या हातून कदापि घडणार नाही,फ असे म्हणून शंकराच्या पिंडीसमोर नाक घासले होते. नंतर मात्र तिचा बा धास्तावला आणि सावकाराकडून अव्वाच्या सव्वा व्याजाने कर्ज काढून पोरीला उजवून मोकळा झाला होता.
यशवंता पारगावची शिक्षकाची नोकरी सांभाळून एका आठवड्यात तीनदा गावात आला होता. पण मारोतीचा खून झाला की त्याने आत्महत्त्या केली असा कोणताच ठळक पुरावा पोलिसांच्या हाती लागला नसल्यामुळे निराश होऊन तो परतला होता. जाताना मारोतीच्या बायकोची विचारपूस करायला तो विसरला नव्हता. तिला काही विचारावे तर ती जोरजोराने हंबरडा फोडी, मग पुढचे बोलणेच खुंटत असे. मारोतीचा नवसाने कितीतरी वर्षांनी झालेला मुलगा मुका निघाला. चार वर्षांचा झाला तरी त्याला काहीच बोलता येत नव्हते. मुलगा आईसारखाच देखणा होता. यशवंता जेव्हा प्रेमाने त्याच्या पाठीवर थोपटायला गेला तेव्हा त्याचे अख्खे शरीर गदगदले. त्याचे डोळे अत्यंत बोलके होते. त्याला यशवंताला काहीतरी सांगायचे होते. यशवंताची उत्सुकता शिगेला पोहोचली. तो हाताने काहीतरी खुणा करून तोंडाने बोलण्याचा प्रयत्न करीत होता. नुसती घरघर बाहेर पडत होती. त्यातून काहीच अर्थबोध होत नव्हता, यशवंताने प्रश्‍नांकित नजरेने आपल्या वहिनीकडे पाहिले, तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता तिने त्याच्या पाठीत जोराचा धपाटा घातला.
ङ्गयेक तर तोंडानं मुका अन् डोक्यानं खुळा होत चाललाय… बापाचं प्रेम उतू चाललंय. मोठ्यापनी कसं होनार याचं? मला तर बया आत्तापासून काळजी वाटायला लागली हाय याची.फ यशवंताला वहिनीच्या वागण्याचं कोडेच उलगडेना. कारण त्याला वाटले त्या मुलाला आपल्याला काहीतरी सांगायचे आहे, पण वहिनी भलतेच कारण सांगून ती आपल्यापासून काहीतरी लपवते आहे. घराबाहेर पडल्यावर शेतावर चाललेले बजाबा नाना त्याला पाहून न पाह्यल्यासारखे करून ते पटकन त्याच्या पुढ्यातून निघून गेले. कोष्टी टेलरची आई- बायजा मावशी गावात आल्यावर अगत्याने त्याची विचारपूस करायची. ती पण त्याला पाहिल्यावर पटकन आतल्या घरात घाईघाईने निघून गेली. आपला मोठा भाऊ नाहीसा झाला आहे. आपण त्या काळजीत आहोत तर आपले सांत्वन करायचे सोडून ही माणसे आपल्यापासून दूर का पळतात? कदाचित इस्टेटीच्या लोभाने आपणच त्याला गायब तर केले नाही ना? असा संशय त्यांच्या मनात असेल तर? बापरे! नुसत्या कल्पनेनेच त्याच्या अंगाला घाम फुटला. मारोतीचे त्याच्यावर अपार प्रेम होते. त्याचा प्रेमळ स्वभाव, आपण शिकावे म्हणून त्याने खाल्लेल्या खस्ता… त्याला हे सगळे आठवले आणि एकदम भडभडून आले. डोळ्यात अश्रू दाटून आले.


खरं तर गावापासून कित्येक मैल दूर असलेल्या आडगावात राहणे यशवंताच्या जिवावर आले होते. केवळ नोकरीवरच आपली उपजीविका चालते म्हणून तर तो कसेबसे दिवस रेटीत होता. वधुपित्याकडून लग्नाचे प्रस्तावही यायला लागले होते. तेव्हा एखाद्या बर्‍यापैकी नोकरी असलेल्या मिळवत्या जीवनातला एकाकीपणा तरी दूर होईल. असे त्याला राहून राहून राहून वाटत होते. तेवढ्यात वडील भाऊ मारोती एकाएकी नाहीसा झाला याचाच त्याला मोठा हादरा बसला होता. अलीकडे त्याला रात्रीची झोपच येत नव्हती. तिने त्याच्याशी असहकार पुकारला होता. त्याची राहती जागा म्हणजे नरवडे हेडमास्तरांच्या नात्यातल्या एका माणसाचा नेमाडे मास्तर यांचा चौसोपी वाडा होता. वार्धक्यामुळे नेमाडे मास्तरांना जेव्हा दम्याच्या विकाराचा जोर चढला व अंतिम क्षण जवळ आल्याची चाहूल लागली तेव्हा त्यांनी हेडमास्तरांना बोलावणे पाठवले. मरता मरता या वाड्याची सर्व जबाबदारी नरडवे मास्तरांच्या खांद्यावर टाकून त्यांनी तिथेच देह ठेवला होता. यशवंता वाड्याच्या पश्‍चिमेकडील मोठ्या खिडकीजवळ असलेल्या पलंगावर झोपला होता. नेहमीप्रमाणे खानावळीतले बेचव अन्न त्याने कसेबसे पोटात ढकलले होते. आकाश ढगाळतेने गढुळलेले… चंद्राचा गोल निर्जीव प्रकाश सर्वत्र पसरला होता. चांदण्यांचा कुठे मागमूसही दिसत नव्हता. अंथरुणाला खिळलेल्या जरार्जर रोग्यासारखा वारा अधूनमधून उसासे सोडीत होता. पश्‍चिमेला असलेली गच्च झाडवळ धूसर प्रकाशात गूढ आणि भयप्रद वाटत होती. या सर्व गोष्टींचा यशवंताच्या मनावर कसलाच विपरीत परिणाम झालेला नव्हता. कारण यावेळी तो आपल्या हरवलेल्या भावाचाच विचार करीत होता. दिवसभर वर्गात मुलांपुढे घसाफोड करून त्याचे शरीर थकले होते आणि मन आंबले होते. आता गाढ झोप लागली तर बरं होईल, असे त्याला वाटत होते आणि नेमके तेच होत नव्हते. काय बरे झाले असेल आपल्या भावाचे? हा प्रश्‍न शंभर वेळा त्याच्या मेंदूला भुंग्याप्रमाणे पोखरत होता. नेमके त्याच वेळी घराच्या आवाराबाहेर चुकार कुत्र्याचे भयाण विव्हळणे त्याच्या कानावर पडले आणि तो घाबरला. डोक्यातला गुंता सोडवण्यासाठी तो तिथेच ठेवलेल्या जाजमावर आडवा झाला. थकल्यामुळे क्षणात त्याला गाढ झोप लागली. अचानक समोर त्याला आपले कळकीच्या माळावर असलेले शेत दिसायला लागले. शेताच्या अगदी मधोमध असलेले कवठी चाफ्याचे झाड दिसायला लागले. शेताच्या आजूबाजूला त्याच्या आज्याने लावलेली झाडे, त्यांच्या गगनाला गवसणी घालणार्‍या फांद्या, तिथून उतारावर असलेली विहीर, तिथे पडलेली नादुरुस्त मोटर हे सगळे त्याला स्पष्ट दिसायला लागले. तेवढ्यात कवठी चाफ्याच्या खाली काही तरी त्याला हलताना दिसले. सुरुवातीला दिसणारा तो आकार काही वेळातच स्पष्ट दिसायला लागला आणि आश्‍चर्यचकित होण्याची पाळी त्याच्यावर आली. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याचा सख्खा भाऊ मारोती कांबळेच होता. तो त्याला कसल्यातरी चमत्कारिक खुणा करून बोलवीत होता. ङ्गदादाऽऽफ तो मोठ्याने किंचाळला आणि धाडदिशी जमिनीवर आपटला. डोक्याला हलकासा धक्का बसला. त्याने डोळे उघडले. क्षणापूर्वी दिसलेले दृश्य लुप्त झाले होते. म्हणजे त्याला स्वप्न पडले होते. स्वप्नात दादा दिसला. तो काहीतरी सांगत होता. दाखवत होता. काय बरे असेल या स्वप्नाचा मतितार्थ? विचार करीत असताना तो तिथेच आडवा झाला व त्याला झोप कधी लागली ते त्याचे त्यालाच कळले नाही.
सब इन्स्पेक्टर जमदाडे यशवंताने सांगितलेल्या त्या स्वप्नावर पुन्हा पुन्हा विचार करीत होते. सुरुवातीला ते असाच विचार करीत होते. एखाद्या व्यक्तीने घडलेल्या गोष्टीचा अति विचार केल्यावर त्याला तीच गोष्ट स्वप्नात दिसते. पण मग त्या खाणाखुणा? दृष्ट अदृष्टाच्या पलीकडे काहीतरी असते असे म्हणतात. तेच किंवा तसेच असेल हे स्वप्न! त्या शेतातच दडलेले असेल एखादे अगम्य रहस्य…
अगोदर त्या घटनेवर सुंदराचा विश्‍वासच बसेना. इनामदाराचा गडी चंद्या रात्रीचा भीत भीत तिला सांगायला लागला. ङ्गताई, म्या माझ्या सवताच्या डोळ्यांनी मारोती दादांना चाफ्याच्या झाडाखाली बसलेले पाहिले.फ
लगेच ती काळोखात शेत तुडवत घाईघाईने आपल्या मुलाला आणि चंद्याला घेऊन चाफ्याच्या झाडाजवळ गेली. त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे चंद्र लवकरच वरती आल्यासारखा वाटत होता. शिवाय वर लख्ख चांदणे पडले होते. पायाखालचे स्पष्ट दिसत होते. चंद्याने सांगितल्याप्रमाणे कोणीतरी अंगभर शाल लपेटून झाडाखाली बसले होते. अधीर झालेल्या सुंदराचे काळीज धडधडायला लागले. दगडावर बसलेली ती व्यक्ती उठून उभी राहिली. तिने निरखून त्याच्या चेहर्‍याकडे पाहिले. तो मारोती, तिचा पतीच होता. तेवढ्यात धीरगंभीर स्वरात तो म्हणाला, ङ्गसुंदरा, तुला लय वाट बघाया लावली म्या… मला माफ कर… वाटेगावला गेलो होतो भाऊ अण्णाकडं. त्यांनी लयच आग्रेव केला म्हणून राह्यलो…फ
ङ्गहे शक्यच नाही. तू जित्ता आसनं शक्यच न्हाय! कारण अमावस्येला बस्तीमल मारवाड्याच्या मदतीनं म्या तुजा खून करून तुजा मुडदा हिथंच गाडला या चाफ्याच्या झाडाखाली.फ
झुडुपाआड लपलेले सब इन्स्पेक्टर जमदाडे टाळ्या वाजवीत म्हणले, ङ्गव्वा यशवंंतराव… मारोतीचा अभिनय तुम्ही लाजवाब केलात हो…फ असे म्हणून त्यांनी बॅटरीचा प्रकाशझोत सुंदराच्या सुंदर चेहर्‍यावर टाकला तेव्हा तो अतीभयाने पार काळवंडला होता.