बांधेसूद दागिना! (Short Story: Bandhesood Dagina)

बांधेसूद दागिना! (Short Story: Bandhesood Dagina)

बांधेसूद दागिना!


मालू व वसंता यांचा विवाह झाला. काळ लोटला. मालूच्या मालतीबाई व वसंताचा वसंतराव झाले. वसंता कधीच बाळसेदार, गुटगुटीत नव्हता. तो मुळातच लठ्ठ होता. वसंतराव झाल्यावर तो हायकोर्टातील सिनिअर वकील व एैसपैस लठ्ठ झाला.
मालतीबाई (वय 45) या मालू (वय 20) होत्या तेव्हा त्यांनी वसंता (वय 23) या तरुणाशी लग्न केलं. आता वसंतराव 48 वर्षांचे आहेत.
वसंताच्या व मालूच्या घरच्यांनी आपापल्या मुलांची नावं वधूवर सूचक मंडळात नोंदवली होती. वधूवरांनी व त्यांच्या आईवडिलांनी म्हणजे दोनही पक्षांनी माहिती पाहिली. फोटोंची देवघेव झाली. मग प्रत्यक्ष पाहण्याचा कार्यक्रम झाला. घरी आल्यावर मालू म्हणाली, आई, हा वसंता फोफसा आहे. मला लठ्ठ नवरा नको.
बाबा म्हणाले, माले, उगाच काहीतरी दोष काढू नकोस. वसंत छान बाळसेदार आहे, किडकिडीत-हडकुळा नाही. नवरा असाच ठसठशीत हवा.
आईनं भर घातली. लग्न झाल्यावर, संसाराची म्हणून एक जबाबदारी असते. ती अंगावर पडली की वसंता सडसडीत होईल.
बाबांनी पाठिंबा दिला, माले, तुझ्या आईचे बोल अनुभवाचे आहेत. लग्नानंतर, नवर्‍यावर हे आणा, ते नको, असं बोला, तसं बोलू नका’ या प्रकारे हुकूमांचा भडिमार कर. वसंताचा आकार तुला हवा तसा झाला की हुकूम देणं थांबव. माझा छळ पूर्णपणे थांबलेला नाही हा भाग वेगळा! माझा आकार कसा हवा हे तुझ्या आईला अजून ठरवता येत नसावं.
काहीतरी बोलून मालूचा गोंधळ उडवू नका. वसंताचं शिक्षण, व्यवसाय, त्याच्या घरची सांपत्तिक स्थिती, बंगला आणि त्याचं दिसणं याचा एकत्र विचार कर. त्याचे वडील वकील आहे. घरचाच व्यवसाय आहे. आणखी काय हवं? प्रत्येक स्थळात काहीतरी कमीजास्त असणारच! तू दिसायला सुंदर आहेस, पदवीधर आहेस. यामुळं तू सहज पसंत पडतेस. पण तुझे शाळेतील गणित विषयातील कोणत्याही परीक्षेतील मार्क वसंतानं पाहिले तर?
मालूला आईचा हा मुद्दा पूर्णपणे पटला. दरवर्षी गणित विषयात धक्के खात खातच ती एसएससी झाली. कॉलेजात गणित विषय नव्हता म्हणून ती पदवीधर होऊ शकली! मालू व वसंता यांचा विवाह झाला. काळ लोटला. मालूच्या मालतीबाई व वसंताचा वसंतराव झाले. वसंता कधीच बाळसेदार, गुटगुटीत नव्हता. तो मुळातच लठ्ठ होता. वसंतराव झाल्यावर तो हायकोर्टातील सिनिअर वकील व एैसपैस लठ्ठ झाला.
प्रत्येक स्त्रीला नवरा सडसडीत, बांधेसूद असावा, कमीत कमी लठ्ठ नसावा असं वाटतं. मालतीबाई ही चार स्त्रियांप्रमाणेच होती. संसाराबद्दल मालतीची काडीचीही तक्रार नव्हती. वसंतराव वकील म्हणून वाकबगार व नामवंत होते. हायकोर्टात सिनिअर वकील म्हणून त्यांचा लौकिक होता. मालतीबाई आई होत्या. त्यांना एक मुलगा व एक मुलगी होती. दोघांची शाळा कॉलेजातील प्रगती विशेषतः गणितातील मार्क, पाहून मालतीबाईंना हर्ष होई. मुलं आपल्या वळणावर न जाता नवर्‍याप्रमाणे हुषार आहेत हे त्यांना आनंददायक वाटे. केव्हातरी आपण मुंबईहून पुण्याला गेलो तर टेकायला स्वतःची जागा हवी म्हणून वसंतरावांनी पुण्याला म्हणजे मालतीच्या माहेरगावी, प्रशस्त फ्लॅट मालतीसाठी घेतला होता. वसंतरावांचं मालतीवर प्रेम होतं. मालतीला दागिने प्रिय होते. वसंतरावांना आपलं प्रेम व्यक्त करणं सोपं झालं होतं. वसंतराव व मालती पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडले की वसंतरावांचे पाय सराफांच्या दुकानात स्थिरावत. दुकानातील दागिने अंगावर चढलेले, मालतीबाई, घरातील पूर्ण उंचीच्या आरशात पाहत.
सर्व दागिन्यांत मालतीबाईंना सर्व स्त्रियांप्रमाणे मंगळसूत्र हा दागिना म्हणजे नवरा अत्यंत आवडता होता. त्यामुळे त्यांना एकच चिंतेचा विषय होता तो म्हणजे वसंतरावांचा ऐसपैस पसरलेला देह. सवयीनं मालतीबाईंच्या डोळ्यांना त्रास होत नव्हता. पण मनाचं काय? त्या रोज चारसहा वृत्तपत्रं वाचत. डॉक्टर-वैद्य वगैरेंची सदरं त्या वाचत व कात्रणं काढून फाइलमध्ये ठेवत. शरीराचा लठ्ठपणा, वाढलेलं वजन हे चार रोगांना आमंत्रण देतं हे त्यांचं मन त्यांना बजावत असे. मालतीबाई लग्नाच्या वेळी होत्या तशाच आजही सडसडीत होत्या. डाएट, व्यायाम अशा सारखे काही खास प्रयत्न त्या करत नव्हत्या. त्यांचं शरीर सहजीच आटोपशीर राहिलं होतं. असते एकेकाला अशी देणगी! आपण कितीही अभ्यास केला तरी गणित हा विषय आपल्याला वश झाला नाही. त्याचप्रमाणे संसार पूर्णपणे सौख्याचा व समाधानाचा असूनही वजनाच्या काट्यावर आपलं शरीर ते सौख्य मिरवत नाही. आपलं वजन पाचसात किलोनी वाढलं तर चालेल, पण आपल्या नवर्‍याचं वजन पंचवीस-तीस किलोनी कमी व्हायलाच हवं असं मालतीला वाटत असे.
पण ते कसं साध्य होणार? आपला नवरा मनसोक्त भजी-बटाटेवडे खाणार, क्रीमची बिस्किटं, आइस्क्रीम, बर्फी, पेढे, श्रीखंड, रबडी असले पदार्थ येताजाता, नव्हे बसल्या बसल्या मुखगत करणार! वारंवार तो आपल्याला विनवणार, मालती, तू करतेस तो खरा, अस्सल साखरभात. इतरांचे साखरभात हे तोतया साखरभात.
आपण शेफारून जाऊन सर्वांकरता भरपूर साखरभात करणार! आपला नवरोबा म्हणणार, तुम्हा तिघांना हवा तेवढा काढून घ्या. नंतर पातेलं मला द्या. अर्ध्याहून जास्त पातेलं हा फस्त करणार व म्हणणार, माले, पुढच्या खेपेला भरपूर साखरभात कर. आज साखरभाताची डिश मिळाली. साखरभात ताटभरून हवा.
खाता खाता, बसल्या बसल्या तो वकिली करणार म्हणजे स्टेनोला डिक्टेशन देणार व भरपूर पैसे मिळवणार. या जन्मी आपल्या नवर्‍याचं वजन काही कमी होणार नाही. बरं तर बरं, वसंतरावांना आज तरी एकही रोग नाही. आपण एवढी वृत्तपत्रे वाचतो. आपणच काहीतरी हालचाल केली पाहिजे.
चारच दिवस गेले. वसंतरावांनी खोटा गंभीर आवाज काढून हाक मारली, मालती, प्लीज, इकडे ये. अर्जंट काम आहे.
मालतीबाई आल्या. वसंतरावांनी त्यांना जवळच्या खुर्चीवर बसायला सांगितलं आणि विचारलं, आपली श्रेया नाचाच्या क्लासला जाते?
हो. गेली दोन वर्षं जाते. का हो? मालतीनं मख्खपणे विचारलं.
मालतीच्या मनात प्रचंड आनंद होता. धमकीचा फोन आपल्या नवर्‍याच्या मनाला बाणाप्रमाणे लागला तर! शेवटी, वकील नवर्‍याचा मेंदू कोल्ह्याप्रमाणे तल्लख असला तरी त्याचं अंतःकरण बापाचं आहे. ते लोण्याप्रमाणे मऊच असणार!
क्लास संपल्यावर ती रात्री नऊला घरी परतते?
होय. क्लासच मुळी सहा ते आठ असतो. क्लासनंतर मैत्रिणीमैत्रिणी चहा-कॉफी घेतात. गप्पागोष्टी करतात. वाजतात नऊ घरी यायला.
नऊ?

यात आश्चर्य वाटण्याजोगं काय आहे? कितीतरी वेळा ती तुमच्या समोरच येते. तुम्ही यापूर्वी कधीही नऊ या आकड्यावर आश्चर्य व्यक्त केलं नव्हतं. आनंद तर दहा वाजता येतो. मालतीनं शब्दाशब्दातून आश्चर्य व्यक्त करण्याचा यत्न कसोशीनं केला. मनातून ती खूष झाली होती. अर्थ स्पष्ट होता. धमकीच्या फोननं वकील साहेबांना चांगलंच हादरवलं होतं. मालतीनं आपल्या बुद्धीनं नवर्‍याचं वजन खाली आणण्याचा सोपा व बिनखर्चाचा मार्ग शोधला होता. आनंद या अभिनयाच्या वर्गाला जाणार्‍या मुलामार्फत वकील साहेबांच्यावर धमक्यांचा वर्षाव करायचा. काळजीनं व चिंतेपोटी माणूस आतून पोखरला की वजन उतरायला तसा काय वेळ लागतो? वसंतराव आपल्याला हवे तसे झाले की त्यांच्या आवडीचा साखरभात करायचा व त्यांना धमक्यांमागचं रहस्य सांगायचं व माफी मागून मोकळं व्हायचं.
आनंदही नाचाच्या क्लासला जातो? वसंतरावांनी विचारलं.
नाही. त्याला अभिनयाची आवड आहे. तो त्या वर्गाला जातो.
मालू, याचा अर्थ आपली दोनही पोरं शिकणार नाहीत. नाच व अभिनय यांच्या जोरावर नोकरी मिळत नाही. शिक्षणाचं काय? दोघांनीही वकील व्हावं, अशी माझी इच्छा आहे.
मिस्टर वसंतराव, खुर्चीत शांत बसा. मी आतून सरबत घेऊन येते. प्या, थंड व्हा व नंतर बोला.
मालतीनं सरबताचे दोन पेले आणले व दोन्ही वसंतापुढं ठेवले. वसंतानं आश्चर्यानं विचारलं, दोन्ही मला? तू एक घे ना.
दोन मुलांमुळं तुम्हाला त्रास होतो. तुमचा मेंदू दमतो. मेंदू थंड होण्यासाठी एक पेला पुरणार नाही, दोन लागतील. तुम्हाला काही जास्तीची माहिती पुरवते. आपली दोनही मुलं शाळेत नाहीत, कॉलेजात आहेत. कॉलेजात प्रवेश मिळवण्यासाठी पंच्याऐंशी टक्के ही कटऑफ मर्यादा होती.
मला आठवलं. प्रवेशाकरता मला काहीही खटपट करावी लागली नव्हती.
याचा अर्थ आपली मुलं हुषार आहेत. ती पदव्या उत्तम प्रकारे मिळवतील. त्यांची इच्छा असेल तर ती वकीलही होतील. नाच शिकणं हा श्रेयाचा व अभिनय हा आनंदचा छंद आहे. तुम्हाला पैसे मिळवण्याचा व माझ्या अंगावर दागिने चढवण्याचा छंद आहे. तुम्ही पैसे हातपाय न हलवता, बसल्या जागी वकिलीची कामे करून मिळवता.
चूक. दागिने तुला शोभून दिसतात. तू खूप छान दिसतेस. तुला पाहणं हा माझा छंद आहे. पैसे मी मिळवतो ते तुला दागिन्यांत नटलेली पाहण्यासाठी.
बोलता बोलता, वसंतरावांनी चेहर्‍यावर गंभीरपणाचा मुखवटा चढवला. कोणत्याही अभिनयवर्गाला न जाता वसंतरावांना हे सहज जमलं. सर्वच वकिलांना प्रॅक्टिस करता करता ही अभिनयकला प्राप्त होते. खोटं कोर्ट सहज बोलता येतं.
वसंतरावांनी आरंभ केला, मालू, हा आकडा बघ. मी कोर्‍या कागदावर नीट लिहून घेतला आहे. 92146200003712 हा आकडा व रक्कम फक्त पाच लाख रुपये. याचा अर्थ काय?
मालतीबाईंना पूर्ण अर्थ माहीत होता. घरातील कपाटात नवर्‍याचे कागदपत्र असतात. त्यातून मालतीबाईंनी बँकेची एक ठेवपावती घेतली होती. सर्व आकडे त्यांनी आनंद या आपल्या मुलाला दिले होते. व आवाज बदलून खंडणी मागणार्‍या गुंडाची भूमिका फोनवरून वठवायला सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्षात मालूनं विचारलं, या आकड्यांचा व पाच लाख रुपयांचा संबंध काय? मला काहीच माहीत नाही.
संबंध आहे. 0092146200003712 हा बँकेतील माझ्या एका ठेव पावतीचा क्रमांक आहे. ठेव पावती 50 लाख रुपयांची आहे. पण खंडणी मागणार्‍या मूर्ख व दुष्ट गुंडानं पहिली दोन शून्यं वगळली आहेत. वरती 50 लाख रुपयांची पावती त्याला 5 लाखांची वाटते आहे.
मालतीला नवर्‍यानं आपल्याला मुर्ख व दुष्ट म्हणावं याचा सरळसरळ संताप आला. मालतीनं विचारपूर्वक सर्व बदल केले होते. त्यांना खंडणी मागणार्‍या गुंडाची बाजू घेणं भाग होतं, गुंड हुषार आहे. पहिल्या दोन शून्यांना किंमत नाही हे त्या हुषार गुंडाला माहीत होतं. म्हणून तर त्यानं पहिली दोन शून्यं वगळली. मी आता तुम्हाला पटवते. मी तुम्हाला 001 रुपये देते. म्हणजे फक्त एक रुपया देते. तुम्ही मला 100 रुपये द्या. तुम्हाला 99 रुपयांचा फटका बसला की आकड्यापूर्वीच्या शून्यांना किंमत नाही हे तुम्हाला पटेल.
मालती, ठेव पावतीवरच्या सोळा आकड्यांतून रक्कम दाखवलेली नाही. तो कोड नंबर आहे. आपण सोसायटीच्या वॉचमनना इंटरकॉमवरून 099 क्रमांकावरून फोन करतो. आकड्यापूर्वीच्या शून्याला किंमत नाही असा विचार करून तू नुसत्या 99वर फोन करून बघ. वॉचमनच्या फोनची रिंग वाजणारच नाही. खंडणी मागणार्‍या दुष्ट गुंडाला मी मुर्ख दुसर्‍या कारणाकरता म्हणालो.
कोणत्या?
पन्नास लाखांची ठेवपावती आहे. ती मोडा अशी दमदाटी करून, तो गुंड माझ्याकडे फक्त पाच लाख रुपये मागतो आहे. या मूर्खपणाला काय म्हणावं?
कनवाळूपणा. सगळे पन्नास लाख काढून घेतले तर तुम्हाला केवढा धक्का बसेल याचाही गुंडानं विचार केला असणार. औषधाच्या गोळ्या रोज एक याप्रमाणे घेतल्या तर गुण येतो. महिन्याच्या तीस गोळ्या एकाच दिवशी घेऊन अपाय होईल, उपाय बाजूलाच राहिला! तो गुंड तुम्हाला पाच पाच लाख रुपयांच्या दहा धमक्या देणार असेल, पाच दाहे पन्नास.
मालतीच्या खंडणीबाबतच्या भाबड्या व प्रेमळ कल्पना ऐकून वसंतराव एवढे खूष झाले की तिच्याकरता, पाच लाख रुपयांचा एक दागिना उद्या खरेदी करायचाच हा निर्णय घेऊन ते मोकळे झाले. उद्याचं उद्या, पण आजचं वकिली प्रश्नोत्तराचं मजेचं काम आपण पुरं केलं पाहिजे. त्यांनी आरंभ केला, मालती हा प्रकार साधा नाही. आतापर्यंत मला राकट, दणकट भाषेत दोन फोन आले. फोनवरचा गुंड मला म्हणाला, वकील साहेब, तुमची श्रेया ही मुलगी रात्री 9 वाजता घरी पोचते. ती सुखरूप घरी पोचावी अशी इच्छा असेल बँकेतील तुमची ठेव पावती मोडा व मला पाच लाख रुपये द्या. पावतीचा नंबर लिहून घ्या. मालू, मी मुकाट नंबर लिहून घेतला. गुंडाचा आवाज मग्रूर होता, भय वाटावे असा होता.
मालतीला आनंद या आपल्या मुलाच्या कामगिरीचा अभिमान वाटला.
मालती, मी पल्याला फोन करतो. त्याला सर्व सांगतो. वसंतराव म्हणाले.
मालतीनं दटावलं. असं बोलू नये. पल्या म्हणायचं नाही. पोलीस इन्स्पेक्टर धोंड म्हणावं. माझी भावना ओळखून धोंडभाऊजी तुम्हाला वश्या म्हणत नाहीत. वकीलसाहेब म्हणतात. तुम्ही शाळेत एका बाकावर बसणारे घट्ट वर्गमित्र होता, हे मला माहीत आहे. पण आज तुम्ही दोन मुलांचे बाप आहात. बापाप्रमाणे बोला.
ठीक आहे, ठीक आहे. मी हे प्रकरण पोलीस इन्स्पेक्टर धोंड साहेबांच्या कानांवर घालतो, वकील साहेबांनी माघार घेतली.
मालती चपापली. या प्रकरणात धोंडभाऊजी येणार? म्हणजे आपला मूळ उद्देश मागं पडणार! धोंड भाऊजी काय करणार हे मालतीला धोंडाच्यामुळं माहीत होतं. मालती म्हणाली, तुम्ही गुंडाची काळजी सोडा. आता त्या गुंडाचा फोन येणार नाही, मी स्वतःच रोज नाचाचा क्लास सुटायच्या वेळेला जाईन व श्रेयाला घेऊन येईन. मुलीबरोबर खुद्द आईच आहे हे पाहिल्यावर गुंड पुन्हा फोन करायची हिंमत दाखवणार नाही. आनंद आपलं बोलणं ऐकणार हे आईला माहीत होतं.
मालतीनं अशी एकदम माघार घेतली याचं वसंतरावांना आश्चर्य वाटलं. पण वसंतराव व धोंड यांच्या गप्पा कित्येक वर्षं मालती ऐकत होती. धोंड म्हणत, वकीलसाहेब, गुन्हा घडला अशी तक्रार आली की प्रथम तपास त्या घरापासूनच करायचा. दागिने चोरीला गेले अशी तक्रार आली की प्रथम त्या घरातील कोणी जुगारी आहे का याचा तपास करायचा. जुगारात गेलेल्या पैशाचे कर्ज फेडण्यासाठी चोरी झाली असते किंवा नवर्‍याचीच बाहेर कोणी मैत्रीण असते. मैत्रिणीला खूष करण्याकरता नवरोजीनीच बायकोचे दागिने चोरलेले असतात.
आपला नवरा खंडणीचे फोन आले हे सांगणार व ठेवपावतीबाबत बोलणार. मग काय? इन्स्पेक्टर धोंड पावतीवरचे बोटांचे ठसे माझे व आनंदचे आहेत, हे जाहीर करणार. आपल्या हितकारक योजनेवर पाणी पडणार!
रात्री जेवणाच्या टेबलावर वसंतरावांनी जाहीर केलं, उद्या सकाळी धोंड येणार आहेत.
मालतीचा चेहरा उतरला. आनंदला काय झालं याचा अंदाज आला. आईची धमक्यांवर धमक्या देऊन, बाबांना घाबरवून त्यांचं वजन खाली आणण्याची कल्पना बालिश आहे हे आनंदला जाणवलं होतं. ते त्यानं बोलूनही दाखवलं होतं. पण आईला ते पटलं नव्हतं. आई म्हणाली होती, मी आई, तू माझा मुलगा, तुला रांगायला, चालायला मी शिकवलं. माझंच बाळ मला बालिश म्हणतं आहे! करून तर पाहू. पंधरा दिवसात, तुला योजना यशस्वी झालेली दिसेल.
उद्या सकाळी होणारी आईची फजिती टाळण्यासाठी आनंदनं माफीचा साक्षीदार होण्याचं ठरवलं. तो म्हणाला, मी कबूल करतो. तुम्हाला धमक्यावर धमक्या देऊन तुमचं वजन कमी करण्याची थर्ड क्लास, भोपू कल्पना माझी आहे. आई मला म्हणाली होती की, आनंद, तुझे वडील निष्णात वकील आहेत. त्यांच्याशी खेळू नकोस. वरती इन्स्पेक्टर धोंड त्यांचे वर्गमित्र आहेत. आपली ते फटफजिती करतील.


आनंद या मुलानं आपली बाजू घेतली हे मालतीला समजलं. मग ती का म्हणून मागं राहील? मालती म्हणाली, म्हणून तर मी आनंदला म्हणत होते. वजन कमी करण्याचा, धष्टपुष्ट व बळकट होण्याचा एकमेव मार्ग आहे, भरपूर व्यायाम व पौष्टिक मिताहार. गोड खाणे जिभेला आवडते, पण ते शरीराला हानीकारक आहे. आपण तिघांनी वसंतरावांना त्यांचे पाय धरून सांगितलं पाहिजे, तुम्ही केवळ कुटुंबप्रमुख नाही, कुटुंबाचा आधार आहात!
श्रेया म्हणाली, बाबा, आईचं म्हणणं बरोबर आहे. तुमची दहा कामं मला सांगा. मी ती आनंदानं करीन. पण तुमच्या ऐवजी मी व्यायाम करून कसं चालेल? तुमचा व्यायाम तुम्हीच केला पाहिजे. मी तुमच्यासाठी उपासही करेन. गोड खाणं कायमचं सोडेन. पण त्यामुळं तुमचं वजन थोडंच कमी होणार आहे?
थांबा, मी आलेच. असं म्हणत मालती आत गेली व दागिन्यांची पेटी घेऊन आली. पेटी नवर्‍यापुढं ठेवत ती म्हणाली, अहो, हे सारे दागिने घ्या. मला दागिन्यांची आवड आहे, हे खरं आहे. पण स्त्रीचा सर्वात मौल्यवान दागिना म्हणजे मंगळसूत्र म्हणजेच नवरा. माझी हात जोडून विनंती आहे. वजन कमी करा. शरीराचं स्वास्थ्य महत्त्वाचं. तुमचं वजन कमी होईपर्यंत मी अंगावर एक दागिना चढवणार नाही. तुम्हाला ओकीबोकी मालूच पाहावी लागेल. मालतीचे डोळे डबडबले होते.
वसंतराव म्हणाले, उद्या सकाळी मी फिरण्यासाठी बाहेर पडतो. मी तुम्हा सर्वांना वचन देतो. उद्यापासून, नव्हे आजपासूनच, गोड खाणंही बंद. वजन कमी करीन. तुम्हा सर्वांची माझ्या प्रकृतीबद्दलची काळजी मला समजली. तुमच्या प्रेमामुळं व धमक्या देण्याचा आनंदला त्रास नको म्हणून मी हा निर्णय घेतला आहे.
दुसर्‍या दिवसाची भली सकाळ उजाडली. वसंतराव फिरण्यास योग्य असा साधा, सुटसुटीत पोशाख चढवून तयार झाले. तेवढ्यात पोलीस इन्स्पेक्टर धोंड हजर झाले. त्यांचं स्वागत करत, थोड्या कोरड्या व करड्या आवाजात मालती म्हणाली, भाऊजी, बसा. मी तुमच्यासाठी चहा आणते. पण प्लीज, यांना थांबवू नका. गप्पात गुंतवू नका. कधी नाही ते आज यांनी रोज फिरायला जाण्याचा निश्चय केला आहे. त्यात मोडता आणू नका. प्लीज.
धोंड म्हणाले, मी गप्पा मारायला आलो नाही. वसंता व मी आजपासून रोज सकाळी फिरायला जाणार आहेत. वहिनी, परवा आदितीनं माझ्या समोर तिचा दागिन्यांचा डबा आदळला व म्हणाली, मला तुमचे दागिने नकोत. स्त्रीचा खरा दागिना म्हणजे तिचा नवरा. नवर्‍याकरता आम्ही मंगळसूत्र हा दागिना गळ्यात अभिमानानं मिरवतो. तुम्ही पोलीस खात्यातील. लग्न केलं तेव्हा तुम्ही किती बांधेसूद होता. आता पोत्यासारखे झाला आहात! तुमच्या खिशातील पाकीट घेऊन चोर पळाला तर तुम्ही त्याला पकडू शकणार नाही. पोलीस खात्यात भरती होताना, वजनाच्या उंचीच्या दहा अटी असतात. त्या तुम्हाला आज लावल्या तर तुमची नोकरी जाईल! उद्यापासून फिरायला जा. लग्नाच्या वेळी होता तसे व्हा व नंतर ते दागिने मला द्या.
वहिनी काय सांगू? माझ्याकडे पिस्तूल आहे, पण गोळ्या आदितीच्या तोंडातून सुटत होत्या. बचाव करण्याकरता मी वकील मित्राकडे धाव घेतली. वसंता म्हणाला, उद्यापासून आपण दोघं मुकाट वजन उतरवण्याच्या कठीण मार्गावरून चालू. बायकोच्या अंगावर दागिने पाहायचे असतील तर आपण आपलं अंग प्रमाणात आणलं पाहिजे. म्हणून तर आलो आहे.
मालतीला धन्य धन्य वाटलं. म्हणजे आपण एकट्या नाही तर! सर्वच बायकांना प्रथम सडपातळ, मंगळसूत्राला शोभेसा, नवरा हा दागिना हवा असतो. दागिन्यांचा डबा नको असतो असं नाही, पण प्रथम नवरा हा बांधेसूद दागिना हवा!