बाऊंसर (Short story: Bouncer)

बाऊंसर (Short story: Bouncer)

बाऊंसर


– सुधीर सेवेकर

आज एका आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वाची कहाणी म्हणा वा कैफियत म्हणा, मला तुम्हाला सांगायचीय. या तरुणीला मी अनेक पुरस्कार सोहळे, अ‍ॅवॉर्ड नाईट्स, इव्हेंटस् अशा कार्यक्रमातून बघितलंय. नेहमी बघतो. माधुरी दीक्षितपासून रिंकू राजगुरू पर्यंत अनेक नव्याजुन्या यशस्वी कलावंतांची एक विश्वसनीय संरक्षक म्हणून ही तरुणी नेहमीच आघाडीवर असते. तिचं नाव रुपाली पाटील.
कला व सांस्कृतिक क्षेत्र कव्हर करणारा मुंबईतील मी एक पत्रकार आहे. कामाचा भाग म्हणून मला नेहमीच नाटक-सिनेमा-चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यक्रम, इव्हेंटस् यांना नेहमीच हजर राहावं लागतं. नाटक, सिनेमा, टिव्ही मालिका ही खरेतर कचकड्याची दुनिया. या दुनियेचं ग्लॅमर, या दुनियेतील लोकप्रिय यशस्वी कलावंत, पैसा, प्रसिद्धी याचं नवतरुण पिढीस असणारं बेसुमार आकर्षण, यातील माणसांचा खरेपणा, खोटेपणा, बेगडीपणा, ढोंगीपणा इत्यादी इत्यादी. मी खूप जवळून पाहात आलोय. गेली अनेक दशके आपल्या नाटक-सिनेमाला प्रसिद्धी मिळावी यासाठी पत्रकारांना पार्ट्या देणं, भेटवस्तू देणं वगैरेचा रिवाजच इथे पडलेला आहे. आपले फोटो, मुलाखती, प्रसिद्ध व्हाव्यात यासाठी चाललेली कलावंतांची धडपडही मी नेहमीच जवळून पाहतो. अनुभवतोही. आज प्रसिद्धीच्या शिखरावर पोचलेले अनेक कलावंत कालपरवापर्यंत किती विनम्र होते तेही मी पाहिलंय, आणि आता किती शेफारलेत, उद्धट झालेत तेही मी पाहिलंय. एकूण काय तर या ग्लॅमरस, मोहमयी दुनियेत तुम्हाला मानवी स्वभाव, मानवी वर्तन, मानवी आशाआकांक्षा, मानवी संघर्ष याचे अक्षरशः असंख्य नमुने, असंख्य तर्‍हा पाहायला मिळतात, ज्या अन्य क्षेत्रात क्वचितच सापडतात.
पडद्यावरच्या लोकप्रिय तारेतारकांविषयी तर नेहमीच मी लिहितो. तो माझ्या ड्युटीचाच एक भाग आहे, पण आज एका आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वाची कहाणी म्हणा वा कैफियत म्हणा, मला तुम्हाला सांगायचीय.
या तरुणीला मी अनेक पुरस्कार सोहळे, अ‍ॅवॉर्ड नाईट्स, इव्हेंटस् अशा कार्यक्रमातून बघितलंय. नेहमी बघतो. चारचौघींपेक्षा पुष्कळ जास्त उंची आणि त्याला साजेसं सुदृढ शरीर असलेली ही तरुणी एक बाऊंसर म्हणून कार्यक्रमातील संभाव्य गुंडगिरी थांबविणे, कार्यक्रमात सहभागी होणार्‍या तारेतारकांना संरक्षण देणे, विशेषतः नट्या, अभिनेत्री यांच्यासोबत सावलीसारखे सतत सोबत राहणं हे या धष्टपुष्ट आणि डेअरिंगबाज तरुणीचे काम. पुरुष बाऊंसर, त्यांची कमावलेली शरीरयष्टी, त्यांची ताकद, त्यांचा दरारा सर्वांनीच पाहिला असेल. परंतु माधुरी दीक्षितपासून रिंकू राजगुरू पर्यंत अनेक नव्याजुन्या यशस्वी कलावंतांची एक विश्वसनीय संरक्षक म्हणून ही तरुणी नेहमीच आघाडीवर असते. तिचं नाव रुपाली पाटील. तिच्याशी एकदा सविस्तर गप्पागोष्टी कराव्यात असं मला बर्‍याच दिवसांपासून वाटत होतं. आणि तो योग मोठ्या योगायोगानंच जुळून आला.
एका अ‍ॅवॉर्ड फंक्शनसाठी प्रमुख पाहुणी म्हणून माधुरी दीक्षित आली होती. माझी एक सिनेपत्रकार म्हणून माधुरीशी जुजबी तोंडओळख होतीच. कार्यक्रम सुरू व्हायला थोडा वेळ होता. स्टेजच्या मागच्या बाजूच्या ग्रीनरुममध्ये माधुरी येऊन बसली होती. सोबत तिच्या सावलीसारखी रुपाली होतीच. सही – स्वाक्षरी, सेल्फी घेण्यासाठी रसिकांची रीघ लागलेली होती. ते सगळे रुपालीच्या नियंत्रणाखाली नीट चालू होते. इव्हेंट मराठी चित्रपट पुरस्कारांचा असल्याने, ऑडियन्स महाराष्ट्रीयन्सच होता. मी ग्रीनरुममध्ये डोकावलो. माधुरीने माझ्याकडे पाहून ओळखीचे स्मितहास्य केले. मीही हाय केले आणि म्हणालो, माधुरीताई आज मला रुपालीशी बोलायचंय!’
अरे मग, माझ्या परवानगीची कशाला वाट पाहतोयंस?
माधुरीनं हसून उत्तर दिलं. मी रुपालीकडे पाहिलं, ती सर्व रसिकांना सह्यांसाठी ओळीने, शिस्तीत सोडण्याच्या कामात गढलेली होती. पण तिच्या कानावर आमचा संवाद गेला होता.
सर, इव्हेंटनंतर माधुरी मॅमना त्यांच्या गाडीत बसवून देण्यापर्यंतची जबाबदारी माझी आहे. ती पार पाडल्यावर मी नक्की आपल्याशी बोलते. कितीही उशीर झाला तरी!
रुपालीच्या या उत्तरानं चित्र स्पष्ट झालं खरं. पण इव्हेंट संपायला बराच वेळ होणार होता. तेव्हा रात्र फार झालीय, आपण नंतर केव्हातरी बोलू, असं कारण सांगून मला रुपाली कटवणार तर नाही ना? अशी एक शंका माझ्या मनात तरळून गेलीच.
बट, लेट्स होप फॉर द बेस्ट! सकारात्मक विचार करुया. अशी मी माझ्या मनाची समजूत घातली. पुरस्कार वितरण सोहळ्याची इव्हेंट खूपच रंगली. बहारदार झाली. माधुरी मॅमचे भाषणही जोरदार झाले. तिला तिच्या गाडीत बसवेपर्यंत रुपाली तिच्या संरक्षणासाठी तत्पर राहिली. कार्यक्रम संपला, लोक पांगले, तोपर्यंत मध्यरात्र केव्हाच उलटून गेली होती. तारीख बदलली होती. कालचक्रानुसार नव्या दिवसास सुरवात झाली होती.
रुपाली, खूप उशीर झालाय! आपण नंतर केव्हातरी बोलायचं का? मीच शेवटी न राहवून म्हणालो.
पण त्यावर रुपाली तात्काळ म्हणाली, नो प्रॉब्लेम सर. जस्ट अलाऊ मी फाईव्ह मिनिटस्, मी ड्रेस चेंज करून येते. देन वुई कॅन टॉक!
असे म्हणून ती खरोखरच तिची काळ्या रंगाची जीन्स, टाइट टीशर्ट, गच्च बांधलेले केस आणि बुट हा परिवेष बदलून, साध्या सैलसर सुती पंजाबी ड्रेसमध्ये माझ्यासमोर आली. केस तिने आता मोकळे सोडलेले होते आणि पायात साध्या स्लीपर्स होत्या. किती वेगळी, तरीपण आकर्षक दिसत होती रुपाली याही पेहरावात!
रात्र एवढी झाली होती की, बहुतांश रेस्टॉरंटस् बंद होत होती. त्यामुळे गप्पा करीत कुठे बसायचे यावर मी विचार करीत होतोच, तो रुपाली मला म्हणाली,
विल ईट बी ओके, इफ वुई गो अ‍ॅण्ड सीट ऑन द बीच?
तिचं हे अस्खलित इंग्रजी ऐकल्यावर ही तरुणी बाऊंसर’ नसून कुठल्यातरी मल्टी नॅशनल कंपनीची उच्चपदस्थ अधिकारी असणार असेच कुणालाही वाटले असते.
ओके! मी उत्तरलो.
रुपालीने तिच्या बुलेटला कीक मारली, मी मागे बसलो. वाटेत तिने एका टपरीवरून भरपूर एग्ज सॅण्डवीचेस, झुणकाभाकर, पाण्याच्या थंड बाटल्या घेतल्या आणि आम्ही समुद्रकिनार्‍यावरच्या वाळूत विसावलो.
असं रात्रीबेरात्री एकट्यानं फिरायला भिती नाही वाटत? माझा बाळबोध प्रश्न. रुपालीला बोलतं करण्यासाठी मुद्दाम सुरवातीलाच विचारलेला.
डर? काहेका डर? जो डर गया समझ लो मर गया! रुपालीचं माझ्या प्रश्नावरचं हे फिल्मी उत्तर. एखाद्या टुकार हिंदी सिनेमातल्या डायलॉगसारखं.
मुंबईत नवीन आले, तेव्हा भिती वाटायची. दोन गोष्टींची, पहिली आपल्याला इंग्रजीतून फाडफाड बोलता येत नाही याची. आणि दुसरं आपल्याला कायद्याचं ज्ञान नाही याची. छेडछाड वा तत्सम प्रसंगांची कधीच भिती वाटली नाही!
कॅरिबॅगमधून एग्ज सॅण्डवीचेस काढून मला एक देत रुपाली बोलू लागली, तसा माझ्यासमोर तिच्या जीवनाचा पट उलगडत गेला. रुपाली आता पुष्कळ रिलॅक्स्ड वाटत होती. मी एग्ज सॅण्डवीच खायला सुरुवात केली. रुपाली मात्र पॅक केलेल्या झुणकाभाकरचा आस्वाद घेऊ लागली. त्यावरुन मला पुढचा प्रश्न सुचला, त्यावर रुपालीने खुलासा केला.
सर, एग्ज सॅण्डवीचेस हे माझेही खूप आवडते फूड आहे. कारण एग्ज्समध्ये कसलीही भेसळ करता येत नाही. शिवाय ते सर्वात उत्तम आणि परवडणारं न्युट्रिशियस फूड आहे. म्हणून माझ्या खाण्यात दिवसभरात चारसहा अंडी सहज असतात. कधी कधी जास्तही. पण माझी खरी टेस्ट झुणकाभाकरीची आहे.
अहो, उत्तम ज्वारी पिकविणार्‍या मराठवाड्यातली परभणी जिल्ह्यात मी जन्मले. ज्वारीची भाकरी हेच आमचे मुख्य अन्न! आणि त्यासोबत जर झुणका, ज्याला आमच्या परभणी भागात पिठलं’ म्हणतात, विदर्भात चून’ म्हणतात, तो जर असेल ना, तर ते जगातलं सर्वात उत्तम फूड आहे, असं माझं मत आहे!
रुपाली आता खुलत होती. मोकळी होत होती. पत्रकार या नात्यानं माझ्यासाठी कितीतरी छानछान मुद्दे, विषय त्यातून जन्म घेत होते. त्यातलाच एक मुख्य प्रश्न होता, तो म्हणजे ती या व्यवसायात कशी आली? तो मी तिला विचारलाच.


त्यावर ती उत्तरली, अहो सर असा काही व्यवसाय असतो, हे तरी मला कुठे ठाऊक होतं? मी पहिल्यापासून अंगापिंडानं धिप्पाड. खेळात आघाडीवर. त्यामुळेच शाळेत आणि कॉलेजात सर्व खेळात मी चमकायचे. तेव्हा पुढे जाऊन रुपालीनं स्पर्धात्मक परीक्षा देऊन पोलीस दलात सब इन्स्पेक्टर म्हणून दाखल व्हावं असाच सल्ला मला आणि माझ्या विधवा आईला द्यायचे. मलाही पीएसआय होण्याची स्वप्नं पडत होती. शिवाय माझे आजोबा, वडिल हे सगळे देशभक्त लोक. हैद्राबाद मुक्तीसंग्रामात त्यांनी जुलमी निझामी सरकार आणि रझाकार यांच्याविरुद्ध सशस्त्र लढा दिलेला. त्यामुळे लढणे, झुंजणे हे माझ्या रक्तातच आहे सर!
हे सर्व सांगत असताना रुपालीचा चेहरा एका वेगळ्याच तेजाने चमकतोय, तिच्या स्वरातही एक वेगळीच धार आलीय हे मला स्पष्ट जाणवत होते.
मी पीएसआयच्या स्पर्धा परीक्षेची तयारी केली. मनापासून केली. त्याच्या सर्व शारीरिक चाचण्या म्हणजे धावणे, उंचउडी, लांबउडी वगैरेत तर मी सर्वप्रथम आले. लेखी परीक्षेतही उत्तम मार्क्स मिळविले. पीएसआय मी होणार असेच सर्वजण मानीत होते. आणि इंटरव्ह्यू कॉल आला. इंटरव्ह्यूला मी गेले. इंटरव्ह्यूत त्या पॅनेलनी मला काहीच प्रश्न विचारले नाहीत. फक्त म्हणाले पन्नास हजार रुपये द्यायची तुमची तयारी आहे का? उत्तर हो असेल तर आम्ही सांगू त्याप्रमाणे पैसे जमा करायचे. तुमची अपॉइंटमेंट नक्की!
रुपाली सांगत होती, ते धक्कादायक अजिबात नव्हते. सरकारी नोकरीसाठी आजकाल प्रत्येक पदाचा रेट ठरलेला आहे. तेव्हढे पैसे मोजल्याशिवाय सरकारी नोकरी मिळत नाही. बाकी तुमची गुणवत्ता, मेरीट याला काहीच अर्थ नाही. सर्वत्र विलक्षण आर्थिक भ्रष्टाचार माजलेला आहे. या विद्यमान घाणेरड्या आणि अत्यंत क्षुब्धजनक परिस्थितीची, व्यावहारिक जगाची मला एक पत्रकार म्हणून निश्चित कल्पना होती. माहिती होती. आणि मागितलेले पन्नास हजार रुपये – काही वर्षांपूर्वी हीही काही मोठी रक्कम नव्हती, म्हणून मी म्हणालो,
अगं मग हो म्हणायचंस की! आता करायची व्यवस्था इकडूनतिकडून पन्नास हजाराची! तेवढ्यावरून तू तुझा चान्स का घालवलास?
माझ्या या प्रश्नांवर काहीशी उसळून रुपाली मला म्हणाली, का द्यायचे मी पैसे? याकरता माझे वडील-आजोबा यांनी स्वातंत्र्यलढ्यात स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून भाग घेतला? माझ्यात काय कमी आहे? माझे घराणे देशभक्ताचे घराणे आहे. संधीसाधू वा भ्रष्ट पुढार्‍याचे घराणे नाही. मी तिथल्यातिथे त्या प्रस्तावाला नकार दिला. आणि माझी अंतिम निवड झाली नाही. याच दरम्यान बाऊंसर या नव्या क्षेत्राची माहिती झाली आणि मी बाऊंसर झाले. आज देशातल्या सेलिब्रिटिजना मी संरक्षण देते, त्या निमित्ताने देशविदेशातही मी सेलिब्रिटिसोबत जाऊन आलेली आहे. पोलिसांपेक्षा हजारपट आदर मला आहे. व्यायाम-सकस आहार- शिस्तबद्ध जीवन हा बाऊंसरचा जीवनक्रम असतो. पण मला विलक्षण आवडतो. व्यवसायाची गरज म्हणून मी उत्तम इंग्रजी, गुजराती, हिंदी संभाषण कौशल्यही प्रयत्नपूर्वक शिकले.”
मी रुपालीच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाकडे आदराने पाहत राहिलो आणि मनोमन तिची मूल्ये, तत्वे, शिस्त, मनोबल यांना सलाम करीत राहिलो.